इतिहास – डावं.. उजवं..

इतिहास हा माणसाला शहाणपण शिकवणारा विषय आहे असे एका युरोपीयन विचारवंताने नोंदवले आहे. हे वाक्य जसेच्या तसे केवळ तेव्हाच लागू होऊ शकते जेव्हा इतिहास हा विषय वैयक्तिक आणि तत्संबंधित हितसंबंधापासून दूर ठेवण्याचे किमान शहाणपण लोकांच्या अंगवळणी पडेल. हे सहजासहजी घडून येणारच नाही. याचे स्पष्ट कारण म्हणजे इतिहास हा देशभरातील आणि जगभरातील बहुतेक लोकांच्या हितसंबंधाचा मुद्दा बनून राहिला आहे. त्यासंबंधित आवश्यक अशा सर्व रचना आणि प्रणाली जमवत हा हितसंबंधी समूह सतत जागता राहत असतो. कोणत्याही प्रकारे आपले हितसंबंध धोक्यात येणार नाहीत याची दक्षता अगदी काटेकोरपणे वाहत हा समूह ऐतिहासिक सत्यांची मोडतोड करत समाजातील आपले वर्चस्व राखत असतो. या घातक वृत्तीला रोखायचे असेल तर इतिहासाची मांडणी करताना योग्य-अयोग्य, खरं-खोटं याबाबतीतील सत्य अगदी  तटस्थपणे नोंदवून त्यापासून योग्य तो बोध घेण्याची वृत्ती समाजमनात वाढीस लागायला हवी. यासाठीच सततचे आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न गरजेचे आहेत.

इतिहासाची विभागणी अगदी स्पष्टपणे दोन समूहांत झाली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. पहिला समूह हा ब्राम्हण्यवादी भूमिकेचा पुरस्कार करत आपल्या अनुकूल इतिहासाची रचना हजारो वर्षे करत आला आहे, तर दुसरा समूह ह्या ब्राम्हण्यवादी भूमिकेवर प्रतिक्रिया देत स्वत:च्या अर्थात बहुजनवादी ऐतिहासिक हितसंबंधांची नव्यानं मांडणी करण्याची धडपड करत आहे. “इतिहासाची पुनर्मांडणी“ हा अजेंडा घेऊन समाजमनात वादसंवाद घडवला जात आहे. अश्यावेळी याकरता आवश्यक अश्या सर्व रचना आणि जोडण्या केल्या जातातच. गतकाळातील प्रसिद्ध अश्या ब्राम्हण ब्राम्हणेतर वादाची पार्श्वभूमी इथे आहेच. सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे. तेव्हा या समाजमाध्यमाचा आपल्या हितसंबंधी गोष्टींकरता वापर करण्याचा प्रघात आता रुळत चाललाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासाची जमेल तशी आणि लावता येईल तेवढी विल्हेवाट स्वहितरक्षणाकरता करत राहणाऱ्या “सोशल योद्ध्यांचा“ जमाना तेजीत आहे. रोजच्या रोज अगदी दिनविशेषापासून याची सुरुवात होते आणि अगदी रात्र संपेपर्यंत हे “सोशल योद्धे“ आपल्या अनैतिहासिक आणि बिनबुडाच्या पोस्ट्स फिरवत असतात. पुस्तक वाचण्याचा त्रास नको वाटणाऱ्या लोकांचा समूह याला बळी पडतो आणि मग प्रत्येक समूहाला त्यांचे त्यांचे भक्त् आणि अनुयायी मिळत जातात. समूहाच्या झुंडीकरणाची प्रक्रिया वेगाने बनत जाते. अशा झुंडी मग वर्तमानातील कोणत्याही प्रश्नावरील उत्तरासाठी भूतकाळात डोकावत राहतात. परिणामी, मुख्य प्रश्नाची अयोग्य वासलात सुरू राहते. याचा मोठा फटका संपूर्ण मानवजातीला बसत चााललाय हे नोंदवले पाहिजे.

इतिहास म्हणजे घडून गेलेल्या क्षणांची, घटनांची, गोष्टींची नोंद अशी सहजसोपी व्याख्या इथे धरून चालूया. मागे पडलेला प्रत्येक क्षण, घटना अथवा गोष्टी ह्या इतिहासाचा भाग अनिवार्यपणे होत असतात. मात्र यांपैकी सर्वच बाबी कुणी नोंदवत नाही. मानवी स्वभावाचा कानोसा घेता असे आढळते की, आपल्याला आवश्यक आणि योग्य वाटतील अश्याच आणि तेवढयाच गोष्टी अथवा घटना नोंदवायच्या आणि तोच आणि तेवढाच भाग इतिहास म्हणून घोषित करायचा, हे अगदी अनादिकालापासून चालू आहे. इतिहासाच्या अश्या नोंदीला हितसंबंधांची असणारी पोलादी चौकट सामान्य जनांच्या सहसा ध्यानात येत नाही. अथवा ती येण्यापूर्वीच नोंदवलेल्या इतिहासाच्या भागापासून मिळणारा तात्कालिक फायदा उपटून मोकळे झालेले असतात. याचे ठळक उदाहरण “काश्मीर फाईल्स“ या सिनेमातून मांडलेल्या तथाकथित भ्रामक इतिहासाचे घेता येईल. इतिहास हा संदर्भासहित मांडलेल्या योग्य  पुस्तकातून वाचून, समजून घेण्याची समज नसणाऱ्या एका मोठया वर्गाला “सिनेमातून इतिहासदर्शन“ घेण्याचे व्यसन लागले आहे. याचा अचूक फायदा घेत सिनेमातील इतिहासकार नामक एक जमात आर्थिक व हितसंबंधी लाभ घेण्यासाठी पुढे सरसावते आणि त्यांच्या इतिहास आकलनातून निर्माण केलेली त्यांची सत्ये सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्या माथी मारली जातात. परिणामी खऱ्या इतिहासाचा मुडदा केव्हाच पडलेला असतो. तानाजी मालुसरे या महान योद्ध्याचे नामकरण सिनेमासाठी म्हणून “तान्हाजी“ असे केले जाते. “ताश्कंद फाईल्स” म्हणून संभ्रमित आकलने इतिहास म्हणून समोर ठेवली जातात. मराठी भाषेत तर छत्रपती शिवराय यांच्या देदीप्यमान कारकीर्दीवर सिनेमांच्या भल्यामोठ्या रचना उभ्या केल्या जात आहेत. यामध्ये इतिहासाच्या वास्तविक नोंदी बाजूला पडतात आणि सिनेमाच्या यशस्वितेची गणिते मांडून इतिहासाची तथ्ये मोडून टाकली जातात. “इतिहासाचे सिनेदर्शन” दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे.

