मूळ लेखक : एड्रिजा रॉयचौधरी
वैवाहिक जोडीदार ठरविण्याची विवाहव्यवस्था जातीची शुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून आली आहे, याबद्दल अनेक समाजशास्त्रज्ञ सहमत आहेत. त्याचवेळी ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पनासुद्धा राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती.
(भारतीय विवाहाची संकल्पना, विशेषतः ठरवून केलेल्या लग्नाची संकल्पना, ही पश्चिमेकडील देशांमधील लोकांसाठी खूपच आकर्षणाची बाब आहे.)
काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक तरुण विद्यार्थी म्हणून राहत असताना भारतातील एकमेवाद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक आचरणपद्धतीने वा परंपरांनी भुललेल्या जिज्ञासू परकियांना वारंवार भेटायचो. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीला भारतीय आहार ते चित्रपट आणि कुटुंब अशा अनेक भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिदृश्यांबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे. निःसंशयपणे, असे असले तरीही, ह्या सगळ्या चर्चांच्या वेळी सर्वांत जास्त चर्चा कोणत्या विषयाची होत असेल तर ती म्हणजे ठरवून केलेले लग्न.
मला आठवतं की, एकदा मला शिकवणार्या प्राध्यापिकेसोबत माझे खूपच गरमागरमीचे संभाषण झाले होते. त्या प्राध्यापिका म्हणाल्या की, त्यांनी भारताबद्दल जे जे काही वाचलं आहे त्यामुळे त्यांना भारताबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली. जसे की, भारतातील दारिद्र्य, आरोग्यास असुरक्षित वातावरण, प्रचंड गर्दी असलेली सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, झोपडपट्ट्या आणि इतर अश्या बऱ्याच गोष्टी. तरीही आयुष्यात किमान एकदा तरी भारताला भेट देऊन भारतीय विवाहसोहळा ‘याची देहि, याची डोळा’ अनुभवण्याची त्यांची जबर इच्छा होती.
भारतीय विवाहाची संकल्पना, विशेषतः ठरवून केलेले लग्न याबद्दल पश्चिमेकडील देशांमध्ये फारच आकर्षण दिसून येते. अलिकडच्या, ‘इंडियन मॅचमेकिंग’ ह्या नेटफ्लिक्स सीरीजने आंतरराष्ट्रीय रसिकांना वैवाहिक जीवनासाठी जोडीदार मिळवण्याच्या भिन्न अशा भारतीय पद्धतीचे ओझरते दर्शन दिले आहे. ही सीरीज खास आंतरराष्ट्रीय रसिकांसाठीच बनविल्याचे दिसते. ‘मुंबई-स्थित’ वधू-वरांना एकत्र आणणाऱ्या सिमा टपारिया ह्यावर भाष्य करताना म्हणतात, ‘‘भारतात विवाह हा एक फारच मोठा उद्योग आहे.’’ आठ भागाच्या ह्या सीरीजच्या नायिका असलेल्या टपारियांचे स्वतःचे ‘सुटेबल रिश्ता’ नावाचे एक विवाहमंडळ मुंबईत आहे. त्यांचा सगळा ग्राहकवर्ग हा प्रामुख्याने भारतातील अनेक धनाढ्य कुटुंब आणि परदेशस्थ भारतीय यांच्यापुरता मर्यादित आहे.
स्वतःच्या रसिकांच्या फायद्यासाठी टपारिया भारतातील विवाहसंकल्पनेची ओळख पुढील शब्दांत करून देतात : ‘‘भारतात, विवाहास ‘ठरवून केलेला विवाह’ असं आम्ही म्हणत नाही. अगोदर विवाह होतो आणि त्यानंतर प्रेमविवाह होत असतो. हा विवाह दोन कुटुंबामधील असतो. ह्या दोन कुटुंबांची स्वतःची प्रतिष्ठा असते आणि त्यामध्ये लक्षावधी रुपयांचे भागभांडवल पणाला लागलेले असते. म्हणून आई-वडील त्यांच्या मुला-मुलींना मार्गदर्शन करतात, आणि हेच तर एखाद्या वधू-वर जोडणी करणाऱ्याचे काम असते.’’
