नास्तिकता समाजात अजून रुजलेली नाही

नास्तिकतेचा विचार भारतामध्ये शेकडो वर्षांपासून आहे; पण आपल्याकडे नास्तिकता अद्याप रुजलेली नाही. नास्तिकतेचा विचार करणाऱ्यांना आजही एकटेपणाची भीती वाटते. समाजात तुटल्यासारखं वाटतं. जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात, त्यांचा लढा खरेतर आस्तिकांच्या विरोधात नसतो, तर तो आस्तिक विचारांच्या विरोधात असतो. आगरकर नेहमी म्हणायचे की विचारकलहाला कशाला घाबरायचं?

नास्तिक आपले विचार ठामपणे मांडून देवा-धर्माची चिकित्सा करतात आणि आस्तिकांनाही विचार करायला प्रवृत्त करतात. पण याचा अर्थ आस्तिकांशी त्यांचा लढा असतो असा होत नाही. आस्तिक असणाऱ्यांनी विचार करावा, आपल्या काही चुकीच्या समजुती आहेत, रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या टाळाव्यात ह्यासाठी नास्तिक पुढाकार घेऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करत असतात. एरवी नास्तिक म्हणजे कुणी मोठे विद्वान असतील अशातला भाग नाही. त्यांना फक्त विचारांची दिशा कळलेली आहे आणि ती ज्यांच्याकडे नाही त्यांना ती दाखवणं महत्त्वाचं आहे.

नास्तिकतेची पायरी विवेकवादाकडे जाणारी आहे. म्हणून नास्तिकतेची ठाम भूमिका घेऊन ब्राईट्स सोसायटी गेली दहा वर्षं काम करत आहे. जी माणसं आयुष्यभर नास्तिकतेची भूमिका घेऊन लोकांमध्ये विवेकवाद रुजवायचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांसाठी ब्राईट्स संस्थेतर्फे ‘चार्वाक’ पुरस्कार दिला जातो. एकप्रकारे हा त्या कार्यकर्त्याचा जीवनगौरव पुरस्कारच असतो. आपल्याला माहीतच आहे की, आपल्या भारतीय परंपरेत चार्वाक हा आद्य-नास्तिक समजला जातो. तर असे लोक, ज्यांनी आयुष्यभर समाजाविरोधात दोन हात करून प्रवाहाचा विरोध सहन करून नास्तिकतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यासाठी हा ‘चार्वाक’ पुरस्कार असतो.

आपण पाहतो आहोत की गेल्या दहा वर्षांत सामाजिक परिस्थिती प्रचंड विस्कळीत झालेली आहे. धार्मिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, परधर्मद्वेष वाढवला जात आहे. आणि ह्या सगळ्याला राष्ट्रप्रेमाची जोड दिली जात आहे. अशा परिस्थितीत नास्तिकतेचा विचार मांडणाऱ्याला धर्मद्रोही/धर्मद्वेषी समजले जाते, देशद्रोही समजले जाते आणि त्याच्या विरोधात अनेकदा केसेस पण केल्या जातात. याचा अनुभव आपल्यातील काही कार्यकर्त्यांना आलेला आहे. तरीसुद्धा न डगमगता, काही मंडळी हा सगळा विरोध अंगावर झेलून धाडसाने देवाधर्माची संपूर्णपणे चिकित्सा करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा जी पुढची पिढी धाडसाने हे काम करत आहे, त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी ‘मधुरजग’ पुरस्कार दिला जातो. 

मी तुम्हा सगळ्यांना या परिषदेच्या निमित्ताने एक ग्वाही देऊ इच्छितो की, प्रवाहाच्या विरोधात कार्य करीत असतांना तुम्ही एकटे नाही आहात. समाजाला घाबरून तुम्ही प्रकट व्हायचं टाळू नका. आस्तिक लोक आपले आस्तिकत्व खूप मोठ्या प्रमाणात मिरवत आहेत, असतात. मग नास्तिकांनी आपलं नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठं? उलट आपण नास्तिक झालो म्हणजे विचार करून परिवर्तित होतो आहोत आणि लोकांनाही विचारांनी परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ह्या देव-धर्म चिकित्सेच्या लढ्यात ब्राईट्स सोसायटी कायम तुमच्या सगळ्यांसोबत आहे. नास्तिक म्हणून तुम्ही एकटे नाही आहात, हीच ग्वाही आज मी देऊ इच्छितो!

धन्यवाद.

ह्या भाषणाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नास्तिकता समाजात अजून रुजलेली नाही

अभिप्राय 1

  • सर तुमचा लेख सुंदर आहे .
    जे लोक घाबरे आहेत त्यांना देव धर्म रूढी परंपरा यांची गरज भासत आहे .
    आपण जो संघर्ष करीत आहात त्यासाठी salute

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.