मानव जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा विचारप्रवास/विचारप्रवाहसुद्धा प्रगत होत जाणे अगदी स्वाभाविक तथा क्रमप्राप्त असते. अशा विचार-प्रगती-प्रवासा/प्रवाहादरम्यान कोणत्याही विचारांना त्यांच्या ‘असण्या’तील ‘आखूडदोषी-बहुगुणीपणा’ची कसोटी पार पाडावी लागते. आखूड का असेनात, अंतर्निहित दोषांना पार करून व बहुगुणीपणाची लस टोचूनच विचारांच्या प्रवासा/प्रवाहात प्रगती संभव असते. विचारप्रवास व विचारप्रवाहातील ही कसोटी पार करू न शकणारे विचार कालबाह्य तथा मानवप्रगतीच्या दृष्टिकोनातून सर्वंकषविकासरोधी होऊ लागतात. अर्थातच अशा कालबाह्य व विकासरोधी विचारांना कवटाळून असलेल्या/असणाऱ्या साऱ्या (विचार)’पद्धती’ निसर्गसंमत/निसर्गाधारित/निसर्गानुकूल मानवविकासाला बाधकच नव्हे तर घातकही ठरू लागतात. असे असले तरी विज्ञानाधारित व निसर्गचक्राला, सुसंगत विचारांना प्राणशून्य करून अशा प्राणशून्य विचारांच्या शववाहकांची समाजातील संख्या व शक्तीसुद्धा नाकारून चालणार नाही.
इतिहास आणि परंपरा या संज्ञा आणि संकल्पनासुद्धा अशा ‘आखूडदोषी बहुगुणीपणा’च्या कसोटीवर घासूनपुसूनच स्वीकार्य ठरवाव्या लागतात. अशाप्रकारे परमावश्यक व निसर्गचक्रसंमत असलेल्या कसोटीवर घासूनपुसून व त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडणाऱ्या इतिहास व परंपरेच्या संज्ञा आणि संकल्पनाच सर्व मानवहिताला आणि मानवाच्या सर्वंकष विकासाला संपूरक ठरू शकतात. त्यामुळेच अशा सर्व ऐतिहासिक व पारंपरिक संज्ञा व संकल्पनांतील, आखूड का असेनात, दोष विसर्जित करून त्यातील अवशिष्ट बहुगुणीपणाची वैशिष्ट्य जपणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा अशा इतिहास आणि परंपरांच्या कालविसंगत आणि प्राणशून्य संज्ञा आणि संकल्पनांच्या शववाहकांची संख्या ‘चार’हून अधिक व्हावयाला वेळ लागत नाही. आणि अशा शववाहकांची संख्या व शक्ती वाढत गेल्यास शेवटी मानवाच्या अस्तित्वाची अकाट्य ठरू पाहणारी अवनतीची व विनाशाची प्रलयावस्था आकारू लागते. विविध धर्मांच्या विविध धर्मग्रंथांतून सांगण्यात आलेली प्रलयावस्था ती हीच, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मानव आपल्या दोन पायांवर केव्हापासून उभा राहायला शिकला हा संशोधनाचा/डार्विनप्रणीत सभ्यताविकासाच्या अभ्यासाचा विषय असेल, परंतु हाच मानव-भार पेलणाऱ्या दोन पायांचे उदाहरण देऊन आपल्याला मानवीय विचार-प्रवास/प्रवाहाच्या आखूडदोषी बहुगुणीपणाचे साधे विश्लेषण मांडता/करता येईल. मानवाच्या या दोन पायांपैकी उजवा पाय हा इतिहास व परंपरेचा आणि डावा पाय हा मानवी-विचार-प्रवास/प्रवाहाचा द्योतक असे मानल्यास आपल्याला ही मांडणी एका साध्या उदाहरणाने साध्य/स्पष्ट करता येईल. ती अशी की, हा उजवा पाय ‘शक्यतो’ घट्ट रोवत डावा पाय ‘काळाबरहुकूम’ गुडघ्यात वळवत, सध्याच्या सुप्रसिद्ध ‘नाटू नाटू …’ या गीतावरील ड्युएट नृत्यासारखे, वर नमूद दोन्ही पायांनी लयबद्ध तथा विवेकनिष्ठ भानपूर्वक थिरकणे/नृत्य करणे म्हणजे जणू मानवेतिहासाच्या ऐतिहासिक व पारंपरिक प्रवास/प्रवाहासोबतच मानवाच्या विचार-प्रवास/प्रवाहाच्या आखूडदोषी व बहुगुणीपणाच्या कसोटीचे अनुसरण करणे होय असे म्हणता येईल, असे माझे अल्पबुद्धी-आकलन आहे.
