या लेखापुरते आपण इतिहास म्हणजे पूर्वकालीन घटना, व्यक्ती, विचार, व्यवस्थापन, आणि परंपरा यांचे आकलन; आणि शिक्षण म्हणजे जगण्याला उपयुक्त अश्या गोष्टींचे आकलन आणि आत्मसात्करण असे समजू. या व्याख्यांना अतिव्याप्तीचा दोष लागू शकतो, पण आपण त्यांना भारतातील आजच्या शालेय आणि विद्यापिठीय शिक्षणाच्या चौकटीत पाहू शकतो. थोडक्यात भारतीय उपखंड हा आपल्या ऐतिहासिक स्थलकालाचा संदर्भ आहे. आजचा न्यूनतम LEB ( Life Expectancy at Birth) हा पन्नास वर्षे आहे असे समजू. अर्थात पन्नास ही काही लक्ष्मणरेषा नव्हे. ती मागे पुढे होऊ शकते. खरंतर प्रत्येक गेला क्षण हा इतिहासजमा होतो. पांच किंवा दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटनांचा आढावासुद्धा आपल्याला घ्यावा लागतो. “पन्नास” वर्षांचा अर्थ इतकाच की आपल्या सर्वसाधारण स्मृतिपटलाच्या पलिकडचा इतिहास (भूतकाळ) हा या लेखाचा विषय आहे. भूतकाळाची आदिम मर्यादा कितीही मागे जाऊ शकते .
इतिहास का शिकायचा? एका अर्थाने इतिहास हा सामुहिक भूतकाळाचा वर्तमानात घेतलेला आढावा. इतिहास आपल्याला वर्तमान समजून घ्यायला उपयोगी पडतो. ही इतिहासाची समज आपल्याला – म्हणजे समाजाला – मागे झालेल्या चुका टाळण्यास आणि नवीन मार्ग शोधण्यास मदत करते.
इतिहासाची साधने कोणती? विज्ञानाला मान्य असणारी सर्व साधने इतिहासाला मान्य आहेत. जुने ग्रन्थ, पुस्तके, हस्तलिखिते, नाणी, शिलालेख, कलाकृती (पुरावशेष), बखरी वगैरेंचे दिनांकन वैज्ञानिक पद्धतीने होऊ शकते. पहा: https://www.ijsr.net/archive/v3i7/MDIwMTQxMTc4.pdf
यापलिकडे उत्खननात आणि इतर ठिकाणी मिळणाऱ्या प्राण्यांच्या अवशेषांचे DNA analysis करता येते. अखिल जगातील प्राणिमात्राच्या इतिहासाचा वैज्ञनिक पद्धतीने आढावा घेऊ पहाणाऱ्या ‘उत्क्रांती’वादात (Biological Evolution Theory) याचा उपयोग होतो. हा अखिल प्राणी-वनस्पतीमात्राचा इतिहास, ज्याला आपण जैविक उत्क्रांती म्हणतो, तो आजच्या शिक्षणात किती महत्त्वाचा आहे हे आपण पाहू.
इतिहासकाराचा दृष्टीकोन काय असावा याबाबत सर्वमान्यता नाही. येथे रॉल्सिअन राज्यशास्त्राच्या भूमिकेतून ‘अज्ञानाचा बुरखा’ (Veil of Ignorance) ही सैद्धांतिक संकल्पना वापरता येते. यात इतिहासकाराला (मूळ संकल्पनेतील विवेकनिष्ठ माणसाला) स्वतःची लिंग, जात, धर्म, देश, पदवी वगैरेंबाबतची ओळख विसरावी लागते. मात्र त्याला आपण इतिहासकार असल्याचे भान असावे लागेल. शिवाय इतिहासाच्या साधनांची, आधुनिक विज्ञानाची, आणि इतिहाससहित इतर समाजशास्त्रांची आवश्यक ती माहिती या इतिहासकाराला असणे अपेक्षित आहे. असा इतिहासकार मिळणे तसे कठीणच! उत्क्रांतीचा अभ्यासक मात्र हा ‘अज्ञानाचा बुरखा’ (वेदांताच्या परिभाषेत साक्षिभाव किंवा साक्षिज्ञान) सहज घेऊ शकतो. नव्हे तो त्याला घ्यावा लागतो. DNA कोडच्या वैश्विकतेमुळे एकवंशागती (common descent) हे उत्क्रांतीचे एक प्रमुख तत्त्व मानावे लागते. सर्व प्राणी आणि वनस्पती जगताचा पूर्वज एकच, किंवा एकाच प्रकारचा ठरतो. संयुगांच्या एकत्रीकरणाची अत्यल्प संभाव्यता जर लक्षात घेतली तर हा पूर्वज केवळ एकपेशीय जीवाणू असू शकतो. या एक किंवा अनेक जीवाणूंची उत्पत्ती ३.५ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे साधार अनुमान निघते. संयुगांच्या एकत्रीकरणाची आणि त्यापुढील उत्क्रांतीची वाटचाल ही केवळ असंख्य जनुकीय अपघातातून झाली आहे असे मानावे लागते. तसे मानले नाही तर DNA चे वैश्विक कोड हे कुठल्यातरी अज्ञात शक्तीने हेतुपूर्वक सजीवांच्या असंख्य जाती-प्रजातींमधे तयार केले आणि या जाती-प्रजाती पृथ्वीच्या उत्पत्तीपासून सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात होत्या असे काहीतरी मानावे लागते. याला कोणताच पुरावा मिळत नाही. याउलट यादृच्छिक (random) जनुकीय बदलातून नवीन प्रजाती उत्पन्न झाल्याचे आणि कित्येक प्रजाती नष्ट झाल्याचे असंख्य पुरावे पुरातत्त्व (archaelogy), जैव-विज्ञान (biology), जनुकशास्त्र (genetics, genomics), पेशीविज्ञान (cytology), प्रथिनशास्त्र (proteomics), तुलनात्मक शरीरशास्त्र (comparative anatomy), गर्भशास्त्र (embryology) आणि या सर्वांतून आढळणारी DNA, जनुके, पेशी, हाडे, रक्त, स्नायू यांतील अनुरुपता (homologies) यांमधून मिळतात. या पुराव्यांची आणि त्याचबरोबर इतर जैव-भौगोलिक पुराव्यांची छाननी करून उत्क्रांतीशास्त्र एक जैविकवृक्ष (tree of life) किंवा अधिक अचूकपणे म्हणायचे तर जीव-जाल (web of life) तयार करते. त्याच्या वेगवेगळ्या भागांचे आणि सांध्यांचे (nodes) ढोबळ मानाने दिनांकन करते आणि प्राणी-वनस्पति जीवनाच्या उत्क्रांतीचा एक इतिहासपट बनवायचा प्रयत्न करते. ह्या जैविक इतिहासाची व्याप्ती इतर कोणत्याही ऐतिहासिक व्याप्तीपेक्षा फार मोठी आहे. उत्क्रांतीतत्त्व (काही फेरफार करून) संस्कृतीला लावता येते. प्राण्यांच्या जैविक गुणधर्मांचा वाहक जसा जनुक (gene) असतो तसा सांस्कृतिक गुणधर्माचा वाहक मनुक (meme) असतो असे समजले जाते. जनुकशास्त्र (genetics) जसा जैविक उत्क्रांतीचा कणा आहे तसा मनुकशास्त्र (memetics) हा सांस्कृतिक संक्रमणाचा कणा आहे असे म्हणता येईल. उत्क्रांतीवाद केवळ जीवसृष्टीचा इतिहास नाही तर तो आपल्याला विज्ञानाकडे आणि एकंदरच जीवनाकडे पहाण्याचा समग्र विवेकवादी दृष्टीकोन देतो. साक्षिज्ञानामागची ती विचारप्रक्रिया आहे. ही प्रक्रिया समोर आलेल्या पुराव्यांची ० ते १०० या मापनात छाननी करते, त्यातील ग्राह्य-अग्राह्य भाग ठरवते आणि ग्राह्य भागाच्या संदर्भात उत्क्रांतीची आणि त्याच्या प्रारुपाची तपसणी करते. ही पुनरावर्ती (iterative) वैज्ञानिक प्रक्रिया आपल्याला सामाजिक इतिहासाला किंवा इतर समाजशास्त्रांना लावता येते.
वैज्ञानिक प्रक्रिया
जेव्हा आपण भारतीय उपखण्डातील (किंवा इतर कोणत्याही भूभागातील) मानवसमूहाच्या (सामजिक) इतिहासाला लावतो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात: (१) पुरावा सर्वस्वी ग्राह्य किंवा अग्राह्य क्वचितच असतो, (२) पुराव्याची तपासणी करून त्यातील तथ्यांश किंवा संदर्भाशी सुसंगत असा उपयोगी भाग ग्राह्य पुरावा म्हणून वेगळा काढावा लागतो, (३) हा वेगळा काढलेला पुरावा नवीन उपलब्ध झालेल्या पुराव्याशी ताडून पहावा लागतो आणि त्या अर्थाने ही प्रक्रिया पुनरावर्ती आहे, (४) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुराव्याचा अन्वयार्थ तत्कालिन समाजव्यवस्था, परिस्थिती आणि परंपरा यांच्या संदर्भात लावावा लागतो. केवळ आधुनिक काळाच्या संदर्भात किंवा संविधानाच्या चौकटीत त्याचा अन्वयार्थ लावणे किंवा मूल्यांकन करणे पर्याप्त नाही.
याचे एक उदाहरण म्हणजे उत्तर आणि पश्चिम भारतात उत्क्रांत झालेली दुग्धसेवी संस्कृती. खरंतर इतर प्राण्यांसारखाच मानवप्राणीदेखील आईच्या दुधाखेरीज इतर दुधांना असोशी (intolerant) आहे. मानवी बाळांच्या शरीरात निर्माण होणारे एक एन्झाईम (enzyme) दुग्ध-शर्करेचे विघटन करून ती पचायला सोपी बनवते. पण काही वर्षांनंतर हे एन्झाईम बनायचे थांबते आणि बाळाला आईच्या दुधाखेरीज इतर आहाराकडे वळवता येते. ही उत्क्रांती शास्त्राच्या नैसर्गिक निवडीनुसार होते. मात्र काही ठिकाणी जनुकांच्या उत्परिवर्तनामुळे (mutation) हे एन्झाईम प्रौढ वयातही तयार होत राहते. हे उत्परिवर्तन इंडोयुरोपियन किंवा इंडोआर्यन भाषिक समूहांत जास्त प्रमाणात आढळून येते – १८.४% (IE/IA) आणि १०.३% (बाकीचे). हा फार मोठा फरक नाही. असे असतांना दुग्धव्यवसाय आणि दुग्धसेवन हे दक्षिण आणि पूर्व भारतात होत नाही, मात्र उत्तर आणि पश्चिम भागात होते. याचे कारण काय? याचे कारण दुधाशी संबंधित मीम उत्तर आणि पश्चिम भारतात दुग्धसंस्कृतीचा प्रसार करतात; दही, दूध, लोणी चोरणारा बालक श्रीकृष्ण, गोपबालांच्या खोड्या काढणारा श्रीकृष्ण वगैरे. येथे परस्परावलंबी जनुक-मनुक संक्रमण संस्कृतीची उत्क्रांती करतात. संस्कृती संक्रमण समजून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा उपयोगी पडतो याचे हे एक उदाहरण आहे. हल्लीचे संजनुकीय संशोधन असे सांगते की हे जनुकीय उत्परिवर्तन भारतात पश्चिमोत्तर युरोप मधून ७००० ते १०००० वर्षांपूर्वी झाले असावे. याचाच अर्थ असा की केवळ भाषिक इंडोयुरोपियन नव्हेत तर वांशिक युरोपियनांची काही तुरळक स्थलांतरे तत्पूर्वी झाली असावीत.
