‘धर्मापेक्षा मोठे कोणी नाही, मग कोणाच्या जिवाला धोका असला किंवा एखाद्याचा जीव गेला तरी चालेल’ अश्या वृत्तीवर प्रहार करणारा ‘भोंगा’ चित्रपट नुकताच पाहण्यात आला. Hypoxic Ischemic Encephalopathy या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याची प्रकृती दिवसभरातून पाच वेळा होणाऱ्या मशिदीतील अजानच्या आवाजाने अधिक खालावते. त्या भोंग्याच्या आवाजाचा परिणाम मुलाच्या मेंदूवर आणि मनावर होत असून, “तुम्ही एकतर घर बदला किंवा त्या भोंग्याचा आवाजतरी कमी करा”, असा सल्ला डॉक्टर देतात. सोबत उपचार सुरूच असतात. घर बदलणे शक्य नसल्याने कुटुंबीय, गावातील सुजाण नागरिक भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी संबंधितांकडे विनवणी करतात. भोंग्याचे तोंड निदान दुसऱ्या बाजूकडे वळवा, असा आग्रह धरतात. परंतु धर्माचा बुरखा पांघरलेल्या मौलवींना जाग येत नाही आणि शेवटी आजार बळावल्याने बाळाचा मृत्यू होतो. सरतेशेवटी मौलवींना आपली चूक लक्षात येते, परंतु तोपर्यंत सारेच संपलेले असते.
धर्मांध प्रवृत्तीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या या चित्रपटाचे कथानक सांगण्याचा उद्देश हाच की, आज आपला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश धर्मांध प्रवृतीच्या कचाट्यात सापडला आहे. हो, कचाट्यात सापडला आहे, असेच म्हणावे लागेल. कारण छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून धर्माचे राजकारण केले जाते आहे. देशातील इतर सारे प्रश्न, इतर साऱ्या समस्या सुटल्यासारखे सारेच फक्त धर्माच्या मागे लागले आहेत. यासाठी सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक म्हणा दोघेही सारखेच दोषी आहेत.
इतिहास जसा घडला यापेक्षा तो मांडला कसा जातो, यावर त्याचे भवितव्य आणि पुढील पार्श्वभूमी अवलंबून असते. इतिहास मांडत असलेली व्यक्ती कोणत्या विचारसरणीची आहे, यावर त्याची व्याप्ती अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून ‘ज्ञानवापी’ मशिदीचा मुद्दा अधिक चर्चिला जात आहे. या मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत “मशिदीत मुस्लिम कोणत्याही अडथळ्याविना नमाज अदा करू शकतील”, असे स्पष्ट केले आहे.
मुळात कोणत्या मशिदीत शिवलिंग आहे/होते किंवा कोणत्या मंदिरात कबरी आहेत/होत्या, हे जाणून घ्यायचा अट्टाहास नेमका कशासाठी आहे? इतिहासात ज्या घटना घडल्या असतील, त्या तत्कालीन परिस्थितीला धरून किंवा त्यावेळी जे योग्य वाटले असेल त्यानुसार घडल्या असतील, ही बाब सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी आपासात जातीय तेढ निर्माण करून देशांतर्गत दंगली घडविण्याचा विघातक प्रवृत्तींचा कट उधळून लावणे गरजेचे आहे.
एखाद्या गोष्टीत चुकाच शोधायचे म्हटले तर हजारो सापडतील. ज्ञानवापीच कशाला, गेल्या काही वर्षांपासून ताजमहालाबाबत काही हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये मतभेद आहेत. सतराव्या शतकात मुघलसम्राट शाहजहान याने पत्नीवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून ही कबर बांधली, असे मुस्लिम मानतात. तर काही हिंदूंचा दावा आहे की ताजमहाल हा मुळात तेजोमहाल होता. कुतुबमिनारबाबतही तेच. १२व्या शतकात इल्तुत्मिशने बांधलेला बुरुज म्हणून तो ओळखला जात असला तरी, काही हिंदू मानतात की, ते एकेकाळी हिंदू धर्माचे प्रसिद्ध विष्णुमंदिर होते. हिंदू खगोलशास्त्रज्ञ वापरत असलेली प्रयोगशाळा या मिनारावर असल्याचा दावाही कधी करण्यात आला होता.
