१. पारलौकिक संदर्भ असलेल्या ‘शुभेच्छा’, ‘दुर्दैव’, इ. शब्दांच्या आणि रूढींच्या सयुक्तिकतेविषयी जोशी यांनी विनोद केले. परंतु, गांभीर्याने पाहिले तर अनेक शब्दांचे आणि रूढींचे अर्थ कालौघात बदललेले आहेत. समाजावर पारलौकिक धारणांचा पगडा होता तेव्हा भाषेत आणि संस्कृतीत त्यांचे प्रतिबिंब दिसणारच. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘पुत्’-नरकातून वाचवणारा अशी आहे. Mundane या शब्दाचा मूळ अर्थ ‘ऐहिक’ असा आहे. नास्तिक या शब्दाचा मूळ अर्थही ‘वेदप्रामाण्य न मानणारे’ असा आहे. हे शब्द आता वेगळ्या अर्थाने वापरले जातात. मूळ अर्थ टाळणे पूर्णपणे शक्य किंवा आवश्यक आहे का याविषयी आम्हाला खात्री नाही आणि ऐहिकतेसाठी भाषाशुद्धी हा विषय आमच्या प्राधान्यक्रमातही नाही.
२. जोशी यांनी सांगितले की ते नास्तिकही नाहीत आणि आस्तिकही नाहीत. त्याविषयी त्यांनी दोन परस्परविरोधी भूमिका मांडल्या.
२.अ. आधी ते म्हणाले की, पारलौकिक अस्तित्वात असते तर त्यांना आवडले असते कारण पारलौकिकाने आयुष्य अधिक इंटरेस्टिंग झाले असते.
२.अ.क. मुळात, कार्ल सेगन, रिचर्ड डॉकिन्स, इ. नास्तिक शास्त्रज्ञांनी असे मत मांडले आहे की ऐहिक बाबींना कंटाळवाण्या मानू नये, विज्ञानही विस्मयकारक असते, Science is the poetry of reality, इत्यादी. त्यामुळे, जर सर्वांचीच विज्ञानाची आणि तर्कबुद्धीची समज वाढली तर ऐहिक बाबींमधूनच sense of wonder चा अनुभव मिळाल्यामुळे, कदाचित लोकांची पारलौकिकासाठीची रुखरुखच कमी होऊ शकेल.
२.अ.ख. नास्तिक या शब्दाचा अर्थ ‘पारलौकिकाचे अस्तित्व नाकारणारा’ असा आहे. “पारलौकिक असते तर चांगले झाले असते” या विधानात ‘पारलौकिक नाही’ या विधानाविषयीची खात्रीच व्यक्त होते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही गरीब असाल. “तुमच्या खिशात पैसे असते तर तुम्हाला आवडले असते” हे विधान कितीही सत्य असेल तरी ‘तुम्ही गरीब नाही’ असे त्यावरून सिद्ध होणारच नाही.
२.आ. परंतु, “पारलौकिक असते तर आवडले असते” या आधीच्या भूमिकेशी विसंगत अशी, “शक्यता खुली ठेवणे”, “तर्क ही विचार करण्याची एकच पद्धत आहे की नाही ते माहिती नाही”, इ. भूमिका जोशींनी नंतर घेतली. ही भूमिका अज्ञेयवादी असू शकते किंवा ती भूमिका, ‘पास्कलची खबरदारी’ (Pascal’s wager) या नावाने ओळखली जाणारी आस्तिक भूमिकासुद्धा असू शकते.
२.आ.क. “खुले मन असणे चांगले असले तरी अक्कल सांडून जाईल इतकेतरी ते खुले सोडू नये” या म्हणीकडे आम्ही जोशींचे लक्ष वेधू इच्छितो. “देवाच्या अस्तित्वाची शक्यता कितीही छोटी असली तरीही ती जर सत्य असेल तर देव नास्तिकांना मोठी शिक्षा करू शकतो हा फारच मोठा धोका आहे. त्या तुलनेत, नुसते खबरदारी म्हणून का होईना, पण तो असेल असे मानून उपासना/आराधना करून टाकणे स्वस्त आहे” या पास्कल्स वेजरच्या तर्कदुष्टतेविषयी युक्तिवाद उपलब्ध आहेत.