भारतात नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे महाभारत, रामायण, पुराणे हा ऐतिहासिक पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो का? राम-जन्म भूमी आणि कृष्ण-जन्म भूमीच्या विवादामुळे या प्रश्नाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रथम पुराणांचा विचार करायचा झाल्यास.. बहुतेक पुराणांचे साधारणपणे (१) ऐकीव (ऐतीह) इतिहास, (२) विश्वाची चक्रीय उत्पत्ती-पुनरुत्पत्ती (सर्ग-प्रतिसर्ग), (३) राजांची वंशावळ, (४) मन्वंतर यांसारखे भाग करता येतात. यातील फारच थोडा भाग – राजांची वंशावळ – इतिहासाच्या दृष्टीने उपयोगी मानला जातो. हा पुरावासुद्धा वर सांगितल्याप्रमाणे तपासून घेण्याची आवश्यकता आहे. बाकी पुराणातली वांगी (वानगी) पुराणात असा वाक्प्रचार आहे तो उगाच नाही.
रामायण-महाभारत ही महाकाव्ये आहेत पण त्यांना परंपरेने इतिहास म्हटले आहे. रामायणात रामाच्या रूपाने एका आदर्श राजाची कल्पना केली गेली. तो केवळ प्रजाहितदक्ष राजा नाही तर मर्यादापुरुषोत्तम आहे. तो स्वतःवर मर्यादा घालतो आणि त्या मर्यादा पाळणे हा आदर्शांचाच भाग असतो. त्याचे शस्त्र कौशल्य, बाहुबल, आणि नैतिकता हा रामाच्या पुरुषोत्तम असण्याचा भाग आहे. श्रीराम ऐतिहासिक व्यक्ती असायची आवश्यकता नाही. रामायणातला जैव-भूगोल हा आजच्या जैव-भूगोलाशी मिळता-जुळता असला तरी त्यावरून रामायण हा इतिहासाचा ग्राह्य पुरावा होऊ शकत नाही. म्हणजे श्रीरामासारखा कोणी मर्यादापुरुषोत्तम पूर्वी होऊन गेला नसेलच असे नव्हे, पण तो मुद्दा वेगळा आहे. भारतीय आणि दक्षिण-पूर्व आशियाई संस्कृतीतील एक मोठा भाग कित्येक शतके रामाने व्यापला आहे, आणि त्या अर्थानं राम आणि राम-कथा सत्य आहे.
रामायण ज्या अर्थाने खरे आहे त्याच मर्यादित अर्थाने महाभारत खरे आहे, पण तो सर्वथा ग्राह्य ऐतिहासिक दस्तावेज नव्हे. असे असले तरी रामायणापेक्षा जास्त प्रतिसंदर्भ महाभारताला उपलब्ध आहेत. वनपर्वातील “एडूकचिन्हा पृथिवी न देवगृहभूषिता” या संदर्भावरून महाभारत – किंवा त्याचे काही भाग – गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर रचले गेले असावेत. महाभारतात काही ठिकाणी आकाशातील नक्षत्रस्थानांचे वर्णन येते, त्यावरून महाभारत युद्धाचे अनेक दिनांक निघतात, त्यापैकी काही BCE 3000-4000 वर्षे मागे जातात. महाभारतातला देवापि (शंतनुराजाचा भाऊ) हा ऋग्वेदातील शेवटच्या (१० व्या) मंडलातील एका सूक्ताचा रचयिता समजला जातो. द्वारका पाण्याखाली गेल्याची घटना हरिवंशात येते. आजचे पुरातत्त्व जर या घटनेचे दिनांकन BCE 13-14 शतकात करत असेल तर महाभारत युद्ध आणि ऋग्वेद मंडल १० ची रचना BCE 14-15 शतकात होऊ शकते.
येथे एखाद्या ग्रंथाच्या रचनेचे दिनांकन आणि त्याच ग्रंथात मांडलेल्या घटनांचे दिनांकन या दोन गोष्टी भिन्न आहेत हे लक्षात ठेवलेले बरे. रामायण, महाभारत यांसारख्या प्रचंड रचना कित्येक शतके विकसित होत असणार. त्यांतले वेगवेगळे भाग एकापेक्षा अधिक कवींनी रचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाभारतातल्या घटनांचे, व्यक्तींचे आणि व्यवस्थापनाचे पुरावे इतिहास म्हणून तपासायचे असतील तर ते वर सांगितलेल्या चार निकषांच्या वैज्ञानिक पद्धतीनेच तपासावे लागतील. रामायण-महाभारत हा ऐतिहासिक दस्तावेज नसला तरी प्राचीन भारतीय संस्कृतींचे ते एक महत्त्वाचे संचित आहे आणि या सत्यतेविषयी संशय नाही.
