पुस्तक: कुतूहलापोटी
लेखक: अनिल अवचट
प्रकाशक: समकालीन प्रकाशन
‘कुतूहलापोटी’, हे डॉ. अनिल अवचटांचं नवं कोरं पुस्तक.
‘शुद्ध कुतूहलापोटी, पुस्तके रसाळ गोमटी’ असं बेलाशक म्हणावं, इतकं हे बेफाट आहे. मुखपृष्ठावर आहेत, चक्क लहान मूल होऊन रांगणारे, या अफाट सृष्टीकडे कुतूहलानी बघणारे, दस्तूरखुद्द डॉ.अवचट. लहान मुलाची उत्सुकता, जिज्ञासा आणि आश्चर्य इथे त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे. हे पुस्तक रोएन्टजेन ह्या एक्सरेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला समर्पित आहे. एक्सरेचा शोध लावला म्हणूनच नाही, तर पेटंट न घेता हा शोध मानवजातीसाठी निःशुल्क उपलब्ध केल्याबद्दल.
आत पानोपानी आपल्याला भेटतात मधमाश्या, साप, बुरशी, पक्षी, कीटक आणि मानवी शरीरातील अनेकानेक आश्चर्ये; अगदी जन्मरहस्यापासून कॅन्सरपर्यंत.