विलियम झिन्सरचे पुस्तक Writing to Learn (१९८८) मध्ये ते म्हणतात, “विचारांचा आणि शिकण्याचा परिपाक म्हणजे लिहिणे नव्हे; तर विचार करणे हेच लिहिणे”. लिहिण्याची कृती आपली समजूत अधिक प्रगत करत जाते असेही ते पुढे म्हणतात. असे म्हणणारे किंवा लिहिणारे झिन्सर एकटेच नाहीत. आईनस्टाईननंतरचे सर्वांत महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे, नोबल पारितोषिकाचे मानकरी, पुरोगामी विचारांचे भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईन्मन ह्यांनी केलेल्या काही नोंदी वाचून त्यांचा एक सहकारी म्हणाला, “तुझ्या लिखाणातून तुझे विचार खूप चांगल्या रीतीने प्रगट झाले आहेत.” यावर त्याला खोडत रिचर्ड फाईन्मन त्वरित उद्गारले, “लिखाण माझ्या विचारांचे प्रगटीकरण नाही, माझे विचार हेच माझे लिहिणे होय. विचार करण्याच्या प्रक्रियेत लिहिणे अंगभूत आहे.” अर्थात, विचार करताना शब्दांची गुंफण, वाक्यरचना हे सारे मनात घडतच असते. ‘LaTex’ची निर्मिती करणारे लेस्ली लॅम्पपोर्ट ह्यांनीदेखील बऱ्याच चर्चांअंती “लिहिणे हा विचार करण्याच्या प्रक्रियेतील एक निर्णायक टप्पा मात्र असतो” असे मत नोंदवले आहे.
हे कसे ते सोदाहरण बघू या. समजा तुमच्याकडे एक असे प्रॉडक्ट (उत्पादन) आहे जे तुम्हाला विक्रीसाठी बाजारात आणायचे आहे. त्याची उपयुक्तता तुम्हाला ग्राहकांसमोर ठासून मांडायची आहे. आता ग्राहकाला पटतील अशा शब्दांची साखळी गुंफून एक संहिता बनवायची तर, तुम्हाला बऱ्याच अंगांनी विचार करावा लागेल; जसे, तुमचा नेमका ग्राहक कोण, तो काय आणि कसा विचार करतो, त्याच्या गरजा काय आणि तुमचे उत्पादन या सगळ्यांत नेमके कुठे बसते हे सारेच तुम्हाला बघावे लागेल. या प्रक्रियेत तुमच्या उत्पादनाविषयी वारंवार, सातत्याने विचार करण्याने उत्पादनाविषयीची तुमची समज वाढेल. एवढेच नव्हे तर उत्पादनाची गुणवत्ता कशी आणि कुठे वाढू शकते याची समज वाढत गेल्याने तुमचे उत्पादन उपयुक्ततेच्या दृष्टीने अधिक परिपूर्ण होत जाईल. यातूनच तुमच्या उत्पादनाचे वेगळेपण नेमकेपणाने विषद करणारी एखादी परिणामकारक संहिता तुम्हाला सुचेल. हे करत असताना कदाचित समर्पक शब्दांची निवड आणि सांगण्याची शैली उत्कृष्ट, सर्वोत्तम नसेल, पण वापरलेल्या त्या शब्दांमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक ठसा नक्कीच उमटलेला असेल.
आता याचा पर्याय म्हणून चॅटजीपीटीकडे कसे बघता येते ते आपण बघू. तुम्ही हेच काम, अर्थात तुमच्या उत्पादनाविषयी ग्राहकांना माहिती देण्यासाठी, ते उत्पादन त्यांनी विकत घ्यावे हे पटवण्यासाठी संहिता लिहिण्याचे काम, चॅटजीपीटीला सांगितले. चॅटजीपीटी यासाठी अतिशय समर्पक शब्दांची निवड करेल, यात तीळमात्र शंका नाही. बाजारातील इतर समान उत्पादनांचे विक्रीमूल्य वाढवण्यासाठी किंवा त्यांची गरज निर्माण करण्यासाठी आजवर वापरल्या गेलेल्या उत्तमोत्तम संहितांची नक्कल करून तो स्वतःची एक सर्वोत्कृष्ट संहिता बनवेलही. शब्दांची अतिशय आकर्षक अशी रचना करून तो ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला संमोहित करेलही. पण असे केल्याने तुम्ही सुंदर काही निर्माण केल्याबद्दलची शाबासकी स्वतःला देऊ शकण्याच्या आनंदापासून वंचित राहाल. एवढेच नाही तर, विचार करण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही जे शिकत जाता, समृद्ध होत जाता त्यालाही मुकाल; आणि ही फार मोठी किंमत आहे. असे करून खरे तर तुम्ही स्वतःलाच ठकवता आहात असे म्हणणेही अतिशयोक्ती ठरू नये. शब्द तसे फार कमी वेळासाठी स्मरणात राहतात, महत्त्वाची असते ती त्यामागची भावना. या व्यक्तिगत भावनांचे पदर चॅटजीपीटीच्या संहितेत उमटू शकणार नाहीत आणि मग तुमचे उत्पादन हे बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर अनेक उत्पादनांसारखेच भासेल, त्याच रांगेतील ते एक उत्पादन ठरेल. शब्दांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा राहणार नाही. उलट, तुमच्यावर त्या शब्दांची मोहिनी राहील. थोडक्यात, चॅटजीपीटीवर हे काम सोपावल्याने आपण हाताचे केवळ एक काम कमी करतो आहोत असे होत नाही तर, आपल्या विचारांची क्षमता आणि शब्दांचा एकमेकांशी संबंध जोडण्याची कलाही संकुचित करतो आहोत.
