१८ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यामध्ये ‘ब्राइट्स’ संस्थेतर्फे नास्तिक परिषद घेण्यात आली होती. नास्तिकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार जगण्याचा एक आयाम आहे याबद्दल दुमत नसले तरी ते आस्तिकांच्या पचनी पडणे कठीण असते. म्हणूनच काही आस्तिकांना नास्तिकांबद्दल घृणा, राग, द्वेष वगैरे वगैरे असतो. पण याची कारणे वैयक्तिक आहेत का? तर नाही. आस्तिकांना नास्तिकांबद्दल वाटणाऱ्या रागाचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे नास्तिकांकडून होणारी धर्माची चिकित्सा आणि धर्माच्या उन्मादाविरोधातील त्यांची भूमिका. म्हणूनच ‘देवा-धर्माची चिकित्सा करू नये, त्याबद्दल प्रश्न निर्माण करू नये’, अशी शिकवण असणाऱ्या आस्तिकांना नास्तिकांचा राग येणे स्वाभाविक आहे.
मेंदूला एका चौकटीत बंदिस्त करून, कायमचे कुलूप लावून, आंधळेपणाने एखादी गोष्ट धार्मिक प्रवाहपतितांसारखी करत रहाणे नास्तिकांना जमत नाही. कारण बहुतांश नास्तिक हे विज्ञाननिष्ठ असतात. त्यांना सतत प्रश्न पडत असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणे आवश्यक वाटते. मग तो धर्म असो, अध्यात्म असो की विज्ञान. (मी ‘बहुतांश नास्तिक’ असा शब्दप्रयोग मुद्दामहून केलेला आहे. कारण सगळेच नास्तिक विवेकवादी असतातच असे नाही. नास्तिकता ही विवेकवादाकडे जाण्याची एक पायरी आहे.)
नास्तिकांना आस्तिकांच्या विरोधात उभे राहण्याची गरजच पडली नसती, जर आस्तिकांनी त्यांचे देव-धर्म त्यांच्या घरात, उंबराठ्याच्या आत ठेवले असते. त्याचा रस्त्यावर उतरून तमाशा केला नसता. कुणी घरात काय करावे, काय खावे, काय ल्यावे… भगवी चड्डी घालावी की हिरवी की नागडे फिरावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आस्तिकांचे देव रस्त्यावर उतरून धिंगाणा घालणार असतील, तर त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे की नाही?
कुणी म्हणते, “जर नास्तिक देव मानतच नाहीत, तर देवाविरोधात लिहिण्याचा अट्टाहास तरी त्यांनी का करावा?” हा प्रश्नच मुळात अविचारी नाही का? “जर तुम्ही बलात्कार करत नसाल, तर बलात्काऱ्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही” असे म्हणण्यासारखे हास्यास्पद झाले हे! देवा-धर्माविरोधात लिहिले की आस्तिकांच्या भावना दुखावतात; पण लोकशाहीत नास्तिकांना संविधानानुसार अभिव्यक्त होण्याचे साधे हक्कही मिळू नयेत का?
इथे मुद्दा नीट समजून घ्यायला हवा की, कुणाच्या वैयक्तिक/खाजगी निर्णयात कुणाचाही हस्तक्षेप चुकीचाच असतो. पण मग त्या वैयक्तिक गोष्टी तुमच्या घरापुरत्या/चार भिंतींपुरत्या मर्यादित का राहत नाहीत? सार्वजनिक जागांवर सगळ्यांचा अधिकार असतो आणि या सगळ्यांत नास्तिकदेखील येतात. असे असताना रस्त्यावर मंडप बांधून, पाच/दहा दिवस मोठ्ठाले स्पीकर्स लावून देव देव करण्याचा, विसर्जनाच्या दिवशी ट्रॅफिक जाम करून, निसर्गाची वाट लावण्याचा अधिकार आस्तिकांना कुणी दिला?