आठ भागांमध्ये विभागलेल्या ह्या मालिकेमध्ये टपारिया आणि त्यांचा ग्राहकवर्ग हा गोरा रंग, उंच आणि सुंदर जोडीदार; तसेच लवचिकता व तडजोड, कुंडली जुळणे इत्यादी गोष्टींबद्दल आग्रही असल्याचे दिसते. यावर सोशल मीडियावर गरमागरम चर्चेला सुरुवात झाली आहे. विवाहाचे असे समस्याग्रस्त चित्रण व्हायला नको असे अनेकांचे मत यामधून व्यक्त झाल्याचे आढळून येते. त्याचवेळी ह्या वेबसीरीजने ‘ठरवून केलेल्या विवाहा’च्या मूळ स्वभावावर वादविवाद सुरू केला आहे.
ठरवून केलेल्या विवाहाची प्राचीन मुळे
हे गंमतीशीर आहे की, प्राचीन काळापासून भारतीय कला आणि साहित्य हे प्रणय आणि मोह ह्या विषयांनी व्यापलेले आहे. परंतु असे असले तरी, जेव्हा विवाहाचा विषय येतो तेव्हा कुटुंबामधील वयस्क मंडळींनी घेतलेल्या निर्णयाला कमालीचे महत्त्व दिले जाते. भारतामधील विवाहसंस्थेवर काम करणारे समाजशास्त्रज्ञ यावर सहमती व्यक्त करतात की, जातशुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून ठरवून केलेल्या विवाहाची कल्पना घेतली गेली आहे.
अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफलो, मैत्रीश घातक आणि जीनी लॅफोर्च्यून यांनी विवाहाच्या अर्थकारणावर सन २००९ मध्ये एक अभ्यास केला होता. तो अभ्यास असे सूचित करतो की, ह्या निर्णयाचे आर्थिक महत्त्व असले तरी, ‘प्रतिष्ठे’सारख्या गुणविशेष असलेल्या गोष्टी, जसे की जात, भारतात विवाह निर्धारित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. पुढे त्यांनी असेही लिहिले आहे की, भारतात अलीकडे झालेल्या मतचाचणीमध्ये ७४% उत्तरदात्यांनी आंतरजातीय विवाहास नकार दिल्याचे दिसते. पुढे ते असेही म्हणतात की, अगदी आतादेखील वृत्तपत्रातील विवाहाच्या जाहिराती सातत्याने जातीच्या बकेटमध्ये वर्गीकृत होत असल्याचे दिसते.
हिंदूंमधील जातवर्गीकरण मनुस्मृतीसंहितेच्या आधारे करण्यात आले होते. ही संहिता भारतातील प्राचीन समाजाने समजून घेतलेल्या विवाहपद्धतीसंदर्भात एक गंमतीशीर मर्मदृष्टी देते. मानसशास्त्रज्ञ टुलिका जैस्वाल यांनी त्यांच्या ‘A Social Psychological Perspective’ ह्या पुस्तकात म्हटले आहे की, विवाह हा काही एका व्यक्तीचे व्यक्तिगत सुख नसून ते एक सामाजिक कर्तव्य आहे, असे मनुस्मृती मानते.
इ.स. पूर्व २०० ते इ.स. ९०० च्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या हिंदू धर्मशास्त्र पुराणांनी वैवाहिक जोडीदार मिळविण्याच्या आठ भिन्न मार्गांची यादी दिली आहे. ब्रह्म, दैव, अर्श, प्रजापत्य, असूर, गांधर्व, राक्षस आणि पैशाचा (पैशाच्य?) असे विवाहाचे आठ प्रकार हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिले आहेत. ह्यांपैकी केवळ पहिल्या चार विवाहांनाच धार्मिक विवाह म्हणून मान्यता दिली होती. आणि राहिलेले चार विवाह हे प्रणयातून किंवा स्त्रीला पळवून नेण्यामधून निर्माण झालेले होते. “प्रथम चार विवाहप्रकार हे ठरवून केलेल्या विवाहाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये माता-पिता विधिवतपणे त्यांची मुलगी सुयोग्य वर मुलास देतात आणि हा आदर्श हिंदू समाजात आजही टिकून आहे,’’ असे समाजशास्त्रज्ञ गिरीराज गुप्ता त्यांच्या ‘Love, Arranged Marriage And The Indian Structure’ ह्या लेखात नमूद करतात. गुप्ता पुढे असं विषद करतात की, हिंदूंमधील ठरवून केलेल्या विवाहाच्या धार्मिक व जातीय गुणविशेषांच्या उलट भारतातील मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी विवाहाकडे एक ‘सामाजिक करार’ म्हणून पाहिले. तथापि, अगदी ह्या परिस्थितीतदेखील, त्यांच्यातील जवळपास सगळेच विवाह हे नेहमीच त्यांच्या कुटुंबियांनी ठरविलेले होते.