भारतीय रचनेत जात आणि धर्म यांचा लेप चढवल्याशिवाय कोणतीही गोष्ट बनणे जणू कठीणच झाले आहे. इतिहास हा विषयदेखील याला अपवाद नाही. इतिहासाची मांडणी आपापल्या जातीकरता आणि धर्माकरता करणारे इतिहासकार बरेच आहेत. ज्यांना इतिहासाचार्य म्हणून गौरवले जाते त्या वि.का.राजवाडे यांनी नाना फडणीसांच्या रखेलींचा कागद तोंडात टाकून खाऊन टाकला याची नोंद आचार्य अत्र्यांपासून दुर्गाबाई भागवतांपर्यंत केली गेलीआहे. याच राजवाडयांच्या जातिनिष्ठ इतिहासलेखनाला खोडून काढत आपल्या वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाचा तडाखा दाखवणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे लेखन प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूने एका महत्त्वाच्या घटनेकडे केवळ धार्मिक अंगाने पाहून इतिहासातील वस्तुनिष्ठतेचा मुडदा पाडण्याचे कामदेखील प्रसिद्ध आहेच. विसाव्या शतकात झालेल्या मोपलांच्या दंगलीची सावरकरांनी केवळ धार्मिक अंगाने मांडणी केली. मात्र त्या दंग्याला असणारी वर्गीय बाजू त्यांनी पाहिलीच नाही. परिणामी एकांगी इतिहासमांडणी होऊन लोकांची मने अधिक कलुषित झाली. इतिहासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन निकोप व तटस्थ नसेल तर सोशल मीडियासारख्या सध्याच्या युद्धभूमीवर इतिहासाची शवे रोज मांडलेली दिसतात. इतिहासाची मांडणी व्यक्तिवादी झाली की अभिनिवेश वाढता राहून अहंकार पोसला जातो आणि व्यक्तिश्रेष्ठत्वाची लढाई सुरू होते. यामध्ये मग आपल्या हीरोला मोठेपण देण्यासाठी त्याच्या समकालीन दुसऱ्या मातब्बर हीरोच्या बदनामीची मोहीम हाती घेतली जाते. सोशल मीडियावर सध्या हे “भाग्य” पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाट्याला आले आहे. रोज नेहरू बदनामीची किमान एक तरी पोस्ट टाकल्याशिवाय आमच्या तथाकथित महान सोशल मीडिया योद्ध्यांना झोपच येत नसावी. यामध्ये नेहरूंच्या वैयक्तिक बदनामीपासून त्यांच्या सार्वजनिक अपयशाची (चीन युद्ध) चर्चा हे महाभाग अगदी कसलेल्या इतिहासकाराप्रमाणे करत आहेत असे भासवतात. ऐतिहासिक वळणांची इतकी तकलादू आणि सवंग चर्चा दुसरी नसावी.

खरेतर इतिहास हा विषय दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. दुधारी शस्त्र जसे दोन्ही बाजूने कापत जाते तसेच इतिहासाची हितसंबंधी मांडणी एकाचवेळी समाजात नको ती गैरमूल्ये रुजवत जातात तर दुसरीकडे तीच गैरमूल्ये योग्य वाटून समाजातील एक मोठा वर्ग अक्षरश: नासत जातो. कोणत्यातरी व्यक्तीच्या, जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या अस्मिता व गैराभिमान वाढवत नेऊन दुसऱ्या बाजूच्या आपल्याच बांधवांवर आपले शस्त्र घाव घालत आहे याची साधी जाणदेखील यांना राहत नाही. परिणामी समाजात नेहमी वादंग, दंगे, मारामारी, झगडे, संशय, एकमेकांना संपवण्याची भाषा व कृती यामध्येच मानवी समाजातील मोठी ऊर्जा वाया जाते याची दखल कुणी घेणार का?  अशाने आपला देश “बलशाली भारत” कसा होईल? अशाने आपण नित्य कमजोरच होत राहू. इतिहासाची मांडणी स्वहिताकरता करणाऱ्या घातक वृत्तीची ही काळी बाजू आपल्या लक्षात कधी येणार? प्रश्न एवढाच आहे आणि महत्त्वाचादेखील आहे.   

जुना बुधवार पेठ ,कोल्हापूर
9922784065

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.