दोन जूनच्या द इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाताना अपघातात मृत्यू पावलेल्या १८ वर्षीय विश्व दीनदयालम या होतकरू क्रीडापटूंच्या वडिलांची कैफियत मांडण्यात आली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, भारतीय क्रीडा प्राधिकरण या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेने विश्वच्या आयुर्विमासंदर्भात त्यांच्या त्याआधी तीन आठवड्यांपुर्वी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही.
हे वाचून मला २००९ मधील माझ्या एका पत्रव्यवहाराची आठवण झाली. तेव्हा मी द इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार म्हणून कृषीविषयक एका वृतांकनासाठी अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेत ज्या दिवसांमध्ये माझे वास्तव्य राहणार होते त्या दिवसांमध्ये अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा होऊ घातली होती. माझ्या तेथील कार्यक्रमाच्या शेवटी काही दिवस मोकळे राहणार होते. त्या दिवसांमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार होता. त्या अनुषंगाने मी एक आगळीक केली. मी अमेरिकन लॉन टेनिस संघटनेच्या संकेतस्थळावरील ई मेल पत्त्यावर एक पत्र पाठवले. त्यात मी आयोजकांना विनंती केली की, मी अंतिम सामन्याच्या दिवशी अमेरिकेत राहणार असून संधी मिळाल्यास त्या सामन्याचे वृत्तसंकलन माझ्या वृत्तपत्रासाठी करायला आवडेल. मी क्रीडा वार्ताहर कधीच नव्हतो पण टेनिस अतिशय आवडता खेळ असल्याने काही जमले तर उत्तम अशा अपेक्षेने मी हा आगाऊपणा केला होता. असे पत्र पाठवताना मला तिकडून कोणतेही उत्तर प्राप्त होईल याची बिलकुलच अपेक्षा नव्हती. उलट येणार नाहीच अशीच खात्री वाटत होती. परंतु, तिसऱ्या दिवशीच मला त्यांचे उत्तर आले. त्यात सर्वप्रथम त्यांनी माझे आभार मानले व अत्यंत नम्रपणे नमूद केले की, पत्रकारांसाठीच्या सर्व जागा पूर्णपणे राखीव झाल्या असून मला तेथे जागा उपलब्ध करून देणे शक्य नाही याबद्दल त्यांना खेद वाटतो. तरीदेखील शेवटच्या क्षणी जर एखादी जागा उपलब्ध झालीच तर आम्ही तुम्हाला कळवू असेही त्यात म्हटले होते.
अमेरिकन टेनिस संस्थेच्या त्या मेलने मी आश्चर्यचकित झालो. मी खरोखरीच पत्रकार आहे का याबाबत कुठलीही चौकशी न करता माझ्यासारख्या आगंतुक माणसाला ते प्रतिसाद देतील याची मला मुळीच अपेक्षा नव्हती. असल्या अत्यंत उच्च दर्जाच्या क्रीडास्पर्धेसाठी खूप आधीपासूनच पत्रकाराची निवडप्रक्रिया पूर्ण केली जाते हे पूर्णपणे ठावूक असूनही मी एक टुक्का मारून बघितला होता. संस्थान शासकीय असो अथवा खासगी, साधारणतः कुठल्याही विनंतीची क्वचितच लगेच दखल न घेण्याच्या आपल्याकडील पद्धतीची सवय असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना या माझ्या अनुभवाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. एकीकडे जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या विषयांनाही तातडीनं न हाताळणारी आपल्याकडील संस्कृती आणि दुसरीकडे कोण्या एका परक्या देशातील व्यक्तीच्या आगंतुक विनंतीला देखील सन्मानपूर्वक वागवणारी संस्कृती. आपण खरेच सुसंस्कृत आहोत का असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
माझ्या त्यानंतरच्या दुसऱ्याच वर्षीच्या अमेरिका दौऱ्यात मला असे इतर अनेक अनुभव आले. तेथील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता ही तर सर्वांना ठावूक असलेली बाब आहे. त्याबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. पण ती तेथील लोक जबाबदारीने राखतात हे विशेष. यावर बरेच अभिमानी, किंबहुना दुराभिमानी, भारतीय दोन कारणं पुढे करतात. एक, तिथे कायदेच इतके कडक आहेत की, लोक ते मोडायला धजावत नाहीत आणि दोन, आपली लोकसंख्याच इतकी आहे की आपल्यासाठी ते शक्य होत नाही. दोन्हीही अर्धसत्य आपण पूर्णसत्यासारखे ठासून ठोकून देतो.