आर्य-आक्रमण सिद्धान्त हा भारतीय राजकारणात आणि अंतर्देशीय विद्यापीठात गाजलेला एक अर्ध-ऐतिहासिक विवादास्पद मुद्दा. काही युरोपियन विद्वानांनी सुचवलेला आणि मायकेल विट्झेलसारख्या हार्वर्ड प्राध्यापकाने प्रथमतः उचलून धरलेला हा सिद्धांत यथावकाश मागे पडला, पण तोपर्यंत (आणि अजूनही) त्याने बऱ्याच लोकांच्या डोक्यात घर केले आहे. अधूनमधून हा सिद्धांत डोके वर काढतो आणि त्याचा राजकारणासाठी लाभ उठवला जातो. आधुनिक काळात आर्य-स्थलांतर सिद्धान्त या नावाने तो स्थिर झालाय. यामध्ये पॉन्टिक-कास्पिअन स्टेप (पूर्वीच्या सोवियत रशियामधले काही देश), कॉकेसस पर्वताच्या दक्षिणेकडला भूभाग (आर्मेनिआ, जॉर्जिया), उत्तर युरोप (फिनलंड), ईराण (पर्शिया), सिरीया-तुर्की (ऍनटोलिया) या फार मोठ्या भूभागात BCE 4500 पासून, किंवा कदाचित त्याच्या आधीपासून, इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या टोळ्या फिरत आणि वसत होत्या. यापैकी विशिष्ठ प्रकारच्या इंडो-युरोपियन (इंडो-आर्यन, आर्ष वैदिक) भाषा बोलणाऱ्या काही टोळ्यांचे BCE 2000 – 1500 दरम्यान अफगाणिस्तान आणि सप्तसिंधू प्रदेशात आगमन झाले. या इंडो-आर्यन (आर्य) टोळ्यांचे आपापसात आणि एतद्देशियांबरोबर झगडे (आणि तीन युद्धे – त्यापैकी एक ऋग्वेदातील दाशराज्ञ) झाल्याचे दिसते. यांपैकी बरीचशी भांडणे गायी-गुरे पळवण्यावरून झाली असावीत. यातील काही टोळ्यांचे भारतीय उपखंडाबाहेर निर्गमन झाले असण्याचीसुद्धा शक्यता आहे. इराणमधून निर्वासित होऊन भारतात आलेल्या पार्सी पंथाच्या आवेस्तामध्ये सप्तसिंधू (हप्त-हिंदू) हे त्यांचे पूर्वीचे निवासस्थान असल्याचा उल्लेख आहे. ऋग्वेदातल्या सप्तसिंधूतील कित्येक टोळ्यांची (पंथांची) नावे ही सध्या भारताबाहेर असलेल्या मध्य अशियातील भूभागांशी नाते सांगतात. त्यांच्या बहिर्गमनाची शक्यता लक्षात घेऊन काही जण भारत हेच मुळी इंडोयुरोपियन भाषांचे मूलस्थान (PIE Urheimat) मानतात. यात आर्य लोक हे भारतातले मूळ रहिवासी (आदिवासी) होते आणि त्यांची भाषा, म्हणजे संस्कृत किंवा आर्ष वैदिक भाषा, ही सर्व इंडो-युरोपियन भाषांची जननी आहे अशा प्रकारची मांडणी असते. या ‘आदिवासी आर्यन’ (Indigeneous Aryan) किंवा ‘भारत बहिर्गमन’ (Out of India) गृहितकांना म्हणावी तशी मान्यता भाषिक इतिहासतज्ज्ञांमधे मिळालेली नाही.
आर्य हा जसा भाषिक समूहवाचक शब्द आहे तसाच कालांतराने तो सभ्य-सुसंस्कृत या अर्थाने वापरला गेला. आर्यांची संस्कृती आणि भाषा (संस्कृत) ही सामान्ययुगात (म्हणजे ख्रिस्तोत्तर (Common Era), आणि तत्पूर्वीसुद्धा, भारतीय उपखंडात आणि कालांतराने दक्षिण-पूर्व आशियात संक्रमणातून (acculturation) पसरली. हे संक्रमण म्हणजे आक्रमण नव्हे. संस्कृतच्या उत्क्रांतीचे दोन टप्पे दिसतात. (अ) वैदिक काळात यज्ञविधीत वापरलेली आर्ष भाषा, जी वेदामध्ये, विशेषतः ऋग्वेदाच्या जुन्या मंडलात दिसते, आणि (ब) पाणिनीय व्याकरणाच्या नंतरची (BCE 300-400 नंतर) सुघटीत भाषा जी सामान्ययुगात कालिदास, भास, भारवी, भवभूती, बाण वगैरेंच्या साहित्यांतून दिसते आणि ज्याला आपण आज संस्कृत म्हणतो. मात्र संस्कृत ही प्रामुख्याने वैदिक यज्ञविधी, ज्योतिष, आणि तदनंतर काव्य-शास्त्र-साहित्य यांची भाषा राहिली. ती सर्वसामान्यांची बोलीभाषा होऊ शकली नाही. या उलट इंडो-आर्यन प्रवर्गाच्या ब्राह्मी आणि मागधीसारख्या भाषा बोलीभाषेत संक्रमित झाल्या; पण कालांतराने कालबाह्य झाल्या. तुलनेने संस्कृत ही दीर्घजीवी भाषा ठरली. संस्कृतचे सर्वात जुने भौतिक पुरावे भारताबाहेर दूरस्थ सीरिया (ऍनटोलिया) येथे मिळाले आहेत (circa BCE 1400). आर्ष संस्कृत त्याही पलीकडे काही शतके अस्तित्वात असू शकते. सिंधू-सरस्वती संस्कृती ऊर्फ हरप्पा संस्कृती (BCE 4000-2000) ही सध्याच्या हिंदू संस्कृतींना आणि पंथांना जवळची आहे. मात्र तेथे कोणत्या भाषा वापरल्या जात होत्या (किंवा नाही) याचा भक्कम पुरावा मिळत नाही. उत्खननात मिळालेल्या चिन्हांवरून भाषेचे अनुमान अजून लागू शकले नाही.
आर्य हा शब्द भारतीय उपखंडाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात वंश किंवा जातीवाचक अर्थाने वापरला गेला नाही हे आपण पाहिले. तो संस्कृतीवाचक शब्द आहे. आर्यावर्त म्हणजे ज्या प्रदेशात आर्य संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृतीचे प्राबल्य आहे असा प्रदेश. आर्यावर्ताच्या आणि भारतवर्षाच्या सीमा वैदिक ग्रंथांतून (धर्मसूत्रे, पतंजलीचे व्याकरण-महाभाष्य, आणि पुराणें) कित्येक ठिकाणी निर्देशित झाल्या आहेत. त्या सीमारेषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी भारतात सांस्कृतिक राष्ट्रवादाची मुळे फार पूर्वीपासून, अगदी बुद्ध-पूर्व काळापासून रुजली होती किंवा रुजवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता असे दिसते. रामायण-महाभारताची रचना आणि त्यामध्ये आलेले भारतीय उपखंडातले कित्येक भौगोलिक संदर्भ त्या प्रयत्नांचाच भाग होता असे मानायला हरकत नाही. हा प्राचीन सांस्कृतिक राष्ट्रवाद आधुनिक भारताच्या संविधानाच्या चौकटीत कसा पहायचा हा वेगळा विषय आहे.
