विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“राजन्, आता एकदा आपण सिंहावलोकन करूया.”
“तुला रे कशाला हवं सिंहावलोकन? तसाही फांदीवर उलटा लटकत करतोसच की मागच्या वाटेचं अवलोकन. वेताळावलोकन म्हण हवं तर त्याला.”
“बरं,बाबा, तसं म्हण. खूश?
तर, सर्वप्रथम फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची कारणे कोणती ह्या प्रश्नावर तू ह्या सर्व कारणांच्या मुळाशी माणसाच्या दोन स्वाभाविक इच्छा आहेत असे म्हटले होतेस. पहिली आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याची आणि दुसरी भविष्याच्या अनिश्चिततेतून येणारी असुरक्षितता घालवण्याची.
त्यावर, आपापल्या आयुष्यातलं दुःख निवारण करण्याचा आणि अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग सापडला तर लोक ह्या भ्रामक फलज्योतिषाच्या विळख्यातून बाहेर पडतील का? असा प्रश्न मी तुला केला होता.
आणि तू, तो मार्ग शोधण्यात आपल्या स्वभावामुळे येणाऱ्या अडचणींविषयी बोलला होतास.
तेव्हा सुखदुःख म्हणजे नेमकं काय हे आधी आपण समजून घ्यायला नको का असे मी विचारले आणि त्याला उत्तर म्हणून तू सुखदुःखाच्या सर्वसमावेशक आणि व्यक्तिगत व्याख्या केल्यास.
सर्वसमावेशक व्याख्या; ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवेहवेसे, कल्याणकारक, आनंददायक वाटते आणि समाधान देते ते सुख आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख’, अशी, आणि व्यक्तिगत सुखाची व्याख्या; ‘प्रत्येक व्यक्तीने जो काही अग्रक्रम ‘स्वतःहोऊन’ निवडला असेल त्यानुसार ज्या गोष्टीस प्राधान्य दिले असेल त्या गोष्टीत त्या व्यक्तीला सुख असते, अशी केली होतीस.”
“होय, गोष्टिवेल्हाळा. आपण त्या सर्वसमावेशक व्याख्येला कालसापेक्षही केले होते.”
“पण कालसापेक्ष म्हणजे काय म्हणायचंय तुला राजन्?”
“हे बघ, आपण प्रत्यक्ष ऐंद्रियानुभवातून होणाऱ्या सकारात्मक जाणिवेला किंवा संवेदनेला (sense) ‘आनंद’ (pleasure) म्हणतो आणि नकारात्मक जाणिवेला दुःख/’वेदना’ (pain) म्हणतो (खरंतर दुखणे/वेदना ह्याहून दुःख वेगळे असते. त्यामुळे आनंदाच्या विरुद्धार्थी भावनेला, दुःख न म्हणता वेदना किंवा वेदनेच्या परिणामस्वरूप निर्माण होणारी, भीती म्हणायला हवे). त्यामुळे आनंद आणि वेदना/भीती ह्या तात्कालिक म्हणजे त्यांचा अनुभव होत असेपर्यंतच म्हणजे वर्तमानातच टिकतात.
तर कल्याण किंवा भलं होण्याची आपल्याला आशा असते म्हणजे तो मुख्यतः भविष्याबद्दलचा विचार असतो.
आणि समाधान हे उणीव (भूक भागल्याने)/कर्तव्य पूर्ततेतून होते. म्हणजेच ते मुख्यतः करून झालेल्या/होऊन गेलेल्या गोष्टींविषयी होत असते.
म्हणजे भविष्यातील कल्याणाची आशा, वर्तमानातील आनंद, वेदना किंवा भीती, आणि भूतकाळातील किंवा होऊन गेलेल्या अथवा करून झालेल्या गोष्टींविषयी समाधान असे तिन्हीं काळातील घटक आपण व्याख्येत घेतले असल्यामुळे ती सार्वकालिकही झाली आहे.”
“खरंय राजन्, आणि तुझी व्यक्तिगत सुखाची व्याख्या मला थोडी, ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशा प्रकारची वाटते.”
