‘ब्राइट्स सोसायटी’च्या वतीने आयोजित या नॅशनल एथिस्ट कॉन्फरन्सच्या उद्घाटनसमारंभाच्या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच इतर सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो कारण त्यांनी भारतीय सांवैधानिक व्यवस्थेने दिलेल्या अधिकाराला मूर्त स्वरूप दिलेले आहे. संस्थेची नोंदणी करून जे काही अधिकार, स्वातंत्र्य मिळवलेले आहे ते पुढच्या काळात ब्राइट्सच्या वतीने चाललेल्या, चालवायच्या कामाला एक मोठा अवकाश निर्माण करून देऊ शकेल. तो अवकाश काय असू शकतो? कदाचित ॲड. असीम आपल्याला सांगतील. पण एक महत्त्वाची पायरी आपण ओलांडली आहे आणि ती पायरी ओलांडल्यामुळे आता आपल्या संसदेला पर्याय म्हणून ‘धर्मसंसद’ उभी करणाऱ्यांनादेखील आपण ‘काटे की टक्कर’-अगदी कॉन्स्टिट्यूशनली आणि लीगली-देऊ शकतो; अनुषंगाने आपली पायाभरणी झाली आहे असं म्हणू शकतो आणि यासाठी पुन्हा एकदा ब्राइट्सच्या सात-आठ हजार सहकाऱ्यांचं, सदस्यांचं, हितचिंतकांचं अभिनंदन.
आजच्या कार्यक्रमात नेपाळहून आलेले उत्तम निरौला आहेत. ते जगामधल्या सर्वांत मोठ्या ह्युमनिस्ट इंटरनॅशनल समन्वय मंचाचे ॲंबेसिडर आहेत. ह्युमनिस्ट इंटरनॅशनलचं पूर्वीचं नाव IHEU (International Humanist Ethical Union) असं होतं. जगातल्या निम्म्यातरी देशांचे सदस्य यात आहेत. रॅशनॅलिस्ट्समध्ये जे काही वेगवेगळे विचारप्रवाह आहेत-एथिस्ट, ॲग्नोस्टिक, फ्री-थिंकर, नॉन-बिलीव्हर वगैरे वगैरे, या सगळ्या विचारधारा ज्यांना ओव्हरऑल आपण रॅशनॅलिस्ट ह्युमनिस्ट म्हणतो, त्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या छोट्या-मोठ्या संघटनांचे, संस्थांचे सदस्यत्व ह्युमनिस्ट इंटरनॅशनल या समन्वय मंचाच्या प्लॅटफॉर्ममध्ये येतं. ह्या मंचाने दाभोळकरांना त्यांच्या खुनानंतर मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीदेखील या प्लॅटफॉर्मची सदस्य राहिली आहे. त्या ह्युमनिस्ट इंटरनॅशनलचे उत्तम निरौला त्यांच्या देशाचा आणि जागतिक पातळीवरचा दृष्टिकोन आज आपल्याला सांगतील.
आपण ज्या दोन सहकाऱ्यांचा सत्कार करतोय त्यापैकी पहिले डॉ. नरेंद्र नायक. महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेले हे तिसरे नरेंद्र. म्हणजे आपल्याला पहिले नरेंद्र माहिती आहेत, ज्यांचा पुण्यामध्ये निर्घृणपणे खून झाला, कारण दुसऱ्या नरेंद्रांच्या विरोधात ते बोलत होते. हे तिसरे नरेंद्र. पण देशातल्या त्या नरेंद्राचे समर्थक यांच्याही मागे लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षायंत्रणा घेऊन देशभर फिरावं लागतं. त्यांना अनेक धमक्या आल्या आहेत. त्यांनाच कशाला, माझ्यासारख्या अनेकजणांनाही अशा धमक्या आल्या आहेत. ह्या ज्या काही कर्मठ, मूलतत्त्ववादी विचारधारेच्या, त्यांना धार्मिक म्हणून आपण चूक करतो आणि धार्मिक म्हणूही नये, धर्मांध आहेत ते, अशा लोकांच्या हिटलिस्टवर असणारे नरेंद्र नायक देशात आणि परदेशात विवेकाचा विचार मुख्यतः सायंटिफिक टेम्परामेंटच्या संबंधात बोलण्याचं, प्रबोधनाचं, प्रशिक्षणाचं काम करतात. नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं आणि प्रशिक्षित करणं हे मुख्यतः त्यांचं काम आहे आणि त्याविषयीचं प्रवक्तेपणही ते करतात. FIRA म्हणजे Federation of Indian Rationalist नावाचा भारतातला समन्वय मंच आहे. भारतातल्या साधारण १५ ते १७ राज्यांमधल्या रॅशनॅलिस्ट विचारधारेच्या संस्था, संघटना यांचा हा समन्वय मंच. साठ-सत्तर संस्थांच्या सहभागाने हा मंच चालतो. त्याचे हे विद्यमान अध्यक्ष आहेत. हा मंच बी. प्रेमानंदांनी सुरू केला. ८०-८२ च्या काळात झालेल्या बी. प्रेमानंदांच्या दोन दौऱ्यांमधून महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रेरणा उभी राहिली. त्याचप्रमाणे FIRA हे देशपातळीवरील व्यासपीठ त्यांनी सुरू केलं. त्यांचेच वारसदार म्हणून डॉक्टर नरेंद्र नायक FIRA चे अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यातदेखील अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने सक्रिय सहभागी होत आली आहे आणि मी आत्तापर्यंत त्याचा उपाध्यक्ष आहे.