२.आ.ख. अनेक नास्तिकांना व्यावहारिक अडचणींमुळे नास्तिक्य लपवावे लागते. तरीही, त्यांची विचासरणी इहलौकिक असते, त्यांच्या भूमिकांवर, धोरणांवर पारलौकिक धारणांचा प्रभाव नसतो. स्वतःला अज्ञेयवादी म्हणवणार्या व्यक्ती for-all-practical-purposes नास्तिकांसारख्याच वागतात. ऐहिक, निसर्गाधिष्ठित विचारव्यूह बाळगणार्या नास्तिक, अज्ञेयवादी, इहवादी, मानवतावादी, इ. सर्व समविचारी व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी Paul Geisert आणि Mynga Futrell यांनी ‘ब्राइट’ ही ओळख सुचवली होती. अशाप्रकारे, इहवादी विचारव्यूह असणार्या व्यक्तींना स्वतःचे नास्तिक्य प्रकट करणे शक्य नसले तरी त्या स्वतःची ओळख ‘ब्राइट’ अशी सांगू शकतात.
३. ‘ब्राइट्स सोसायटी’ या नास्तिक संघटनेतर्फे आयोजित नास्तिक परिषदेत महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंनिसतर्फे आयोजित स्मशानसहल या उपक्रमाच्या संदर्भाने बोलताना जोशींनी सूचना केली की नास्तिकांनी केवळ भुताखेतांची, भोंदूबाबांच्या चमत्कारांची चिकित्सा करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास चर्चेचा दर्जा (डिस्कोर्स) खालावतो, तसे करणे टाळावे. जोशी यांची ही सूचना आम्हाला पटते. ब्राइट्स या नास्तिकांच्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही जोशींना खात्री देतो की आम्ही त्यांचा अपेक्षाभंग करणार नाही. आमचे अनेक सदस्य अंनिसचे सदस्य नाहीत, परंतु, आमची अशी समजूत आहे की अंनिस नास्तिकतेचा पुरस्कार करत नाही. अंनिसच्या विचारसरणीची परिणती नास्तिक्यात होते असा दावा अंनिसच्या कोणत्याही शाखेने केल्याचे आमच्या ऐकिवात नाही. किंबहुना, अंनिसचे धोरणच बहुसंख्य आणि सश्रद्ध जनतेपर्यंत पोहोचण्याचे आहे. देव, धर्म, श्रद्धा यांना नकार न देता ते केवळ अंधश्रद्धांना विरोध करतात असे आम्हाला जाणवते. त्यामुळे, जोशींच्या लेखी उथळ असलेल्या भोंदूबाबा, जोगते, इ. विषयांवरच अंनिसने उर्जा केंद्रित करणे स्वाभाविक आहे. अंनिसच्या चतु:सूत्रीत नास्तिक्य नाही. त्यामुळे, त्यांनी आयोजित केलेल्या स्मशानसहलीचा नास्तिक्याशी संबंध नाही. भुतांचे अस्तित्व मानल्याने लोकांचे शोषण, फसवणूक, इ. होऊ शकते म्हणून धार्मिक व्यक्तींनीही भुतांचे अस्तित्व नाकारावे असा अंनिसचा प्रयत्न असतो. किंबहुना, रिचर्ड डॉकिन्स यांनी असे मत मांडले आहे की, अंधश्रद्धाविरोधी प्रचारात नास्तिक उतरले तर “बघा तुमच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा नावाखाली हे तुमचा धर्मच बुडवणार आहेत” असा आरोप शक्य असतो, त्याने प्रबोधनाच्या मूळ प्रयत्नांवर पाणी पडू शकते.
४. “One day, atheism will disappear as a concept. Instead, there will be normal people AND some weirdo believers.” या Frank Zappa या नास्तिक संगीतकाराच्या वक्तव्यावर टीका करताना जोशी यांनी असे सुचवले की नास्तिकांनी आस्तिकांना विक्षिप्त म्हणू नये. नरेंद्र नायक यांची जी अपेक्षा आहे की ‘सर्व धर्मांचे लोक आणि नास्तिक यांना समान दर्जा मिळावा’, त्या अपेक्षेशी झापा यांचे वक्तव्य विसंगत आहे असे जोशी म्हणाले. दीवार या चित्रपटात विजय (अमिताभ बच्चन) ची आई सुमित्रा (निरूपा रॉय) किंवा भाऊ रवि (शशी कपूर) विजयच्या नास्तिक्याबद्दल विजयला विक्षिप्त म्हणत नाहीत असेही जोशी म्हणाले.
