बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप

प्रा. मे.पुं रेगे ह्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे विवेचन :

आज एकविसाव्या शतकातही ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ उत्स्फूर्तपणे प्रचार करण्याची, त्याचे महत्त्व पटवून सांगण्याची आवश्यकता अनेकांना वाटते, त्यामागचे कारण काय? बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे आणि ते आपण केले तरच भारतीय समाजात काही ‘सुधारणा’ होऊ शकेल, अशी समजूत बहुधा त्यामागे असते. बुद्धिप्रामाण्यवाद ही केवळ एक विचारसरणी नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन बुद्धिप्रामाण्याने जगावे, त्याच्या जीवनाची सर्व अंगोपांगे ही बुद्धिप्रामाण्यानेच नियंत्रित व्हावीत, असे हे प्रतिपादन असते.

बुद्धिप्रामाण्यवादाचा जीवनमार्ग म्हणून स्वीकार आणि प्रचार करण्याआधी एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे : बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नेमके काय? 

बुद्धिप्रामाण्यवाद म्हणून जी एक भूमिका अनेकदा मांडली जाते, ती अशी :

“आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये; अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.”

बुद्धिप्रामाण्यवादाच्या ह्या मांडणीत असे अभिप्रेत आहे की,

१) बुद्धी ही एक विवक्षित, स्पष्टपणे ओळखता येण्याजोगी अशी मन:शक्ती आहे.
२) बुद्धीला कित्येक गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत, असे दिसून येते.
३) बुद्धीला ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आलेल्या असतात किंवा येतात, तेवढ्याच गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत, असे जो स्वीकारतो तो बुद्धिप्रामाण्यवादी असतो.

तत्त्वज्ञ मे.पुं.रेगे ह्यांनी या मांडणीवर दोन आक्षेप घेतले आहेत. त्यांनी उपस्थित केलेला पहिला प्रश्न असा: ” बुद्धी ही एक विशिष्ट शक्ती आहे आणि ती काहीतरी करते किंवा तिच्याद्वारे, तिच्या माध्यमातून काहीतरी घडते असे मानायला नेमका कशाचा आधार आहे?” 

प्रा.रेग्यांचा प्रश्न थोडा अधिक स्पष्ट करावा लागेल. 

माणसे वस्तू उचलतात, ते सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात. ही इतकी उघड गोष्ट आहे की तिचा उल्लेखही कुणी का करावा, असा प्रश्न पडेल. पण अपवादभूत प्रसंगी आपल्या पायांचा किंवा कोपरांचा उपयोग करूनही माणसे वस्तू उचलू शकतात. तेव्हा, ‘ही वस्तू येथून कुणी उचलली असेल?’ ह्या प्रश्नाचा सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ ‘ही वस्तू कुणाच्या हातांनी येथून उचलली गेली असेल?’ असा असतो. पोलीस ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या वस्तूवर उमटलेले बोटांचे ठसे न्याहाळीत बसतात हे सर्वांना माहीत आहेच. अर्थात चाणाक्ष पोलीस ती वस्तू पायांनी किंवा हातांनी उचलता येण्याजोगी असली, तर त्याप्रकारेही ती उचलली गेली असण्याची शक्यता ध्यानात बाळगतो.

आता, ह्याच न्यायाने माणसांच्या वस्तू उचलण्याची आणि सत्य समजुतींचा स्वीकार करण्याच्या प्रक्रियेची तुलना करता येईल. माणसे ज्याप्रमाणे वस्तू उचलतात, त्याप्रमाणेच ते ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत त्यांचे ग्रहण करतात. माणसे वस्तू उचलतात, ती सामान्यतः आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात. अगदी तसेच, ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून माणसांना पटलेल्या असतात, त्या सामान्यपणे (किंवा अनेकदा) आपल्या बुद्धीचा त्यांनी वापर केल्यामुळे सत्य किंवा योग्य म्हणून त्यांना दिसलेल्या असतात, पण ज्याप्रमाणे अपवादभूतप्रसंगी वस्तू ह्या पायांचा किंवा कोपरांचा वापर करून उचलता येणे संभवनीय असते, अगदी तसेच अपवादभूतप्रसंगी कित्येकदा दुसऱ्या एखाद्या मन:शक्तीचा वापर केल्याने त्यांना त्या सत्य किंवा योग्य म्हणून दिसलेल्या असतात किंवा दिसल्या असण्याची शक्यता असते.