शालेय पाठ्यपुस्तकात हा आर्यन स्थलांतर-संक्रमण सिद्धांत योग्य प्रकारे मांडला जाण्याची गरज आहे. भारत इतर देशांसारखाच, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त, संमिश्र वंशाचा देश आहे आणि या वंशसंकरात बाहेरून आलेले फिरस्ते, आक्रमक, निर्वासित, व्यापारी किंवा इतर कोणत्याही कारणाने आलेले स्थलांतरित यांचा सहभाग आहे हे मान्य व्हावे. संजनुकांच्या (genome) विश्लेषणाने हे पडताळून पहाता येते (पहा: मूरजानी, थंगराज, पॅटर्सन वगैरे https://doi.org/10.1016%2Fj.ajhg.2013.07.006 ). मानवाची (Homo sapiens) प्रथम यादृच्छिक उत्क्रांती जर आफ्रिका खंडात झाली असेल तर मानव इतर सर्व ठिकाणी एक प्रकारे स्थलांतरितच असतो. सांगायचा मुद्दा हा की स्थलांतर मानवाच्या जैविक इतिहासातील निसर्गसिद्ध घटनाक्रम आहे. अर्थात येथे आपण लाख वर्षांच्या हिशेबाने बोलत आहोत हे लक्षात ठेवायला हवे.
भारतीय उपखंडात (अ) बुद्धपूर्व – BCE 500 आधीची अतिप्राचीन स्थलांतरे; (आ) BCE 400 – CE 700 या काळात झालेली युनानी, शक, कुशाण, हूण, पहलवी टोळ्यांनी केलेली स्थलांतरे; (इ) CE 700 – 1700 काळातील अरबी, तुर्कोमंगोल, पर्शियन यांची स्थलांतरे; (ई) CE 1500 – 1947 काळातील पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्लिश वगैरे युरोपियन वसाहतवादी स्थलांतरे, आणि (उ) CE 1947 नंतरची स्वतंत्र भारतातील स्थलांतरे आपापला इतिहास घेऊन येतात. यातील स्थलांतराचे स्थूलमानाने प्रकार: (अ) आगमन-संक्रमण, (आ) आक्रमण-संघर्ष-आत्मसात्करण, (इ) आक्रमण-संघर्ष-धर्मांतरण-अंशतः आत्मसात्करण, (ई) आगमन-वसाहत-संघर्ष-संक्रमण, (उ) निर्वसन-पुनर्वसन. हा शेवटचा प्रकार बहुतेक सर्व प्रकारांमधे उपप्रकार म्हणून असू शकतो. जसे की एका भूभागातले आक्रमक इतर कुठल्या भूभागातले निर्वासित असू शकतात. स्थलांतरे ही निसर्गसिद्ध असली तरी स्थानिक संस्कृतींचे संतुलन त्यामुळे बिघडू शकते. येथे आत्मसात्करण (assimilation) आणि संक्रमण (acculturation) यातील फरक समजून घ्यायला हवा. (१) जेव्हां स्थलांतरितांची संस्कृती स्थानिक संस्कृतीत जवळजवळ विरघळून जाते तेव्हा ते आत्मसात्करण, (२) जेव्हा स्थलांतरितांची संस्कृती स्थानिक संस्कृतीत मोठा बदल, हेतुतः किंवा निर्हेतुक हिंसेशिवाय घडवून आणते तेव्हा ते संक्रमण, (३) आक्रमक जेव्हा आपली संस्कृती स्थानिक लोकांवर जबरदस्तीने लादतात ते अध्यारोपण (superimposition), (४) जेव्हा दोन संस्कृतींचा परस्परांवर परिणाम होऊन एक नवीन रसायन तयार होते तो संस्कृती संगम (synthesis).
(अ) अतिप्राचीन स्थलांतरे: याचे एक उदाहरण – पश्चिमोत्तर भारतीय उपखंडातले आर्य स्थलांतर आणि संक्रमण आपण पाहिले. त्याच काळात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरब जगतातून – अरब, बॅबिलोनियन, अस्सीरियन वगैरे प्रदेशांतून व्यापारासाठी किंवा नशीब आजमावण्यासाठी काही लोक येऊन रहात असल्याचे पुरावे मिळतात. याहीपेक्षा जुनी स्थलांतरे, दक्षिण भारतात बहुधा समुद्रमार्गे झाली असणार – ॲस्ट्रोलॉइड, पॉलिनेशियन वगैरे. पण हा खूप जुना प्रागैतिहासिक काळ असल्यामुळे त्याचे पुरावे संजनुकीय अभ्यासातूनच मिळू शकतात.
(आ) आणि (इ) मधली आक्रमक स्थलांतरे: पार्सी (झरतोस्ट्रियन) लोकांचा अपवाद वगळता ही बहुतांशी आक्रमकांची आहेत. पार्सी हे निर्वासित म्हणून इराणमधून आले. (आ) आणि (ई) या दोन प्रकारच्या स्थलांतरांतील फरक समजून घेण्यासाठी आपल्याला पंथ आणि परापंथ यातील फरक समजून घेतला पाहिजे (पहा: इजिप्त-संस्कृती विशेषज्ञ इयान आस्मान आणि त्याचे पुस्तक ‘एकेश्वर वादाची किंमत’ (२००९), मूळ जर्मन भाषेत). पंथ हे टोळीच्या प्रथा, परंपरा पाळणारे, सहसा अनेकेश्वरवादी, सहसा निसर्गपूजक; आणि परापंथ हे त्यांचे एकेश्वरवादी संदेश देणारे, वैश्विक सत्याचा दावा करणारे आणि त्या अर्थाने जागतिक असलेले तथाकथित विकसित रूप. परापंथ अनुयायी आपल्या ईश्वराला आणि संदेशाला इतरांनी मानावे याबाबत आग्रही असतात आणि तसा प्रयत्न करतात (proselytization). पंथ अनुयायी एकेश्वरवादी असू शकतात पण आपल्या ईश्वराला (एक किंवा अनेक) आणि परंपरांना इतरांनी मानावे हा त्यांचा आग्रह नसतो. याचा अर्थ पंथानुयायी उदारमतवादी, अहिंसक असतील असे नाही. पण आपल्याकडे वैश्विक सत्य आहे असा त्यांचा दावा नसतो. (आ) मधले आक्रमक म्हणजे बहुतांशी मध्यआशियातून भारतात आलेल्या पंथानुयायी टोळ्या होत्या. त्यांनी भारताच्या काही भागात राज्य केले. मिलींद (यवन), रुद्रदमन (शक), कनिष्क (कुशाण), तोरमण (हूण) हे त्यांचे काही महत्त्वाचे राजे. कनिष्काने मोठे साम्राज्य उभे केले, सोन्याची नाणी पाडली, शक संवत् कालगणना सुरू केली. मिलींद (मीनॅंडर) आणि नागसेन यांचा संवाद प्रसिद्ध आहे. मिलींदने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि चांगले राज्य केले. रुद्रदमनच्या नावाने बनलेला गिरनार शिलालेख (CE 130-150) हा संस्कृतमधला महत्त्वाचा शिलालेख मानला जातो. त्याने