कृत्रिम बुद्धिमत्ता – फायदे आणि तोटे

कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे बरेच चर्चिले गेले आहेत. त्यावर हा माझा दृष्टिकोन. 

आपण मानव किंवा सजीव प्राणी अनुभवांवरून शिकू शकतो पण यंत्रे तसे करू शकत नाहीत. आता यंत्रेही तसे करू लागलीत तर? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जणू यंत्राने स्वतःच शिकणे.

ह्या क्षेत्रात जरी काही मोठे बदल, प्रगती हल्ली झाली असली तरी २१ व्या शतकाच्या मध्यापासून शास्त्रज्ञांनी यावर विचार करणे सुरू केले होते. १९४३ मध्ये मॅकलॉक आणि पिट्‌स या शास्त्रज्ञांनी बायलॉजिकल न्यूरल नेटवर्कची संकल्पना मांडली. अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी याने १९५५ मध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ह्या शब्दांचा प्रथम वापर केला, त्याने एक प्रोग्रामिंग लँग्वेज LISP विकसित केली जी आजही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सगळ्यांत जास्त वापरली जाणारी भाषा आहे.

आर्थर सॅम्युअल नावाच्या अमेरिकन संगणक वैज्ञानिकानेदेखील १९५९ मध्ये यंत्रशिक्षणाबद्दल सांगितले होते. त्याचे म्हणणे होते की संगणकाला कोणत्याही खास प्रोग्राम शिवाय यंत्रशिक्षणाद्वारे तो स्वतः निर्णय घेऊ शकेल अशा प्रकारे बनवले जाऊ शकते.

यापुढे या क्षेत्राने खरी गती पकडली. आयबीएमच्या डीप ब्ल्यू या संगणकाने १९९० मध्ये सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला पराभूत केल्यानंतर एआय तंत्रज्ञानाची भविष्यातील क्षमता, ताकद याचे अंदाज वैज्ञानिकांना येऊ लागले. 

यंत्रयुगाचा प्रारंभ ३-४ शतकांपूर्वी झाल्यापासून सद्यःस्थितीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान संपूर्ण नवीन स्तरावर पोचले आहे. अच्युत गोडबोलेंच्या मते गेल्या १० वर्षांतील तंत्रज्ञानाचा विकास अखंड मानवाच्या इतिहासातदेखील झालेला नाही आणि विकासाचा हा वेग यापुढे अजून वाढणार आहे. म्हणजे पुढे काय होऊ शकते यावर आपण स्वतःच विचार करा. 

काही शास्त्रज्ञ असा दावा करतात की २०५३ नंतर शल्यचिकित्सकांची गरजच राहणार नाही. २०९५ नंतर यंत्रमानव करू शकणार नाहीत असे कोणतेही मानवी काम राहणार नाही (अर्थातच पुनरुत्पादन सोडून). 

येत्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जगाला कसे विकसित करेल आणि आकार देईल हे नक्की सांगणे कठीण असले तरी, काही कल दिसतात ज्यांच्या आधारावर आपण थोडेफार अंदाज बांधू शकू. 

आतापर्यंत मनुष्य केवळ प्राकृतिक/जैविक बुद्धिमत्ता (Natural/Biological Intelligence) अनुभवत आला आहे, ज्यात डार्विनच्या सिद्धांतानुसार ह्या पृथ्वीवर तग धरणाऱ्या जीवांनी आपल्या अस्तित्वासाठी योग्य ते बदल केले. हजारो नव्हे लाखो वर्षे चालणाऱ्या या प्रक्रियेमध्ये आपले शरीरदेखील समाविष्ट असल्यामुळे वेगवान, अचानक किंवा टोकाचे निर्णय घेणे आपसूकच टाळले गेले आणि शरीरातदेखील उपायानुकूल बदल हळूहळू होत बुद्धिमत्ता विकसित/उत्क्रांत होत गेली.

कृत्रिम बुद्धिमत्तेत मात्र आपली बुद्धिमत्ता/जीजिविषा हळूहळू उत्क्रांत न होता झपाट्याने आणि अतिशय वेगाने विकसित केली जात आहे. जिथे आपला मेंदू चालत नाही तिथे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने वेगात उपाय शोधायला सुरुवात केली आहे.

कदाचित नैसर्गिक उत्क्रांतीचाच पुढचा टप्पा हा असावा. We are destined to walk on this path.

माझ्या मते कृत्रिम बुद्धिमत्तेचे दुष्परिणाम :-

१) कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सगळ्यात खालच्या स्तरावरील रोजगार जसे की वेटर, झाडू-पोछा करणारे कामगार, हमाल, वितरण करणारी मुले, बँकेतील कारकून, वाहनचालक यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊन बेरोजगारी वाढेल. 

२) कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपली सर्जनशीलता धोक्यात येईल. भारतासारख्या देशात जिथे संशोधन आणि विकासाकडे मुळातच फालतूचा खर्च म्हणून पाहिले जाते, तिथे हा धोका जास्तच आहे. 

३) बुद्धिमत्ता आणि जाणिवा यांचा लगेच नाही पण या मार्गावर पुढे केव्हातरी संगम झाला तर मानवजात धोक्यात येऊ शकेल. 

पण मला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तोट्यांपेक्षा तिचे फायदेच जास्त दिसत आहेत. जसे :- 

१] बारकावे समजून घेण्यासाठी, विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचंड फायदेशीर ठरेल.

२] कोणत्याही यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्याने उत्पादनक्षमता प्रचंड वाढेल.

३] अपघातांचे प्रमाण खूप कमी होईल. 

४] तंत्रज्ञानाधारित नोकऱ्यांचे प्रमाण वाढेल. 

५] आपल्या आरोग्यासंबंधित विदेचे विश्लेषण करून पुढील आयुष्यात होऊ शकणाऱ्या गंभीर आजारांचे अंदाज आधीच बांधता आल्याने आपली अपेक्षित आयुर्मर्यादा वाढेल. 

६] विश्वउत्पत्तीक्षेत्रात, आपल्या अवकाशामधील भाऊबंद (हे भाऊबंद असतील की वैरी हा प्रश्नच आहे) शोधायचा वेग वाढेल. 

७] मला दिसणारा अजून एक फायदा म्हणजे धर्म/देव यांचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व कमी होईल. त्यामुळे कदाचित सर्वांचीच धर्मांधता कमी होऊन एक मानवजात म्हणून विचार करायला लागू. (उद्या यंत्रांकडून धोका निर्माण झाला तर आपण आपले अस्तित्व बघणार की हिंदू-मुस्लिम बघणार?)

८] कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीमधील संभाव्य धोके लक्षात आल्याने जगातील प्रगत देशांचा एकमेकांशी या संदर्भात होणारा ताळमेळ वाढेल. त्यामुळे शस्त्रस्पर्धा कमी होऊन सुरक्षेचा खर्च कमी होईल. 

स्टीफन हॉकिंग ,युव्हाल हरारी यांच्यासारख्यांनी जरी धोक्याचे इशारे दिले असले तरी आपण या क्षेत्रात होत असलेली प्रगती थांबवू शकत नाही. 

ही प्रगती आता स्वयंचलित प्रकारात पोहोचली आहे. 

औद्योगिक क्रांतीला युरोपमध्ये १८ व्या शतकात सुरुवात झाली तेव्हा लोकांनी बेरोजगारी वाढेल असा इशारा दिला होता. तरीपण आजचे जग त्यावेळच्या जगापेक्षा सर्वच बाबतीत नक्कीच पुढारलेले आहे 

औद्योगिक क्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगती यांत महत्त्वाचा फरक असा आहे की यंत्रांची प्रगती सर्वतोपरी माणसाच्या गरजेवर अवलंबून असल्याने त्यावर आपले नियंत्रण आहे. जसजशी प्रगती होत आहे तसतशी कृत्रिम बुद्धिमत्तेपासून होऊ शकणार्‍या संभाव्य धोक्यांबद्दलची चिंता वाढत चालली आहे. 

आपला मेंदू हे दुसरे-तिसरे काही नसून, एक जैविक यंत्रच आहे. यंत्राला जशा मर्यादा असतात अगदी तशाच मर्यादा मानवाच्या नैसर्गिक उत्क्रांतीलादेखील आहेत. आपला मेंदू ही गुंतागुंतीची जैविक प्रणाली असून आपले अस्तित्वच धोक्यात येईल असा कोणताही विकास तो करू शकत नाही. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेने विकसित होणारी यंत्रे त्यांच्या मालकालाच पुढे गुलाम बनवणार नाहीत याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. 

टेस्लाचे ॲलॉन मस्क यांच्यासह अनेक जाणकारांनी यावर एक खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीचा विकास थांबविण्याची विनंती करण्यात आली आहे. पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, जसे, “पुढे जाऊन मानवी मेंदूची जागा घेईल अशा कृत्रिम बुद्धिमत्तेची आपण निर्मिती करायलाच हवी आहे का?” या जाणकारांचे असे म्हणणे आहे की आण्विक उर्जेप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रही नियंत्रित असायला हवे. 

असो, यापुढील काळ हा रोमहर्षक आणि तंत्रज्ञानाधारित राहणार आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र टाळून जगणे निव्वळ अशक्य आहे. 