आता, बुद्धिप्रामाण्यवादी त्याला म्हणायचे की जो केवळ बुद्धीला दिसलेल्या गोष्टीच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारतो; अन्य शक्तींचा वापर केल्याने दिसलेल्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारीत नाही.

आता, “ही वस्तू ह्या माणसाने उचलली असेल, तर ती त्याने कशी उचलली, आपल्या हातांचा उपयोग करून, की कोपरांचा की पायांचा?” ह्या प्रश्नाचा निर्णय घेता येईल. तो कशाप्रकारे? तर, अनुभवाच्या (निरीक्षणाच्या) किंवा अनुभवावर आधारित अनुमानाच्या मदतीने हा निर्णय घेता येईल. कित्येक माणसांना आपण हातांनी वस्तू उचलताना बघितलेले असते तसेच काही कलाकार मंडळींना पायांनी किंवा कोपरांनी वस्तू उचलतांनाही प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण बघतो. तेव्हा, एखादी वस्तू कशाप्रकारे उचलली गेली असण्याची शक्यता आहे, हे अनुभवाच्या आधारावर ठरविता येते. पण, ह्या माणसाला ही गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली, ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी शक्तीचा वापर केल्याने जाणवली, ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता?

बहुधा वस्तू ह्या आपण हातांनी उचलतो. आपण आपले व इतरांचे हात ओळखू शकतो आणि एखाद्या प्रसंगी ते वापरले जात आहेत की नाहीत हे निरीक्षणाने ठरवू शकतो. आता, असे विचारता येईल की, ह्या प्रकारे बुद्धी अशी आपली एक विशिष्ट शक्ती आपण ओळखू शकतो काय? आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात येत आहे की नाही हे निरीक्षणाने ठरवू शकतो काय?

प्रा.रेग्यांच्या पहिल्या प्रश्नाचा अर्थ हा असा आहे आणि या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर असे की, 

“बुद्धी ही आपली एक विशिष्ट शक्ती आहे हे आपण निरीक्षणाने ओळखू शकत नाही आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात येत आहे की नाही हेही निरीक्षण करून ठरवू शकत नाही.”

तेव्हा, ‘आपल्या बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते, तेवढेच स्वीकारणे योग्य असते.’ असे घोषवाक्य उच्चारणे सोयीचे असले, तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल. बुद्धीला प्रमाण मानून जगायचे, आपल्या मानवी व्यवहारांची, वर्तनाची व्यवस्था लावायची, आपल्या जीवनाची अंगोपांगे बुद्धिप्रामाण्यानेच नियंत्रित करायची म्हणजे नेमके काय? हे अगोदर स्पष्ट केले पाहिजे.

आता, बुद्धिप्रामाण्यवादाच्या उपर्निर्दिष्ट मांडणीवर प्रा.रेग्यांनी घेतलेल्या दुसऱ्या आक्षेपाचा विचार करू.

“बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारा.” ह्या म्हणण्यात कदाचित असे अभिप्रेत असेल की, “बुद्धीशिवाय इतरही मन:शक्ती आहेत; पण त्यांच्यातील इतर कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही; फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय.”

तेव्हा, बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी काहीशी बदलून थोडक्यात अशी सांगता येईल:

“बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारले पाहिजे, हे योग्यच आहे; पण त्यात असेही अभिप्रेत आहे की, बुद्धीशिवाय इतरही मन:शक्ती आहेत. त्या मन:शक्तीपैकी कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही, फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय. यालाच बुद्धिप्रामाण्यवाद म्हणावे.”

येथे अशी शंका विचारता येते की, बुद्धीबाबत आपण असा पक्षपात का करतो? 