“हो, आपण नेहमी आपल्याला सुखकारक गोष्टीच वांछितो आणि त्यांत तुलनाकरून जास्त सुखकारक गोष्टींनाच आपण अग्रक्रम देतो, त्यामुळे आपण जे अग्रक्रमाने वांछितो त्याच्या प्राप्तीने आपल्याला सुख होते असे समजायला हरकत नसावी.
ह्यातही एक गंमत असते, आपण आपला अग्रक्रम आपल्याला अभिप्रेत असलेल्या सुखाच्या कालावधीनुसार ठरवत असतो.”
“म्हणजे काय राजन्?”
“त्याचं असं आहे की, आपण जर ‘आज, आत्ता, ताबडतोब/हाजीर सो वजीर’ अशा विचाराचे असलो तर आपण सर्वसमावेशक सुखापैकी फक्त वर्तमानातल्या तात्कालिक आनंदाला, जो आपण पूर्वी बघितल्याप्रमाणे फक्त आपल्यास्वतःपुरता मर्यादित असतो, अग्रक्रम देतो आणि भविष्यातील कल्याणाकडे दुर्लक्ष करतो.
जर आपल्याला भविष्यातील आपले कल्याण जास्त महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपण त्याला अग्रक्रम देतो आणि तात्कालिक आनंदाकडे दुर्लक्ष करू शकतो.
त्यातही आपल्याला भविष्यातील जितक्या जास्त कालावधीसाठी आपले कल्याण अभिप्रेत असेल तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला आपल्या सुखात इतरांच्याही सुखाचा समावेश करून घ्यावा लागतो.
मला जर आयुष्यभर सुखी राहायचे असेल तर माझे सर्व कुटुंबीयही सुखी राहायला हवेत कारण नाहीतर त्यांचे दुःख हे मलाही दुःखी करणार. मला माझ्या स्वतःच्या कल्याणाच्या शाश्वती इतकेच माझ्या वारसांच्या कल्याणाच्या शाश्वतीने जर सुख होणार असेल तर मला कल्याणाचा कालावधी अनंतकाळपर्यंत वाढवत न्यावा लागेल आणि त्यात सर्व चराचर सृष्टीचा अंतर्भाव करावा लागेल.”
“बरोबर आहे राजन्, म्हणूनच तर दूरदृष्टीचे लोक ‘वसुधैव कुटुंबकम्’ मानतात आणि ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ ह्या इच्छेला अग्रक्रम देतात, किंवा सर्वांच्या सुखातच किंवा कल्याणातच माझे सुख आणि कल्याण सामावलेले आहे असे समजतात.
आणि त्या व्याख्येतील कल्याण व समाधान ह्या घटकांची आणखीन एक विशेषता असते बघ.”
“कोणती राजन्?”
“प्रत्येक व्यक्तीचे ‘कल्याण’ हे इतरांच्या, म्हणजे कौटुंबिक, सामूहिक, सामाजिक (किंवा समाजाच्या प्रतिनिधींनी चालवलेल्या कल्याणकारी राज्याच्या) प्रयत्नांतून होते, तर आपल्याला मिळणारे समाधान हे आपण इतरांसाठी, म्हणजे कुटुंब, समूह, समाज यांसाठी केलेल्या कर्तृत्वातून, कर्तव्यातून मिळते.
तर, अश्यातऱ्हेने आपल्या सुखदुःखाच्या व्याख्येत, प्रत्येकाचे आनंद, कल्याण आणि समाधान अंतर्भूत असल्यामुळे ती सर्वसमावेशक झाली आहे.”
“खरं आहे, पण काय रे, गेल्याखेपेत तर तू समाधान, त्या ‘क’ च्या बाराखडीतून, कृतींतून, कर्मातून, कर्तृत्वातून, कर्तव्याच्या निर्वाहातून, कृतार्थतेतून, सार्थकतेतून मिळतं असं म्हणाला होतास आणि आता मात्र फक्त कर्तृत्वातून, कर्तव्यातून मिळतं असं म्हणतो आहेस . .”
“हो, म्हणालो होतो खरं, पण आता कृती, कर्म आणि कर्तव्याचा वेगवेगळा अर्थ लक्षात आलाय माझ्या?”
“कोणता रे बाबा?”
“अरे, कृती ही माणसाच्या हातून भावनेच्या भरात होते, त्यामुळे त्यातून प्रत्येकवेळी समाधानच मिळेल असं नाही, उलट बहुतांश वेळा आपल्या कृतीचा पाश्चात्तापच करण्याची पाळी येणार.