आपल्याकडे भ्रष्टाचाराविरुद्धचे कायदे कडक नाहीत? मग का आपण जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांमध्ये गणल्या जातो? आणि भ्रष्टाचाराचा लोकसंख्येशी काय संबंध? आपल्याकडील भ्रष्ट लोकांमध्ये शिक्षित आणि उच्चपदस्थही मोठ्या संख्येने असतात. इथे कुठे मध्ये येते लोकसंख्या?
स्वच्छतेचे तेच. एटीएम मध्ये गेल्यावर आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिलेले दृश्य म्हणजे जमिनीवर पडलेल्या पावत्या. त्या मशिनमधून काढल्यावर बाजूच्या केराच्या बादलीत टाकण्याचे कष्टही आपण घेत नाही. इथे कुठे येतो लोकसंख्येचा प्रश्न? तसेच कारमधून जाताना खिडकीतून कचरा बाहेर फेकणे याचा लोकसंख्येशी काय संबंध? याचा संबंध संस्कृतीशी आहे. ती आहे का खरंच आपल्याकडे?
नमूद करण्यासारखा दुसरा अनुभव: दुसऱ्या वर्षीचा दौरा आटोपून परतताना विमानतळावर मी एक मोठी बॅग केबिन बॅगेज म्हणुन न पाठवता लगेज मध्ये पाठवली. नंतर मी बघितले की, तेवढ्याच आकाराची एक बॅग एक व्यक्ती केबिनमध्ये घेऊन जात होता. मीही तसेच केले असते तर मला साधारण एक हजार रुपये वाचवता आले असते. पण मला वाटले होते की, माझी बॅग केबिनमध्ये नेण्याच्या मनाने मोठी होती आणि ती मला त्यांनी केबिनमध्ये नेऊ दिली नसती. मी अतिशय संकोचाने त्या काउंटरवरील महिला कर्मचाऱ्याला विचारले की, लगेजमध्ये पाठवलेली बॅग परत बोलवून मला केबिनमध्ये नेता येईल काय? त्यावर त्या महिलेने अत्यंत अदबीने मला “येस, शुअर. प्लीज वेट फॉर 5 मिनिट्स” असे सांगितले. याही वेळी मला असे शक्य होईल याची बिलकुल अपेक्षा नव्हती. पण मला पुन्हा सुखद आश्चर्यच एक धक्का मिळाला. त्यानंतर मी थोडा दूर उभा राहिलो. बरोबर पाचच मिनिटांनी त्या बाईंनी मला बोलावले आणि माझे काम करून काही पैसे मला परत केले आणि वरून “थँक्यू” ही म्हटले. सुसंस्कृतपणा काय असतो हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. असे आपल्याकडे सरसकट होवू शकते काय?