४.अ. दीवार चित्रपटात विजयची आई त्याच्यावर नाराजच असते. त्याला सक्तीने मंदिरात नेण्यासाठी त्याच्याशी न बोलण्याची धमकीही देऊन बघते. त्याचे मंदिरात न जाणे हे ‘वाट चुकणे’ आहे असे ती मानते. त्याला आई/देवापासून दूर झोप लागत नाही, त्याला गुन्ह्यांची उपरती होते तेव्हा तो मंदिरात गेलेलाच दाखविलेला आहे. चित्रपटांमध्ये नास्तिक पात्र असले तरी बहुतेकदा त्याची भूमिका गुअटेच्या फौस्टच्या धर्तीवरच असते. नदी कितीही वळणे घेत गेली तरी सागरालाच मिळते तसे नास्तिक बहुतेक चित्रपटांच्या शेवटी ईश्वराकडे जातानाच दाखवले जातात. त्यामुळे, आस्तिक लोक नास्तिकांना हीन, वाट चुकलेले, विक्षिप्त, इ. समजत नाहीत ही जोशींची समजूत वस्तुस्थितीशी विसंगत आहे. तसेही, विजय देवावर रागवलेला असतो, तो नास्तिक नसतोच. त्यामुळे, तो तर आस्तिक आणि नास्तिक अशा दोघांच्याही दृष्टीने चूक आहे.
४.आ. “सर्व धर्माच्या व्यक्तींना आणि नास्तिकांना समान मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्ये मिळणे” आणि “सर्व मतांना समानच सन्मान मिळणे” या दोन ध्येयांमध्ये जोशी गल्लत करत आहेत. “मी तुझे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य करतो” याचा अर्थ “मी तुला चूक/मूर्ख/विक्षिप्त म्हणण्याचे माझे स्वातंत्र्य नाकारतो” असा होत नाही. किंबहुना, जेव्हा इतर कोणी व्यक्ती विक्षिप्त/चूक आहे असे तुम्हाला वाटत असूनही तुम्ही त्या व्यक्तीची मूलभूत स्वातंत्र्ये मान्य करता तेव्हाच “इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर” या तुमच्या भूमिकेचा खरा कस लागतो. इतर कोणी स्खलित, विक्षिप्त आहेत असे तुम्हाला वाटत असतानाही तुम्ही त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेत तरच तुम्ही इतरांच्या स्वातंत्र्याचे खरे पुरस्कर्ते ठरता. “सतीबंदी ही संकल्पनाच भविष्यात नष्ट होईल. आज जे लोक सतीबंदीचे पुरस्कर्ते समजले जातात त्यांना भविष्यात नुसतीच नॉर्मल माणसे समजले जाईल, आणि सतीप्रथेचे पुरस्कर्ते विकृत समजले जातील.” असे मत राजा राममोहन रॉय यांनी व्यक्त केले असते तर जोशी त्यांच्याशीही असहमत झाले असते का? पर्यावरणाच्या हानीमधील मानवी हस्तक्षेपांचे योगदान नाकारणे, पृथ्वी सपाट असल्याचे मानणे, किंवा, इंटेलिजंट डिझाईन ही उत्क्रांतीविरोधी संकल्पना मानणे, इ. भूमिकांच्या पुरस्कर्त्यांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्ये आपण मान्य करत असूनही त्यांना विक्षिप्त/चूक म्हणतोच. “तुला काहीतरी समजत नाही, ते मी शिकवतो” ही ज्ञानाची असमानता मानल्याशिवाय प्रबोधन होऊच शकत नाही.