गिरनार मंदिर हे गुजरातमधील जुनागढ येथील जैन धर्माचे लोकप्रिय मंदिर आहे. डोंगरावर वसलेले हे मंदिर जैन धर्माचे प्रतीक आहे. तीर्थंकर नेमिनाथांना तेथेच मोक्ष प्राप्त झाला, असे त्या धर्माचे लोक मानतात. परंतु हिंदू धर्मातील काही लोकांचा असा विश्वास आहे की, हे ठिकाण प्राचीन हिंदू श्रद्धेचे प्रतीक आहे. भगवान दत्तात्रेयांचे मंदिर असल्याचे पुरावेदेखील दिले जातात.
अशी असंख्य उदाहरणे देता येतील. ज्याबाबत अनेक मत-मतांतरे आहेत. यावरून हेच सिद्ध होते की, चुकाच शोधायच्या असतील तर हजारो सापडतील. परंतु यातून साध्य काहीच होणार नाही.
ज्ञानवापीचा मुद्दा जरासा मागे सरत नाही तोच भाजपच्या महिला प्रवक्त्यांच्या तथाकथित वक्तव्याने रान माजवले आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधाचे पडसाद देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर उमटले आहेत. या प्रकरणी विविध शहरांत आंदोलनाच्या माध्यमातून राग व्यक्त केला जात आहे. मुस्लिमबहुल भागांत मोठ्या संख्येने मार्चे काढले जात आहेत.
राज्यात औरंगाबाद, जालना, सोलापूर या शहरांत पसरलेले हे लोण इतरही शहरांमध्ये पसरण्यास वेळ लागणार नाही. अश्यावेळी कुठेतरी विवेकाचा आवाज दाबण्यासाठी तर हे होत नाही ना, असा प्रश्न पडतो.
आज सर्वसामान्य नागरिक प्रचंड विवंचनेत आहे. ‘न भूतो न भविष्यति’ अश्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कुटुंबीयांचे उदरभरण, मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य या साऱ्या गरजा पुरवताना सामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ‘गेला गेला’ असे वाटत असताना ऐन शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या काळात कोरोनाने डोके वर काढले. पावसाळ्यात चौथी लाट येण्याची शक्यता नाकारण्यासारखी नव्हती. या साऱ्यांत भरडला जातो तो फक्त आणि फक्त सामान्य माणूस. कोरोना म्हटले की त्याच्या पोटात धडकी भरते. कारण याचा सर्वाधिक फटका त्यांच्याच व्यवसायाला बसलेला आहे. आणि आजूबाजूला एवढे सारे असताना राज्यकर्त्यांचे काहीतरी वेगळेच सुरू आहे. या साऱ्या प्रकारातून संयमशील, विवेकपूर्ण आवाज दाबला जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. अन्यथा जनताजनार्दन कुणालाच माफ करणार नाही. सर्वसामान्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिल्यास मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे नक्की.
संपर्क: ७७२२०४९८००
पहिल्यांदा बाबरी मस्जिद मध्ये मूर्ती नेऊन ठेवायच्या, नंतर तिथे जन्मभूमी असल्याचा दावा करायचा. मस्जिद उध्वस्त केल्यानंतर, मस्जिद न म्हणता विवादित वास्तू म्हणायचे. अश्या प्रकारे इतिहास विकृत करायचा. पण हा क्रम सुधारक ने करावा? ताजमहाल की तेजोमहाल? कुतुबमिनार की विष्णुमंदिर? असली अनैतिहासिक ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेली कल्पना पुढे नेण्याची आजच्या सुधारक का वाटली असावी? वेदनादायक