दुसऱ्या वर्षीच्या अमेरिकन सरकारतर्फे आयोजित दौऱ्यात आम्हाला एका संध्याकाळी वॉशिंग्टनमध्ये जपानी वाद्यवृंदाच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमासाठी निमंत्रिका देण्यात आल्या होत्या. तेथे मी आणि पाकिस्तानच्या द डॉन या दैनिकाचा एक पत्रकार थोडे उशीरा पोचलो. सभागृहाच्या मागील दारापाशी पोचलो तेव्हा आतून वादनाचा आवाज येत होता. आमच्या सोबतच एक वृद्ध अमेरिकन जोडपेही उशीरा आले होते. दरवाज्याच्या थोड्या अंतरावर एक तरुण आणि एक तरूणी बसले होते. ते वृद्ध जोडपे बाहेरच थबकले. आम्ही दोघे दरवाजा उघडून आत शिरणार एवढ्यात बाजूला बसलेला तरुण लगबगीने आमच्याकडे आला आणि अतिशय अदबीने म्हणाला, “जेंटलमेन, प्लीज वेट टील द आर्टिस्ट्स कंप्लीट द फर्स्ट पिस. यू मे एंटर द ऑडीटोरीयम आफ्टर दॅट.” आम्ही थोडे वरमलो आणि थांबलो. तेव्हाच आम्हाला कळले की, ते वृद्ध जोडपे का थांबले होते. त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केले.
आपल्याकडे एकतर कार्यक्रम क्वचितच वेळेवर सुरु होतो. आणि त्याउपर अनेक प्रेक्षक उशीरा येतात. त्यात समोरच्या रांगेत राखीव जागा असलेले व्हीआयपी तर विचारूच नका. ते उशीरा तर येतातच पण लवकर निघूनही जातात. आणि दोन्ही वेळ अनेकदा कार्यक्रम थांबवून त्याचे स्वागत आणि कार्यक्रम सुरु असताना मध्येच त्यांना निरोप देणे अशी सरबराई चालू असते. त्यामुळे कलाकारांना जो व्यत्यय होतो त्याबद्दल आपण अत्यंत निर्लज्ज असतो.
२०१४ सली जर्मन एकिकरणाच्या रौप्य महोत्सवाच्या वृत्तांकनासाठी गेलो असता बर्लिनमधील एका रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी लागलेला लाल सिग्नल माझ्या दृष्टीदोषामुळे न दिसल्याने मी झेब्रा क्रॉसिंगवर उतरलो. एका बाजूने हिरवा सिग्नल मिळालेली एक कार येऊन माझ्याजवळ थबकली. चालक एक महिला होती. माझा जाण्याचा सिग्नल नसूनही तिने मला “जाऊ शकता” असा इशारा केला. माझ्या सहकाऱ्यांनी मला मागे खेचले व आपला सिग्नल अजून झालेला नाही असे माझ्या ध्यानात आणून दिले. मला थोडे वरमायला झाले. त्या महिलेने स्मित करून आपली गाडी पुढे नेली.
आणखी एक बोलका अनुभवी असा की मी आणि माझा पाकिस्तानी पत्रकार मित्र वॉशिंग्टनमध्ये एक भारतीय रेस्तरॉ शोधीत होतो. आम्हाला ते सापडत नव्हते. तेवढ्यात आम्हाला समोरून एका अमेरीकन महिलेसोबत येणारा एक भारतीय माणूस दिसला. आम्हीं त्याला त्या रेस्तरॉचा पत्ता विचारला तेव्हा त्या महिलेने आम्हाला म्हटले, “कम, आय विल शो यू”. ते रेस्तरॉ ते जात असलेल्या विरुध्द बाजुला अणि बऱ्याच अंतरावर होते. तरीही तिने आम्हाला तिथपर्यंत नेऊन पोचवले. या दरम्यान तिचा भारतीय मित्र मात्र सतत कुरकुर करीत होता. त्याला तिचे हे करणे बिलकूल आवडलेले नव्हते.