ह्याबाबत बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका अशी असू शकेल की, “हा पक्षपात करणे योग्य आहे, किंबहुना हा पक्षपातच नाही असेही म्हणता येईल, कारण फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे ह्याचे आकलन होऊ शकते, इतर शक्तींना होऊ शकत नाही.” पण, असे विचारता येईल की, हे सर्व आपल्याला कसे समजते? हे आपल्या बुद्धीला समजते असे त्याचे उत्तर देऊन चालणार नाही; कारण ते आपल्या बुद्धीला कसे समजते असा प्रश्न पुन्हा त्यातूनच निर्माण होतो. म्हणजे ते उत्तर वर्तुळात्मक (Circular) ठरेल. उलट, बुद्धिप्रामाण्यवादाचा हा युक्तिवाद त्याच्यावरच पलटवता येईल. इतर मन:शक्तींच्या बाबतीतही असाच दावा करता येईल. उदाहरणार्थ, ‘प्रतिभा’ ही एक मन:शक्ती आहे. तेव्हा, प्रतिभाप्रामाण्यवाद म्हणूनही एक भूमिका मांडता येईल. ती अशी: “व्यक्तीच्या प्रतिभाशक्तीला जे जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झालेले असते, तेच स्वीकारले पाहिजे. हाच प्रतिभाप्रामाण्यवाद होय.” 

पण, यामुळे बुद्धिप्रामाण्यवाद हा अशा अनेक पंथामधील एक पंथ ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणेच कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवाद, भावनाप्रामाण्यवाद, प्रेरणाप्रामाण्यवाद, इच्छाप्रामाण्यवाद असेही अनेक पंथ असू शकतील. आणि ह्या पंथांमधून निवड करावी लागेल. आता, हे सर्वच पंथ त्या त्या मन:शक्तीला सत्य आणि योग्य जाणवते म्हणून त्यांचाच स्वीकार करणे कसे योग्य आहे, ही भूमिका आग्रहाने मांडू लागतील.

यासंदर्भात, प्रा.रेगे विचारतात की, कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवाद, भावनाप्रामाण्यवाद यांसारख्या पंथांमधून निवड कशी करावी? कारण, अशा निवडीला काही तात्त्विक अधिष्ठानच असणार नाही. ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल. पण, त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार का करावा हे कळत नाही.

तेव्हा, वरील बुद्धिप्रामाण्यवादी मांडणीला आणखी मुरड घालून, बुद्धिप्रामाण्यवादाला पुढीलप्रमाणे भूमिका घेता येईल:

“बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते, तेच केवळ स्वीकारा ; ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत नाही की, बुद्धीशिवाय इतरही ज्ञानशक्ती किंवा मन:शक्ती आहेत, त्याही सत्य म्हणून कशाचे तरी ग्रहण करतात. तो सत्याभास असतो. खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते. हाच बुद्धिप्रामाण्यवाद होय.” 

पण, वरील बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेचा स्वीकार केला, तर एका गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागते. तो प्रश्न प्रा.रेगे विचारतात, “खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते; तर ‘जे बुद्धीला पटले आहे तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात स्वारस्य तरी काय?” 

प्रा.रेग्यांचा प्रश्न थोडा अधिक स्पष्ट करावा लागेल.

आपण फक्त तोंडाने खाऊ शकतो, इतर कशाने खाऊ शकत नाही. हे अगदी उघड आहे. म्हणून ‘तुम्ही रोज एक सफरचंद खा’ असा सल्ला डॉक्टर देतील. ‘तुम्ही रोज एक सफरचंद तोंडाने खा’ असा सल्ला काही ते देणार नाहीत. तोंडाने खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही.

आता, “खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते, तेव्हा बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते, तेच केवळ स्वीकारा.” ही बुद्धिप्रामाण्यवादाची भूमिका आहे. त्यानुसार, ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा.’ अशी भूमिका असेल तर ती सुसंगत आहे, असेही म्हणता येईल. ‘तुमच्या बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे म्हणण्याचे कारण नाही.

प्रा.रेग्यांचा प्रश्न असा की ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय? जे आपल्याला सत्य म्हणून आकलन झालेले नसते; त्याचा सत्य म्हणून कुणी स्वीकार करीत असतो काय? हा अनावश्यक सल्ला तर नाही ना?

