कृत्रिमप्रज्ञा वापराचे तारतम्य शक्य होईल का?

मानवी जीवन हे सतत आपल्या अडचणी आणि गरजांमधून शिकत, त्यावर तोडगा म्हणून नवनवीन उपकरणे, युक्त्या, क्लृप्त्या, तंत्र इत्यादी शोधत, विकसित होत गेले आहे. या सगळ्यामुळे मानवी जीवन सुरुवातीला नेहमीच सुखकर, सहज झाले खरे, पण या सर्व उपायांमुळे नवे प्रश्न नक्कीच उभे राहत आले आहेत. हे चक्र अखंड सुरू आहे आणि यापुढेही राहील. मागील काही दशकांपासून विकसित झालेले तंत्रज्ञान, उदाहरणार्थ विमान, अणुऊर्जा, वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन, सीसीटीव्ही, क्लाऊड टेक्नॉलॉजी इत्यादी, आणि आता कृत्रिमप्रज्ञा.

या सर्वांचा दैनंदिन जीवनात समावेश/वापर वाढत गेला, आणि या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यावर प्रथमदर्शनी आपले जीवन सहज/सोपे/सुखकारक झाले असे नक्कीच म्हणता येईल. माझ्या मते ढोबळमानाने, या तंत्रज्ञानाचे मुख्यतः पर्यावरणावर आणि समाजमनावर परिणाम होताना दिसतात. शिवाय याचे काही दूरगामी परिणाम माणसाच्या शारीरिक, वैचारिक, मेंदूच्या विकासप्रक्रियेवर होऊ शकतात. 

बरेचदा मानवी जीवनात या तंत्रज्ञानाची उपयुक्तता, त्याची किंमत, सामान्य नागरिकांना त्याची उपलब्धता यावर त्याचा प्रसार अवलंबून असतो. दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर जितक्या जास्त प्रमाणात वाढतो, तितकेच त्याचे परिणाम हळूहळू खोलवर होताना दिसतात. कोणतेही तंत्रज्ञान हे मुळात वाईट परिणाम करण्याच्या उद्देशाने शोधले गेलेले नाही. पण ते विकसित झाल्यावर त्याचा दुरुपयोग कसा करता येईल याचा विचार नक्की केला गेला. 

अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर, सध्याच्या काळात माहिती किंवा विदा ही माल किंवा वस्तू या स्वरूपात विकली जाते. आता इथपर्यंत आपण पोचलो कसे? काही अंशी याची सुरुवात झाली ती इंटरनेटच्या प्रसारापासून/प्रसारामुळे. जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून document/PDF/email अश्या लिखित स्वरूपात माहितीची देवाणघेवाण शक्य होऊ लागली तेव्हा हे सर्व कायमस्वरूपी साठवणे शक्य होऊ लागले. याचा अर्थ काय तर वापरकर्ता म्हणून आपण स्वतः ऑनलाईन नसतानादेखील विदा तिथे असते. अर्थातच अशा संहिता, चित्रे प्रत्यक्ष तुमच्या परवानगीशिवाय इतरांना search engine मार्फत थेट उपलब्ध होत नाहीत. ही ऑनलाईन विदा साठवण्यातली सुविधा. मग ही ऑनलाईन विदा जगभरात तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकेल, म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा क्लाऊड, जो तुमच्यामागे तुम्हाला अनुसरत राहील. आता हा झाला वैयक्तिक क्लाऊड. उदाहरणार्थ, “google drive”, किंवा “apple cloud”. म्हणजे अशाप्रकारे माहिती साठवणे सुरू झाले. पण ही माहिती येते कुठून? व ही उत्पन्न कशी होते? तर, विविध संकेतस्थळे, समाजमाध्यम खाती यांच्यामार्फत आपण आपली चित्रे, आपली मते, वैयक्तिक आयुष्यातील सध्याच्या घडामोडी इत्यादींबद्दल सतत काही ना काही इतरांपर्यंत पोचवत असतो, किंवा आपण एखाद्या वस्तूचा विविध शोध-संकेतस्थळांवर शोध घेतो, किंवा कोणती ना कोणती माहिती मिळवत असतो. जसे, एखाद्या पर्यटनस्थळाबद्दल किंवा एखाद्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल, वा खाद्यपदार्थाबद्दल. आपली ही प्रत्येक कृती प्रत्येक क्षणी विदानिर्मिती करत असते, या विदेतून उर्फ माहितीमधून, एकूण जनमानसाचा कल कुठे जातोय, किंवा किती लोक नेमक्या कोणत्या वस्तू/जागा (स्थळ)/उत्पादने यांच्या शोधात आहेत? एकूणच दिनचर्या कशी आहे, त्या अनुषंगाने कोणती उत्पादने लोक वापरत आहेत इत्यादी सर्व माहिती गोळा होत असते. ह्या सर्व निर्माण झालेल्या माहितीवरून उत्पादनकंपन्या नफा मिळवण्यासाठी विविध उत्पादनांची निर्मिती करणे, संकेतस्थळांवरून तुम्ही सतत शोध घेत असलेल्या वस्तू/माहितीशी निगडीत जाहिराती दाखवणे, ती उत्पादने तुमच्या सर्व गरजा कश्या भागवू शकतात हे सतत बिंबवणे असे करत राहतात. 