अमेरिकेतील आणखीन एक अनुभव आवर्जून सांगावा असा आहे. तेथे एकदा बाल्टीमोर शहरातील एका मोठ्या मत्स्यालयात गेलो असता एक सफाई कर्मचारी त्याची ढकलगडी घेऊन जात होता. त्याच्या पाठोपाठ एक उच्चभ्रू वाटणारी महिला झपझप पावले टाकीत येत होती. त्या सफाई कर्माचाजवळ येताच ती त्याच्या गळ्यात हात घालून गप्पा मारत त्याच्यासोबत चालू लागली. मी माझ्यासोबत आलेल्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या माझ्या पुतणीच्या नवऱ्याला कुतूहलाने विचारले तेव्हा त्याने सांगितले की, त्या बाई त्या मत्स्यालयाच्या संचालिका आहेत. ते ऐकून मी निशब्द झालो. “श्रमप्रतिष्ठा” म्हणजे काय याचे मी प्रत्यक्ष दर्शन त्यादिवशी घेतले. आपल्या देशात आपल्याला असे अद्भुत अनुभव कधी येऊ शकतील?
कुठल्याही संस्थानामध्ये शिरताना आतून बाहेर येणारी व्यक्ती जर दाराजवळ तुमच्या आधी पोचली तर ती तुम्ही आत शिरेपर्यंत दार धरून ठेवते आणि बहुतेक वेळा तुमच्याकडे बघून स्मितही करते.
सर्व वाहने शाळा जवळ येताच अत्यंत धीम्या गतीने पुढे जातात जेणे करून चुकून मुले समोर आलीच तर त्यांना दुखापत होवू नये.
कुत्रे फिरायला नेताना हातात एक पिशवी घेऊन जाणे आणि त्याने सार्वजनिक ठिकाणी शौच केल्यास ती हातातील पिशवीत उचलून आपल्या घरी त्याची विल्हेवाट लावणे आणि सार्वजनिक शुचितेची काळजी घेणे, वेळ पाळणे, वगैरे, अशी इतर अनेक उदाहरणे देता येतील ज्यातून पाश्चिमात्य देशांमधील प्रगल्भ समाजवर्तनाचे दर्शन होते. आणि तेवढ्याच खात्रीने असे अनुभव आपल्याकडे नगण्य प्रमाणात येतील हेही सांगता येते.
पाश्चिमात्य देशांमध्ये घरांना कंपाऊंडची भिंत अभावानेच दिसते. तुम्ही राष्ट्राध्यक्षांच्या घराच्या कंपाऊंडजवळ उभे राहून गप्पा मारू शकता व फोटोही काढू शकता आणि कॅपिटल हील या अमेरीकन संसदेच्या इमारतीत अतिशय सहज जाऊ शकता.
टपालाने आलेली वस्तू घरी कोणी नसल्यास बाहेर ठेवून दिली जाते आणि तिला इतर कोणीही हात लावत नाही. घर सोडताना विकाऊ जुन्या वस्तू घराबाहेर ठेऊन निर्धास्त जाता येतं. त्या घेउन जाणारे लोक तुमच्या दिलेल्या पद्धतीने त्याची किंमत तुमच्यापर्यंत पोचवतात. तुम्ही मॉल्समधून टीव्हीसारखी एखादी वस्तू विकत घेतली आणि ती काही दिवस वापरून न आवडल्यास पूर्ण किंमत घेऊन परत करू शकता.
अजून कितीतरी गोष्टी सांगता येतील पण प्रगल्भ संस्कृती कशी असावी हे अधोरेखित करण्यासाठी एव्हढी उदाहरणें पुरी व्हावी.
मुळात संस्कृती म्हणजे काय याबद्दल स्पष्टता असली पाहिजे. परंपरा म्हणजे संस्कृती असा एक समज आपल्याकडे सर्वसाधारणपणे आढळून येतो. म्हणजे, सणासुदीला देवाची सांगोपांग पूजा करणे, वरिष्ठांना नमस्कार करणे, पूर्वजांचे स्मरण करणे, वगैरे गोष्टींना आपल्याकडे संस्कृती मानले जाते.