आपल्या दुसऱ्या सत्कारमूर्ती म्हणजे पत्रकारितेतलं, माध्यमक्षेत्रातलं, आजच्या काळामधलं अतिशय दुर्मिळ, अपवादात्मक व्यक्तिमत्व असलेल्या अलका धुपकर. अलका एका पद्धतीची भूमिका घेते आणि त्या भूमिकेवर ठाम राहते. त्यामुळे होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवते. म्हणूनच आपण तिला पुरस्कृत करतो आहोत. फ्री-थिंकर म्हणून, स्वतंत्र विचार करणारा जनसमुदाय म्हणून ही आपली गरजपण आहे.
आजची युवा पिढी, जी संविधान आणि संविधानाच्या मूल्यावर असलेले कायदे, कानून, तरतुदी आणि जनकल्याण योजना यासंदर्भात संविधानाच्या संदर्भात आग्रह धरते, प्रयत्न करते, लावून धरते आणि न्यायालयीन व्यवस्थेमध्ये त्यासाठीचा हस्तक्षेप करते, महाराष्ट्रातल्या मोजक्या अशा नावांमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे नाव आहे. घरामधून मिळालेल्या समाजवादी, गांधीवादी, सर्वोदय विचारधारेचा वारसा अधिक कालसुसंगत करत त्यामध्ये अडकून न राहता अतिशय कमी काळामध्ये त्यांनी न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजामध्ये सातत्याने त्याबद्दलचं प्रवक्तेपणदेखील ते करत आहेत. आपल्यासारख्या आणि आपल्यासोबत असणाऱ्या सदस्यांना, संस्था-संघटनांना अशा स्वरूपाचं पाठबळ असणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं की, आपल्या पुरोगाम्यांचा लीगल सेल नाहीये. म्हणजे काही झालं तर आपल्याला वकील शोधावा लागतो. तर असा सेल होण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा, स्वतंत्र व्यवसायिक असूनदेखील महाराष्ट्रात असीमने सुरू केला. त्याच्या पातळीवर, अनौपचारिकरित्या. प्रामुख्याने महाराष्ट्रातील तरुण वकिलांचा आपसात समन्वय कसा साधता येईल, परस्परपूरक सहाय्यभूत कसे ठरता येईल आणि समान विचारधारेसोबत आपल्याला कसं उभा राहता येईल यासाठी त्यांचे यथाशक्ती प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न अधिक गतीने पुढे न्यायला पाहिजे. कारण भविष्याची लढाई सांवैधानिक मूल्यांच्या आणि त्यात उपलब्ध असणाऱ्या कायदेशीर तत्त्वांच्या आधारावर अधिक जोरकसपणे करावी लागणार आहे. या नवतरुण वकिलाचे स्वागत आहे.