साधारण २०-२२ वर्षांपूर्वीपासून शोध-संकेतस्थळांद्वारे इंटरनेटवर माहिती शोधता येत होती. पण त्याकाळात वापरकर्ता म्हणून आपण जे जे शोधत असू त्या सगळ्याचे रूपांतर विदेमध्ये होत नव्हते. मागील काही वर्षांपासून जसजसे इंटरनेट, क्लाऊड तंत्रज्ञान विकसित होत गेले, प्रगत होत गेले, तसतसे ही विदा विकाऊ वस्तूमध्ये रूपांतरित होऊ लागली. ही सर्व विदा सध्याच्या कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानाचा मेंदू म्हणून काम करते. विकसित कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञान सतत स्वयंशिक्षणातून स्वतःला अद्ययावत करत राहते. कृत्रिमप्रज्ञा म्हणजे मानवी बुद्धिमत्तेनुसार, शहाणपणाने निर्णय घेण्याची क्षमता. या सर्व प्रणालीमुळे कृत्रिमप्रज्ञा/रोबोट्स खरेच पृथ्वीवर सत्ता गाजवतील की काय अशी भीती नक्कीच वाटते. 

एकीकडे कृत्रिमप्रज्ञेमुळे, एकूणच तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान दीर्घ होताना दिसते. दुर्धर रोगांवर, शारीरिक दिव्यंगत्वावर मात करणे, भविष्यातील धोके ओळखून योग्य ती खबरदारी घेतल्याने जीवितहानी टाळणे, ह्या बरोबरच विविध दुर्गम भागातील (जसे समुद्राचा तळ, उत्तर/दक्षिण ध्रुव इत्यादी) संशोधन सोपे होताना दिसते. परग्रहावरचे फोटो, सूर्याच्या पृष्ठभागाचे फोटो हे सारे आजवर अशक्य असणारे आता शक्य झाले आहे, यासाठी कृत्रिमप्रज्ञेचे आभार. 

अलीकडे खूप चर्चेत असलेले ChatGPT, हे AI engine कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. संगणकीय भाषेतील कोणतेही अल्गोरिदमपण लिहून देऊ शकते. थोडक्यात काय तर, कोणतेही उत्तर शोधण्याची प्रक्रिया न करता, न अनुभवता थेट उत्तर मिळणार. एरवी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधताना मन, मनगट, मेंदू यांचा ताळमेळ घालून केलेल्या कृतीतून, चुका करत उत्तर तर सापडतेच; पण हेच उत्तर का, कसे आले याचे आकलनही होते. परिणामी निगडीत, किंवा संबंधित नसलेल्यासुद्धा मूर्त, अमूर्त प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे शहाणपण विकसित होत जाते. कृत्रिमप्रज्ञा अजून नवीन तंत्रज्ञान आहे, आणि अजूनही अश्या पिढ्या आहेत ज्यांनी कृत्रिमप्रज्ञा जन्माला न आलेला काळसुद्धा अनुभवाला आहे, आणि आत्ताची पिढी, जिथे कृत्रिमप्रज्ञेच्या वापराचे प्रमाण तुलनेत कमी आहे. पण भविष्यात जेव्हा मानव कृत्रिमप्रज्ञेवर अधिकाधिक अवलंबित जाईल तसतसे अनुभवातून विकसित झालेले शहाणपण लुप्त होऊ शकते. मानवी भाव-भावना ज्या असंख्य छटांनी बनतात, व्यक्त होतात, त्या केवळ ०-१/हो-नाही इतक्याच मर्यादित होऊ शकतात. असे परिणाम कदाचीत नजीकच्या काळात, अगदी अजून १००-२०० वर्षे दिसून येणार नाहीत. पण त्यानंतरचा काळ मानवी भावविश्वासाठी कठीण ठरू शकतो. 