संस्कृती म्हणजे समाज म्हणून आपण एकत्रितपणे आणि त्याचे वेगवेगळे घटक म्हणून परस्परांशी कसे वागतो याची गोळाबेरीज असते. त्यात निश्चितपणे जमेच्या आणि कमतरतेच्या बाजू सगळीकडेच असतात. परंतु, उणीवा वजा जाता काय शिल्लक राहते यावर कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ठरत असते.
भ्रष्टाचार हा मानवी दोष आहे. तो सर्वत्र आढळतो, अगदी पाश्चिमात्य आणि प्रगत देशांमध्येही. पण तेथील भ्रष्टाचार सर्वसामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनात छळत नाही. कोणतेही काम करण्यासाठी तिथे लाच द्यावी लागत नाही किंवा कोणाचीही जीहुजुरी करावी लागत नाही.
एकूणच संस्कृती म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा समाजातील व समाजाशी सभ्य व्यवहार तसेच समाजाचाही सर्व सभासद व्यक्तींशी सभ्य व्यवहार. मग एखादी व्यक्ती वैयक्तिक जीवनात काय करते याच्याशी इतर कोणालाही काही घेणे-देणे नसावे. कुणाच्याही वैयक्तिक जीवनात लुडबुड करणे हे असभ्यापणाचे लक्षण मानले गेले पाहिजे.
व्यक्तीवाद (individualism) ही यादृष्टीने बघण्याची संकल्पना आहे. असा व्यक्तिवाद कुठल्याही प्रकारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा नसतो. पाश्चिमात्य समाजांनी हे तत्त्व चांगल्या प्रकारे आत्मसात केलेले दिसते.
याउलट सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे वागणे हा घातक आणि कुसंस्कृत व्यक्तिवाद आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण प्रगत देशांमधील तथाकथित व्यक्तिवादाबद्दल टीकात्मकरीत्या बोलण्यापूर्वी आपल्या आत्मकेंद्री सामाजिक व्यवहाराकडे प्रामाणिकपणे बघण्याची आणि त्यात मूलगामी बदल करण्याची गरज आहे
सभ्य संस्कृतीचे समाज व व्यक्ती यांच्याव्यतिरिक्त आणखी एक परिमाण आहे. ते म्हणजे कुटुंब. आपण भारतीय असे मानतो की, कुटुंबव्यवस्था आज कुठे शिल्लक असेल तर ती भारतात आहे. अशा समजुतीला आधार काय? लहानानी मोठ्यांचा (मग मोठ्यांचे कितीही चुकत असो)आदर राखणे व त्यांनी सांगितले ते शिरसावंद्य मानणे किंवा चार जणांनी एकत्र राहणे म्हणजे कुटुंब? पत्नीने पतीशी कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेणे (मुलांच्या भविष्यासाठी, वगैरे) यात वैवाहिक जीवनाचे सार्थक मानले की झाले? त्यापेक्षा एकमेकांपासून घटस्फोट घेउन एकमेकांना एकमेकांवर न थोपवता वेगळे राहणे हे जास्त सुसंस्कृतपणाचे नाही?
शिवाय, आपल्यापैकी किती कुटुंबांमध्ये खऱ्या अर्थाने सौहार्द नांदते? वडिलोपार्जित संपत्तीबाबत किती कुटुंबांमध्ये कलह नसतात? आपण जर जगातील सर्वोत्तम कुटुंबव्यवस्था आहोत, तर संपत्तीसाठी नातेसंबंधाना आपण का सुरुंग लावतो?