बदल/परिवर्तन हा निसर्गाचा स्थायीभावच असल्याने कोणताही विचारसुद्धा या सर्वशक्तिमान व शाश्वत अशा निसर्गप्रणीत बदल/परिवर्तनाला सापेक्ष असणे क्रमप्राप्तच ठरतो. म्हणूनच कोणताही विचार हा सदैव १०० टक्के लागू व/वा सर्वंकषरीत्या सर्वसंमत/सर्वमान्य तथा पूर्णतः बहुगुणी असण्याच्या प्रमेयाची मांडणी करणे व तसा पुरस्कार करणे, म्हणजे जणू वदतोव्याघातच ठरतो. शाश्वत सत्य हे कालनिरपेक्ष व बदलनिरपेक्ष असण्याची बाब निरपवादपणे सिद्ध करणे विचार-सापेक्षतेच्या वर नमूद स्थायीभावाच्या प्रकाशात अजूनतरी शक्य झाल्याचे ऐकिवात नाही. भौतिकशास्त्रातील अनिश्चिततेचे तत्त्व व तज्जनित अद्ययावत वैज्ञानिक संशोधन व त्यातील निष्कर्षांचा सापेक्षतेने विचार करता १०० टक्के बहुगुणी विचार हा आखूडदोषी या न्यूनतेसोबतच विचारार्ह आणि मान्य होण्यालायक ठरतो ही बाब स्पष्ट व्हावी.
अशा या मूलतः नैसर्गिक पद्धतीने प्रसवणाऱ्या व स्थायीभाव असलेल्या बदल/परिवर्तनाला सुसंगत ठरणाऱ्या विचारपद्धतीमध्ये सध्या एआयने (कृत्रिम-बुद्धिमत्ता/प्रज्ञा) जो प्रारंभिक धुमाकूळ घातला आहे त्याची गंभीर दखल घेणे आज प्रत्येक विचारवंतासाठी परमावश्यक ठरू लागले आहे. नैसर्गिक पद्धतीने व प्रक्रियेनुसार प्रसवणाऱ्या विचारपद्धतीत होणाऱ्या/होऊ घातलेल्या बदल/परिवर्तनाची गती ही संथ/मंद होती. परंतु सध्याच्या या ‘उजाखो’त्तर, सत्योत्तरकालीन संगणकीय व कृत्रिम-बुद्धिमत्तामय युगातील विचार व विचारपद्धतींत होणाऱ्या/होऊ घातलेल्या बदल/परिवर्तनाची गती प्रकाशाच्या गतीशी शर्यत लावायला तयार बसली आहे. अशावेळेस विचारांतील बहुगुणीपणाला आखूडदोषीचे अवगुण वेळोवेळी व जागोजागी अडथळे आणू शकण्याची साधार शक्यता मानवापुढे आ वासून उभी आहे. यात एक जीवघेणी स्वरूपाची मेख अशी की विचार करण्याच्या कोणत्याच भानगडीत(?) न पडता सरळ कृत्रिमप्रज्ञेच्या माध्यमातून अंतिम निष्कर्षाप्रत पोचण्याची अभागी मानवी वृत्ती बळावून बदल/परिवर्तनाची संभाव्य शक्यताच शून्यवत होईल. अशावेळेस विचारांतील बहुगुणी आखूडदोषीपणाची कसोटीसुद्धा मग अर्थन्यून व पर्यायाने असंबद्ध ठरेल. तेव्हा मग विचार करण्याचा एकाधिकार मक्ता कृत्रिमप्रज्ञेवर सोपवून मानव एक कठपुतळी/बाहुलीच ठरण्याची वेळ आली असेल, असे माझे अल्पबुद्धी-आकलन आहे.
अशी ही विचार आणि आखूडदोषी बहुगुणीपणाच्या कसोटीची (कृत्रिम-बुद्धिमत्ता/प्रज्ञेच्या प्रकाशात) संक्षिप्त टिप्पणी विचारवंत व बुद्धिवंत वाचकांच्या साधकबाधक विचारार्थ सादर करण्यात येत आहे.