केलेल्या लोकोपयोगी कामाची माहिती यात आहे. या काळातील बाहेरून आलेल्या बहुतेक आक्रमक राजांनी प्रथम बौद्ध धर्माचा स्वीकार केला, पण कालांतराने त्यांनी शैव, वैष्णव (त्याकाळी हिंदू हा शब्द प्रचारात नव्हता) पंथांचा अंगीकार केला. बाहेरून आलेल्या या स्थलांतरित टोळ्या भारतीय समाजात मिसळून गेल्या. त्यांचा कोणत्या जातीत समावेश झाला हा संशोधनाचा विषय आहे. याच काळात काही स्थलांतरे भारताबाहेर झाली. (आ) मधली ही बहिर्गामी स्थलांतरे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी किंवा व्यापारासाठी झाली (उदा. सम्राट अशोकाचा काळ). बौद्ध धर्म हा परापंथ आहे; आपला मार्ग आणि आपल्याला समजलेले सत्य (आर्य अष्टांग मार्ग, आर्यसत्य) हे इतरांना शिकवून त्यांचे सहकार्य आणि अनुयायित्व मिळवावे ही बौद्धांची अहिंसक परंपरा आहे. या अर्थाने बौद्ध, विशेषतः महायान पंथ हा मागधी श्रमण परंपरेचा उत्क्रांत परापंथ आहे असे समजायला हरकत नाही. सुमात्रा (इंडोनेशिया) येथे स्थापन झालेले श्रीविजय हे भारतीय उपखंडाबाहेरचे साम्राज्य CE 7-13 शतकांमधे दक्षिण-पूर्व आशियातले बौद्ध-वैदिक प्रभावाचे क्षेत्र राहिले. बौद्धांच्या पाठोपाठ वैदिक व्यापारी आणि त्यांच्या आमंत्रणावरून वैदिक (ब्राह्मण) पुरोहितांचेही इंडोनेशियात आगमन झाले. हे मर्यादित स्थलांतर प्रसारासाठी नव्हते तर तेथल्या राजांच्या (म्हणजे टोळी-प्रमुखांच्या) अधिकारांचे वैदिक वैधिकरण करण्यासाठी होते. या राजांचा आणि त्यांच्या टोळ्यांचा त्याआधी वैदिक पंथांशी कोणताही संबंध असल्याचे दिसत नाही. वेदोक्त राज्याभिषेकाचे आणि मंत्रसामर्थ्याचे मनुक हे वैदिक पुरोहितांनीच आपल्या पोटापाण्यासाठी जन्माला घातलेले असावे. दोन सहस्रकांमधे त्याचा प्रसार सीरिया (ॲनटोलिया) पासून श्रीविजय (इंडोनेशिया) पर्यंत सर्वदूर झालेला दिसतो. या पुरोहितांनाच पुढे तिथल्या राजांनी सल्लागार म्हणून नेमले. वैदिक पंथ हा तोपर्यंत परापंथ झालेला नव्हता. तो कर्मकांडावर आधारित प्राथमिक पंथ होता. त्याच्या वैश्विकरणाची सुरुवात गौडपाद-शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतापासून CE 700 च्या पुढे झाली. त्याचे उत्क्रांत परापंथीय स्वरूप १९व्या शतकात विवेकानंदांच्या वेदांतात दिसते. भारतीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात या दक्षिण-पूर्व आशियातील भारतीय संस्कृतीच्या संक्रमणाची सत्यकथा आणि कारणे व्यवस्थित यायला हवीत, कारण मध्ययुगीन अहिंसक संस्कृती-संक्रमणाचे ते एक महत्त्वाचे आणि दुर्मिळ उदाहरण आहे.
(इ) या काळातील बहुतेक आक्रमणांना इस्लाम या परापंथाचा पाठिंबा होता असे म्हणता येईल. इस्लामचा ‘शस्त्रां’सहित कोणत्याही साधनाने प्रसार करणे इस्लामच्या अनुयायांचे कर्तव्य समजले जाते. याला कुराणाचे अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचे संदर्भ मिळू शकतात. मात्र कुराण, हादिथ यांचा एकत्र विचार केला आणि मिल्लत, कुफ्र (काफ़िर), दार-उल-इस्लाम, दार-उल-हर्ब, शिर्क (मशरिक), जिहाद या संबंधातल्या आयता वगैरे वाचल्या तर इस्लाम काफ़िरांबाबत (मूर्तिपूजक, बहुदेववादी, नास्तिक, अश्रद्ध) अतिशय कठोर आहे हे लक्षात येते. नास्तिक म्हणजे केवळ देव किंवा ईश्वर न मानणारा असे नव्हे तर “अल्ला हा एकमेव देव आहे, मुहम्मद हा अल्लाचा शेवटचा प्रेषित आहे आणि कुराण हा अल्लाचा शब्द आहे जो गॅब्रियेलने मुहम्मदाला दिला आणि मुहम्मदाने तो समस्त मानवजातीला दिला” ही श्रद्धा नसणारा. त्याला कोणत्याही मार्गाने सश्रद्ध बनवणे हे इस्लाममधे परमकर्तव्य मानले जाते. तसेच देवादिकांच्या मूर्ती फोडणे, मूर्ती असलेली देवळे आणि लेणी पाडणे, इस्लामच्या शिकवणीत न बसणारी नालंदासारखी विद्यापीठे ध्वस्त करणे, धर्मप्रसाराला विरोध करणाऱ्या काफ़िरांची कत्तल करणे, त्यांची संपत्ती लुटणे, बायका पळवणे हे सर्व मुसलमान राजांनी आणि जिहादी मुसलमानांनी करणे अपेक्षित होते, आणि ते या कालखंडात यथाशक्ती केले गेले. यामध्ये लुटमार करून मिळणाऱ्या संपत्तीचे आकर्षण होतेच. अर्थात भारत हा इस्लामिक धर्मग्रंथानुसार काफ़िरांचा देश होता आणि आजही आहे हे स्पष्ट आहे. मुहम्मद बिन कासिम आणि त्यानंतर आलेल्या अरेबिक, अफगाण, तुर्की, आणि तुर्को-मंगोल टोळ्या इस्लामला मानणाऱ्या होत्या. यातल्या सर्व टोळीप्रमुखांनी (राजांनी) कुराण, हादिथचे तंतोतंत पालन केले असे म्हणता येणार नाही. अकबरासारख्या मुघल सम्राटाने तर दिन-ए-इलाहीसारखा नवीन पंथ काढला. सध्याच्या सर्वपंथसमभावी संस्कृतीत त्याचे वर्तन बसणारे होते. या काळातल्या सुलतानांच्या राज्यकारभाराचे वर्णन कोणत्याही भारतीय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मिळू शकेल (उदा. History of India: by Kulke and Rothermund, chapter-4 & 5). या काळातले एक स्थलांतर भारतांतर्गत होते. औरंगझेब मोठी सेना घेऊन दिल्लीहून महाराष्ट्रात आला आणि जवळजवळ २० वर्षे महाराष्ट्रात राहिला आणि मृत्यू पावला.
