आजवर जी कामे मानवी बुद्धिमत्तेच्या वापराशिवाय शक्य नव्हती अशी कामे यंत्रांकरवी करून घेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रणालीस कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणतात. यात मशीन लर्निंग, पॅटर्न रेकग्निशन, बिग डेटा, न्यूरल नेटवर्क्स, सेल्फ अल्गोरिदम इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक संगणक वापरून आधुनिक काळातच संग्रहित प्रोग्रामद्वारे विकसित केले गेले असले तरी या संकल्पनेचा उगम पौराणिक कथांमध्ये तसेच विज्ञानकथांमध्ये आढळतो.
कृत्रिम जीवन आणि स्वयंचलित यंत्रे तयार करण्याचे आकर्षण माणसाला पुराणकाळापासून असल्याचे दिसते. कृत्रिम जीवन म्हणजे जैविक प्रक्रियांचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांचे एकीकरण (synthesis) आणि त्यांच्यासारखी पुनर्निर्मिती (simulation) करण्याचा प्रयास होय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा संकल्पनेच्या पातळीवर उगम ग्रीक पौराणिक कथेमध्ये झाल्याचे दिसते. यामध्ये टॅलोस नावाचे कांस्य राक्षसाचे पात्र आहे. हा ‘स्वयंचलित’ प्राणी आक्रमणकर्त्यांपासून क्रेटचे संरक्षण करताना दिसतो. टॅलोस हा पृथ्वीवर चालणारा पहिला कल्पित रोबोट् आहे. हेफेस्टस आणि डेडेलसच्या ग्रीक मिथकांमध्ये अशा बुद्धिमान रोबोट् आणि पांडोरासारख्या कृत्रिम प्राण्यांची कल्पना आढळते. प्राचीन ग्रीक लोकांनी वृद्धत्वासारख्या जैविक घटना मानवी तंत्रज्ञानाने बदलल्या जाऊ शकतात अशी कल्पना केली होती, असे यातून लक्षात येते. रोमन, भारतीय आणि चिनी मिथकांमध्येही कृत्रिम जीवन, स्वयंचलित जैविक यंत्रे अशा कल्पना आढळतात. भारतीय दंतकथेत बुद्धाच्या मौल्यवान अवशेषांचे रक्षण रोबोट् योद्ध्यांनी केल्याचे आढळते. आजच्या काही सर्वात प्रगत नवकल्पना प्राचीन पुराणकथेमध्ये पूर्वचित्रित केल्या गेल्या होत्या. मानवासारखी बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांची कल्पना ललित साहित्यात सन १८७२ मध्ये सॅम्युअल बटलरच्या ‘एरेव्हॉन’ कादंबरीमध्ये प्रथम आल्याचे दिसते. त्यानंतर अनेक विज्ञानकथा व कलाकृतींमध्ये रोबोट्सच्या विद्रोहासारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध संभाव्य परिणामांची कल्पना करण्यात आल्याचे आढळून येते. स्टॅनले कुब्रिकचे ‘२००१:अ स्पेस ऑडेसी’, आयझॅक आसिमोव्ह यांचे ‘आय रोबोट्’, डेनिस ई. टेलरचे ‘वी आर लीजन’, बेकी चेंबर्सचे ‘अ क्लोज्ड अँण्ड कॉमन ऑर्बिट’, लुईसा हॉल यांचे ‘स्पीक’ आणि जॉर्ज लुकासद्वारा निर्मित स्टार वॉर्स चित्रपटशृंखला अशी काही उदाहरणे सांगता येतील. गोष्टी आधी माणसांच्या कल्पनेत घडतात आणि मगच पुढे कधीतरी प्रत्यक्षात येतात हेच खरे!