आपण ज्या वास्तूमध्ये आज आहोत त्यांचादेखील एक कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही संस्था आहे. केवळ महाराष्ट्रातील नाही तर जगातील या स्वरूपाची एक वेगळी ओळख असणारी अशी संस्था ह्या कार्यक्रमासाठी मिळणं ही फार मोठी सकारात्मक बाब आहे. या संस्थेचे विद्यमान कुलगुरू मंचावर यायला तयार झालेत आणि येणार आहेत, हीदेखील आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
आपण कमी-जास्त प्रमाणात अनुभवतो तो थेट धोका हा की सभा उधळून लावायच्या, विरोध करायचा, संयोजकांपर्यंत भिडायचं, संयोजकांना उलटसुलट, खोटंनाटं, अर्धवट काहीतरी सांगायचं, भावना आणि संवेदना यांचा वापर करायचं, अटकाव करायचा, नाकारायचं अशा स्वरूपाचं काम महाराष्ट्रात आणि भारतात विरोधक, मूलतत्त्ववादी विचारांच्या संस्था-संघटना, त्यांचे समर्थन करणाऱ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातले लोक या साऱ्यांनी आरंभलेलं आहे. याच महाराष्ट्रातलं सगळ्यात सॉफ्ट टार्गेट अंधश्रद्धा निर्मूलन समिती राहिलेली आहे आणि या अनुभवाबद्दल गेली तीस वर्ष म्हणजे साधारण ९० च्या दशकापासून आम्ही सर्व बोलतो आहोत. नरेंद्र दाभोळकर बोलत होते, त्यांच्यानंतर मी आणि माझे सहकारीपण बोलत आलो आहोत. सांवैधानिक मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो आणि सांवैधानिक तरतुदी आणि त्यानुसार निर्माण झालेले कायदे अमलात आणून आपल्याला देशाचा राज्यकारभार चालवायचा आहे हे आपल्या राज्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवं. राज्यकारभार लोकशाही, प्रजासत्ताक पद्धतीने, लोकसहभागाने चालवायचा असतो. असं असतानादेखील ही मंडळी इतिहासाची तोडमोड करून मायथॉलॉजी हा इतिहास आहे असे दाखवतात. मायथॉलॉजी आणि इतिहासामध्ये काही फरक आहे याबद्दल चांगल्या शिकलेल्या, पुरोगामी असणाऱ्या लोकांमध्येही मोठा गोंधळ आहे. म्हणूनच मायथॉलॉजी आणि इतिहास यांच्यामधील फरकाचं वेगळं प्रशिक्षण घेण्याची पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अत्यंत गरज आहे असा माझा आग्रह असतो. आपण व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीमधून, गुगलच्या माध्यमातून आलेल्या पोस्ट्स फॉरवर्ड करत राहतो. त्यातून बुद्धिभेद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
असे असूनही अनेक विरोधाभासी नकारात्मक परिस्थितींमध्ये आपण कमी-जास्त प्रमाणात संघटित आहोत, काही उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या आधारावर यथाशक्ती काम करतो आहोत हे चांगलं लक्षण आहे. अत्यंत विरोधाभासी परिस्थितीमध्येही हे होत आहे. मूलतत्त्ववादी विचारांचे समर्थन करणाऱ्या लोकांना मिळणारा प्रतिसाद, त्यांच्याकडे असलेली वेगवेगळी साधनं, सुविधा, मान्यता, अनुकूलता, प्रसिद्धी या सगळ्याची गोळाबेरीज लक्षात घेतली तर दुसऱ्या बाजूला खरं तर आपण अगदी मोजके आणि अल्पशक्ती आहोत. पुरोगामी असो, परिवर्तनवादी असो, रॅशनॅलिस्ट असो, आपण फुले-शाहू-आंबेडकर म्हणो किंवा सांवैधानिक, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष अशा लोकशाही विचारांचे समर्थन करणारे आणि ते विचार प्रत्यक्षात आणण्यास प्रयत्न करणारे म्हणो, या सगळ्यांची गोळाबेरीज केली तरी ही लढाई एकास शंभर (१:१००) एवढी प्रचंड विषम आहे. अशा विषम लढाईमध्ये आपल्याला पुढे कसं जाता येईल, याविषयीच्या काही प्राथमिक गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे विचार सांगणं, विचारासाठी आग्रही राहणं, विचारासाठी प्रवक्तेपण करणं, विचारांचं आपल्या जीवनात परिस्थितीप्रमाणे टप्प्याटप्प्याने अनुकरण, अवलोकन, अवलंबन करणं – ज्याला नर्चर होणं म्हणतात, आयडियोलॉजिकली हे एका बाजूला चालू असलं पाहिजे. ती प्रक्रिया आहे. माणूस एका रात्रीतून बदलत नाही. माणूस हा मुळात प्राणी आहे आणि अजूनही त्याच्यात प्राणित्वाच्या अनेक अशा मूलभूत गोष्टी आहेत ज्या बदलत