लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले.
या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!
या पुस्तकात सतत, पानोपानी जाणवणारी गोष्ट म्हणजे गाडगीळांचे फक्त निसर्गावरचे नाही, तर माणसांवरचे प्रेम – सामान्य माणसावरचे प्रेम. कुठलीही जात, धर्म, वंश, रंग, लिंग यापलिकडे जाऊन सर्व माणसांवर या माणसाने निखळ, निस्वार्थीपणे प्रेम केले. तळागाळातल्या माणसाबद्दलही त्यांची कळकळ पानोपानी दिसून येते. विकासाच्या नावाखाली आज जी जंगलतोड चालली आहे ती त्यांना मान्य नाही. खाणी काढणे, रस्ते रुंद करणे आणि अशाच गोष्टींसाठी जंगल तोडणे, एवढेच नाही तर लोकांना विस्थापित करणे हे त्यांना मान्य नाही, हे ते अनेक ठिकाणी ठासून सांगतात. हा शाश्वत विकास नाही हे ते आपल्याला पटवून देतात आणि निसर्गाची, पर्यावरणाची, बायोडायवर्सिटीची काळजी/रक्षण करत असतानाही विकास होऊ शकतो, लोकांना रोजगार मिळू शकतो आणि विकास करताना जनतेकडून ओरबाडून, हिसकावून घ्यायला पाहिजे असे नाही हे ते सिद्धच करून दाखवतात. त्यामुळे हे फक्त ‘सह्याचला’ रहात नाही तर ‘विश्वाचला’ होते.
हे पुस्तक म्हणजे माधव गाडगीळ यांची फक्त आत्मकथा नाही; तर शाश्वत विकासाचा एक जिवंत परिपाक आहे. यात ते त्यांचे अनुभव तर सांगतातच, पण त्यातून ते आपल्याला पर्यावरण आणि शाश्वत विकास यांच्याविषयी धडेच देतात. त्यामुळे या विषयांवरचे हे एक पाठ्यपुस्तकही आहे असे म्हणावे लागेल.
अनेक वेळेला माणूस प्रचंड बुद्धिमान असला की आपल्या खोलीत, ऑफिसमध्ये किंवा प्रयोगशाळेत बसून संशोधन करत बसतो. पण विलक्षण बुद्धिमान असूनही गाडगीळ ह्यांनी विश्व हीच त्यांची प्रयोगशाळा केली. किती गोष्टींची त्यांनी निरीक्षणे करावीत? अनेक माश्यांची, पक्ष्यांची, प्राण्यांची, कीटकांची, वनस्पतींची आणि माणसांची निरीक्षणे त्यांनी भारतातच नाही तर जगभर केली. त्याकरता त्यांनी केलेली पायपीट, कुठेही रहाण्याची, झोपण्याची आणि गावकऱ्यांबरोबर मिळून-मिसळून शोध घेण्याची त्यांची वृत्ती बघितली की चक्क थक्क व्हायला होते! किती प्रवास करावा आणि किती अनुभव घ्यावेत या माणसाने? त्यांचे आयुष्य बघितले की आपल्याला आपली लाज वाटायला लागते. आपण थोड्याथोड्या गोष्टींनी खचतो. पण गाडगीळ कधीच खचले नाहीत. याचे कारण त्यांचे कुतूहल आणि संशोधनवृत्ती सतत त्यांच्याबरोबर होती. ते सतत विद्यार्थी राहिले आणि आज ८०व्या वर्षीही ते सतत शिकत असतात. कॉम्प्युटर आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा त्यांचा आग्रह असतो.
हे सगळे ते कसे करू शकले याचे रहस्य त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्यांच्या बालपणीच्या संस्कारामध्ये उलगडते. धनंजयराव गाडगीळांच्या घरात ते जन्मले. धनंजयरावांना पक्षीनिरीक्षणाची खूप आवड होती. त्यातून माधव गाडगीळ यांची सलीम अली यांच्याबरोबर ओळख आणि मैत्री झाली आणि मग खूप भटकणे आणि पक्षीनिरीक्षणेही झाली. त्यांच्या घरी मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा प्रचंड साठा होता. त्याचा माधव गाडगीळांनी फडशा पाडला होता. धनंजयराव लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि सहकार अशा अनेक गोष्टी मानणारे होते. अशा संस्कारात माधव गाडगीळ वाढले. लहानपणी बैलगाडी चालव, शेतातली कामे कर, मोटेने पाणी पोहोचव हे सगळे त्यांनी केले. त्यानंतर सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांच्याबरोबर भटकंती, कानडी शिकून त्यावर प्रभुत्व, सलीम अलींबरोबर सुगरणीच्या अफलातून कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास, शिक्षणाबरोबर पोहणे, टेनिस, स्कॉश, उंच उडी, धावणे अशा सगळ्यांमध्ये प्राविण्य, शिक्षण आणि खेळ यांच्याबरोबरच संगीत आणि साहित्य यांच्याविषयी प्रचंड प्रेम, फुले, आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, जे.बी.एस. हाल्डेन यांचा प्रभाव, मग हार्वर्डसारख्या ग्रेट विद्यापीठात प्रवेश, स्कॉलरशिप, विवाह, तिथे ई.ओ. विल्सन या प्रसिद्ध वैज्ञानिकांचे मार्गदर्शन, उत्क्रांती, तसेच कीटकशास्त्र, मासे अशा अनेक विषयांत अभ्यास आणि संशोधन, अमेरिकेत अनेक संधी असूनही भारतात परत येऊन पुढचे काम आणि संशोधन करण्याचा निश्चय हे सगळेच खूप रंजक आणि आश्चर्यजनक आहे.
इमर्जन्सीमध्ये त्यांनी लिहिलेला लेख, त्यावर आक्षेप घेतला जाणे, त्याला माधव गाडगीळांनी विरोध करणे, सतीश धवन यांनी त्यांना पाठींबा देणे हे बघताना खूपच मजा येते.
आपल्याला माधव गाडगीळांनी ‘पश्चिम घाटा’च्या संदर्भात केलेले काम माहीत आहे. पण त्याअगोदर त्यांनी काय काय करावे? कुठे कुठे चित्रविचित्र ठिकाणी जाऊन रहावे, निरीक्षण आणि संशोधन करावे हे बघून खरोखरच थक्क व्हायला होते.
एकूण हे पुस्तक खरेच अफलातून आहे. यातली भाषा इतकी चांगली आहे की वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही. पुस्तकाची मांडणी, कव्हर आणि आतले फोटो हे सगळे अप्रतिम आहे. इतके सुंदर पुस्तक वाचकांना सादर केल्याबद्दल राजहंस प्रकाशनाचे आणि माधव गाडगीळांचे अभिनंदन!
हे पुस्तक सगळ्यांनी वाचलेच पाहिजे. निसर्गप्रेमींनी, पर्यावरणवादींनी, विकासाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी आणि खरे तर सगळे पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे असे मला वाटते.