आस्तिक म्हणतात, ‘सार्वजनिक उत्सव’ हे लोकांनी एकत्र येण्यासाठी केलेले आहेत, मग एखादे सभागृह आरक्षित करा, दरवाजे लावून हवे तेवढे एकत्र या…! रस्तोरस्ती चालणारा उन्माद कशासाठी? आणि देवाच्याच नावाखाली बरे तुम्हाला एकत्र येण्याची गरज पडते? त्याऐवजी महिन्यातून एक ‘साफसफाई’ नावाचा उत्सव करा ना सुरू! या ना एकत्र!! तसे का जमत नाही? ‘जेथे असे स्वच्छता घरोघरी, तेथे देव वास करी।’ असा फक्त सुविचार भिंतीवर टांगणे यालाच धार्मिक असणे समजायचे? एकत्र येऊन जर घाणच करणार असाल, तर त्या एकत्र येण्याला तरी काय अर्थ आहे?
आजचे पंचतारांकित आश्रम असणारे बुवा, बलात्कारी बाबा, त्यांचे लाखोंच्या संख्येतील शिष्यगण आणि भक्त, जटा, दाढ्या, जनावरांचे मूत्र पिणारा भारतीय हे वास्तव पाहिले की, हजारो वर्षांपूर्वी या देशात चार्वाक जन्मावा हे एक आश्चर्यच वाटते. अर्थात धर्माचा पाया असलेले पोथीनिष्ठ तत्त्वज्ञान, यज्ञासारख्या अनिष्ट परंपरा, रूढी यांच्यावर हा पंथ किंवा विचार प्रहार करणारा होता. त्याचा प्रसार झाला तर धर्माच्या नावावर चालणारे शोषण थांबविण्याची ताकद त्यात आहे, हे धर्मांधांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी चार्वाकांना जिवंत जाळले. त्यांच्या सगळ्या साहित्याचा क्रुरतेने नाश केला. बाकी चार्वाकपंथीय जीवाच्या भीतीने अज्ञातवासात गेले. पण हा विचार विज्ञानाधिष्ठित असल्याने समूळ नष्ट झाला नाही.
चार्वाकांच्या हत्या करूनही जर तो विचार मारता येत नसेल तर तो आमचाच, असे म्हणत चार्वाकांच्या विचारांना ९ दर्शनांपैकी एका दर्शनात स्थान दिले गेले. जसे की हिंदू धर्माचा प्रसार करताना शंकराचार्यांच्या निर्देशानुसार बौद्ध भिक्खूंच्या हत्या केल्या गेल्या; पण बुद्ध विचार मारता आला नाही आणि बुद्ध विचार जगभर खूप वाढला. तेव्हा हिंदूंनी बुद्ध हा आमचाच म्हणून त्याला ९ वा अवतार बहाल केला. ही जशी मखलाशी होती तशीच चार्वाकदर्शनाला आपलेसे करण्यातही आस्तिकांची मखलाशी होती. विषय अंगाशी आला की, सावाचा आव आणून तत्त्वज्ञ बनण्याचा कातडीबचावू गुणधर्म आस्तिकांचा अंगभूत गुणधर्म आहे.
दुसऱ्या बाजूला सध्या तुकारामांना वैकुंठाला पाठवून गौरवीकारण करण्याचा हिडीस खेळ खेळला जात आहे. कारण सदेह वैकुंठाला पाठवले, म्हणजे मृतदेह शोधण्याचा कुणी प्रयत्न करत नाही वा प्रश्न विचारत नाही. त्यामुळे सामान्य माणूस तुकारामांची हत्या विसरून गेला. अशाप्रकारे त्यांच्यामागे चमत्काराचे लचांड लावून संत तुकाराम वैकुंठाला गेले या खोट्या भ्रमात तो आनंद मानू लागला, मानत आहे. म्हणूनच सामान्य धार्मिक माणसाला आजतागायत प्रश्न पडला नाही की फक्त तुकाराम महाराजांनाच सदेह वैकुंठाला न्यायला विमान आले कसे? बाकीचे इतर संत एवढे मोठे होऊन गेले, त्यातील एकालाही घ्यायला विमान का येऊ नये? म्हणजे संत तुकाराम महाराजांपेक्षाही ते कमी प्रतीचे होते की काय? अशा मखलाश्या करून सामान्य जनांचा बुद्धिभेद करणे हा सर्व काळातील धर्ममार्तंडांचा हातखंडा खेळ होता आणि राहिला आहे.