नाहीत, बदलवता येत नाहीत. अनेक दशकांमध्ये, शतकांमध्ये, पिढ्यांमध्ये त्या बदलतात. असं असेल तर ‘आजचा माणूस’ असे म्हणून एका बाजूला विचार तर दुसऱ्या बाजूला त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असणाऱ्या भावना-या आव्हानाचं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आपल्यातल्या धोरणी, संयमी, चिकाटीने बांधीलकी घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडतो का, हा प्रश्न मला आजही पडतो. आजही आपण बटबटीत पद्धतीने फक्त विचारांचे अवलंबन करताना दिसतो आणि त्याच्या फार तीव्र प्रतिक्रिया आपल्याला अनुभवायला मिळतात. प्रश्न हा आहे की यामुळे आपला फायदा होण्याऐवजी नुकसान तर होत नाहीये ना? एक कार्यकर्ता म्हणून तीन-साडेतीन दशके समाजजीवनात वावरताना निघालेला हा माझा निष्कर्ष आहे. त्यामुळे आपलं माणूस असणं आणि आपला सभोवतालचा समाज त्या माणसांचा आहे हे आधी नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. त्याविषयीचे जे काही विज्ञानसंशोधन, शास्त्र उपलब्ध आहे आणि त्याचे विश्लेषण आहे, मानवी व्यक्तिमत्वाचा, मानवी मेंदूचा जो अभ्यास आहे त्याबद्दलचे काही निष्कर्ष आहेत, त्याचे संदर्भ आहेत, याचादेखील नीटपणे अभ्यास करायला हवा. आणि हे करून घेत असताना त्यानुसारच्या आपल्या भूमिका, आपली धोरणं, आपली कृती, कार्यक्रम आणि त्यासाठी आवश्यक असणारे संघटन, समूहाला एकत्र करण्याचे कौशल्य हे सारं विकसित करणं आवश्यक आहे असं माझं एक नम्र आणि प्रामाणिक मत आहे.
यासाठी आपणच कमी पडतो आहोत का? तर “कमी पडतो आहोत”, असं माझं ठाम मत आहे. म्हणून मी यासाठी आपल्यालाच खरवडण्याचं काम गेल्या पाच-सात वर्षांत, लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊननंतरदेखील जाणीवपूर्वक करतो आहे. म्हणजे आपले विचार तपासणं, खरवडणं, त्याचं अवलोकन करणं, मूल्यमापन करणं आणि त्यातून काय बरं वाईट निष्पन्न झालं ते बघणं. अर्थात् सोशिओ-पॉलिटिकली! असं म्हणूया की त्याचा सोशिओपॉलिटिकल इम्पॅक्ट काय आहे?
गेली तीन-साडेतीन दशकं अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम मी करतोय, संघटितपणे करतोय, त्याचा महाराष्ट्रावर, देशावर परिणाम झाला की नाही झाला? देशामध्ये, धोरणांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं की नाही उमटलं? लोकांच्या जनकल्याणासाठी त्याचा उपयोग झाला की नाही झाला? समाज आणि माणसं, समूह आणि कुटुंब, व्यक्ती यांमध्ये बदल झाला की नाही झाला? याचा आढावा घेतला पाहिजे. याचा एक सोशिओपॉलिटिकल इम्पॅक्ट बघितला पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. एका बाजूला जसा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत मी बोलतोय तसंच मला वाटतं की दुसऱ्या बाजूला परिवर्तनवादी प्रागतिक विचारधारांच्या संस्था, संघटना असतील, राजकीय पक्ष असतील यांच्यामधील सहकाऱ्यांनीदेखील याबद्दल विचार करायला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने शंभर-एक प्रमुख नेतृत्वांशी मी याबद्दल बोललो. पण याविषयी आपण उदासीन आहोत. नेतृत्वदेखील उदासीन आहे. अनुकरण करणारे इतर सहकारी आणि अनुयायीवर्ग यांच्यामध्येतर याचा गंध असण्याची सुतराम शक्यता नाही, अशी स्थिती आहे. ही फार अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, असं मला वाटतं. मी जे बोलतोय ते एक कार्यकर्ता, संघटक म्हणून; शिवाय मी काळानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार आणि अपघाताने बनलेल्या या समूहाचा, संघटनेचा, विचारांचा नेता आणि प्रवक्ता या सगळ्या अनुभवातून हे बोलतोय. माझा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुख्यतः संघटक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे मी असं मानतो की, पुढच्या दशकांमध्ये आपल्याला अधिक समर्थपणे, प्रभावीपणे वाटचाल करायची असेल तर, आपण आपल्यातल्या मर्यादा, अडचणी यांचा