इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसेच मुळात इतिहासाविषयीचा स्वीकार आला तरच बदलत्या सामाजिक मापदंडानुसार जे वाईट ते टाळण्याकडे आपोआपच आपला कल जाईल. यादृष्टीने ‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकासाठी काही साहित्य यावे असे आवाहन आम्ही केले होते. या अंकातील लेखांमधून याविषयीचे विविध विचार वाचकांसमोर आम्हाला मांडता आले आहेत. या लेखांवर आणिक चर्चा व्हावी आणि यानिमित्ताने अनेक विवेकी विचारधारा सातत्याने समोर याव्या यासाठी सुधारक प्रयत्नरत आहेच.
लेखांवरील संक्षिप्त प्रतिसाद वाचकांकडून वेळोवेळी येतातच. परंतु लेखाच्या प्रतिसादात अधिक विस्तृत आणि प्रतिवाद करणारे काही लेख आले तर विचारांची देवाणघेवाण अधिक प्रभावी होईल.