तेव्हा, आणखी वेगळ्या प्रकारे बुद्धिप्रामाण्यवादाची फेरमांडणी करावी लागेल.

माणसाच्या अनेकविध समजुती असतात, श्रद्धा असतात. आपल्या कोणत्याही समजुतीचा किंवा विश्वासाचा आशय म्हणजे एक विधान असते. म्हणजेच, आपली कोणतीही समजूत विधानाच्या स्वरूपात मांडता येते. उदाहरणार्थ, “माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.” ह्या म्हणण्याचा अर्थ असा की, ‘सर्व माणसे स्वाभाविकपणे वागतात तेव्हा ती चांगल्या प्रकारे वागतात.’, हे विधान सत्य आहे असे मी मानतो. आता, विधानांचे स्वरूपच असे असते की, ते सत्य तरी असते किंवा असत्य तरी असते. दुसरी गोष्ट अशी की, कोणतेही विधान त्यापलीकडील कोणत्यातरी गोष्टींमुळे सत्य किंवा असत्य ठरते.

उदाहरणार्थ, ‘उद्या नागपुरात थंडी पडेल.’ हे विधान ‘उद्या’ ह्या अव्ययाने ज्या दिवसाचा निर्देश होतो, त्यादिवशी आणि ‘नागपूर’ या नामाने ज्या ठिकाणाचा बोध होतो, तेथे थंडी पडण्याची घटना जर घडली तर सत्य ठरते; ही घटना जर घडली नाही तर असत्य ठरते. म्हणजे, हे विधान त्याच्याहून भिन्न असलेल्या घटनेमुळे सत्य किंवा असत्य ठरते. तेव्हा, ज्या गोष्टीमुळे एखादे विधान सत्य ठरते, तिला ते विधान सिद्ध करणारा पुरावा किंवा त्या विधानाचा ‘साधक पुरावा’ असे म्हणूया.

आता, बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी अशी करता येईल :

“बुद्धिप्रामाण्यवादी माणूस जेव्हा एखादे विधान सत्य म्हणून स्वीकारतो, तेव्हा ते विधान सत्य ठरविणारा साधक पुरावा त्याला अवगत असतो म्हणून आणि म्हणूनच केवळ तो ते स्वीकारतो. विधान सत्य ठरवण्यासाठी जो पुरावा आवश्यक असतो तो सर्व जर उपलब्ध नसेल, तर बुद्धिप्रामाण्यवादी माणूस ते विधान सत्य म्हणून स्वीकारीत नाही. थोडक्यात, बुद्धिप्रामाण्यवादी माणूस पुरेशा पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून स्वीकारीत नाही, किंवा असत्य म्हणून नाकारीत नाही. विधान सत्य (किंवा असत्य) ठरविणारा निर्णायक पुरावा उपलब्ध नसेल, तर बुद्धिप्रामाण्यवादी माणूस ते सत्य (किंवा असत्य) आहे असे मानणार नाही, ते अनिर्णित आहे असे तो मानेल.”

विधाने वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि म्हणून त्यांचे साधक पुरावेही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ, ‘हे फूल तांबडे आहे.’ व ‘उद्या पाऊस पडण्याचा दाट संभव आहे.’ ही भिन्न प्रकारची विधाने आहेत आणि त्यांना सत्य किंवा असत्य ठरविण्यासाठी ज्या पुराव्यांचा आधार घ्यावा लागेल ते भिन्न प्रकारचे असतील. गणिती विधानांची सत्यता वेगळ्याच प्रकारच्या पुराव्यांवर आधारलेली असते. उदाहरणार्थ, ‘काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.’, हे पायथागोरसचे प्रमेय आहे. हे गणिती विधान आहे. ह्या विधानाची सत्यता तार्किक पुराव्यावर आधारलेली असते. हे प्रमेय इतर कित्येक आधारविधानांपासून निगमनाने सिद्ध केले जाते आणि तसे करणे म्हणजेच प्रमेयाची सिद्धता देणे होय.