५. जोशी म्हणाले की, प्रामुख्याने हिंदू धर्मावरच टीका करताना दाभोलकरांसारखे नास्तिक जर “आपले घर आधी साफ करूया” असे स्पष्टीकरण देत असतील तर त्यांना ‘आपण’ या शब्दाबद्दल खुलासा करावा लागेल. ते नास्तिक स्वतःला हिंदू मानतात का याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल असेही जोशी म्हणाले. परंतु, नास्तिक लोक मुळात सर्वच धर्मश्रद्धा नाकारतात. दाभोलकरांनी इस्लाममधील अंधश्रद्धांवरही टीका केली आहे, आणि अंनिसने अनेक मुस्लिम भोंदूबाबाही पकडून दिलेले आहेत. कोणत्याही धर्माची वस्तुस्थितीला धरून चिकित्सा करण्यास नास्तिकांना वावडे नाहीच. त्यामुळे, ते प्रामुख्याने हिंदू धर्मावरच टीका करतात हा आरोपच चूक आहे. तो आरोप केवळ वादासाठी खरा मानला तरी, असे लक्षात घेतले पाहिजे की, अल्पसंख्यकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या धार्मिक अभिव्यक्तीचा इतरांना होणारा त्रास हा, बहुसंख्यकांच्या धार्मिक अभिव्यक्तीमुळे होणार्या त्रासाहून कमी असण्याची शक्यताच अधिक असते. नास्तिक व्यक्ती जवळपास नेहमीच धार्मिकांसोबत अक्षरशः एकत्र राहत असते, वावरत असते. कुणाही नास्तिकाचे नातेवाईक, शेजारी, सहकारी हिंदू असतील अशी शक्यता ते इतरधर्मीय असण्यापेक्षा अधिकच असते. रस्त्यातील प्रत्येक धोंड बाजूला काढावी हे खरेच आहे परंतु, पायावर पडलेली/सर्वांत जवळची मोठी धोंड जर आधी कोणी काढत असेल तर त्यावरून ते त्या विशिष्ट धोंडीचे विरोधक आहेत असे सिद्ध होते असे नव्हे. सरकारला जमत नसलेल्या कामांकडेच बिगरसरकारी संस्था प्रयत्न केंद्रित करतात. अल्पसंख्यकांचे प्रबोधन करण्याचे (किंवा, त्यांच्या धार्मिक अभिव्यक्तीपासून इतरांच्या स्वातंत्र्यांचे रक्षण करण्याचे) काम सरकार चांगले करू शकते कारण पोलिस, जिल्हाधिकारी, न्यायाधीश, इ. शासनयंत्रणेतील बहुतेक उच्चपदस्थ अधिकारी बहुसंख्यक धर्माचेच असतात. त्याउलट, बहुसंख्यकांचे प्रबोधन करण्यात किंवा बहुसंख्यकांच्या धार्मिक अभिव्यक्तीपासून इतरांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास शासनयंत्रणा तितकीशी उत्सुक नसणे स्वाभाविक आहे. बहुसंख्यकांचे प्रबोधन करण्यापेक्षा अनेक नेते त्यांना अज्ञानी मतगठ्ठा म्हणूनच वापरू पाहतात, अल्पसंख्यकांचे मतगठ्ठे वापरून निवडणूक जिंकण्यापेक्षा बहुसंख्यकांचे मतगठ्ठे वापरून निवडणूक जिंकणे कमी अवघड असते. त्यामुळे, बहुसंख्यकांचे प्रबोधन करण्याचे काम केवळ बिगरसरकारी संस्थांवरच पडते.