भारतात हिंदू ही संज्ञा इस्लामिक आक्रमणाची सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिक्रिया या अर्थाने CE-8 शतकानंतर तयार झाली. CE-8 शतक ते CE-12 शतक यामध्ये ती अस्पष्ट होती आणि वैदिक धर्मात समाविष्ट होती. “रामायणाच्या लोकमानसातल्या प्रभावामुळे ही संज्ञा जास्त मजबूत आणि विस्तृत झाली” असे शेल्डन पोलॉकसारख्या इतिहासतज्ज्ञाने म्हटले आहे. याच संदर्भात तो रामचंद्र या १३ व्या शतकातील महाराष्ट्रीय शैव यादव राजाचे उदाहरण देतो. (या राजाच्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली गेली). या उलट ब्रजदुलाल चतर्जी या अभ्यासकाचे म्हणणे आहे की हे केवळ रामायणामुळे नव्हे तर इस्लामिक सल्तनत आणि स्थानिक राजे यांच्या एकमेकांबरोबर झालेल्या लढाया यांतून ही ‘हिंदू’ ओळख पक्की होत गेली. ॲंड्र्यु निकल्सन वगैरेंच्या मतानुसार हिंदू ही संज्ञा कबीर, एकनाथ, विद्यापती वगैरे संतांच्या साहित्यात CE14-17 या शतकात धार्मिक अर्थाने वापरली गेली.
CE 700 नंतरची इस्लामिक आक्रमणातून ही स्थलांतरे आक्रमण-संघर्ष-धर्मांतरण-अंशतः आत्मसात्करण या अवस्थांतून गेली. यातला संघर्ष हा केवळ आक्रमक आणि त्यांचा प्रतिकार करणारे स्थानिक लोक असा न रहाता त्याला संस्कृती-संघर्षाचे (Huntinton’s clash of civilization) स्वरूप आले, आणि कितीही नाकारले तरी संस्कृतीच्या आधारे झालेल्या फाळणीनंतरही ते अजून टिकून आहे. मात्र या संघर्षातून काही संस्कृती-संगमाच्या गोष्टीही झाल्या. ज्याला आपण गंगा-जमनी तहजीब म्हणू. भारतीय संगीत (हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत) हे या संस्कृती-संगमाचे एक उत्तम उदाहरण. उर्दू आणि इतर भाषा आणि साहित्य, नृत्य, शिल्प, चित्रपट, सूफी चालीरिती, तत्त्वज्ञान यांमध्येही ही गंगा-जमनी तहजीब दिसून येते.
यादवकाळात महाराष्ट्रात राज्यव्यवहारासाठी ज्ञानेश्वरकालीन स्थानिक मराठी भाषा वापरात होती. पण शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत त्यात कित्येक अरबी, फारसी, तुर्की शब्द घुसले कारण राज्यकर्ते परकीय भाषिक संस्कृतींचे वाहक होते. शिवाजी महाराजांच्या आदेशावरून एक राज्यव्यवहारकोष बनवण्यात आला, ज्यात त्यांना संस्कृत प्रतिशब्द देण्यात आले. शिवाजी महाराजांनी धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांना पुन्हा शुद्धिकरण करून हिंदू धर्मात आणले. या काही घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होण्यास मदत होते की शिवाजी महाराज हे केवळ रयतेचे राजे नव्हते तर हिंदू वैदिक संस्कृतीचे वाहक होते. त्यांनी स्वत:ला वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. महाराष्ट्रातल्या काही ब्राहणांनी या राज्याभिषेकाला विरोध केल्यावर महाराजांनी काशीच्या गागाभट्टाला (विश्वेश्वर भट्ट) बोलावून घेतले. वेदोक्त राज्याभिषेकाचे आणि वेदमंत्रांचे मनुक प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात किती शक्तिशाली होते याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते हे दाखविण्यासाठी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात – त्यांच्या सैन्यात हजारो मुसलमान होते, त्यांनी कित्येक मशिदींना जमिनीची दानपत्रे दिली, त्यांच्या आग्र्यामधल्या वास्तव्यात त्यानी महाराष्ट्रातून नेलेल्या १० शरीर रक्षकांपैकी तीन मुसलमान होते, ज्या पैकी एक मदारी मेहेतर होता, मदारी मेहेतरने स्वत:चा प्राण धोक्यात घालून महाराजांना आग्र्याहून सुटण्यास मदत केली वगैरे; या सर्वाना सबळ पुरावे मिळत नाहीत. यातली कित्येक मनुके २०-२१ व्या शतकात तयार झालेली असवीत!