आज मानवी आज्ञा आणि क्रियाकलाप समजून घेण्यासाठी आणि सध्या माणसे करतात ती विविध कामे करण्यासाठी लाखो अल्गोरिदम आणि कोड आहेत. फेसबुकवर आपल्याला मिळणारी फ्रेंड सजेशन्स, इंटरनेटवर ब्राउजिंग चालू असताना स्क्रीनवर प्रकटणारे, आपल्या आवडत्या ब्रँडच्या शूज आणि कपड्यांबाबतचे पॉप-अप्स, ही कृत्रिम बुद्धिमत्तेची किमया आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक जटिल तंत्रज्ञान आहे. यामध्ये विशिष्ट विदा मशीनला पुरवणे आणि वेगवेगळ्या परिस्थितींनुसार प्रतिक्रिया देणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. ज्यांची उत्तरे आजवर फक्त माणूसच देऊ शकत होता अशा प्रश्नांची उत्तरेदेखील स्वयंशिक्षण पद्धतींचा वापर करून आता मशीन देऊ लागले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर मानवी मेंदूच्या, समस्या सोडवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या, क्षमतेचे संगणक आणि मशीनच्या सहाय्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अनुकरण करते. आपण समाजमाध्यमांवर स्क्रोल करत असताना आपल्याला काय पहायचे आहे याचा अंदाज लावण्यापासून ते आपल्याला हवामानाचा अंदाज सांगण्यापर्यंत कृत्रिमप्रज्ञा सर्वव्यापी होते आहे.
कृत्रिमप्रज्ञेचा विकास आणि विस्तार सामायिक मानवी मूल्यांसह होण्याकरिता जागतिक नियम आणि संबंधित करार नैतिकतेवर आधारित असावेत, यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये युनेस्कोमध्ये १९३ देशांदरम्यान कृत्रिमप्रज्ञेच्या नैतिकतेवर एक महत्त्वपूर्ण करार झाला. सदस्य देशांवर अंमलबजावणीची जबाबदारी सोपवताना त्यांनी प्रथम कृत्रिमप्रज्ञेबाबत जागतिक मानक आराखडा निश्चित केला आहे. कृत्रिमप्रज्ञा विकासक, व्यावसायिक आणि सरकार यांच्यातील शक्तीचे संतुलन, मानवी हिताला प्राधान्य, सदस्य देशांद्वारे ‘संशोधन-डिझाइन-डेव्हलपमेंट-डिप्लॉयमेंट आणि वापर’ या एआय प्रणालीच्या संपूर्ण जीवनचक्राचे नियमन, विदेचे व्यवस्थापन, गोपनीयता आणि माहितीपर्यंत प्रवेश, ‘सोशल स्कोअरिंग’ आणि सामूहिक पाळत ठेवण्यावर बंदी, पर्यावरणाचे संरक्षण, ही कराराची उद्दिष्टे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेची गुरुकिल्ली नेहमीच प्रातिनिधिक असते, असे मज्जातंतूशास्त्रज्ञ जेफ हॉकिन्स सांगतात. कृत्रिमप्रज्ञेच्या आरेखन चमूमध्ये महिला आणि अल्पसंख्याक गटांना उचित प्रतिनिधित्व दिले पाहिजे. वापरकर्त्यांचे विदेवर नियंत्रण असावे. त्यांना आवश्यकतेनुसार माहिती मिळवता व हटवता यायला हवी. सदस्य राष्ट्रांनी संवेदनशील विदा आणि प्रभावी उत्तरदायित्व योजना तसेच तक्रार निवारणासाठी योग्य सुरक्षा उपाय केले असल्याची खात्री करून घ्यायला हवी. सोशल स्कोअरिंग आणि मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवण्यासाठी कृत्रिमप्रज्ञा प्रणालीचा वापर करण्यास यात स्पष्ट मनाई आहे. अंतिम जबाबदारी आणि उत्तरदायित्व नेहमीच माणसावर असले पाहिजे, यावर जोर देण्यात आला आहे. सदस्य देशांना नियामक आराखडा विकसित करताना या सर्व गोष्टींची काळजी तसेच एआय तंत्रज्ञानास त्याचे स्वतःचे कायदेशीर व्यक्तिमत्व दिले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. हे झाले नाही तर मानवाने आजवरच्या इतिहासात यापूर्वी कधीही अनुभवली नाही इतकी असमानता आणि अनर्थ यातून ओढवू शकतो. हवामानबदलाविरुद्धच्या लढ्यात आणि पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी तसेच ऊर्जा आणि संसाधनांसाठी एआय एजंसीज् नी कार्यक्षम विदा देण्याची गरज आहे. एआय तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देताना कार्बन फूटप्रिंट, ऊर्जेचा वापर आणि कच्च्या मालाच्या उत्खननाचा पर्यावरणीय प्रभाव यासारख्या विविध प्रभावांचे संबंधित सरकारने मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक क्षेत्रांमध्ये विविध फायदे आहेत. पोलीसयंत्रणेत कृत्रिमप्रज्ञेद्वारे केंद्रीय डेटाबेसशी चेहऱ्याची ओळख जुळवून, गुन्ह्यांच्या रीतीचा अंदाज घेऊन आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून संशयितांची ओळख पटवता येते. सरकार गुन्हेनोंदींचे सीसीटीएनएस नावाच्या एकाच ठिकाणी डिजीटायझेशन करण्यात येत आहे. इथे गुन्हेगार किंवा संशयितांची छायाचित्रे, त्यांच्या बोटांचे ठसे तसेच त्यांच्या गुन्हेगारी इतिहासासह सर्व माहिती उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता यावेत यासाठीची माहिती कृत्रिमप्रज्ञेद्वारे मिळते. हवामानाची परिस्थिती, तापमान, पाण्याचा वापर किंवा शेतजमीन यांसारख्या कृषिविदेचे विश्लेषण करण्यात कृत्रिमप्रज्ञा मदत करते. पिकांवरील रोग, कीटक तसेच शेतातील खराब पोषण अचूक शोधण्यात कृत्रिमप्रज्ञा उपयोगी ठरते. एआयसेन्सर तण शोधून त्यांना लक्ष्य करू शकतात तसेच योग्य बफरझोनमध्ये कोणते तणनाशक लागू करायचे ते सुचवू शकतात. पाणीव्यवस्थापन, पीकविमा आणि कीडनियंत्रणासाठी कृत्रिमप्रज्ञेचा उपयोग करता येतो. अर्धशुष्क उष्णकटिबंधीय क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेने हवामान प्रारूपे आणि स्थानिक पीक उत्पादन आणि पर्जन्यमानावरील विदा वापरत कृत्रिमप्रज्ञेवर चालणारे पेरणी-अॅप विकसित केले आहे. याद्वारे विशिष्ट भागातील शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबद्दल अधिक अचूक अंदाज आणि योग्य सल्ला मिळू शकतो. याशिवाय औषधनिर्मिती, खाद्यप्रक्रिया, वीजनिर्मिती, अवकाशशास्त्र, हवाई वाहतूक, दळणवळण, वाहन उद्योग, बंदरे, खाणकाम, हवामान इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिमप्रज्ञेचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कोविडच्या संकटामुळे आरोग्यसेवेमध्ये एआय-सक्षम चॅटबॉट, चाचणी, निदान आणि अचूक औषधोपचारासाठी कृत्रिमप्रज्ञेचा उपयोग वाढत्या प्रमाणात सुरू झाला आहे. संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात रसद (लॉजिस्टिक) आणि पुरवठा साखळीचे व्यवस्थापन, विदा व्यवस्थापन आणि प्रगत इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अँड रिकोनिसन्स क्षमता, शस्त्रप्रणाली, सायबर सुरक्षा यांमध्ये कृत्रिमप्रज्ञा उपयोगी ठरते. एकंदरीत माणसाची मती गुंग करेल इतक्या अफाट शक्यता आणि विकासाचा वेग एआय तंत्रज्ञानामध्ये आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी बरीच मतमतांतरे आहेत. वर्तमानातील सर्वात मोठी संधी आणि सर्वात मोठा धोकाही कदाचित कृत्रिमप्रज्ञा असेल. ‘अलेक्सा’ म्हटले की लगेच प्रकटणारी, कशाला कधीच नकार न देणारी आणि नेहमी तुमच्यासाठी तत्पर असणारी परिपूर्ण स्त्री, असे कृत्रिमप्रज्ञेचे वर्णन सिबिल सेज यांनी न्यूयॉर्क टाइम्समधील त्यांच्या लेखात केले आहे. अरबी पौराणिक कथांमधील देवदूतापेक्षा निकृष्ट पण अलौकिक बुद्धिमत्ता तसेच जादुई शक्ती असलेल्या सुरस आणि चमत्कारिक जिन्नची इथे आठवण होते. डीपमाइंडसारख्या समूहांच्या थेट संपर्कात आल्यास तुम्हाला कृत्रिमप्रज्ञा कशी घातांकीय (आणि घातक?) पद्धतीने वाढत आहे याची कल्पना येईल. येत्या पाच-दहा वर्षांत यातून काहीतरी गंभीर धोका संभवतो, असे प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी म्हटले आहे.