पण, विधान कोणत्याही प्रकारचे असो, ते ज्या प्रकारचे असेल, त्याला अनुसरून योग्य त्या प्रकारच्या पुरेशा पुराव्याचा पाठिंबा त्याला असला, तरच ते सत्य ठरते आणि असा पुरावा जर आपल्याला अवगत असला, तरच ते सत्य म्हणून स्वीकारण्याचा आपल्याला अधिकार असतो. हे बुद्धिप्रामाण्यवादाचे सार आहे.

वैज्ञानिक रीतींमध्ये आणि वैज्ञानिक व्यवहारातसुद्धा हीच गोष्ट अनुस्यूत असते.

या संदर्भात प्रा.दि.य.देशपांडे यांची भूमिका अशी: “विज्ञान ही वर्धमान, दरक्षणी वाढणारी गोष्ट आहे. त्यात सातत्याने नवीन ज्ञानाची भर पडत असते. दररोज नवीन विधाने सुचविली जातात आणि त्यांची परिक्षा चालू असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी अशी काही विधाने असणे अपरिहार्य आहे की जी अजून ‘निश्चित सत्य’ वा ‘ज्ञान’ म्हणून प्रस्थापित झाली नाहीत, ती अजून अभ्युपगमाच्या (Hypothesis) स्वरूपात आहेत. अशा विधानांच्या बाबतीत विश्वास किंवा अविश्वास दोन्ही न बाळगता, कुठलीही अनुकूल वा प्रतिकूल भूमिका न घेता, त्याविषयी तटस्थ राहता येते.” 

ही एखाद्या सत्यप्रेमी वैज्ञानिकाची वृत्ती झाली. आपला सत्याचा शोध सुरू आहे, आपण प्रयत्नशील आहोत. आपल्याला ‘सत्य’ म्हणून मान्य असलेली अनेक विधाने ‘असत्य’ ठरण्याची शक्यता मनी बाळगून, जे अनिर्णित आहे त्याविषयी दुराग्रह न बाळगता, सतत सत्यशोधन करत राहणे ही वृत्ती वैज्ञानिकाची असते.

बुद्धिप्रामाण्यवादाचे हेच सांगणे आहे काय?

प्रा.रेग्यांनी ह्याविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत : 

“विधान सत्य (किंवा असत्य) ठरविणारा पुरावा अवगत असेल तरच ते सत्य (किंवा असत्य) आहे, असे माना. असा पुरावा नसेल तर ते अनिर्णित आहे असे माना. एवढेच जर बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल, तर बुद्धिप्रामाण्यवादाचा इतक्या ठामपणे, आग्रहाने, अभिनिवेशाने उद्घोष करण्याचे, प्रसार करण्याचे कारणच काय?  ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ ह्या काहीशा लांब आणि संस्कृत शब्दाचे जे म्हणणे आहे, ते सरळ आणि साधे आहे; त्याला कुणी विरोध करीत असेल किंवा त्याच्याविरुद्ध वर्तन करीत असेल हे शक्य आहे काय? ज्या विधानाला पाठिंबा देणारा पुरेसा पुरावा आपल्यापाशी नाही अशा विधानावर कुणी विश्वास ठेवीत असेल काय? असे विधान कुणी सत्य म्हणून स्वीकारीत असेल काय?” 

प्रा.रेग्यांचे ह्या प्रश्नांना स्वत:चे उत्तर ‘होय’ असे आहे. त्यांच्या उत्तराचे विस्ताराने स्पष्टीकरण दिले पाहिजे.

ज्या विधानाला पाठिंबा देणारा पुरेसा पुरावा आपल्यापाशी नाही अशाही विधानावर माणूस बऱ्याचदा विश्वास ठेवीत असतो आणि त्याचा सत्य म्हणून स्वीकार करीत असतो. पण माणूस असे का करतो? तर याकरिता आपल्याला मानवी प्रकृतीचा नीट विचार केला पाहिजे.