आपल्याकडील कौटुंबिक मूल्ये अजूनही कायम आहेत वगैरे गोष्टी कृत्रिम समाधानासाठी उत्तम. पण ज्याला आपण मूल्ये मानतो ती कितपत ग्राह्य आहेत? याबाबत काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मांडलेला विचार बोलका आहे. त्यांच्यानुसार लग्न हा नवरा-बायकोमधील एक करार असून त्यानुसार बायकोने त्याचे घर चालवणे, त्याला “सुख देणे” आणि त्याबदल्यात त्यानी तिचे संरक्षण आणि पालन-पोषण असे ठरते. ही जर आपली कौतुंबिक मूल्यांची कल्पना असेल तर उत्तमच म्हणायचे. आणि संघाला मानणारा वर्ग हा बहुसंख्येने तथाकथित उच्चजातीचा आणि उच्चविद्याविभूषित वगैरे असतो. असे असले तरीही संघाशी जुळलेल्या अनेक कुटुंबांमध्ये त्याबाबत अतिशय प्रगत आचारविचार बघायला मिळतात हेही तेवढेच खरे. परंतु, ते जाहीरपणे उपर्निर्दिष्ट विचारांशी असहमती दर्शवीत नाहीत.
प्रगत देशांमध्ये कुटुंबव्यवस्था कोलमडली आहे वगैरे गप्पा आपण नेहमीच करीत व ऐकत असतो. वीस वर्षांपूर्वी मुळच्या अमेरिकन पण अनेक दशकांपासून महाराष्ट्रात स्थायिक होवून शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या मॅक्सीन बर्नश्टाईन या सेवाव्रतीची मुलाखत घेण्याचा योग आला होता. पाश्चात्य कुटुंबव्यवस्थेबद्दलच्या भारतात प्रचलित समजाबद्दल विचारलें असता त्या म्हणाल्या होत्या की, हा समज पूर्णपणे चुकीचा असुन तेथेही भारताप्रमाणे चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची कुटुंबं आढळतात. त्यांनी अतिशय तरुण वयात भारतात काम करण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या निर्णयाचा सन्मान करीत संमती दिली. त्यानंतर त्यांच्या वृद्धापकाळी त्यांची पूर्ण काळजी मक्सिनची धाकटी बहीण व तिच्या नवऱ्याने घेतल्याचे बाई म्हणाल्या होत्या. उच्च कुटुंबमुल्यांअभावी यातील काहीच शक्य झाले नसते हे वेगळे सांगण्याची गरच नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की,
आपण जगाचा अध्यात्मिक उद्धार करण्यासाठी ईश्वरनियुक्त लोक आहोत असा अहं अनाठायी आत्मप्रौढीतून येतो. पाश्चात्य जगाने वैज्ञानिक प्रगती केली पण त्यातून मानवजातीला केवळ भौतिक सुख मिळाले आणि त्यांचे मानसिक सुख हिरावून घेतले असा विचार अत्यंत आत्मविश्वासाने आपण मांडत असतो. हे काहीसे खरे असेलही परंतु ते एखाद्या गणिती सिद्धांतासारखे आपण मांडत असतो. असे असते तर ते देश साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान या सर्वच क्षेत्रात सतत मुसंडी मारताना दिसतात ते गमावत्या मानसिक स्वास्थ्यचे निदर्शक मानायचे काय?
आपला सांस्कृतिक गंड किती पोकळ आहे याचा साधा पुरावा म्हणजे पाश्चात्य जगात स्थायिक झालेले कोट्यवधी भारतीय. ते सर्व तिथे आत्मिक सुख घालवून बसायला गेले आहेत असे आपण मानायचे काय?
मुळात वैज्ञानिक प्रगती आणि संस्कृती यातील संबंध वस्तुनिष्ठपणे लक्षात घेतला तर असे दिसते की, वैज्ञानिक प्रगतीने अनेक बाबतीत मानवी संस्कृती समृद्धही केली आहे. जशीजशी विज्ञानाची प्रगती झाली तसतसा वैज्ञानिक दृष्टिकोनही वाढला अणी त्यातून अनेक अनिष्ट व चुकीच्या धार्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक आचारविचार आणि प्रथा आपण मागे टाकल्या. समानता, माणुसकी आणि मानवी हक्क याबाबत मानवी संस्कृतीच्या आपल्या आजच्या प्रगल्भ जाणीवा या वैज्ञानिक प्रगतीतूनच आलेल्या आहेत हेही तितकेच खरे आहे. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था आणि अल्पसंख्यांकांना बरोबरीची वागणूक ही अत्युच्च सांस्कृतिक मुल्येही वैज्ञानिक प्रगतीसोबत आणि त्यामुळे झालेल्या वैचारिक अभिसरणातूनच पुढें आलेली आहेत. गेल्या काही वर्षात या मूल्यांची आपल्या देशात झालेली चिंताजनक पायमल्ली आपल्या उन्नत नव्हे अवनत सांस्कृतिक पातळीची निदर्शक आहे.