६. डॉ. अरुण गद्रे लिखित ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ या, ‘इंटेलिजंट डिझाईन’च्या पुस्तकाला महात्मा फुले पुरस्कार मिळण्याचा भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी निषेध केल्याच्या संदर्भात जोशींनी असे सूचित केले की ख्रिश्चन धर्मातील चमत्कारांना वैज्ञानिक मान्यता असल्याचा दावा फ्रान्सिस दिब्रिटोंनी केलेला असूनही, दिब्रिटोंना साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळण्यास पुरोगाम्यांनी (जोशी यांचा रोख अंनिसकडे असेल) मूक संमती किंवा सक्रिय समर्थन दिले. परंतु, दिब्रिटोंशी गद्रेंची तुलना करणे अनाठायी आहे. दिब्रिटोंना केवळ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले होते, कोण्या वैज्ञानिक परिषदेत स्थान मिळालेले नव्हते. दिब्रिटोंच्या साहित्यात ख्रिश्चन धर्माचा प्रसार असला तरी, साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड करताना त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन केवळ साहित्यिक निकषांवरच झाले असेल अशी आशा करता येते. गद्रे यांच्या पुस्तकाला विज्ञानाव्यतिरिक्त इतर कोणत्यातरी विभागात पुरस्कार मिळाला असता तर ते क्षम्य मानता आले असते. उदाहरणार्थ, भारतातील अनेक विद्यापीठांच्या कलाविभागांत फलज्योतिष्य शिकवले जाण्यास न्यायालयाने क्षम्य ठरवलेले आहे. निर्मिकाचे अस्तित्व मानणार्या महात्मा फुलेंच्या नावे ‘क्रिएशनिजम’ या विषयावरील पुस्तकाला पुरस्कार मिळणे हा काव्यगत न्यायही मानता आला असता. परंतु, गद्रे यांना विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे, निवडसमितीत विज्ञानविषयातील तज्ज्ञ नेमण्यासाठी, आणि गद्रे यांचा पुरस्कार रद्द करून घेण्यासाठी (किंवा, किमान, त्याला विज्ञान विभागाऐवजी छद्मविज्ञानाच्या माध्यमातून धार्मिक अजेंडा राबवण्याचा वस्तुपाठ म्हणून पुरस्कार देण्यासाठी) नास्तिकांनी, बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पाठीराख्यांनी प्रयत्न केले पाहिजेतच. चमत्कार हा संतपदाचा निकष मानण्यास किंवा चमत्कारांचे अस्तित्व मानण्यास दाभोलकरांनी नकारच दिलेला आहे. संतांचा मानवतेचा संदेश स्वीकारणे आणि त्यांच्या चमत्कारांना नाकारणे हे धोरण अंनिस सर्वच धर्मांतील संतांविषयी सातत्याने, नि:पक्षपातीपणे राबवते असे आमचे निरीक्षण आहे.
७. “विवेकाची बेरीज करत गेलं पाहिजे, जे जे जवळ येऊ शकतात त्यांना आपण सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे.” असे जोशींनी सुचवले. परंतु, बेरीज करण्यासाठी ज्या काही इतर विचारसरणी जोशी सुचवू शकतील त्यांच्यासोबत बेरीज करण्यासाठी नेमक्या काय तडजोडी कराव्या लागतील त्याचा प्रत्येक विचारसरणीसाठी वेगळा हिशोब करावा लागेल. मुळात, संख्याबळ वाढवून मुद्दा सिद्ध करणे हे बुद्धिप्रामाण्य नसतेच. तरीही, पारलौकिकाचे अस्तित्व मानण्यास नाकारणार्या, नास्तिक, अज्ञेयवादी, इहवादी, धर्मनिरपेक्ष, इ. सर्व बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणींची बेरीज करण्यासाठीच ब्राइट्स ही चळवळ सुरू झालेली आहे. तिच्यात स्वतःचीही बेरीज करण्याचा विचार जोशी करतील अशी आम्ही आशा करतो.
नास्तिक परिषदेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. आनंद करंदीकर यांच्याशी संवाद साधताना जोशींनी अशी इच्छा व्यक्त केली की, धर्मवाद्यांशी मोकळेपणे, थेट आणि प्रदीर्घ चर्चा करून अनेक महत्त्वाच्या वादांचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न ‘विचारवेध’ने करावा, नास्तिक परिषदेत हिंदूहितवाद्यांतर्फे किमान एकतरी समंजस वक्ता आणावा, इत्यादी. जोशींनी स्वतःच्याच भाषणात हिंदुत्ववाद्यांच्या वतीने काही मुद्दे मांडले. त्यामुळे, त्यांची ही सूचना आम्ही १८ डिसेंबरच्या नास्तिक परिषदेत अमलात आणलीच आहे असे आम्हाला वाटते. विज्ञानात, falsifiability हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. “काय निरीक्षण किंवा पुरावे मिळाल्यास तुम्ही प्रतिपक्षाचे प्रतिपादन मान्य कराल?” या प्रश्नाचे उत्तर दोन्ही पक्षांनी आधीच ठरवून ठेवणे कोणत्याही वादविवादात आवश्यक असते. अन्यथा, वादविवाद हे केवळ आपापल्या समर्थकांना सुखावणारी नूरा कुस्ती उरतात. तरीही, प्रसन्न जोशींनी कोणी समंजस धर्मवादी वादपटू सुचवल्यास नास्तिक त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असतील.