ह्याउलट कर्तृत्व, कर्तव्य हे मात्र हेतुपुरस्सर, काही विशिष्ट उद्देशाने केलं जातं. त्यामुळे कृती भावनेच्या तर कर्तव्य हे बुद्धीच्या क्षेत्रात येतं.”
“आणि कर्म?”
“जे निर्हेतुकपणे, भावनेच्या संसर्गाशिवाय केलं जातं ते कर्म.”
“ओहह्, म्हणजे कर्माला, culpable homicide not amounting to murder, असं म्हण ना!”
“हां, हुशार होतोयस तू, पण अगदी तसंच नाही, तशासारखं.
तर जे हेतुपुरस्सर केलं जातं किंवा ज्याला काही उद्देश असतो अशाचीच उद्देशपूर्ती होऊ शकते नाही का? आणि त्यातून आपल्याला समाधानही उद्देशपूर्तीच्या प्रमाणात मिळणार.”
“पण राजन्, सुखदुःख मानण्यात असतं असंही तू म्हणालास.”
“हो, सुखदुःख ‘मानण्यात’ असतं असंही आपण समजतो. ह्याचा अर्थ सुखदुःख कशाने व्हावं हे आपण विचारपूर्वक ठरवू शकतो. किंवा असं म्हण की सुखदुःखातील आनंद, भीती आणि हवेहवेसेपण हे जरी भावनिक आणि त्यामुळेच तात्कालिक असले तरीही त्यातील कल्याण आणि समाधान हे घटक मात्र बुद्धिगम्य आहेत.
त्यामुळे सुखदुःख हे आनंद किंवा वेदनेइतकं तात्कालिक नसलं तरीही ते कायमस्वरूपीही नसतं, मात्र ते आनंद किंवा भीतीच्या भावनेपेक्षा बराच जास्त काळ टिकून राहतं.
आपलं कल्याण कशात आहे ह्याचं अनुमान, तुलना आपण तर्काच्या साहाय्याने करू शकतो. म्हणूनच गेल्याखेपेतील गोष्टीतल्या गुरुजींनी अंधेरनगरीत न राहण्याचा निर्णय घेतला.”
“ठीक आहे, कल्याण हे तर्काधारित, बुद्धिगम्य असतं हे मान्य, पण समाधान? ते ही बुद्धिगम्य असतं हे कशावरून म्हणतोस राजन्?”
“हे बघ, समाधान उद्देशपूर्तीच्या प्रमाणात होतं हे तर आपण बघितलंच.
दुसरं शंकासमाधान, हेही शंकेचं पूर्ण तर्कशुद्ध उत्तर मिळाल्याशिवाय होत नाही.
आणि तिसरं, ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे तर पूर्णपणे ‘मानण्याचं’, म्हणजे काल्पनिक समाधान. तर उद्देश किंवा हेतू, तर्कबुद्धी आणि कल्पनाशक्ती हे तीनही बुद्धीच्या क्षेत्रात येतात, भावनेच्या नाही.
त्यामुळे कल्याण कशात आहे आणि समाधान कशातून मिळतं हे आपल्याला लहानपणापासून शिकवलंही जातं.”
“कसं शिकवलं जातं राजन्?”
“अरे, हितोपदेशातून, मूल्यशिक्षणातून, नीतिविचारातून समाज हे सतत शिकवत असतो. पण असो.
तर आयुष्याच्या आपण असलेल्या टप्प्यावर आपण साधारण किती सुखात किंवा दुःखात आहोत ह्याचं भान प्रत्येकाला असतं.”
“हो, खरंय, आता सुखदुःख मोजावं कसं हेही तू गेल्या खेपेत सांगितलंस राजन्, परंतु ते प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्याप्रकारे मोजावं लागणार असं तू म्हणाला होतास.”
“होय, सुखदुःखातील प्रत्येक घटकाची मोजमाप करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरीही आपापल्या वैयक्तिक प्राधान्यानुसार त्या सर्वघटकांची गोळाबेरीज किंवा मोजमाप आपल्या प्रत्येकाच्या मनात (वेगवेगळी का असेना) होतंच असते.”
