अलीकडेच सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ (राजहंस प्रकाशन) हे आत्मकथन वाचलं. २८६ पानांचं हे पुस्तक अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, हे पानोपानी जाणवत राहतं. कसलीही भीती न बाळगता, काहीही न लपवता यात आयुष्यातील अनेक घटना लेखिकेने तंतोतंत, मोकळ्या मनाने सांगितलेल्या आहेत. चरित्रलेखिका सुमती देवस्थळे यांची सरिता ही मुलगी. लहानपणापासूनच संवेदनशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांची. चाकोरी सोडून वेगळ्या वाटा चोखाळण्याची आकांक्षा असलेली. चळवळींमध्ये भाग घेणारी, त्यांत रमणारी आणि त्यामुळेच पुरोगामी विचार अंगिकारून स्वतःचे आंतरजातीय लग्न ठरवल्यामुळे वेळोवेळी घरच्यांकडून दुखावली जाणारी, विचारी व समंजस वागूनही जवळच्यांकडून वागणुकीतले परकेपण मिळणारी. माणुसकीचे मूल्य महत्त्वाचे मानणारी, सासरच्यांना समजून घेणारी. वेळोवेळी घेतलेल्या अनुभवांचा ताळेबंद मांडत जाऊन त्यातून नवीन धारणा शिकत जाणारी. आपल्या जवळच्या नात्यांतील माणसांचा त्रयस्थ दृष्टिकोनाने विचार करून तटस्थपणे वागणारी, त्यांच्याबद्दल अंगभूत मानसशास्त्रीय समज दाखवून चिंतन करणारी आणि स्वतःच्याही (चांगल्या-वाईट) वागण्याबद्दल समतोल विचार करत राहणारी, वयानुसार अत्यंत प्रगल्भ होत गेलेली ही लेखिका अलीकडे ज्येष्ठांच्या सहजीवनाबद्दल लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये पाक्षिक सदरलेखन करत आहे. त्या सदरातले लेख वाचत असताना त्यांच्या आत्मकथनातून उमजलेल्या त्यांच्या वैचारिक जडणघडणीची पार्श्वभूमी उपयोगी येते.
आणखी एक त्यांचा सामाजिकतेमधला विचार मला भावला, तो असा :
टॉलस्टॉयवर त्यांच्या आईने चरित्रात्मक लेखन केलेले आहे (ते माझे अतिशय आवडते आहे). त्यावरून समकालीन व्यक्तिमत्त्वांविषयी विचार करताना म.गांधी व म.फुले यांबद्दल लेखिका जे मत मांडते, ते खरोखर पटते. टॉलस्टॉय, गांधी यांनी काही मूल्ये/धारणा स्वीकारून माणुसकी, स्वातंत्र्य, धर्म यांविषयीचे स्वतःचे तत्त्वज्ञान मांडले व अंगिकारले. परंतु त्यात समाजपरिवर्तनाबद्दलचा ठाम असा काही विचार व कृती नव्हती. परिवर्तनासंबंधातली कृती म.फुलेंच्या आणि नंतर डॉ. आंबेडकरांच्या जीवनशैलीचा अभिन्न भागच झालेला होती. लेखिकेने धीटपणे हे म्हणणे मला वेगळे व महत्त्वाचे वाटते. तरुणवयापासून परिवर्तन चळवळींमधून वाढत गेलेल्या लेखिकेच्या आयुष्याचे सारच परिवर्तन हे आहे असे मला दिसते. निरीश्वरवादी, अंधश्रद्धाविरोधी, पुरोगामी असणे व या मूल्यांनुसार स्त्रीने स्वतःचे जीवन जगणे हिंदू समाजात तितकेसे सोपे नाही, याचा अनुभव अशा अनेकींनी घेतलेला आहे. सरिताताईंनी त्यांच्या जगण्याबद्दल घेतलेल्या सर्वच निर्णयांविषयी खूप आदर वाटावा अशी स्थिती आहे. सुनीताबाई देशपांडे, विद्याताई बाळ यांच्यानंतर सरिता आवाड या पुरोगामी स्त्रियांसाठी आदर्श असलेले असे व्यक्तिमत्त्व आहेत, हे नक्की!