त्यावेळेला ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पनासुद्धा राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती. सबिता सिंह ह्या लेखिकेने मध्ययुगीन राजस्थानातील विवाहाचा सखोल अभ्यास करून असे लिहिले आहे की, राजकीय विवाह हे मुख्यतः राज्यनिर्मितीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य होते, जेव्हा वैवाहिक युती ही ‘स्वतःच्या भूप्रदेशाचा विस्तार करण्यासाठी, शत्रूत्व नष्ट करण्यासाठी आणि सत्ता व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी’ वापरली जात असे.
सबिता सिंह असे स्पष्ट करतात की, अशा वैवाहिक युतींच्या उत्क्रांत होणाऱ्या तऱ्हांनी मध्ययुगीन राजकीय उतरंडीमध्ये राजपूत वंशाच्या बदलणाऱ्या प्रतिष्ठेला प्रतिबिंबित केले.
निरीक्षण नोंदवताना त्या पुढे असे लिहितात की, जेव्हा पंधराव्या शतकाच्या मध्यात मारवाडचे राठोड बलशाली व प्रतिष्ठित झाले तेव्हा, राठोड घराण्याशी वैवाहिक संबंध जोडण्यास इतर राजांनी उत्सुकता दाखवली. अगदी ह्याचप्रमाणे शेखावत आणि बघेला यांच्यासारख्या वंशांचे मुघलांच्या मनसबदारी व्यवस्थेत आगमन होताच त्यांची वाढलेली प्रतिष्ठा वैवाहिक आखाड्यात प्रतिबिंबित झाली.
युद्धाचे प्रकार आणि भूप्रदेशीय महत्त्वाकांक्षा ह्या वास्तविकपणे उच्चभ्रू राज्यकर्त्यावर्गामधील बहुपत्नीकत्वाच्या अस्तित्वामागील सर्वात मोठे घटक होते. सबिता सिंह यांनी त्यांच्या संशोधनात असेही निरीक्षण नोंदवले आहे की, बहुतांश राजपूत राज्यकर्त्यांचे आणि सरदारांचे बहुपत्नीविवाह हे राजपूतांच्या शौर्यगाथेचे राजकीय जाळे टिकवून ठेवण्यासाठीचा एक मार्ग होता. आणीबाणीच्या प्रसंगी अशा विवाहसंबंधाने जोडलेला एक राजा दुसऱ्या राजाला मदतीसाठी बोलावत असे.
त्याचवेळेला भारतातील विस्तृत भागात, विशेषतः पर्वतीय भागात, बहुपतिकत्वाच्या अस्तित्वामागे अर्थशास्त्र आणि भूगोल हे घटक होते.
केवळ भारतात नाही
भारतात ठरवून केलेले विवाह वेगवेगळ्या मार्गांनी अस्तित्वात असले तरीही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही पद्धती निश्चितपणे दक्षिण आशिया खंडापुरती मर्यादित नाही. विवाहसंस्थेने संपूर्ण जगात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भूमिका पार पाडल्या आहेत. उदाहरणार्थ, जपानमध्ये ठरवून केलेल्या विवाहाची परंपरा अगदी आजही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ह्याची मुळे सोळाव्या शतकात सापडतात. जपानमध्ये लष्करी वर्गाने किंवा सामुराईने सरदारांमधील लष्करी युतींना संरक्षण देण्यासाठी ‘मियाई’ नावाची पद्धत रुजवली.
(पुजी आणि हिरो सागा यांच्या ठरवून केलेल्या विवाहामागे एक निश्चित असा व्यूहात्मक हेतू होता. टोक्यो १९३७ विकिमीडिया कॉमन्स)
तुर्कीमध्येदेखील ठरवून केलेल्या विवाहाचे प्राबल्य दिसते. अगदी अलीकडेच, २०१६मध्ये तुर्की संख्याशास्त्रसंस्थेने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार १५ ते २४ वयोगटातील ४५% तरुण तुर्की स्त्रियांनी त्यांचा जोडीदार ‘ठरवून केलेल्या विवाहा’मधून शोधण्यास संमती दिली.