“ओहो, आत्ताकुठे वळतो दिसतोय राजन् मापदंडाकडे!”
“हो, त्यामुळे सर्वांना पटेल असं इयत्तीकरण (calibration) केलेली सांकल्पनिक मोजपट्टी जर आपण बनवू शकलो तर आपण स्वतः त्या मोजपट्टीवरील कुठल्या इयत्तेत आहो हे प्रत्येक जण नेमकेपणाने सांगू शकेल.”
“सांग तर मग कशी बनवावी ती मोजपट्टी?”
“त्यासाठी आपण एक प्रयोगकरून बघू. आपल्याला जी मोजपट्टी बनवायची आहेना तिचे दोन भाग करू, डावीकडचा अर्धाभाग दुःखाचा आणि उजवीकडचा अर्धाभाग सुखाचा. आता मोजपट्टीच्या डाव्याबाजूचं टोक दुःखाचं आणि उजव्याबाजूचं सुखाचं. म्हणजे एका टोकाला पराकोटीचं दुःख आणि दुसऱ्या टोकाला पराकोटीचं सुख.”
“राजन्, पण पराकोटी म्हणजे नेमकं किती? एक कोटी, दोन कोटी की हजार कोटी?”
“तू सांग ना थोडा विचारकरून, पराकोटीचं सुख म्हणजे त्यापलीकडे काही शक्यच नाही असं.”
“अं . . . एव्हरेस्ट पादाक्रांत केल्याचा आनंद, जग जिंकल्याचा आनंद की स्वर्ग दोन बोटं उरल्याचा?”
“नाही रे, त्याही पलीकडे, तू गोष्टीत सांगितलेल्या चौपट राजाला नाहीका पारलौकिक सुखाची आस होती आणि त्या पारलौकिक सुखापुढे सगळ्या ऐहिक सुखावर पाणीसोडायला तो तयार होता, अगदी त्याच्या जिवावरसुद्धा!”
“म्हणजे स्वर्गसुख?”
“हां, आणि पराकोटीचं दुःख म्हणजे?”
“मरणप्राय वेदना, मृत्यू?”
“नाही, इतर प्राण्यांसाठी मृत्यू असेल कदाचित, गेल्या खेपेत आपण माकडिणीचं उदाहरण बघितलंच आहे. तिला स्वतःचा मृत्यू सगळ्यात दुःखद वाटत होता, आपल्या पोटच्या पोराच्या मृत्यूपेक्षाही. पण माणसांत दुसऱ्यासाठी जीव देणारे असू शकतात किंवा इतर काही दुःखांपेक्षा मृत्यूचे दुःख कमी समजणारेही असतात, असे लोक आत्महत्या करतात. तेव्हा स्वतःच्या मृत्यूहूनही जास्त दुःखद गोष्टी असू शकतात, आपण त्यांना नरकयातना म्हणूया.
तर स्वर्गसुख आणि नरकयातना ह्या आपल्या सांकल्पनिक मापदंडाच्या किंवा मोजपट्टीच्या दोन मर्यादा, किंवा दोन टोकं, ती तर निश्चित झाली. आता ह्या दोन टोकांना पारलौकिक सुखदुःख असल्यामुळे इहलोकीच्या सुखदुःखाचा संपूर्ण वर्णपट ह्यात आला. दोन्हीं टोकांना आपण दहा ही संख्या देऊ. डाव्या टोकाला नरकयातनांना ऋण दहा ‘–’ 10 आणि उजव्या टोकाला स्वर्गसुख म्हणजे धन दहा ‘+’ 10. मोजपट्टीच्या मध्याला म्हणजे दुःख आणि सुखाच्या भेदबिंदूवर शून्य 0. आता दुःखाच्या अर्ध्याभागात शून्यापासून उणे दहापर्यंत दहाभागांत – 1, – 2, – 3 . . . ते – 10 असे आकडे घालू आणि सुखाच्या अर्ध्याभागात शून्यापासून धन दहापर्यंत +1, +2, +3, . . . +10 असे, झाली बघ मोजपट्टी तयार.”
“शाबास राजन्, पण खरं सांग, ही संकल्पना तुझी आहे की ‘मूळ कल्पना परकीय’?”
“हुशार झाला आहेस! बरोबर पकडलंस!”