अभिप्राय 6

  • या लेखात श्री. राहूल खरे यांनी कृत्रिम बुध्दिमत्ते संबंधात अत्यंत साधक बाधक विचार केलेला आहे. त्यांनी कृत्रिम बुध्दिमत्तेचे फायदे आणि तोटे विषद करताना तोट्यांपेक्षा फायदेच जास्त असल्याचे म्हटले आहे, आणि ते योग्यच आहे; असे मला वाटते. पण त्यांनी टेस्लाचे अलान मस्क यांच्या सह अनेक या क्षेत्रातिल जाणकारांनी खुले पत्र लिहून ‘ मानवी मेंदूची जागा घेईल अशा कृत्रिम बुध्दिमत्तेची आपण निर्मिती करायलाच हवी आहे का?’ या प्रश्नाचा उल्लेख केला आहे; ते माझ्या मते गैर आहे. (मी प्रथम कबूल करतो की, मला या क्षेत्रातील ज्ञान नाही. पण माझ्या अल्प बुध्दीप्रमाणे) मला असे वाटते की, कोणतेही यंत्र मानवाने चालू केल्या शिवाय काम करू शकत नाही. शिवाय यंत्र चालू करण्यासाठी त्यात कोणते ना कोणते इंधन भरणे आवश्यक असते. कृत्रिम बुध्दीमत्ता हे सुध्दा एक यंत्रच असणार आहे आणि ते सुद्धा वीज वगैरे कोणत्यातरी इंधनावरच चालणार आहे. उद्या ही यंत्रणा मानवाला डोईजड होऊ लागली, तर तिला इंधन पुरवठा न करणे मानवाच्याच हातात आहे. त्यामुळे सरते शेवटी कृत्रिम बुध्दिमत्तेवर ताबा माणसाचाच रहाणार आहे; असे मला वाटते.

    • तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे कारण जपानअध्ये तयार करण्यात आलेल्या नवीन 4 रोबोट नी तेथील लॅब ची तोडफोड करून तेथील व्यक्तींवर देखील हल्ला केला होता त्यांचे हे वर्तन पाहता त्यांना बंद करण्यात आले परंतु त्यापैकी एक रोबो नी आपली सर्व information satelite ला पोहोचवली होती ज्यामुळे त्याला बंद करणे अवघड जात होते तो auto पध्छतीने चालू होत होता तो लॅब मधून पळून जाण्यात सफल झाला त्या नंतर तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला साफळा लावून पकडले नंतर बरेच प्रयत्न करून या रोबोना कायम साठी बंद करण्यात आले

  • ज्याअर्थी ते म्हणताहेत की “मानवी मेंदूची जागा घेईल अश्या कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती आवश्यकच आहे का..? तर उत्तर स्पष्ट आहे “नाही… आणि तुम्ही जे म्हणताहेत की इंधन आणि वीज पुरवठा तर तिथे त्याची निर्मिती आणि controlling साठी सुद्धा AI चे robots काम करत असतील… त्यांचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रात असेल.. दूरदृष्टीने विचार केला तर ते आपल्यावर हावी होणार हे १००% खरं आहे…

  • तुमचे म्हणणे अगदी बरो्बर आहे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अपघात कमी होईल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या वाढेल

  • AI मानवी विकासासाठी आवश्यक बाब होऊन बसली आहे, शतके, दशके, वर्ष उलटून जात आहेत.. आणि प्रत्येक दशकांत नवनवीन क्रांती घडवून येते आहे..
    समाजात होणारे बदल, नावीन्य, प्रगतशिलता आपण थांबवू शकत नाही, कारण बदलत्या पर्यावरणासोबत नवीन पिढी सुद्धा विचाराने, आचराने बदलत आहे. AI त्यांच्यासाठी मोबाईल इतकेच महत्वाचे होइल.
    कारण मानवी जीवन म्हणजे, सतत होणाऱ्या बदलास सामोरे जाणे होय…

  • AI मानवी विकासासाठी आवश्यक बाब होऊन बसली आहे, शतके, दशके, वर्ष उलटून जात आहेत.. आणि प्रत्येक दशकांत नवनवीन क्रांती घडवून येते आहे..
    समाजात होणारे बदल, नावीन्य, प्रगतशिलता आपण थांबवू शकत नाही, कारण बदलत्या पर्यावरणासोबत नवीन पिढी सुद्धा विचाराने, आचराने बदलत आहे. AI त्यांच्यासाठी मोबाईल इतकेच महत्वाचे होइल.
    कारण मानवी जीवन म्हणजे, सतत होणाऱ्या बदलास सामोरे जाणे होय…म्हणून AI विषयी चांगले किंवा वाईट बोलणे सध्या तरी योग्य वाटतं नाही.
    कारण प्रत्येक divice चें फायदे तोटे हे असणारच, जे नवीन तंत्र वापरणार तेच त्याचा योग्य उपयोग समजू शकतील..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.