विचार करायला हवा. कालसुसंगत होण्याची गरज, कालसुसंगत होत असताना करायच्या दुरुस्त्या यांचादेखील विचार करायला पाहिजे. ही सगळी प्रक्रिया अतिशय त्रास देणारी आहे, पण ती चिकाटीनं करायला हवी. त्याशिवाय आपण दुरुस्त होणार नाही आणि पुढील वाटचाल समर्थपणे करू शकणार नाही, असं माझं ठाम आणि प्रामाणिक मत आहे. तसंच आपला सभोवताल हा समाजकारणाचा, राजकारणाचा आणि एकूणच समाजातल्या विविध क्षेत्रांचा आहे. त्यामधला आपला अवकाश कमी कमी होत गेलेला आहे. तो अवकाश कायम ठेवायचा असेल आणि तो टप्प्याटप्प्याने वाढवत न्यायचा असेल तर त्यासाठी प्रचंड संधी समोर आहे. ‘स्काय इज द लिमिट’ एवढं काम करता येणं शक्य आहे. पण त्यादृष्टीने आपण काय करतोय? अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये असताना हा प्रश्न अनेकवेळा संघटनेच्या आघाडीवर अंतर्गत चर्चिला गेला आहे. देवधर्माबद्दलची भूमिका काय? याबद्दल अनेक उहापोह झाले. येथे उपस्थित असलेल्यांमध्ये निम्म्यापेक्षा अधिकांचा संबंध अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आलेला आहे. त्यामुळे देव-धर्माकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल झालेल्या चर्चांमधून निश्चितपणे असा विचार मांडला गेला की देव-धर्म पूर्णपणे नाकारून, अंधश्रद्धा नाकारून अंधश्रद्धा निर्मूलन केलं पाहिजे. पाश्चात्य विचारांचा असा प्रभाव पडून डाव्या पुरोगामी विचारप्रवाहाच्या संस्था, संघटना आणि अभ्यासक तयार झाले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातही याची चर्चा सतत होत राहिली आहे. पण दुसरीकडे असादेखील प्रयत्न केला की लोकांना धरून काम करायचं, लोकांसोबत जायचं आहे. तेव्हा सांवैधानिक व्यवस्थेमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार आपली भूमिका आणि धोरण असायला पाहिजे. आणि त्यानुसारच आपण पुढे जायला पाहिजे. हेच सर्वसमावेशक असू शकतं. अधिक लोकांना सहभागी करून आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. आणि या चर्चेतूनच पुढे ही भूमिका घेऊन संघटना म्हणून वाटचाल केली गेली आणि मला वाटतं की त्याचा उपयोग झाला.
ओव्हरऑल सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस करताना अभ्यासकांच्या, विश्लेषकांच्या लक्षात येईल की या भूमिकेचा निश्चितच उपयोग झाला आहे. एका मोठ्या जनसमुदायाला संबोधित करत असताना देवा-धर्माबद्दलच्या भूमिकेविषयी तटस्थ रहायचं. तटस्थ हा शब्द वादग्रस्त होता. नंतरदेखील त्यावर चर्चा झाली. पण त्यातून निष्कर्ष निघाला तो असा-सांवैधानिक तरतुदीतील कलम 25 नुसार हे स्वातंत्र्य आहे. व्यक्ती म्हणून मला स्वातंत्र्य आहे स्वीकारण्याचं, नाकारण्याचं आणि तटस्थ राहण्याचं. तर हे सगळं आपण मान्य केलं पाहिजे आणि त्यामुळे होणाऱ्या शोषणाच्या संबंधात आपली भूमिका व्यक्त केली पाहिजे. शोषणाविरोधात उभं राहिलं पाहिजे, त्याच्याबद्दल प्रबोधित, प्रशिक्षित केलं पाहिजे. लोकांचं प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी लोकांना संघटित करून कृतीशील केलं पाहिजे. अशा दिशेने आपण आतापर्यंत वाटचाल केलेली आहे. मला वाटतं, महाराष्ट्रात हे झालं कारण भारतीय समाज हा मध्यममार्गी आहे. भारतीय समाजाला कुठलीही टोकाची विचारधारा पचत नाही. ज्याला आपण गावरान शहाणपण म्हणतो. जो शिक्षित, ‘प्रचलित शिक्षणा’नुसार शिक्षित नसेल, अंगठाबहादूर असला तरी त्याला जगण्यासाठी तर्कसुसंगत निर्णयप्रक्रिया करण्याची सवय असू शकते, अनुभव असू शकतो. त्याच्या कुटुंबातून, सभोवतालून त्याला तो मिळत राहातो. त्यातनं त्याला गावरान शहाणपण आलेलं असतं. या गावरान शहाणपणामध्ये लोकांना कोणतीही टोकाची गोष्ट पटत नाही, पचत नाही, रुचत नाही, जमत नाही. काही काळापुरती वातावरणनिर्मिती होते, चर्चा होते, वादविवाद होतात आणि काही काळापुरती विशिष्ट परिस्थितीमुळे अनुकूलता येते, समर्थन मिळतं. पण ते दीर्घकाळ टिकत नाही.