माणसे ज्या समजुती बाळगतात, त्यांच्या ज्या धारणा असतात त्या केवळ पुराव्यावर आधारलेल्या नसतात. तसे असते, तर आपण सर्व ‘तार्किक यंत्रे’ (Logical machines) झालो असतो. माणसाला भावनाही असतात, प्रेरणाही असतात आणि ह्या भावना, प्रेरणांची छाप माणसांच्या समजुतीवर उमटलेली असते. क्रुद्ध माणसाला, संशयग्रस्त माणसाला, भयभीत माणसाला आणि प्रसन्न माणसाला तोच परिसर, त्याच हालचाली वेगळ्या दिसतात. ह्या भिन्न मनोवस्थांतील माणसांना एकाच वस्तूची होणारी दर्शने भिन्न असतात. पण त्यापलीकडे जाऊन, मनोवैज्ञानिक आपल्याला सांगतात की, माणसाच्या खोल अंतर्मनात ज्या अबोध इच्छा व प्रेरणा असतात; त्यांच्यामधून त्याच्या अनेक समजुती उद्भवतात, आकार धारण करत असतात. व्यक्तिभिन्नता हे मानसशास्त्रातील एक प्रमुख तत्त्व आहे. त्यामुळे अबोध इच्छांतूम व प्रेरणांतून भिन्न समजुती व भिन्न वर्तनप्रकार निष्पन्न होतात. ह्या प्रेरणा अशा असतात की त्यांचे समाधान कल्पनेच्या किंवा अद्भुतरम्य (Romantic) विश्वातच होऊ शकते. कारण, स्वप्ने आणि दिवास्वप्ने ह्या स्वरूपातच त्या प्रेरणा सफल होऊ शकतात. मात्र, स्वप्न म्हणजे वास्तवाचा अभाव नव्हे. कलाकारांना आणि कवींना पडलेली स्वप्ने ही वास्तवाला भव्यता आणि परिपूर्णता प्रदान करतात. यासाठी ते कल्पनाशक्तीचा आश्रय घेतात. इतकेच नव्हे, बऱ्याचदा वैज्ञानिक व्यवहारांतही शास्त्रज्ञ कल्पनाशक्तीचा उपयोग करून घेतात. यासंदर्भात आईन्स्टाईनचे एक वचन असे : “तर्क माणसाला ‘अ’ पासून ‘ब’ पर्यंतच नेऊ शकतो; कल्पनाशक्तीचा संचार सर्वत्र असतो.” 

पण ही स्वप्ने आणि पुराव्यांच्या आधारे सत्य ठरणाऱ्या तार्किक समजुती माणूस वेगळ्या ठेवू शकत नाही. मानवी प्रकृतीचे तसे स्वरूपच नाही. ह्या तर्कसिद्ध समजुतींचे विषय असलेल्या वस्तुस्थिती (Facts) आणि ही स्वप्ने ह्या दोन्हींचे बेमालूम मिश्रण असलेल्या जगात माणूस जगत असतो. (हे जगही सर्वांसाठी सारखे नसते; कारण आपल्या मनोदशेनुसार, अंत:प्रेरणेनुसार प्रत्येकाला ते भिन्न भासते.) अशा जगात जगण्याची माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि तो तसाच जगतो. कारण, माणूस ह्या प्रकारचा प्राणी आहे.

पण ह्या स्वप्नालाही काही मर्यादा आहेत. स्वप्न उत्कट समाधान देऊ शकतील, ती माणसाला सुखात चिंब भिजवू शकतील; मात्र हे समाधान आणि सुख क्षणिक असेल. कारण, ते कल्पनाविश्वातले असते. आपल्या इच्छांचे वास्तव, खरेखुरे समाधान वास्तव जगात बदल घडवून आणूनच करावे लागते आणि आपल्याला कृती करूनच बदल घडवून आणावे लागतात. केवळ इच्छा केल्याने बदल घडवून आणता येत नाहीत. स्वप्नावर कृती आधारता येत नाही. वस्तूंचे स्वरूप कसे आहे, हे पारखून घेऊन त्यांना साजेशी कृती केली तरच ती यशस्वी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून माणसाला केवळ स्वप्नांत रमता येत नाही. त्याला पुराव्यांवर आधारलेल्या तार्किक समजुतींचा, वस्तूच्या स्वरूपाशी इमान राखणाऱ्या समजुतींचा संग्रह करावा लागतो.  तेव्हा, माणसाच्या जीवनात चिकित्सक, तार्किक विचाराला अनिवार्य असे स्थान आहे. पण, ह्याबरोबरच माणसाच्या जीवनात स्वप्नांना, निरंकुश, मुक्त कल्पनांना, सर्जनशीलतेला स्वाभाविक आणि आदिम असे स्थान आहे आणि ह्या दोन्ही प्रेरणांची, तार्किक विचार आणि मुक्त कल्पना यांची सांगड माणसाला घालता येते. जेव्हा कृती टाळता येत नाही तेव्हा आणि तेवढ्यापुरता तार्किक विचाराचा आश्रय माणसाला घेता येईल आणि कृतीचे जोखड जेव्हा झुगारता येईल, तेव्हा तो मुक्त कल्पनेचे सृजन करू शकेल. स्वप्नांत रमू शकेल. माणसाचे जीवन हे बरेचसे असेच संमिश्र स्वरूपाचे असते. हा माणसाचा स्वाभाविक मोह आहे. आणि अतिशय चिवट असा हा मोह आहे.