मानवी मेंदूच्या प्रणाली व प्रक्रियांमध्ये विलक्षण जटिल जैविक गुंतागुंत असल्याने कितीही प्रयत्न केला तरी तो कृत्रिम पद्धतीने करता येणार नाही. अर्थात मानवी बुद्धिमत्ता सदैव श्रेष्ठच राहील, असे मानणारा तज्ज्ञांचा मोठा गट आहे. हे तंत्रज्ञान वास्तवात आपल्याला समृद्ध करेल आणि याद्वारे आपण आपलीच बुद्धिमत्ता वाढवू, असे आयबीएमच्या माजी प्रमुख गिन्नी रोमेट्टी यांनी म्हटले आहे. कृत्रिमप्रज्ञा ही मानवाच्या ज्ञानशाखांमधील एक असून मानवी बुद्धिमत्ता आणि मानवी आकलनशक्ती समजून घेणे हे तिचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन जर्मन-अमेरिकन उद्योजक सेबॅस्टियन थ्रून यांनी केले आहे. कृत्रिमप्रज्ञा सन २०२९ पर्यंत मानवी मेंदूची पातळी गाठेल व पुढे त्याचा वापर करत सन २०४५ पर्यंत जेनेटिक्स, नॅनो टेक्नोलॉजी, रोबोटिक्स अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव ॲज रिव्हर्सिंग नॅनोबॉटस बनवून त्याद्वारे शरीरातील खराब होणारे टिश्यू आणि पेशी लगेच बरे करेल व यामुळे वार्धक्य रोखता येईल आणि माणूस चक्क ‘अमर’ होईल, असा आशावादी अंदाज अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ रे कुर्झवील यांनी वर्तवला आहे. मानवी अस्तित्व टिकवण्याचे तंत्रज्ञान विकसित करताना समांतरपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माणसाप्रमाणे कार्ये करण्याच्या विकसित क्षमतेचा अधिकाधिक स्वीकारही आपण करीत जाऊ, असेही कुर्त्झवील यांनी म्हटले आहे.
माणसाची बुद्धी यंत्रमानवाला लाभली तर तो माणसाला अपेक्षित कामे करेल पण आपले डोके (!) चालवून कदाचित आपल्याला नको असलेल्या काही वेगळ्या गोष्टीही करेल. स्वतःहून कार्यरत होईल आणि सतत वाढत्या गतीने स्वतःची रचना करेल. माणसाच्या वर्चस्ववादी वृत्तीला सारासार विवेकाचा अंकुश उरला नाही तर कृत्रिमप्रज्ञेचा विस्तार म्हणजे आपल्या पायावर आपल्याच हाताने कुऱ्हाड मारल्यासारखे होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मानवी हितासाठीच नाही तर अस्तित्वासाठी हे तंत्रज्ञान वेळीच रोखले पाहिजे, असा काही तज्ज्ञांचा आग्रह आहे. संथ जैविक उत्क्रांतीच्या मर्यादा असलेले मानव तिच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत आणि कृत्रिमप्रज्ञा मानवाची जागा घेईल, असे विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले आहे. बिल गेट्स यांनीही यामधील मानवी अस्तित्व नष्ट करण्याइतपत विनाशकारी क्षमतेबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कृत्रिमप्रज्ञेशी संबंधित समस्या काय आहेत, हे आपण पाहूया.
माणसे अविवेकी व पक्षपाती असू शकतात. एआय तंत्रज्ञान मानवनिर्मित असल्याने त्याचे परिणाम घातक व भेदभावपूर्ण होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या मोठ्या आव्हानांवर काम करण्यापूर्वी आम्ही आमच्या नैसर्गिक मूर्खपणाबद्दल काही का करत नाही, असा खोचक सवाल स्टीव्ह पॉलीक यांनी विचारला आहे. ‘गार्बेज इन गार्बेज आउट’ या तत्त्वानुसार पुरवठा करण्यात आलेल्या अपूर्ण, दोषपूर्ण वा पक्षपाती विदेमुळे गंभीर चुकीचे परिणाम संभवतात. सेलफोन, बँकखाते किंवा अपार्टमेंटमध्ये प्रवेश देताना वापरण्यात येणाऱ्या चेहरा ओळखण्याच्या प्रणालीमधून चुकीच्या लोकांना अटक वा अटकाव झाल्याची उदाहरणे आहेत. गोपनीयतेशी तडजोड ही दुसरी समस्या आहे. विदेचे विश्लेषण करून शिकताना तसेच त्यात परस्परसंवाद विदा आणि वापरणाऱ्याचा प्रतिसाद याआधारे सतत प्रारूपाद्वारे सुधारणा करताना कृत्रिमप्रज्ञा एखाद्याच्या क्रियाकलाप विदेमध्ये अनधिकृत प्रवेश करू शकते. यामुळे त्याचा गोपनीयतेचा अधिकार धोक्यात येऊ शकतो. विषम शक्ती आणि नियंत्रण हे आणखी एक आव्हान आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, उत्पादन, व्यवसाय आणि सेवांमध्ये कृत्रिमप्रज्ञेवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मोठी राष्ट्रे अथवा मोठे खेळाडू प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करणार नाहीत, याकडे सर्व देशांच्या सरकारांनी लक्ष देणे महत्त्वाचे राहील.