आपल्या वैचारिक भूमिकेला अनुकूल सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी गेली ३०-४० वर्षे प्रयत्न केले गेले. पण ही गोष्ट भारतीय जनमानसाला मानवणारी नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा परिस्थितीत समुदायासोबत जर काम करायचं तर, रॅशनॅलिस्ट म्हणवून घेणारे एथिस्ट, ॲग्नोस्टिक, फ्री-थिंकर, नॉन-बिलीव्हर वगैरे सगळ्यांनी एकमेकांशी समन्वय, सुसंवाद आणि सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. काही समान कार्यक्रमांवर एकत्र येऊन काम केलं पाहिजे.
मी आपल्या सगळ्यांना यानिमित्ताने आव्हान करेन, की आपण आपल्या वैचारिक भूमिकांवर जरूर ठाम राहावं! यात काही दुमत नाही पण समूह म्हणून लोकांना सोबत घेऊन जात असताना आपली ताकद कशी वाढेल, आपले समसंवादी, सहप्रवासी कोण कोण असू शकतात, आहेत हे बघणं आणि एकमेकांच्या हातात हात घालून सोबत जाणं आवश्यक आहे. ही एक बाजू! आणि दुसरा आणखी एक महत्त्वाचा पैलू मी उल्लेख करू इच्छितो. ज्यावेळी ब्राइट्सच्या किंवा एथिस्टच्या संदर्भातील संरचना करण्यासाठी पुढाकार घेतला जात होता आणि त्यासंबंधीचे आयोजन सुरू झालं होतं, पुण्यामध्ये ब्राइट्सची पहिली परिषद झाली होती, नंतर मुंबईत आणि इतरत्र झाली-कुमार, प्रमोद आणि संजय यांमध्ये सुसंवाद होता. कारण हे सगळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचे अविभाज्य घटक राहिलेले आहे; समर्थक राहिले आहेत, आणि त्यांनी योगदान दिलं आहे. त्यामुळे ते जेव्हा हे करत होते तेव्हाही मी स्पष्ट केले होते की तुम्हाला असं वाटतंय तर जरूर करा, पण संघटना म्हणून आम्ही भूमिका घेणार नाही. कारण, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यकर्ता अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणजे नेमकं काय होतं या प्रक्रियेमध्ये? तर तो टप्प्याटप्प्याने नास्तिक होतो! त्यानंतर त्याचं कुटुंब होतं! तर तो एका अर्थाने नास्तिक म्हणूनच जगत असतो पण समाजाचा घटक म्हणून काही अर्थाने काही प्रक्रियांशी जोडला गेलेला असतो. तसं आपण वैचारिक भूमिका घेत असताना आणि त्यासाठी समूह म्हणून काम करत असतानादेखील हे धोरण ठरवलं पाहिजे आणि सोबत जाण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे. भारताला परंपरा लाभली आहे चार्वाक, महावीर, बुद्धांच्या विचारधारेची. माझा प्रश्न असा आहे की, आम्हाला कुठला विवेकवाद हवा आहे? पाश्चात्याधारित विवेकवाद आम्हाला नकोय. तर भारतीय कसावर आधारित विवेकवाद पुढे नेण्यात आम्हाला रस आहे. का? कारण भारतीय कसावर आधारित विवेकवादाचा वारसा बलदंड आहे. बुद्ध, महावीर, चार्वाकापासूनचा आणि त्यानंतर संतांच्या माध्यमातून तो निरंतर राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो आपण का विसरतो आहोत? तो बाजूला ठेवून आपण जर विवेकाचा विचार सांगतो आहोत, तर विलगीकरणाच्या पद्धतीचे राज्य आणि धर्मव्यवस्थांचे विलगीकरण एवढ्याच संदर्भात आपण त्याच्याकडे बघतो आहोत. म्हणूनच भारतीय कसावर आधारित असलेला विवेकवादाचा वारसा आपण समजून घ्यायला हवा.