“मग सांग ना कोणाची आहे?”
“‘मॅक्स वेबर’ची, समाजशास्त्रातील Ideal Type नावानी प्रसिद्ध आहे.”
“Ok राजन्, पण एक गोष्ट मला इतक्यात लक्षात यायला लागलीय.”
“काय?”
“तू हल्ली खूपच ‘हलक्यात’ घेतोयस मला!”
“आँ?”
“मग काय तर!
म्हणजे, ‘हुशार झालायस तू!’ वगैरे असे शेरे तू खुशाल मारू लागलायस इतक्यात.
पण मी ही काही कच्च्या गुरुचा चेला नाहीय, तू बनवलेली सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून दाखवल्याशिवाय आणि आपल्या आयुष्यातलं दुःख निवारण करण्याचा आणि अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग तू शोधून काढल्याशिवाय तुला सोडणार नाही मी!
आपलं म्हणजे असंच असतं, हां, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर . . !”
असे म्हणून वेताळ निघाला आणि पुन्हा झाडावर जाऊन उलटा लोंबकळू लागला!
क्रमशः . . .
वेताळाचे सुख दुःखाचे विश्लेषण आवडले। इथे दोन विचार आहेत विक्रम आणि वेताळ। वेताळ याचा दृष्टिकोन त्याचा संसार मुक्त दुखसुखातून विभक्त असा हवा। उलट विक्रम अजूनही सुखदुःखात अडकलेला। प्रत्येक व्यक्ती त्याचा सुख दुःखाची व्यख्या वेगळी असू शकेल। शेवटी सेन्स हेच यास कारणीभूत आहे हा विचार योग्य वाटतो। फलजोतिष्य बद्दल सांगताना अनिश्चितता पासून निश्चित कडे जाण्याचा मानवी कल,, त्यातून वाटणारी सुरक्षितता ह्या गोष्टी विचार करण्यालायक आहेत। कर्मकांड करून भविष्यात सुख भोगू शकतो की योग्य कर्म करून सुख भोगू शकतो याबद्दल इथे विश्लेषण नाही। पण हा विचार करायला भाग पाडत। नेमकं कोणतं कर्म सुख देईल कोणतं दुःख देईल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे। शुद्ध ,चांगले विचार, हेच जवळ संत म्हणून वावरत असतात। तेच निरंतर सुख प्रदान करू शकतात,, रामदासांच एक अभंग आठवला,,
ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं । माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव । घालिना कीं देव कारागृहीं कारागृह देवादिकांचे चुकेना । तेथे काय जनां चुकईल चुकईल भोग हें कईं घडावें । लागेल भोगावें केलें कर्म केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे ।दास म्हणे भेटे संतजन
भावार्थ :- या अभंगात संत रामदास कर्मभोग आणि त्याचे परिणाम या विषयाची चर्चा करीत आहेत. त्या साठी ते इंद्राचे उदाहरण देतात. आपले राज्य कोणी तरी बळकावून बसेल असे वाटत असल्याने त्याच्या मनात नेहमीच उद्विग्नता असतं.एखादा बलवान दानव सर्व देवांना काराग्रुहात डांबून इंद्रपद मिळवून बसेल अशी भिती त्याला वाटते. संत रामदास म्हणतात की, देवादिकांना सुध्दा तुरंगवास चुकला नाही तर तो माणसाला कसा चुकणार?सुखदु:खाचे भोग माणसला कदापीही चुकवता येणार नाहीत. आपण जसे कर्म करू तसे भोग आपल्याला भोगावे लागणार असा कर्मसिध्दांत आहे. केलेल्या कर्माचे भोग भोगून संपवल्या नंतरच मनाची भ्रांती फिटते असे स्पष्ट मत येथे संत रामदासांनी व्यक्त केले आहे. ते पुढे असेही म्हणतात की, संतजन भेटल्यावरच ही प्रक्रिया घडून येते.
” सूकराप्रमाणे सुखेनैव उकिरड्यावर लोळण्यापेक्षा साॅक्रेटिससारखे निराश होणेच बरे!भलेही उकिरड्यावर लोळण्याचे ‘सुख’ अनंत का असेना!!”( It is better to be Socrates dissatisfied than a pig satisfied!)