मानवी संस्कृतीला अधिक व्यापक अणि विकसनशील बनवण्यात विज्ञानाचा मोठा वाटा आहे हे मान्य केले पाहिजे. अणि हे विज्ञान प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित आणि वृद्धिंगत झाले हे देखील आम्हाला अमान्य करता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनातून येणारा विवेकवाद अगदी सहजपणे आपल्याला आपल्या संस्कृतीतील उणीवा दाखवतो आणि त्या मान्य करून त्यात सुधारणा करण्यास प्रोत्साहित करतो. जर्मनीतील होलोकॉस्ट संग्रहालय अणि अमेरिकेतील गुलामगिरीच्या अमानवीय प्रथेची आठवण करून देणारे वॉशिंग्टनपासून जवळच असलेले संग्रहालय हे अशा विवेकवादाचे द्योतक आहेत. असे एखादे संग्रहालय भारतातील जातीप्रथेच्या बाबत निर्माण करण्याचे धाडस आहे का आपल्यात? ते तर दूरच, पण सध्याचे केंद्र सरकार शालेय अभ्यासक्रमातून त्याबद्दलचे उल्लेखही गाळण्याचा उद्योग करीत आहे. शिवाय,आपण प्रगत जगाने त्यागलेल्या फॅसिझमसारख्या अत्यंत खतरनाक विस्तवाशीही खेळतो आहे.
मग काय आपल्या संस्कृतीमध्ये काहीच श्रेष्ठ नाही? निश्चित आहे. आणि ते म्हणजे इतर सांस्कृतिक प्रवाहांना आपल्या कवेत घेउन पुढें जाण्याची आपली सहज प्रवृत्ती. हे खरे तर आपल्या संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ बलस्थान आहे. कितीतरी परकीय संस्कृतींना अपण आपली स्वतःची सांस्कृतिक ओळख न गमावता आपल्यात सामावून घेतले. अणि केवळ सामावूनच नाहीं घेतले तर त्या सर्व संस्कृतीसोबतच्या मिलाफातून एक सर्वसमावेशक अशी सामायिक भारतीय संस्कृतीही आपण निर्माण केली. हे सगळे आपल्याकडे त्या काळात घडत होते जेव्हा आजचे प्रगत समाज एकमेकांशी सामाजिक, राजकीय व धार्मिक रस्सीखेच करीत होते.
पण आजचे चित्र काय आहे? आज पाश्चात्य जग सर्वसमावेशकतेकडे जाते आहे आणि आपल्या त्या श्रेष्ठ संस्कृतीक परंपरेला आपण स्वतःच तिलांजली द्यायला निघालो आहोत. आज भारतीय वंशाचे लोक इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये वरिष्ठ पदांवर, अगदी मंत्रीपदावर विराजमान झालेले दिसतात आणि आपण मात्र एकपदरी हिंदुत्वाच्या दिशेने जात आहोत. आणि असे करीत असताना मात्र सतत “वसुधैव कुटुंबकम”, “एकं सत विप्रा बहुधा वदन्ती” आणि “सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः” याचा जप करीत आपली संस्कृती ही कशी जात्याच जास्त प्रगल्भ असून आपल्याकडे विज्ञान व तंत्रज्ञानातून निर्माण झालेले प्रश्न सोडविण्याची आध्यात्मिक गुरुकिल्ली आहे असे मोठया आविर्भावात आपण सांगत असतो.