उत्पादन विकेल जाईल की नाही हा मुद्दा येथे नाही. पण या प्रक्रियेतून उद्भवणारा महत्त्वाचा प्रश्न हा की चॅटजीपीटीवरील आपले अवलंबित्व, विशेषतः लेखनासाठीचे अवलंबित्व, आपल्या विचारांच्या परिणामकारकतेला, प्रभावाला मारक ठरेल का? की उगाच ओढून-ताणून उभी केलेली ही भीती आहे? कुठल्याही नव्या शोधाचे, संशोधनाचे फायदे-तोटे असतातच. तर चॅटजीपीटीसारख्या शोधाचा विवेकी वापर केल्याने आपण अनेक संभाव्य धोके टाळू शकतो का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मनुष्यप्राणी असा विवेकपूर्ण वापर करू शकेल का?
तंत्रज्ञानावरील अवलंबित्व
वारंवार करावे लागणारे परिश्रम वाचवणाऱ्या तंत्रज्ञानामुळे माणसातील काही विशिष्ट कौशल्ये नामशेष होतील का किंवा त्यांची झीज होईल का ही शंका प्रत्येकच नव्या शोधासोबत जन्म घेत असते. आपण वापरत नसलेले अवयव उत्क्रांतीच्या टप्प्यात जसे झिजत जाऊन नष्ट होतात, तशी वापर कमी किंवा बंद झाल्यामुळे काही कौशल्यांची झीज होत राहिली तर नेमक्या गरजेच्या क्षणी ती कौशल्ये आपल्या कामी येणार नाहीत अशी शंका आज अनेकांच्या मनात आहे. ही चिंता अर्थात नवी नाही. कॅल्क्युलेटर (गणनयंत्र) चा शोध लागला तेव्हा येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढीची संख्यांशी खेळण्याची सहजप्रवृत्ती नष्टच होत जाईल, इतकेच नव्हे तर ते करण्याची क्षमताही संपुष्टात येईल ही भीती त्या काळातील शिक्षकांपुढे होतीच की. GPS, अर्थात प्रवासात तुम्हाला मार्ग दाखवणारी प्रणाली जर आपण वाहनांमधून काढून टाकली तर आपण अपरिचित ठिकाणापासून आपल्या घरापर्यंत पोहोचू शकणार नाही ही भीती काही जणांच्या बाबतीत शक्य आहे. छापलेले नकाशे, जे पूर्वी या कामासाठी वापरले जायचे, ते समजून घेण्याची अनेकांची कुवत GPS सारख्या यंत्रणेमुळे कमी झाली आहे. आणि आता चॅटजीपीटी ‘अवतरले’ आहे. ईमेल्स, उत्पादांविषयीची संहिता, उपदेशात्मक संदेश, एवढेच नव्हे तर प्रोग्रांमिंगसाठीदेखील ही यंत्रणा उपयोगात आणली जात आहे. GPT आपल्याला घ्यावी लागणारी निव्वळ कुबडी ठरते आहे का?