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
lskatre55@gmail.com
AI is a discovery(?invention),made by man.Natural biological intelligence is observed in all livings,.and it’s depth (complicatedness ?) increases from unicellular to multicellular, from aquatic living things to reptiles,to birds and finally human being.
AI,is a nonliving entity,made by intelligent living animal(=man)….but it has flaws,and limitations…
AI is emotionless,robot.
Like all other discoveries,(e.g.fire,wheel,etc) it require judiciousness in using,otherwise,it may do more harm than good.
Hence if AI has to thrive/survive,it can’t in remain inisolation…..
AI ,thus,is a complement of natural intelligence, and not a replacement.
*’एआय’ : एक भस्मासुर(?)*
~~~~~~~~~~~~~~~~~
आजकाल भरपूर बोलबाला होत असलेल्या ‘एआय’ची संकल्पना/कृती/समस्या म्हणजे एक दुधारी तलवार असल्याचे विविध समाजमाध्यमातून व इतर समाचारादि माध्यमांतूनही चर्चिले जात आहे. हे सगळे वाचून/पाहून/जाणून असे वाटते की, ‘एआय’ची मानवजातीपुढील समस्या ही ‘दुधारी तलवारी’ची समस्या नसून सनातन संस्कृतीतील पौराणिक धर्मग्रंथांतून सांगितलेल्या ‘भस्मासूर’ची समस्या होऊ घातली आहे.
आदिदेव भोळ्या शिवाने भस्मासुराला दिलेल्या वरदानाने उन्मत्त होऊन तो शिवाच्याच डोक्यावर हात ठेवून शिवालाच भस्म करू पाहतो, अशी ही पौराणिक कथा आजचा विवेकहीनतेने संपृक्त मानव पुन्हा रचतो आहे. ‘एआय’चा भस्मासुर मानवाच्या अंताला कारणीभूत होऊ शकतो हे स्टिफन हाॅकिंग्जचे भविष्यकथन(?) सत्यात उतरण्याची शक्यता कोणत्याच विवेकनिष्ठ व्यक्तीला आज नाकारताच येऊ नये अशी वस्तुस्थिती समोर येत आहे.
विविध विचारवंतांच्या विचार/लिखाणादिंमध्ये दर्शविण्यात येत असल्यानुसार हे खरेच आहे की, हुशारी आणि बुद्धिमत्ता यात महत्त्वाचा फरक असतो. परंतू हा मूलभूत फरकच बहुतांश लोकांना कळत नाही, असे दिसून येते. सदरील विधानाच्या प्रकाशात मी नम्रतापूर्वक मांडू इच्छितो की ‘एआय’ ही ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची पर्यायवाची संज्ञा होऊ शकत नाही. ती ‘कृत्रिम हुशारी’ या संज्ञेचीच पर्यायवाची संकल्पना होऊ शकेल. कारण की, हुशारी आणि बुद्धिमत्ता हे वेगवेगळे प्रांत(!) असून सगळेच हुशार लोक हे बुद्धिमान असतातच असे नव्हे! त्यामुळेच तंत्रज्ञानमय व तंत्रज्ञानप्रणित तथाकथित ‘एआय’ ही हुशारीची परमावधी अवश्य असू शकेल पण बुद्धिमत्तेच्या बाबतीत मात्र ‘एआय’ स्वयंपूर्ण वा स्वायत्त होऊ शकेल असे/हे शक्य वाटत नाही.
अर्थातच ‘बुद्धिमत्ता’ या संज्ञेतच अंतर्निहित असलेल्या विवेक आणि नैतिकता या बुद्धिमत्तेचे अनिवार्य व परमावश्यक घटक असलेल्या संज्ञा मात्र तंत्रज्ञानमय व/वा तंत्रज्ञानप्रणित होऊ शकत नसल्याने व ‘एआय’मध्ये नेमक्या ह्याच घटकांचा अभाव राहणार असल्याने सध्याच्या तथाकथित हुशार ‘एआय’चे भस्मासुर होणे अनिवार्यपणे क्रमप्राप्त ठरत आहे, असे माझे नम्र आकलन आहे. (#280)
¤
(DISSENT : THE VOICE OF PROGRESS नुसार साधक-बाधक विचारार्थ.)
¤¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(14.06.2023)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~