या जातकुळीतील लोक मोठ्या संख्येने पाश्चिमात्य देशात स्थायिक झालेले असतात व तेथील समाजामध्ये मिसळून तेथील राष्ट्रीय मुख्यधारेचा भाग होण्याऐवजी तेथून भारताला हिंदूराष्ट्र बनवण्याच्या प्रकल्पामध्ये हिरीरीने भाग घेत असतात. शिवाय, आईवडिलांना गरज पडेल तेव्हा बोलावून घेवून एक सपोर्ट सिस्टीम म्हणून वापरून घेतात. काम झाले की आईवडील पुन्हा भारतात परत येऊन वृद्धापकाळात एकाकी जीवन जगतात. त्यामुळे कौटुंबिक मूल्ये वगैरे कशी भारतातच शिल्लक आहेत असा दावा करणे म्हणजे केवळ एक दांभिकपणा आहे. शेकडो भारतीय तरुण पाश्चात्य आणि इतर प्रगत देशांमध्ये तेथील गुणात्मकदृष्ट्या अनेक पटींनी सरस असलेल्या ऐहिक जीवनाच्या आकर्षणापोटी जातात. तेथील ऐहिक जीवनानील “फोलपणा” लक्षात आल्यावर खरे आत्मिक सुख आपल्या देशातच आहे अशी उपरती होवून परत आलेला एकही भारतीय मी तरी पाहिलेला नाही. त्यामुळे “सारा विश्व भारत की ओर बडी आशा के साथ देख रहा हैं”, वगैरे गोष्टी म्हणजे केवळ भंपकपणा आहे. हे ओघानेच आले की, भंपकपणा आणि संस्कृति या परस्परविरोधी गोष्टी आहेत. हे जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल तेवढ्या त्वरेने आपली सांस्कृतिक उन्नती होईल.
तळटीप: दरम्यान, दिवंगत टेबल टेनिसपटू विश्वच्या बाबतीत पुढे आलेली माहिती ही की, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्याचा विमाच उतरविला नव्हता. आपल्याकडं नव्याने पेरलेल्या खेलो इंडिया संस्कृतीबीजाला फुटलेला हा एक अंकुर….
पूर्वप्रकाशित: लोकसत्ता, २१ जून २०२२
आपण भारत आणि अमेरिका यांच्या नागरिकांच्या वर्तणुकीची, दोन देशातील ऑलिंपिक संस्थेच्या कार्यपद्धत यांची तुलना चांगली केली आहे.
अमेरिकेतील भारतीयांच्या सामाजिक कार्यक्रमात पुष्कळदा गडबड, कार्यक्रम चालू असताना स्टेज समोरून मुले धावत असताना कौतुकाने पाहणारे आईवडील दिसतात. हीच मंडळी अमेरिकन कार्यक्रमात मात्र शिस्तीने वागतात.
अगदी अलीकडेच आम्ही लाॅस एंजेलिस उपनगरात राहतो तेथे तुरळकपणे अँँमेझाॅॅनने दारात ठेवलेल्या वस्तु गायब होतात.
मोहन भागवतांनी लग्न हा एक करार म्हटले ते मुस्लिम निकाहाच्या करारासारखे आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये जन्मोजन्मीचे नाते असे मानले आहे.
बंदुकीची सर्रास लायन्सेस, दर पाच मिनिटाला होणारे बलत्कार, अजूनही स्त्रियांना समान वेतन नसणे, नव्याने सुप्रिम कोर्टने दिलेला गर्भपातविरोधी कायदयाची पुनर्स्थापना.
स्त्रियांचा दर्जा हा निकष संस्कृतीचे मापन करण्यासाठी एक चांगले परिमाण असू शकेल.