‘आजचा सुधारक’च्या जुलै २०२३ च्या कृत्रिमप्रज्ञा विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या अंकाच्या मनोगतात आम्ही लिहिले होते की,
आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा मोकळा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या मनाला आणि बुद्धीलाच गुंतवून टाकले आहे. एवढेच नव्हे तर माणसाच्या विचारांना दिशाही तीच देते आहे.
मानवाची आजवरची वाटचाल/प्रगती ज्या अंगभूत गुणांमुळे, जसे जिज्ञासा, कल्पकता, सर्जकता, इत्यादींमुळे झाली, ते गुण कृत्रिमप्रज्ञेच्या वाढत्या उपयोगामुळे निकामी तर होणार नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.