मेरिअम वेब्स्टर नावाच्या नामवंत शब्दकोशात जेव्हा आपण ‘intelligence’ ह्या शब्दाची व्याख्या शोधू पाहतो तेव्हा ज्या काही व्याख्या येतात त्या सर्व व्याख्यांचा सारांश हा मी माझ्या शब्दात असा मांडतो; ‘स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून स्वतःच्या परिस्थितीचे पृथक्करण व त्या परिस्थितीत योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी करता येऊ शकणारा सर्जनशील प्रयत्न’.
संगणक हा त्याच्याकडे असलेल्या बायनरी स्मृतीचा वापर करून त्यांच्या गणिती क्षमतेनुसार माहितीचा साठा नक्कीच करू शकतो परंतु त्या माहितीचे पृथक्करण करणे त्याला शक्य नाही. संगणक गणिती ज्ञान सहजपणे हाताळू शकतो आणि मोठमोठी गणिते चुटकीसरशी हातावेगळी करू शकतो परंतु त्याला तशा सूचना देणे मात्र गरजेचे असते आणि त्या सूचना फक्त मानवच देऊ शकतो.
मानवाने समजा एखादी माहिती देऊन त्या माहितीचा संख्याशास्त्रीय किंवा गणिती आढावा घे असे संगणकाला सांगितले तर तो ते कोणतेही आढेवेढे न घेता इमानेइतबारे करू शकतो. परंतु त्याला ते सांगणे गरजेचे असते.
मी जीवशास्त्राच्या विद्यार्थी आहे आणि मला गणिताबद्दल आणि संगणकशास्त्राबद्दल शून्य ज्ञान असल्याने त्याबद्दल मी बोलणे टाळतो. पण आज माझ्यासोबत एक गमतीशीर प्रकार घडला. आमच्या परिसरामध्ये बरेच कुत्रे आहेत, आणि त्या कुत्र्यांना खाऊ घालणारी माणसे पण भरपूर आहेत. त्यामुळेच वसतीगृहाच्या ब्लॉकसमोर हे अधाशी कुत्रे शेपूट हलवत तेथून येणेजाणे करणाऱ्या लोकांच्या मागे लागतात. आज एक कुत्री मात्र जिवाच्या आकांताने विव्हळत (कण्हल्यागत भुंकत) लोकांसमोर अन्नाची याचना करत होती. अर्थातच मला राहवले नाही म्हणून बिस्किटाचा एक पुडा विकत घेऊन तिला मी तो खाऊ घातला…
संध्याकाळी जेव्हा मी परत वसतीगृहावर आलो तेव्हा तीच कुत्री परत धावत शेपूट हलवत जवळ आली. तेव्हा ती मला कुठेतरी बोलवत असावी असे वाटून मी तिच्यामागे गेलो तर परिसरामध्ये एका आडवाटेला एका खड्ड्यात तिची सगळी पिल्ले पहुडलेली होती. थोडक्यात काय तर त्या स्वतःच्या बाळांना दूध पाजता यावे म्हणून त्या कुत्रीची ही सगळी धडपड सुरू होती.
आता तुम्ही म्हणाल की ह्या कुत्र्यांचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय संबंध? आहे! संबंध आहे. जैविक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातला एक सरळ साधा फरक आपल्याला इथे दिसून येतो जो आपण ‘हेतू’ ह्या एका शब्दात मांडू शकतो. जैविक बुद्धिमत्तेमागे एक ‘हेतू’ असतो जो कृत्रिम बुद्धिमत्तेला नसतो.
