‘आजचा सुधारक’च्या जुलै २०२३ च्या कृत्रिमप्रज्ञा विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या अंकाच्या मनोगतात आम्ही लिहिले होते की,
आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा मोकळा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या मनाला आणि बुद्धीलाच गुंतवून टाकले आहे. एवढेच नव्हे तर माणसाच्या विचारांना दिशाही तीच देते आहे.
मानवाची आजवरची वाटचाल/प्रगती ज्या अंगभूत गुणांमुळे, जसे जिज्ञासा, कल्पकता, सर्जकता, इत्यादींमुळे झाली, ते गुण कृत्रिमप्रज्ञेच्या वाढत्या उपयोगामुळे निकामी तर होणार नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु ह्या अंगभूत गुणांचा वापर आणि विकास औपचारिक शिक्षणातून होणे शक्यही नाही कारण प्रचलित शिक्षणपद्धतीचे उद्दिष्ट गुणवत्ता राहिले नसून गुण (मार्क्स ह्या अर्थी) आणि त्यातून मिळणारा रोजगार यापुरते मर्यादित झाले आहे. अर्थात्, आडात आहे पण पोहऱ्यात आणता येत नाही अशी काहीशी आपली स्थिती झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षणातील गुणवत्ता हा विषय ऐरणीवर येणे क्रमप्राप्त होते.
‘आजचा सुधारक’च्या ह्या अंकात शिक्षणातील गुणवत्तेवरील लेखांमधून बरेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण विचार समोर आले आहेत. लेखांचे आणि अंकाचे खरे मोल वाचकांनीच ठरवावे.
प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक
सुरेख अंक. विषय चांगले. नीट वाचून अभिप्राय देतो.
मनःपूर्वक आभार. आपल्या अभिप्रायांची प्रतीक्षा राहील. आपण टाकलेले अभिप्राय थेट लेखकापर्यंत पोहोचतात. वाचकांचा प्रतिसाद ही लेखकाला मिळालेली पावतीच असते.
‘आजचा सुधारक’ची लिंक आपल्या इतर परिचितांपर्यंतदेखील पोचवा. आपले हे योगदान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
विषय चांगले. सुरेख अंक. नीट वाचायचा आहे.
आक्टोंबरच्या अंकाची आतुरतेने वाट पहात होतो, तो आज मिळाला. धन्यवाद! या अंकाच्या मनोगतात गत अंकातिल विषया बद्दल लिहिले आहे ते मनाला पटले. कृत्रिम प्रज्ञेमुळे व्यक्तिच्या अंगभूत गुणांना खच्ची केल्यासारखे वाटते. या अंकाचा विषय सद्यपरिस्थितीत योग्य असाच आहे. मला हा विषय अगोदर समजला असता, तर नक्कीच व्यक्त झालो असतो. हा अंक वाचल्यावर प्रत्येक लेखाबद्दल माझ्या प्रतिक्रिया देईनच. अंक पाठवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!