तंत्रज्ञानावर जरा जास्तच विश्वास असणाऱ्या एकाचा अलीकडेच मला एक अनुभव आला. माध्यमिक शाळेत शिकणारा १७ वर्षे वयाचा एक विद्यार्थी मला भेटला. या वयात वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन जवळपास प्रत्येकजणच आपल्या पालकांवरचे अवलंबित्व संपवून स्वतंत्र होण्याची स्वप्ने बघत असतो. कार किंवा बाईक हे तारुण्यातील जोश, जोम, उत्साह दाखवण्याचे, दिसण्याचे एक खूप प्रभावी साधन आहे. आपल्या हातात स्वतंत्र वाहन आहे आणि त्यावरून आपले आपण मुक्तपणे फिरू शकतो हीच खूप हवीहवीशी भावना असते. वेगाशी, इतर वाहनांशी, रस्त्यावरील इतर अडचणींशी, खाचखळग्यांशी मुकाबला करण्याची कौशल्ये या वयात यायलाच हवी असे वाटणे ही सहजप्रवृत्ती असते. पण मला भेटलेल्या या मुलाने मात्र मला बुचकळ्यात टाकले. स्वयंचलित वाहने बाजारात येण्याची तो वाट बघत होता. गाडी चालवण्याची, ते शिकण्याची गरजच काय, असा साधा, सरळ त्याचा प्रश्न होता. आता हाच युक्तिवाद पुढे नेला तर काही अफलातून प्रश्न पुढे येऊ शकतात. ‘अवतार’ चित्रपटातील विशाल रोबोज् आठवतात का, जे अतिशय वेगाने इकडेतिकडे फिरू शकतात, वरती चढू शकतात, नकोसे असे कुणी मध्ये आले तर ठोसा मारू शकतात? असे शक्य असेल तर, रोबोज् तंत्राच्या वापर करून आपणही अतिशय वेगाने चालू शकतो. अशावेळी चालणे ही जगण्यासाठीची मूलभूत गरज न उरता चैनीचा व्यायाममात्र राहील.
एकीकडे हे असे बिनबुडाचे युक्तिवाद करणारे आहेत. तर दुसरीकडे, हे नवे तंत्रज्ञान वापरून, प्रोग्रामिंगसाठी कृत्रिमप्रज्ञेला आपला सहकारी मानून आपली उत्पादनक्षमता वाढवणारे, गती आणि गुणवत्ता दोन्ही अंगांनी, असे अनेक लोक आहेत. ज्या कामासाठी दोन दिवस लागतील, ते काम हे लोक या आपल्या नव्या सहकाऱ्याकडून दोन तासांत करून घेतात. वारंवार करावी लागणारी नीरस कामे जर या सहकाऱ्यावर सोपवली तर तो आपल्याला अन्य काही महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केन्द्रित करण्यासाठी मोकळा वेळ देतात आणि आपल्यातील निर्मिकाला खुलण्याची संधी निर्माण करतात. अनेक अभ्यासांती हाच निष्कर्ष निघाला आहे की कॅल्क्युलेटरच्या शोधामुळे विद्यार्थ्यांना गणिताच्या अंतरंगात डुबक्या मारून गणिताविषयीची आपली समजूत वाढवण्याची संधी मिळाली आहे, अर्थात त्याने विद्यार्थ्यांना सक्षमच केले आहे. येणाऱ्या पिढ्यांना चॅटजीपीटीचा आधार अधिक हुशार, चुणचुणीत बनवेल का? ही प्रणाली निव्वळ आधार देणारी कुबडी न ठरता आपलाच एक कृत्रिम पण विस्तारित अवयव बनेल का? त्यावर आपण संपूर्णपणे अवंलबून राहू शकतो का?
विवेकी अवलंबित्व
चांगले की वाईट? हा प्रश्न फारच ढोबळ वाटतो. किंबहुना हे ‘एकच माप सर्वांना लागू’ प्रकारचे गृहीतक वाटते. चॅटजीपीटीचे परिणाम साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांवर वेगवेगळ्या प्रकारे झालेले दिसतील. एवढेच नाही तर एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूवर याचे समान परिणाम होतील असेही अजिबात नाही. अधिक समर्पकपणे सांगायचे झाले तर, अशी काही युक्ती आपल्यापाशी आहे का की एखादे गुणवैशिष्ट्य विकसित करण्याच्या प्रक्रियेसाठी चॅटजीपीटीचा वापर करीत असताना दुसऱ्याच एखाद्या गुणवैशिष्ट्यावर होणारे अपायकारक परिणाम आपण वाचवू शकू? याच्याशी साधर्म्य साधणारे एक उदाहरण बघू या. एका प्रतिभावंत, कुशल खेळाडूची कल्पना करा, जसे दीर्घपल्ल्याच्या धावपट्टीवर धावणारा एक खेळाडू. आपल्या डोळ्यांपुढे चटकन शरीराने तगडी, शक्तिवान, विश्वास बसणार नाही एवढी ऊर्जा असणारी व्यक्ती येते. मैलोन् मैल न थकता धावू शकणारी व्यक्ती. ह्या व्यक्तीचे कुंपणावरून उंच उडी मारणे किंवा गरज पडल्यास १०-१२ मैल धावून जाणे आपल्याला अचंबित करणार नाही. आता अश्या व्यक्तीची कल्पना करा, जो कुठल्याही भूभागावर वाहन चालवू शकतो, पण काही फुटांचे अंतरही कधी चालून जात नाही. दीर्घपल्ल्याच्या धावपट्टीवरील खेळाडू आपल्या पायांचा वापर करून जितके अंतर पार करतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक अंतर हा वाहनचालक पार करतो. पण तरीही कुंपण पार करण्यासाठी किंवा पर्वतारोहणासाठी त्याची कार कामाची नाही.