हा हेतू म्हणजे नेमके असते तरी काय? आपण हे डार्विनच्या उत्क्रांतीशास्त्राचा वापर करून समजून घेण्याचा प्रयत्न करू. ह्या जगात जगण्याला लायक अशा गोष्टी तग धरतात आणि पूरक नसलेल्या गोष्टी जगाच्या एकूणच जैविक स्पर्धेत तग धरू शकत नाहीत. त्या कुत्रीचे मातृत्व हे जीवनाला अनुकूल म्हणून टिकून आहे. त्या कुत्रीला आपल्या पिल्लांच्या सुरक्षेची आणि सुदृढतेची चिंता असणे हे तिला तिच्या आईकडून आणि तिच्या मातृवंशाकडूनच मिळालेले आहे.
ज्या मादा-कुत्र्यांमध्ये स्वतःच्या पिल्लांविषयी माया नव्हती त्यांची पिल्ले ही जगाच्या रेट्यात तग धरू शकली नाहीत. परंतु ज्या मादा-कुत्र्यांमध्ये हे मातृत्व होते, त्यांच्या पिल्लांनी मात्र नुसता जगाच्या रेट्यात तग धरला नाही तर त्याकरिता लागणाऱ्या जनुकांचा संच पण त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला देऊ केला.
माझी पिल्ले जिवंत राहावीत हा ‘हेतू’ ज्याप्रकारे कुत्रीकडे असतो तसा हेतू कोणत्या यांत्रिक बुद्धिमत्ता असलेल्या यंत्राला असेल का? ह्या जैविक बुद्धीला ज्याप्रकारे गोष्टींची फोड करून त्यातील खाचाखोचा शिकता येतात त्याप्रमाणे ह्या यांत्रिक बुद्धीला विश्लेषण जमत असेल का? तर सहज आपण नाही असे उत्तर देऊ शकतो.
यंत्रांना जैविक आशाआकांक्षा नसतात त्यामुळे त्यांना जैविक बुद्धिमत्ता असु शकत नाही. जैविक बुद्धिमत्ता ही जीवनसातत्य, प्रजनन, पोषण, वेदनारहित आयुष्य इत्यादी गरजांना गृहीत धरून तयार झालेली असते. जीवनाच्या प्रतिकूलतेत तग धरून राहणे आणि जगण्यातील सातत्य व समतोल राखणे हा जैविक बुद्धिमत्ता असणाऱ्या प्राण्यांचा हेतू असतो.
यांत्रिक बुद्धिमत्ता ही हेतूशून्य असते. तसेच फक्त ऐकीव माहितीवर संख्याशास्त्रीय गणिते करून ती माहिती आणखी सोयीस्करपणे मांडू शकते. परंतु तिला नवीन माहिती, ठोकताळे किंवा प्रमेये मांडता येत नाही.
एखाद्या मशीनला संख्याशास्त्राचा वापर करून ट्युरिंग टेस्ट नक्कीच पास करता येईल; परंतु जैविक हेतू नसल्याने जैविक बुद्धिमत्तेशी ती स्पर्धा करू शकणार नाही. समजा एखाद्या AI मशीनला गणिताची सोडून कोणतीही विदा न देता फक्त एखादी वस्तू खाली पडताना दाखवली तर ती मशीन स्वतःहून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकेल का? नाही! गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्या जिज्ञासेने लावला ती जिज्ञासा मानवजातीमध्ये उत्क्रांत झालेली आहे आणि तिच्यामागे असलेला औत्क्रांतिक हेतू हा स्पष्टपणे जीवनसातत्याचाच आहे. जिज्ञासू व्यक्ती जीवनाला सहज आणि सुखकर बनवण्याचे नवनवीन फंडे शोधून काढत असते, म्हणूनच तर टिकून राहते.
फक्त ट्युरिंग टेस्ट पास केलेल्या कोण्या मशीनला जर स्वतःच्या अस्तित्वाची भीतीच नसेल तर ती मशीन जैविक गुणवैशिष्ट्ये आणि जैविक हेतू का बरे दाखवेल? आणि अशा मशीनच्या बुद्धिमत्तेला मानवाने का म्हणून स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या तोडीचे मानावे?