बुद्धिप्रामाण्यवाद ह्या मोहाविरूध्द ठाम भूमिका घेतो. तो स्वप्नांची, काव्याची हकालपट्टी करतो. स्वप्नांना जागाच ठेवीत नाही. तार्किक सत्य हे त्याच्या दृष्टीने केवळ कृतीचे साधन नसते. तर सत्याला त्याच्या दृष्टीने स्वयंभू आणि केवल मूल्य आहे. 

जे पुराव्याच्या आधारे सत्य ठरत नाही, ते स्वीकारणे केवळ धोकादायक असते एवढेच नाही; तर ते स्वीकारणे हा माणसाचा घृणास्पद दुबळेपणा असतो. असे करण्यात माणसाची अप्रतिष्ठा आहे. स्वत:विषयी, विश्वाविषयी जे सत्य असेल ते, ते केवळ सत्य आहे म्हणून स्वीकारण्यात माणसाची महत्ता आहे. सत्य का स्वीकारायचे? कारण ते सत्य आहे म्हणून! सत्याला अशाप्रकारे स्वतोमूल्य (Value-in-itself) आहे.

शेवटी, सत्य हे एक मूल्य आहे.

‘सत्य’ हे मूल्यच बुद्धिप्रामाण्यवाद्याची देवता आहे आणि तिच्याऐवजी दुसऱ्या कुणाला तो शरण जाऊ शकत नाही आणि इतर कुणीही तसे शरण जावे असे त्याला वाटत नाही. त्याचे सर्वांना हेच आवाहन असते की : “सत्यालाच शरण जा.”

बुद्धिप्रामाण्यवाद अखेरीस एका मूल्यावर आधारलेला आहे आणि म्हणून त्याच्यात धार्मिक कठोरपणा आहे आणि धार्मिक आवाहन आहे.

मग एक प्रश्न उरतोच. प्रा.रेगे शेवटी विचारतात की, “ह्या मूल्याचे प्रामाण्य कशावर आधारलेले आहे?” 

चाळीस वर्षांपूर्वी प्रा.मे.पुं.रेगे सरांनी विचारलेला हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. ते का?

एम.ए. द्वितीय वर्ष
(अर्थशास्त्र)

आदरांजली : मेघश्याम पुंडलिक रेगे
(२४-१-१९२४ ते २८-१२-२०००)

महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक क्षेत्रात गतशतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाने ठसा उमटविला त्यांपैकी प्रा.मे.पुं.रेगे हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचे वर्णन करतांना प्रा. रा.भा.पाटणकरांनी लिहिले आहे, “प्रा.रेगे एक तत्त्वज्ञ, प्रबोधनकार आणि सॉक्रेटिक शिक्षक होते. त्यांचे जीवन म्हणजे समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास होय.” 

तर, तत्त्वज्ञ दि.य.देशपांडे यांनी रेग्यांविषयी लिहिले आहे,  “या व्यक्तीपुढे आपण सर्व खुजे आहोत हे सतत जाणवते.”

स्वत: ‘ आजचा सुधारक’ परिवाराने त्यांच्याविषयी म्हटले आहे, “प्रा.रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे; तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते. ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्त्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानांचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून, त्या विषयावरील त्यांचा अधिकार निर्विवाद आहे.”

