सार्वकालिकता – एक विचार

सार्वकालिकता अर्थात शाश्वतता ही मानवी जीवनाची एक जमेची बाजू आहे. पण ही जमेची बाजू नेहमीच योग्य असते असे नव्हे. सार्वकालिकतेचा स्पष्ट अर्थ ‘कालसुसंगत’ असा व्यवहारात असता तर सार्वकालिकता या शब्दालाच योग्य अर्थ प्राप्त झाला असता. पण सार्वकालिकता या शब्दाचा बहुतांशी वेळा समाज व्यवहारात अर्थ घेतला जातो तो ‘पारंपरिक’ या अर्थाने. इथे मोठा घोटाळा होतो. कारण परंपरागत चालत आलेली कोणतीही गोष्ट जणू पवित्रच असते आणि त्याच्यामध्ये कदापि बदल करू नये असे समाजमन अर्थात बहुतांशी लोकांचे सांगणे असते. सार्वकालिक या शब्दाला जेव्हा परंपरागत या शब्दाचा अर्थ प्राप्त होतो तेव्हा समाजात अनेक प्रश्न, वाद तयार होतात. उदाहरणार्थ, विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न घ्या. अगदी आजही सहजासहजी घडून येईल अशी ही बाब नाही. आजही कुठेही विधवा पुनर्विवाह होतो तेव्हा त्याची नोंद “खास बाब” म्हणूनच होते. ती “आम बाब” म्हणून नोंदवली जावी असे सामाजिक वातावरण आपण अद्याप तयार करू शकलो नाही. विधवापुनर्विवाहाचा प्रश्न हा परंपरागत मनाला जाचणारा, छळणारा आहे. याचकरता हे पारंपरिक मन विधवा पुनर्विवाहात ‘पारंपरिक चाल’ म्हणून अथवा ‘दृढमूल परंपरा’ म्हणून पाहते आणि जणू काही हीच दृष्टी सार्वकालिक अर्थात शाश्वत आहे असे स्वतःच ठरवून स्त्री-मुक्तीच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाची अक्षरशः नासाडी करते. याचकरिता सार्वकालिकता या शब्दाचा एक योग्य अर्थ समाजमनांत दृढ करणे अत्यंत गरजेचे व आवश्यकदेखील आहे. जेव्हा समाजमन न्याय अथवा अन्याय आणि नीती यांच्या बाबतीत सार्वकालिकता शोधते अथवा सांगत असते तेव्हादेखील बहुतांशी समाजमनाला ‘परंपरागत तेच शाश्वत’ या अर्थाने सार्वकालिकता अपेक्षित असते हे ध्यानात घेऊन त्याविषयी काही योग्य बोलले पाहिजे.

न्याय, अन्याय यांचे काही सार्वकालिक व्याख्या, नियम आहेत. अन्यायाचा स्पष्ट संबंध असतो तो शोषणाशी आणि न्यायाचा संबंध असतो तो मुक्ततेशी. पण ही झाली व्यापक संकल्पना. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र न्याय म्हणजे आपल्या मनाप्रमाणे घडणे आणि अन्याय म्हणजे आपल्या मनाविरोधात घडणे असा बहुतांशी जणांचा समज असतो. हा समज अत्यंत घातकदेखील असतो. कारण अशा समजातून स्वतः मनाशी बाळगलेल्या मूल्यांनीच अथवा धारणांनीच या जगातील सारे व्यवहार घडले पाहिजेत असा अट्टाहास तयार होत जातो. अश्यावेळी एखादी घटना मनाविरोधात घडली तरी तो लगेचच अन्याय ठरवला जातो, इतकेच नव्हे तर ‘न्याय’ नावाच्या योग्य प्रतिमेला आपल्याच धारणांच्या प्रतिमेत जमेल तसे बद्ध करत जगणे हाती उरते. यामध्ये केवळ व्यक्तीचाच नाही, तर समाजाचादेखील पराभव होत जातो. न्याय-अन्याय यांना जेव्हा सार्वकालिक निकष लावले जातात तेव्हा त्यांचादेखील एक पुनर्विचार आवश्यक असतो. कारण जगात ‘बदल’ हेच सार्वकालिक सत्य असते. शाश्वत असे काही समाजमनात नोंदवले गेले असले तरी, त्यालादेखील एक मर्यादा असतेच असते. अथवा असावीच. अन्यथा सार्वकालिकतेच्या नावावर जुने मुलामे चढवले जातात. यातूनच जुने-नवे वाद पेटतात. सार्वकालिकता अशा रीतीने ‘ठिणगी’ बनलेली असते. याचकरिता सार्वकालिकता या शब्दला कालसुसंगत हा अर्थ जोडला गेला पाहिजे. 

न्याय म्हणजे नेमके काय आणि अन्यायाची व्याख्या कोणती? शोषणाचा व हितसंबंधाचा मुद्दा तयार झाला की अन्याय निर्माण होतो. न्याय म्हणजे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय योग्य नीतिनियमांचा आधार घेत समाजमने बांधण्याचा केलेला प्रयत्न होय. यामध्ये स्वहित बाजूला फेकून शोषणाची व्यवस्था उध्वस्त करण्याची कृतीशील मनीषा अपेक्षित असते. जेव्हा न्याय निर्माण होतो तेव्हा पुढे जाऊन एका योग्य वाटेवर त्याला ‘नीती’ चे स्वरूप येत जाते. सुईच्या अग्राएवढीदेखील जमीन पांडवांना नाकारणारे कौरव शेवटी रणांगणावर हरतात हा महाभारताचा दाखला एका पद्धतीने ‘न्याय’ दाखवतो तर या कथेचे मर्म म्हणून जो बोध समाजमनात तयार होत जातो तिथे ‘नीती’ तयार होत जाते. समाजमनात विधायक पद्धतीने निर्माण होणारा न्याय जेव्हा पुढे जाऊन नीती बनतो तेव्हा …तेव्हा त्याला ‘सार्वकालिकता’ प्राप्त होते. ही सार्वकालिकता विधायक असते, समाजहित साधणारी असते.

कोल्हापूर
मोबाईल:९९२२७८४०६५

अभिप्राय 1

  • छान विचार. शोषणमुक्त अशा व्यवस्थेसाठी केलेल्या प्रयत्नाला एक प्रकारे तुम्ही न्याय ही परिभाषा देता आणि अशी परिभाषा समाजामध्ये रुजवण्याच्या प्रक्रियेनंतर जे होतं त्याला नीती म्हणतात असे कळले.

    सार्वकालीकतेला तुम्ही “काल सुसंगत” असे म्हणतात, पण माझ्या समजूतीनुसार सार्वकालिकता ही कालानुरूप बदलत नसते किंबहुना त्यालाच सर्वकालिकता म्हणतात. जसे की आईचे मुलावरचे प्रेम, वडिलांचे मुलाबद्दल वाटणारे वात्सल्य, गुरुजनांबद्दल वाटणारी कृतज्ञता. थोडक्यात काही सर्वकालिक किंवा शाश्वत मानवी मूल्य असतात आणि अशा मूल्यांचा निर्वाह होणे यालाच न्याय म्हणतात. असल्या न्याय या परिभाषेचे संरक्षण ज्या व्यवस्थेमध्ये होते त्याला नीती म्हणतात. या विषयावर माझे मध्यस्थ दर्शन सहअस्तित्व वाद:( ए नागराज) या अनुसंधानावर अध्ययन सुरू आहे आणि जे मला समजले ते माझ्या शब्दात मी वर मांडलेले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.