तथापि, चीनची एक गंमतीशीर गोष्ट आहे. सन १९५०मध्ये माओ झेडॉंगने नवीन विवाहकायदा पारीत केला होता. ठरवून केलेल्या विवाहाच्या संरजामशाही पद्धतीचे निर्मूलन करणे व विवाहामध्ये व्यक्तीच्या संमतीला प्राधान्य देणे यासाठी त्याने हा कायदा केला होता. विवाहकायद्याच्या सुधारित आवृत्तीला साम्यवादी क्रांतीच्या दरम्यान केलेल्या जमीन सुधारणांशी जोडण्यात आले आणि त्याने अधिकृतपणे असा संदेश दिला की, इथून पुढे स्त्रिया त्यांच्या वडिलांच्या व्यावसायिक विनिमयाच्या वस्तू असणार नाहीत किंवा त्यांच्या नवऱ्याचे वर्चस्व असलेल्या वस्तू असणार नाहीत. ह्या अश्या सुधारणा झाल्या असल्या तरी बीबीसी २०१७चा अहवाल असे दाखवितो की, आई-वडील त्यांच्या मुला-मुलींच्या वैवाहिक निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेले होते आणि त्यांनी वारंवार वधू-वर जुळवणी माध्यमांचा उपयोग केला.
‘इंडियन मॅचमेकिंग’ सीरीज पाहताना आणि तिच्यावर टीका-टिप्पणी करताना रसिकांनी भारतातील आणि सबंध जगभरातील विवाहाची सामाजिक, राजकीय, धार्मिक मुळे, तसेच ही विवाहसंस्था ज्या पद्धतीने उत्क्रांत झाली आहे, ते लक्षात घेणे गरजेचे आहे. सन २०००मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेला अहवाल हे स्पष्ट करतो की, दक्षिण आशियाई लोक जोडीदार निवडण्यासाठी अधिकाधिकपणे वैवाहिक संकेतस्थळांचा उपयोग करत आहेत आणि ते ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांच्या कुटुंबियांना बाजूला ठेवत आहेत. स्वतःसाठी जोडीदार निवडण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य असतानादेखील हा अहवाल गंमतीशीरपणे हे स्पष्ट करतो की, व्यक्तींनी पारंपरिक जात, त्वचेचा रंग, धर्म इत्यादींचे पारंपरिक निकष वापरणे सुरूच ठेवले आहे. ह्या संदर्भामध्ये पाहता, कदाचित सिमा टपारियांचे बहुचर्चित विवाहजुळवणीचे कौशल्य, आपण ज्या समाजात राहतो त्याचेच प्रतिबिंब आहे, असे दिसते.
- एड्रिजा रॉयचौधरी, (नवी दिल्ली) – सध्या ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये कार्यरत आहेत. विस्तृत प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि शैक्षणिक संशोधन उपलब्ध करून देण्यासाठी त्या पत्रकारितेचा वापर करतात. अभिलेख संशोधकांच्या, इतिहासकारांच्या आणि सामाजिक शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, मौखिक इतिहास, मुलाखती आणि दुय्यम संशोधन या विषयांवर त्यांचा हातखंडा आहे. यापूर्वी त्यांनी आर्क माध्यम, न्यूयॉर्क निर्मित आणि पीबीएसमध्ये प्रसारित केलेल्या ‘फाइंडिंग यू रूट्स’ (सीझन ३) या माहितीपट मालिकेसाठी संशोधक म्हणूनही काम केले आहे. त्या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या पदवीधर असून युरोपियन आणि भूमध्यसागरीय अभ्यासात त्यांची आवड आहे. दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. शैक्षणिक प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून भारत, अमेरिका आणि युनायटेड किंगडममधील व्यापक प्रवासाच्या अनुभवाने त्यांची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी समृद्ध बनली आहे जी दर्जेदार पत्रकारितेसाठी आवश्यक सामग्री आहे.
- अनुवादक : प्रा. राजक्रांती वलसे व प्रा. प्रियदर्शन भवरे हे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे अध्यापन करतात.
- मूळ लेख https://indianexpress.com/article/research/from-manusmriti-to-indian-matchmaking-tracing-the-roots-of-arranged-marriages-6521518/ या संकेतस्थळावर दिनांक २६ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध झाला आहे.