असे असूनही, नियमित व्यायाम करीत स्वतःला धडधाकट ठेवणारी, क्वचित मॅरेथॉन धावणारी आणि घरातील किराणामाल आणण्यासाठी कार घेऊन बाजारात जाणारी व्यक्ती या व्यवहारी जगात आपल्याला दिसतेच. थोडक्यात काय तर, आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी साधनांची, तंत्रज्ञानाची मदत घेत या शोधांचे लाभ आपण उपभोगावे. तसेच हानिकारक असणाऱ्या/ वाटणाऱ्या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करावा. हा तोल सांभाळण्याची पराकाष्ठा आपण करायला हवी आहे.
पण मानवाच्या अंतर्भूत प्रेरणांमध्ये हा तोल सांभाळणारा विवेक अपवादानेच आढळतो. मोबाईल फोन्सने आपला ताबा अगोदरच घेतला आहे (मीदेखील अपवाद नाही). आजची मुलं, ती आधी होती तेवढी धडधाकट आज राहिलेली नाहीत ही अतिशय गंभीर बाब आहे (https://www.npr.org/sections/health-shots/2013/11/20/246316731/kids-are-less-fit-today-than-you-were-back-then). शाळेसाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करण्यापेक्षा कारने शाळेत पोहोचणे सोपे झाले आहे. कदाचित शारीरिक कष्टावरच्या कार ह्या साधनाच्या अतिसुलभ तोडग्यामुळे आरोग्यावर हा परिणाम झाला असणार.
आता ‘कमी धडधाकट’ ह्या सदराखाली तत्सम आणखी काही गोष्टी टाकू या – ‘कमी बुद्धिमत्ता’, ‘कमी माहितीगार’, ‘कमी कुशल’, ‘कमी प्रतिभा’. जसे कार घेऊन सगळ्या ठिकाणी जायचे नसते, तसेच जीपीटी घेऊन सर्व क्षेत्रांत वावर करायचा नसतो. अगदी तो उपाय खूप सोपा, बिनकष्टाचा, बिना अडचणींचा असला तरी…
Author is NLP practitioner, currently the Knowledge Architect at Pinterest, previously worked at Google research
मानवाच्या इतिहासात कमी धडधाकट बनण्याची अनेक उदाहरणे आहेत. आपण कच्चे धान्य पचविण्याची कुवत गमावलेली आहे. आपल्या अपत्यांना वर्षभर उभेही राहता येत नाही. इतर काहीतरी श्रेष्ठत्व कमविण्यासाठी आपण या किमती चुकवत आहोत. काही सहस्रकांनंतर जन्मणाऱ्या बाळांचे डोके इतके मोठे असेल की सिझरिअन शस्त्रक्रियेशिवाय जन्मही होणार नाहीत.
अभिजितजी, आपण केलेले विश्लेषण बरोबर आहे. कोणतेही लिखाण करण्यापूर्वी ते आपल्या मनात/मेंदूत तयार झालेले असते; व आपण जेंव्हा ते प्रत्यक्ष लिहायला घेतो, तेंव्हा एकामागून एक वाक्य कागदावर उमटत जातात. हे झाले हाताने कागदावर लिहिण्यासंबंधी. पण तेच आपण जेंव्हा संगणकावर लिहितो, तेव्हा काही शब्द लिहिताच त्यापुढील शब्द आपल्या संगणकावर आपोआप उमटतात; आणि ते बहुंशी योग्यच असतात. याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मेंदूचे कार्य करण्यास काही अंशी तरी तरबेज झाले आहे. पण म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माणसाने कितपत करायचा याचे तारतम्य ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत तंत्रज्ञानच वापरत गेलो, तर आपल्या नैसर्गिक क्षमता कमकुवत होत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.