संस्कृती-संघर्ष आणि संस्कृती-संगम या दोन्ही गोष्टी या कालखंडात दिसून येतात. इतिहास, संस्कृती, आणि मूल्य-व्यवस्था यांच्या शिक्षणाने संस्कृती-संघर्ष हा कमी होऊ शकतो. समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) याबाबतीत उपयोगी पडू शकेल. याचे प्रावधान भारतीय संविधानात आहे; पण काही जणांच्या मते ही दरी UCC मुळे अधिक वाढेल. हे जर खरे असेल तर ‘संस्कृती संघर्ष’ अजून चालू आहे हे निश्चित!
(ई) पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्लिश वगैरे युरोपियन वसाहतवादी स्थलांतरे: ही स्थलांतरे व्यापाराच्या निमित्ताने पधराव्या-सोळाव्या शतकापासून झाली. ही बहुतेक ख्रिश्चन देशांतून झाली असली तरी धर्मांतर हा त्यांचा मूळ उद्देश नव्हता. मात्र वसाहतींच्या आगे-मागे ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे आगमन झाले. ऑटोमन साम्राज्यात मध्ययुगीन रेशीम मार्ग जवळजवळ बंद झाल्याने युरोपियन व्यापाऱ्यांना समुद्रमार्गाने मालाची आणि मजुरांची वाहतूक करावी लागत होती आणि त्यासाठी व्यापारी ठाणी भारतात उभारणे त्यांना आवश्यक वाटले. त्यासाठी ब्रिटिशांतर्फे ईस्ट-इंडिया कंपनी स्थापन झाली. त्यांनी स्थानिक राजांचे परवाने घेतले, जमिनी खरेदी केल्या, वसाहती उभारल्या, त्या वसाहतींच्या संरक्षणासाठी काही सैन्य उभे केले वगैरे. हाच प्रकार बाकीच्या वसाहतींनी केला. या वसाहतींनी आपापला विस्तार करायचा प्रयत्न केला. त्यांचे स्थानिक राजे-नवाबांशी आणि इतर युरोपियन वसाहतींशी झगडे, लढाया झाल्या. यात भारतातील ब्रिटिश वसाहत सर्वांत यशस्वी झाली. अंततः पोर्तुगीजांचे सांस्कृतिक आक्रमण गोव्यापुरते मर्यादित राहिले आणि फ्रेंचांची वसाहत पुद्दुचरीपुरती मर्यादित राहिली. ब्रिटिशांचे साम्राज्य भारतीय उपखंडात जवळजवळ सर्वत्र पसरले. १८५७ नंतर ईस्ट-इंडिया कंपनीचा कारभार ब्रिटीश सरकारने आपल्या हातात घेतला आणि १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यात दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा सर्वात मोठा वाटा होता. त्या अर्थाने अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळाले हे खरे नाही. याचा अर्थ महात्मा गांधींचे अहिंसक योगदान महत्त्वाचे नाही असे नाही; पण त्याचे महत्त्व आहे ते वेगळ्या संदर्भात. माझ्या लेखाचा तो विषय नाही. ब्रिटिश राजवटीत झालेली भारताची आर्थिक पिळवणूक शशी थरूरने त्याच्या ‘Era of Darkness’ मध्ये दाखवली आहे. त्यावर अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही.
(उ) निर्वसन-पुनर्वसन: बहुतेक स्थलांतरात निर्वसन-पुनर्वसन दडलेले असते. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर एक ते दोन कोटी लोक निर्वासित झाले. असंख्य माणसे मेली. या जगातील सर्वांत मोठ्या आणि रक्तलांछित स्थलांतराचे व्रण अजून बुजले नाहीत! हा सर्व नजीकचा इतिहास आहे. हे सर्व टाळता आले असते का? कदाचित टाळता आले असते; जर ब्रिटीश (ॲटली) सरकारने भारतीय उपखंडातील सत्तांतर हिंदू-मुसलमान नेत्यांना विश्वासात घेऊन, आणि या नेत्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन, जास्त नियोजनबद्ध पद्धतीने केले असते तर. पण या जर-तरच्या गोष्टी आहेत. जसे की औरंगझेबाच्या जागी दिल्लीच्या तख्तावर दारा शिकोह असता तर वगैरे. स्वतंत्र भारतात सुद्धा भारताबाहेरून आलेली अनेक स्थलांतरे झाली: बांगलादेश युद्धाच्या आगे-मागे झालेली निर्वासितांची स्थलांतरे, ब्रह्मदेशातून झालेली रोहिंग्यांची स्थलांतरे आणि अफगाणिस्तानातून झालेली सिख-हिंदूंची स्थलांतरे. बांगलादेशांतून आलेल्या निर्वासितांमुळे भारताच्या पूर्वोत्तर राज्यांच्या लोकसंख्येंचा ताळमेळ बदलला. किंबहुना पाकिस्तानबरोबर झालेल्या बांगलादेश युद्धाचे तेही एक कारण होते. यातले एक उदाहरण अंतर्गत स्थलांतराचे आहे; ते म्हणजे काश्मिरी पंडितांचे स्थलांतर. हे इस्लामिक आतंकवादामुळे काश्मीर खोऱ्यातून जम्मू आणि भारतातल्या इतर ठिकाणी झाले. हे स्थलांतर पन्नास वर्षांच्या आतले असल्यामुळे ते ह्या लेखाचा विषय नाही.
स्थलांतरांचा इतिहास आपण पाहिला कारण भारतातले कित्येक सांस्कृतिक, भावनिक गुंतागुंतीचे प्रश्न हे स्थलांतरांशी जोडले गेले आहेत. काही अपवाद सोडून, स्थलांतरे फिरवता येत नाहीत. पण स्थलांतरांमागची कारणे समजून घेतली आणि त्याचे भले-बुरे परिणाम मान्य केले तर कटुता आणि संघर्ष कमी होऊ शकतो. त्यासाठी सार्वत्रिक विज्ञाननिष्ठेची आणि विवेकवादी शिक्षणाची आवश्यकता आहे.