ह्याचे साधे उदाहरण हे ‘चायनीज रूम टेस्ट’ मधून देता येते. जॉन सर्ले नावाच्या एका तत्त्ववेत्याने ही परीक्षा एक गृहीतक म्हणून मांडली. ह्या चाचणीत एका संगणकाला किंवा एका जिवंत माणसाला जर चिनी भाषेची सगळी अद्याक्षरे असलेला शब्दकोश आणि चिनी भाषेचा व्याकरणकोश देऊ केला तर ती व्यक्ती चिनी माणसाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकेल. म्हणजे करायचे काय तर १) एका बंद खोलीत चिनी भाषा न येणाऱ्या माणसाला ठेवा. २) त्या माणसाकडे चिनी भाषेतले काही व्याकरणाचे संदर्भग्रंथ द्या. ३) दरवाज्याच्या फटीतून त्याच्यासाठी चिनी भाषेत एक संदेश लिहून पाठवा. ४) त्याच्या उत्तराची वाट पहा.
ह्या प्रयोगाचा निकाल: खोलीच्या आत असलेल्या माणसाला चिनी भाषेचा एकही शब्द ‘ओ’ का ‘ठो’ माहीत नसतानासुद्धा तो माणूस आत पाठवलेल्या संदेशाचे चिनी भाषेत अस्खलित उत्तर लिहून बाहेर देऊ करतो.
पण ह्याचा अर्थ काय? तो माणूस चिनी शिकला का? नाही! त्या माणसाला चिनी भाषेचे अजिबात ज्ञान नाही आणि तो फक्त आलेल्या अक्षरांना व्याकरणाच्या दृष्टीने योग्य रचनेत जुळवून बाहेर पाठवतो. तो माणूस ह्या प्रयोगानंतरही चिनी भाषेबद्दल तितकाच अज्ञानी असेल जितका तो माणूस ह्या प्रयोगाआधी होता.
आजची कृत्रिमप्रज्ञा प्रणाली GPT सारख्या संगणकीय प्रोग्रामच्या माध्यमातून भाषेच्या वाक्यरचनेचा संख्याशास्त्रीयदृष्ट्या वापर करून अस्तित्वात असलेल्या माहितीचे पुनःअनुमोदन करून फक्त ती माहिती जशीच्या तशी आपल्यापुढे मांडत आहे. म्हणजे संख्याशास्त्रीय दृष्ट्या If ने सुरू होणाऱ्या वाक्यात असलेला प्रश्न हा then ने पुढे जोडल्या जाणाऱ्या वाक्याने पूर्ण होतो हे त्याला भरवलेल्या माहितीच्या जोरावर तो शिकलेला आहे. किंवा विचारलेल्या प्रश्नात असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत नसतानासुद्धा तो फक्त भरवलेल्या माहितीनुसार त्या प्रश्नातील कर्म जाणून घेऊन त्याच्याशी निगडीत माहिती परत वाक्याच्या त्याच साच्यात घालून आपल्याकडे पाठवत आहे. ‘चायनीज रूम प्रयोगा’तल्या चायनीज न येणाऱ्या माणसाप्रमाणे आजची कृत्रिमप्रज्ञा आहे आणि त्यामुळे ती नाविन्यपूर्ण काही करू शकेल ह्याची आज तरी सुतराम शक्यता नाही.
पण उद्या मात्र हे चित्र नक्कीच बदलू शकते. आणि आपल्याला नक्कीच कोणा विचारी यंत्राला सामोरे जायची वेळ येऊ शकते. आणि त्यावेळी चित्र नक्कीच उलटे असू शकते. परंतु ते यंत्र मानवी सर्जनशीलता दाखवू शकेल का? तर ह्याची शक्यता कमी आहे! मी वर ‘हेतू’ ह्या विषयावर जे काही लिहिले आहे त्यावरून तुम्हाला आता अंदाज आला असेलच. जर संगणकाला काही हेतू नसेल तर मग तो त्याची हुशारी स्वतःहून कुठे वापरेल? त्यामुळे संगणक कितीही हुशार झाला तरी तो मानवापेक्षा जास्त सर्जनशील नक्कीच होणार नाही.