कृत्रिमप्रज्ञा किंवा एकूणच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पर्यावरणीय परिणाम याबद्दल बोलायचे झाले तर, कृत्रिमप्रज्ञाI मुख्यत्वे दोन गोष्टींनी बनलेली आहे. एकतर hardware आणि दुसरे software. हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात आणि एकमेकांना पूरक, सुसंगत असतात. PCB, Silicon chips, battery, आणि इतर electronic घटकांपासून Hardware बनलेले असते. प्रत्येक उपयोजन/उत्पादनाच्या अनुषंगाने विशिष्ठ hardware बनत असते. बरेचदा हे hardware/उपकरण टिकाऊ नसते. २-५ वर्षे इतकेच याचे आयुष्मान. शिवाय हे hardware ज्या प्रमाणात सतत बदलते, विकसित होत जाते, बनवले जाते, त्या सगळ्यासाठी नैसर्गिक संसाधने, खनिजे, धातू यांचा खूप मोठ्या प्रमाणात उपसा करावा लागतो. ९९% उपकरणे वापरानंतर निसर्गपूरक (biodegradable) नसतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे निसर्गाची सातत्याने हानी व प्रदूषण होते. पर्यावरणाचा ऱ्हास/हानी ही निर्मितीच्या काळात आणि उपकरण वापरून झाल्यानंतरच्या काळात अशा दोन स्तरांवर होतांना दिसते. 

दुसरा परिणाम म्हणजे समाजमनावर होणारा परिणाम. असे दिसून येते/म्हणता येईल की हे परिणाम अगदी हळूहळू होतात. पण ते लक्षणीय प्रमाणात आणि खोलवर झाले आहेत असे विविध घटनांवरून अचानक दिसून येते. जसे, सतत वाटणारी असुरक्षिततेची भावना, एकाकीपण, नैराश्य, विकृती याच्याशी संबंधित बातम्यांची वारंवारिता अचानकपणे वाढलेली दिसते आहे. कृत्रिमप्रज्ञेचा आयुष्यातील सहभाग/संक्रमण आणि त्यानुसार परिणामांची पातळी आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळी असू शकते. समाजविघातक, विकृतीपूर्ण घटना, व्यसनाधीन तरुणाई किंवा उपकरणांमध्ये व्यस्त/गढलेले सर्व, आणि यातून येणारे एकाकीपण. या एकाकीपणावर मात करण्यासाठी रोबोट् स्वरूपातली अगदी हवी तशी एक व्यक्ती सदृश सहचर म्हणून असणे, किंवा कोसो दूर अंतरावरून आपल्या कुटुंबातील वृद्धांची काळजी घेणे आता शक्य आहे. त्यांची ख्यालीखुशाली विचारणे, पाहणे शक्य झाले आहे. ज्यामुळे प्रत्यक्षात भेटायची गरज कमी झाली आहे. अशी ही बदलत चाललेली मानसिकता आपल्याला समाज म्हणून पोकळ करत चालली आहे. मानवी मूल्यांची, नीतिमत्तेची होत असलेली घसरण प्रकर्षाने जाणवू लागली आहे. 

एकूणच कोणतेही तंत्रज्ञान हे तारतम्य ठेवूनच वापरावे लागेल. कारण शेवटी ‘हे निव्वळ तंत्रज्ञानाबद्दल, कृत्रिमप्रज्ञेबद्दल नाही; तर हे आपल्याबद्दल आहे’. मानवी वृत्त्ती कोणत्याही मानवी शोधाला, कृत्रिम तंत्रज्ञानाला तारक किंवा मारक बनवू शकते. 

अभिप्राय 2

  • स्वप्नालीजी, आपण कृत्रिम प्रज्ञेविषयी खूपच छान विश्लेषण सोप्या शब्दात केले आहे. पण आपण म्हटल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा वापर करताना तारतम्य ठेवणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी निर्माण केलेल्या हार्डवेअर्स मुळे निर्माण होणारे पर्यावरणीय प्रदुषण हानी कारक आहे. पण भविष्यात कृत्रिम प्रज्ञेमुळे मानवी जीवनावर आणि मानवी समाजावर मोठ्याप्रमाणात दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
    ्द

  • Balance in thought process or decision making is needed but today’s trend of everything for profit runs counter to it How to address it is a problem

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.