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराने भविष्यात माणसांसाठी रोजगाराच्या संधी कमी होतील, अशी भीती अनेकांना भेडसावत आहे. हे तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्यांसाठी येत्या काळात वाढत्या संधी असतील, अशी या नाण्याची दुसरी आशादायक बाजू आहे. फॉर्च्युन बिझनेस इनसाईट्सच्या अंदाजानुसार कृत्रिमप्रज्ञेची जागतिक बाजारपेठ २१% हून जास्त चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (सीएजीआर) विस्तारेल आणि सन २०२२ मधील ४२८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून २०३० सालापर्यंत २०२५ अब्ज डॉलर्सला जाऊन ठेपेल. भारतासाठी अर्थातच यामध्ये मोठी संधी आहे. आपल्या सरकारी शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गतवर्षी एप्रिलमध्ये सुरू केलेला “युवकांसाठी जबाबदार कृत्रिमप्रज्ञा” हा मूलभूत शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सीबीएसईने याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना आता विदा विज्ञान, मशीन लर्निंग आणि कृत्रिमप्रज्ञेमधील मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये शिकवली जात आहेत. याबरोबरच विवेकाचे व शांततामय सहअस्तित्वाचे संस्कारही त्यांच्यासाठी गरजेचे असतील.
(सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व स्तंभ लेखक)
सेल: ९८५०९८९९९८ ; इमेल: peedeedeshpande@gmail.com
कृत्रिम बुद्धिमत्ता हा संवेदनक्षम विषय आज तरुणांचा अत्यंत आवडता अभ्यासाचा किंवा शैक्षणिक आवश्यक प्रधानतेचा ठरला आहे. वैद्यकीय क्षेत्रामधील या विषयाचा उपयोग, अंतराळ क्षेत्रातला किंवा आपण उल्लेखलेल्या सर्व क्षेत्रातला उपयोग हा अखिल जीवसृष्टीला उपकारक झाला आहे. “अति सर्वत्र वर्जयेत” या उक्तीप्रमाणे यातून संभवत असलेला दुरुपयोग हा जगभर मानव विरोधी होऊ शकतो. विश्वाचा अकाली घस घेण्याचा मोठा प्रमाद सुद्धा यातून घडू शकतो. शास्त्रज्ञांनी याची भाकिते केलेली आहेतच! आपण हा विषय सहजतेने मांडला आहे. पण मनात उद्भवलेली भीती, कुशंका याची नव्याने जाणीव झाली, हे मात्र खरं
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.त्याप्रमाणे नवीन शोधाचे चांगले परिणाम व दुष्परिणाम ही असतात.गरज ही शोधाची जननी मानले तर जास्तीत जास्त मानव कल्याण कसे होईल व विघातक कसे होणार नाही याचेही परीक्षण करावे लागणार आहे.याबाबत अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. धन्यवाद सर.
या लेखात श्री. देशपांडे यांनी कृत्रिम प्रज्ञेसंबंधातिल पोराणिक कथांचे दाखले दिले आहेत ते सार्थ आहेत. कोणतीही नविन शोध प्रत्यक्षात येण्यापूर्वी त्याची संकल्पना आपल्या मनात तयार होत असते, हे सत्यच आहे. पण त्यांनी कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होउन कदाचित मानवाला अमरत्व प्राप्त होउ शकेल, ही बाब सृष्टिचक्राला घातकच ठरेल. आज उत्पत्ती आणि विनाश यामुळे सृष्टीचा समतोल राखला गेला आहे. उद्या कृत्रिम प्रज्ञेमुळे मानव अमर झाला तर मानवाला ही पृथ्वी निवासासाठी अपुरी पडेल. या सृष्टित निर्माण होणारे अन्नधान्य सद्यकाळातच अपुरे पडत आहे. मानव अमर झाला तर सृष्टीचा समतोलच बिघडून जाईल.