तुम्ही आता विचारात पडला असाल की माझ्यासारख्या जैवशास्त्राच्या विद्यार्थ्याला ह्या सगळ्याशी काय देणंघेणं? कृत्रिमप्रज्ञेमुळे आमच्या विषयात अनेक नवनवीन पायंडे पडण्याची शक्यता आहे. जैवशास्त्राच्या संशोधनात कृत्रिमप्रज्ञेमुळे कैक आमूलाग्र बदल होणार आहेत. आणि माझ्या अल्पशा बुद्धीला आत्तापर्यंत जे काही उमगले आहे त्यावरून तरी सगळे बदल हे सकारात्मक वाटत आहेत.
जैवशास्त्राच्या संशोधनात वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानाची उत्पत्ती होत असते. काही ज्ञान हे प्रयोगाअंती निर्माण होते तर, काही ज्ञान हे आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचे निरीक्षण करून आपल्याला मिळते. शिवाय बऱ्याच वैद्यकीय चाचण्यासुद्धा आपल्या ज्ञानात भर पाडत असतात. पण अस्तित्वात असलेल्या माहितीचे संकलन आणि त्याचे विश्लेषण करूनसुद्धा आपल्या ज्ञानात भर पडू शकते. काटेकोर परीक्षण आणि मेटा-विश्लेषणसुद्धा ह्याचप्रकारे अस्तित्वात असलेल्या माहितीचा वापर करून आपल्या ज्ञानात भर पाडतात.
सद्यःस्थितीत ‘पब्लिश ऑर पेरिश’ संस्कृतीच्या प्रभावामुळे शास्त्रज्ञ हे शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या दबावात असतात. हे सगळे शास्त्रज्ञ आपल्या नावावर दाखवण्यापुरते काही शोधनिबंध असावेत म्हणून परीक्षण करण्याच्या भानगडीत पडतात. हे परीक्षण शक्यतो फक्त उपलब्ध असलेल्या माहितीचे संकलन एवढ्यावरच राहून जाते आणि त्याउपर त्याचे काहीही मूल्य नसते. ज्याला एखाद्या विषयाचे सगळे ज्ञान एका ठिकाणी संकलित स्वरूपात हवे असेल तो ते ज्ञान परीक्षण वाचून चटकन् मिळवू शकतो.
शिवाय एखाद्या परीक्षणामधून संशोधक त्या विषयातील अनुत्तरित प्रश्न जगासमोर आणत असेल तर तेव्हाच ते परीक्षण चांगले असे म्हणता येते. परंतु आजकालची बहुतांश परीक्षणे फक्त शब्दांचे खेळ म्हणूनच केलेली आहेत की काय असे वाटते. त्या परीक्षणांमधून अनुत्तरित प्रश्न तर सोडाच, साधे विषयात झालेले नवे बदलसुद्धा कळून येत नाहीत. पण आत्तापर्यंत वेळ वाचावा आणि ४०-५० शोधनिबंध एका दमात वाचल्याचे पुण्य पदाराशी पडावे म्हणून परीक्षण गरजेचे होते. पण आता तसे नाही.
कृत्रिमप्रज्ञेमुळे बुंदीच्या लाडवांसारखी परीक्षणे पडण्याची प्रथा तरी खुंटेल असे मला वाटते! उदाहरणार्थ: १) Elicit सारख्या कृत्रिमप्रज्ञेचा वापर करून माझ्यासारखे विद्यार्थी हे कोण्या परीक्षणावर अवलंबवून राहण्याऐवजी विषयाचा सारांश लगेच समजून घेऊ शकतील. २) Research Rabbit सारख्या कृत्रिमप्रज्ञेचा वापर करून मी अनुत्तरित प्रश्न स्वतः चुटकीसरशी शोधून काढू शकतो.