म्हणूनच अजूनही अनेक अनिष्ट रूढी-परंपरांवर आघात करणारे आधुनिक चार्वाक निर्माण होत आहेत आणि त्यांचे आजही खून पडत आहेत. या संघर्षाला अशी हजारो वर्षांची परंपरा आहे आणि तरीही तो चालूच राहणार आहे. युरोपात प्राचीन काळी अशा अनेक विचारवंतांचे बळी गेले, पण त्यानंतर युरोपात विज्ञानवादी विचारांचे प्राबल्य वाढले आणि तो विचार रुजला. आपल्याकडे मात्र प्राचीन काळातील आर्यभट, कणाद, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त इत्यादी विचारवंतांच्या वैज्ञानिक विचारांना तिलांजली देऊन धार्मिक अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड, व्रतवैकल्ये, मोक्ष अशा पारलौकिक गोष्टींना महत्त्व प्राप्त करून देण्यात धर्ममार्तंड यशस्वी झाले आणि इहलोकासंबंधीचे विचार दुय्यम ठरवले गेला. म्हणूनच आपण मागास राहिलो. सामान्य जनांचे तसे राहणे राज्यकर्त्यांना नेहमीच फायद्याचे असल्यामुळे त्यांनीही धर्मसत्तेला मदतच केली. आजही राज्यकर्त्यांनी सामान्य जनांत धार्मिक पुनरुज्जीवनवाद मोठ्या प्रमाणात वाढवत नेण्याचे षडयंत्र अवलंबिले आहे. त्यामुळे भारतात संविधानातील 51(ज) या अनुच्छेदात सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होण्यास अजून बराच कालावधी जावा लागणार आहे. त्यासाठी समाजसुधारकांना जनसामान्यांचे प्रबोधन सातत्याने करावे लागणार आहे.
लेख वाचताना पहिले सहा परिच्छेद पटणारे. तथाकथित आस्तिक लोक सार्वजनिक अवकाश देव, धर्म, परंपरा यांच्या नावाने कोलाहल करून व्यापून टाकतात आणि त्याचा शांतता प्रिय नास्तिक आणि आस्तिक या दोघांना त्रास होतो हे पटणारे आहे.
पण नंतर आडव्या बॅटने खेळणं सुरू होतं! “चार्वाकाला जाळला’ हा काय प्रकार? सोळाव्या शतकातला युरोपीयन ब्रूनो चार्वाक नावाच्या काल्पनिक व्यक्ती वर का थोपता?
आणि पुढच्याच परिच्छेदात: “हिंदू धर्माचा प्रसार करताना शंकराचार्यांच्या निर्देशानुसार बौद्ध भिक्खूंच्या हत्या केल्या गेल्या” हे कोण शंकराचार्य? ब्रह्मसूत्रातल्या अपशूद्राधिकरणावरचे अनावश्यक भाष्य आणि छांदोग्य उपनिषदातल्या जबाल कथेचा चुकीचा अर्थ लावणं या साठी त्यांना दोष द्या, पण न केलेल्या गुन्ह्याचे आरोपण कशासाठी?
आणि तुकाराम महाराजांची हत्या? हा कल्पनाविलास कशासाठी? सदेह वैकुंठगमन ही आस्तिकांची भाकडकथा आहे हे म्हणणं समजू शकत पण त्याच कटकारस्थान करण्याची काय आवश्यकता? याच न्यायाने २१ वर्षांच्या ज्ञानेश्वरांना समाधीच्या मिषाने जमिनीखाली गाडून मारला अशी कटकथा तयार करणार का?
काही आस्तिक लबाडांनी त्यांची विश्वासार्हता पार घालवली आहे पण आपला कल्पनाविलास अनिर्बंध चालवून नास्तिक तेच करत आहेत का याचा विचार व्हावा.
लेखाचा शेवटचा परिच्छेद सगळा मान्य! त्या साठी लेखकाला धन्यवाद.
शेवटचा परिच्छेद सगळा मान्य असं म्हटलं खरं पण त्यातल्या मूळ भावनेशी मी पूर्ण सहमत आहे असं म्हणणं जास्त बरोबर होईल.