भारतीय विवेकवादामध्ये नास्तिकतेपासून ते आस्तिकतेपर्यंत सर्व प्रकारच्या विचारधारांचं अस्तित्व होतं आणि ते सहअस्तित्व मान्य करूनच समाज पुढे जात होता. हे आज आपल्या पुरोगामींनी नीटपणे अभ्यासणे आणि समजून घेणे, आपल्या धोरणांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये अवलंबणे महत्त्वाचं आहे, निकडीचं आहे. आपण ह्याचा गांभीर्याने विचार करावा. मी याबद्दलची मांडणी राज्यपातळीवर, संघटनेत, संघटनेच्या पातळीवर, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही करत आलो आहे. “We are trying to belong with and travel with rationalism on basis of Indian ethos.” याबद्दल अधिक तपशीलाने बोलायला हवं आणि यामधील जे रंग आहेत, वेगवेगळ्या छटा आहेत, तिचे संदर्भ आहेत त्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे अशा मताचा मी आहे.
त्यामुळे शेवट करताना मी असं म्हणेन, की सहअस्तित्व घेऊन पुढे जाण्याच्या आपल्या भूमिकांमुळे मी हे मानतो की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामांमध्ये एका बाजूला भक्तिसंप्रदायाच्या प्रागतिक विचारप्रवाहांचा, संतांचा जो वारसा आहे त्याविषयी आपण संवाद केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या रॅशनॅलिस्ट आयडिओलॉजीचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत, त्याविषयीदेखील संवाद केला पाहिजे. एकाच वेळेला ह्या दोन्ही आघाड्यांवर संवाद करून पुढे जाण्याची भूमिका ठेवली तर नजीकच्या काळामध्ये भारतामध्ये पुन्हा विवेकवादी विचारांना उधाण आणण्यासाठी सहाय्यक ठरेल, उधाण हा शब्द अंगावर येणारा वाटेल, पण मी असं म्हणतो कारण, आपण पुरोगामी हे अल्पसंख्याकांमधील अल्पसंख्याक आहोत. काही विचारधारांची, विचारप्रवाहांची, संस्था-संघटनांची तर अस्तित्व टिकवण्याची लढाई चालू आहे. अशी वेळ या बाकीच्या कर्मठ लोकांनी, मूलतत्त्ववादी मंडळींनी आपल्यावर आणली आहे. त्यामध्ये आपल्या पूर्वसुरींच्या काही ऐतिहासिक चुकापण आहेत-धोरणांच्या, कृतींच्या-त्यावर आपण चिकित्सा करत राहू. पण वर्तमानातील आणि भविष्याच्या वाटचालीसाठी मला असं वाटतं की या सगळ्याचा भारतीय कसावर आधारित विवेकवादाचा संदर्भ आपण विसरता कामा नये. जो माणसांचा समूह म्हणून, माणसांचा समाज म्हणून पुढे समर्थपणे वाटचाल करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. एवढेच यानिमित्ताने नम्र आवाहन करतो.
नास्तिकांमधे दोन प्रवाह दिसतात.. अत्याग्रही किंवा जहाल (अतिरेकी हा शब्द टाळतोय) आणि समन्वयवादी किंवा मवाळ. लेखक (वक्ता) समन्वयवादी दिसतात. त्यांची भूमिका सद्यस्थितीत व्यवहार्य वाटते.
माझ्या माहितीप्रमाणे ब्राईट हा दोन अमेरिकन माणसांनी नामांकित केलेला समाज त्यांचे सभासद बघता (डेनट, डॉकिंझ वगैरे) अत्याग्रही दिसतोय. तो त्यांचा मुख्य प्रवाह असेल तर समन्वयवादी अल्पमतात जाऊ शकतात. जहाल विरुद्ध मवाळ हा वाद तसा जुनाच आहे 😊