ते गेले तेव्हा ‘सुधारक’ ने लिहिले, “प्रा.रेग्यांबद्दल ‘आजचा सुधारक’ परिवाराला आदरही फार आणि जिव्हाळा तर त्याहूनही अधिक. ते आमचे लाडके विरोधक आणि टीकाकार होते. ते नेमके मुद्दे मांडून आम्हाला आमच्या भूमिका तपासायला लावत. आमच्या विचारांना दिशा देणारे आणि ‘धार लावणारे’ हे व्यक्तिमत्व. त्यांचा अभाव आम्हाला पदोपदी जाणवेल.”

आज मात्र ते विस्मरणात गेल्यासारखे आहेत. आपण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, दि.य.देशपांडे, सुरेंद्र बारलिंगे, नरहर कुरुंदकर, शरद पाटील यांसारख्या मौलिक विचारवंताकडे असेच दुर्लक्ष केले आहे. ते आपले खरेखुरे पुर्वसूरी आहेत. त्यांच्या विचारांची दखल घेऊन, त्यांचे सखोल परीक्षण केल्याशिवाय महाराष्ट्रात सकस वैचारिक परंपरा विकसित होणे, जवळजवळ अशक्यप्राय आहे.

प्रा.रेग्यांनी व्रतस्थ निष्ठेने तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. जर्मन तत्त्वज्ञ कांटचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. सुरुवातीला ते ‘कांटवादी’ होते; पण लुडविग व्हिट्गेन्स्टाइन यांचे ‘फिलॉसॉफिकल इनव्हेस्टिगेशन्स’ अभ्यासल्यावर ते ‘कांट-व्हिट्गेन्स्टाइनवादी’ झाले. या भूमिकेतूनच त्यांनी पुरोगामित्व, इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद, मानवतावाद, श्रद्धा आणि धर्म व विज्ञाननिष्ठा या प्रतिष्ठित विचारांच्या शक्ती व मर्यादा चिकित्सकपणे दाखवून दिल्या.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व पौर्वात्य पंडित यांच्यात त्यांनी घडवलेले ‘संवाद’, विविध विषयांवर केलेले निबंधलेखन, विश्वकोश व धर्मकोश यांच्या संपादनाचे कार्य या साऱ्यांतून प्रा.रेगे यांची जी वैचारिक प्रतिमा आपल्यापुढे येते, तशी प्रतिमा निर्माण करणारे तोडीस तोड व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात नाही.

आज रेग्यांना जाऊन बावीस वर्षे होत आहेत.

२८ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन आणि २४ जानेवारी हा जन्मदिन. तत्त्वज्ञानाचा सखोल व सकस अभ्यास करणे, असा अभ्यास साक्षेपीपणे सादर करणे व हा अभ्यास सामाजिक प्रश्नांना प्रस्तुत राहील याचीही काळजी घेणे याचे महत्त्व प्रा.रेगे यांनी आपल्या वैचारिक कारकिर्दीत अधोरेखित केले. हे महत्त्व ओळखून वाटचाल करीत राहणे हीच प्रा.रेगे यांना खरी आदरांजली ठरेल. प्रस्तुत लेख ‘बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप’ हा तशाच आदरांजलीचा एक छोटासा प्रयत्न होय. 

तळटीप: प्रा. मे.पुं.रेगे यांचे सुधारकमधील लेख वाचण्यासाठी https://www.sudharak.in/लेखक-सूची/?l=प्रा.+मे.+पुं.+रेगे यावर क्लिक करा.

अभिप्राय 2

  • खूप सुंदर आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन केलेस श्रीधर !एवढ्या कमी वयामध्ये चिकित्सकपणे मांडणी करणे खरंच सोपे नाही. तरीसुद्धा यशस्वीपणे तू ही किमया पार पाडलीस .तू आमचा विद्यार्थी आहेस याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी तुला नक्कीच शुभेच्छा.

  • चिकित्सक, वास्तव,मार्मिक, तटस्थ भूमिकेतून बुद्धी प्रामान्यावाद ही संकल्पना समजावून सांगितली आहे. खरंच *मूर्ती लहान पण कीर्ती महान* हे वाक्य तुझ्यासाठी १००%लागु पडते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.