कृत्रिमप्रज्ञेमुळे परीक्षणे लिहिण्याची गरज बहुतांश संपेल; परंतु तरीही काही ठिकाणी परीक्षणे गरजेची असतील. ज्या ठिकाणी सर्जनशीलतेची गरज आहे तिथे कृत्रिमप्रज्ञा काहीही करू शकणार नाही. तुम्ही स्वतःहून विचार करण्याला पर्याय पूर्वीही नव्हता आणि आत्ताही नसेल. त्यामुळे अनावश्यक हमाली करणाऱ्या लोकांना ह्यापुढे टिकाव धरणे बऱ्यापैकी कठीण जाईल. पूर्वी वैद्यकीय माहितीचे संकलन करायला वैद्यकशास्त्रातील लेखक असायचे. आता ह्या वैद्यकशास्त्रातील लेखकांची नोकरी कृत्रिमप्रज्ञेमुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
फक्त वैद्यकीय माहितीचे पृथक्करण करणारे फार्मसीतले वैद्यकीय संशोधक, निम्नस्तरीय उत्पादनामधले लोक, किंवा असे सर्व लोक जे फक्त एक्सेल शीट भरणे आणि डेटा-एन्ट्री करणे असल्या कामांवर आहेत त्यांची नोकरी कृत्रिमप्रज्ञेमुळे नष्ट होऊ शकते.
पण ज्या कामात फक्त सरधोपट गाढवासारखी मजुरी नसेल ते काम मात्र कृत्रिमप्रज्ञा करू शकणार नाही. त्यामुळे जे वैद्यकीय संशोधक नुसता माहितीचा साठा न करता त्या महितीमधून योग्य ते वैद्यकीय आणि औषधक्रियेला पूरक असे कंगोरे शोधून काढू शकतील ते मात्र नक्कीच कृत्रिमप्रज्ञेच्या जगात टिकाव धरतील. कृत्रिमप्रज्ञेमुळे निर्मितीक्षम, सर्जनशील आणि कल्पक जैवशास्त्रज्ञांना अजिबात धोका नाही!
पण चिंता करू नका. टॅक्सीमुळे टांगा चालवणारे लोक बेरोजगार झाले तरी तेच टांगा चालवणारे नंतर टॅक्सी चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करू लागले. तसेच जैवशास्त्राच्या ज्ञानाचा वापर करून सर्व जैवशास्त्राचे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वतःच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा वापर करून स्वतःसाठी एक ध्रुवपद निर्माण करूच शकतील, असा आत्मविश्वास वाटतो..
(औषधविद्येचा आणि जैवतंत्रज्ञानाचा विद्यार्थी)
मराठी वाचकांसाठी AI म्हणजे काय आणि त्याचे संभावित परिणाम वर्णन करणारा अतिशय बोधप्रद लेख
अतिशय छान लेख👌
जैविक बुद्धिमत्तेला आव्हान देऊ पाहणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती ही सिमीत असल्याचे या लेखामध्ये अधोरेखित झाले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रेम, सृजनशीलता, भावना विरहित आहे पण “हेतू” हा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे येथे दाखवून दिले आहे.
सुलभ, सुंदर आणि सुरेख मांडणी. धन्यवाद !!
जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून दाखवण्यात आलेला जैविक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील फरक दैनंदिन जीवनातील उदाहरण वापरून सहज सोपे करून मांडले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती कितीही झपाट्याने वाढत असली तरी जैविक बुद्धिमत्तेची उंची व खोली दोन्ही गाठणे सध्या तरी सोपे नाही.
जैविक बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत किती सक्षम व परिपूर्ण आहे हे या लेखातून सुंदर व व्यवस्थित रित्या मांडण्यात आले आहे.