प्रो. हरीमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील भगवद्गीता या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर देत आहे. या पुस्तकातील लेख १९५०च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.
‘खट्टर काका’ हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापिठाचे हे मैथिली भाषेचे तज्ज्ञ होते. मैथिली भाषेतील सौंदर्य फुलवून सांगणाऱ्या त्यांच्या पुस्तकांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
डिस्क्लेमरः हा लेख कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी लिहिलेला नसून गीतेच्या संबंधातील अजून एक (गंमतीशीर) विचार एवढाच त्यामागचा हेतू आहे याची कृपया नोंद घ्यावी.
माझ्या हातातील भगवद्गीतेचे पुस्तक बघून खट्टर काका अवाक झाले व घाबरतच म्हणाले,
“आजकाल तू गीतापाठ करत आहेस की काय? तुझ्यापासून आता चार हात दूर असलेले बरे.”
“का हो काका, असे का म्हणता?” मी आश्चर्यचकित होत म्हणालो.
काका सांगू लागले, “पहिल्या पहिल्यांदा अर्जुनाजवळ थोडी फार तरी माणुसकी शिल्लक होती. हा भाऊ आहे, हा काका आहे, हा माझा पुतण्या आहे, हे आजोबा आहेत…. या रक्ताच्या नात्यांवर बाण कसे चालवायचे? असे त्याला मनोमन वाटायचे. परंतु गीतेचे सार पिऊन झाल्यावर असा काही बाणांचा वर्षाव त्याने सुरू केला की सर्वांच्या छातीची चाळण झाली. म्हणून मी गीता हातात असणाऱ्यांना घाबरतो. कुठल्या तरी निमित्ताने आपल्या दोघांच्यात मतभेद झाले व तू अर्जुनासारखे विचार करू लागल्यास माझे काही खरे नाही. खट्टर काकाच्या आत्म्याला काही होणार नाही असे म्हणत मला मारून टाकल्यास तुझी काकू धाय मोकलून रडू लागेल. हे शरीर जीर्ण कापडासारखे आहे व ते गेले तरी काही फरक पडणार नाही हे तिला कोण समजावून सांगणार? काकाजी कपडे बदलल्यासारखे शरीर बदलत आहेत, त्यांना नवीन शरीर मिळेल. तुम्ही रडू नका, आनंदित रहा असे तू सांगणार आहेस का?
या गावातील तरुण गीतेतील उपदेशाप्रमाणे वागू लागल्यास येथील कित्येक काका, मामा मरून जातील. काकी, मामी विधवा होतील. कृपा करून गीतेच्या भानगडीत पडू नकोस. हवे असल्यास गीत रामायण वाच किंवा गीत गोविंद. परंतु गीता नको.”
“काका, गीता अहिंसा, वैराग्य यांचे शिक्षण देते असे जाणकार नेहमी म्हणतात.”
“हे बघ, मी साधा सरळ विचार करणारा माणूस. अर्जुनाने गीतेतील उपदेश ऐकून जर गांडीव धनुष्य तोडून भगवे वस्त्र धारण केले असते, कवचकुंडले उतरवून कमंडलू हातात घेतला असता आणि कुरूक्षेत्राची युद्धभूमी सोडून तीर्थक्षेत्राला गेला असता तर गीतेत अहिंसा-वैराग्य यांचे पाठ आहेत असे मी म्हणू शकलो असतो. परंतु हा तर मत्स्यवेधासारखे भावांचे मस्तकवेध करू लागला!
हे बघ काही कारण नसताना सुद्धा आजकाल तलवारी बाहेर काढतात. त्यांना गीतेच्या उपदेशाची नशा चढल्यास प्रत्येक गाव कुरूक्षेत्र होईल. तरी कृपा करून तुझ्यात तरुण रक्त वाहत असताना गीता वाचू नकोस.”
“खट्टर काका, गीता लिहिणाऱ्यांचा वास्तविक अभिप्राय अंत्यत वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
काका थोडेसे रागाच्या भरातच, “कुठला दुसरा अभिप्राय असू शकेल हे मला कसे कळेल? गीता सांगणाराच रथात सारथी होऊन पुढे बसला. तेव्हाच रथ का मोडून टाकला नाही? अर्जुना मी तुला शरीर नश्वर आहे, संसार क्षणभंगूर आहे व हस्तिनापुरातील हस्ती एका दिवशी मातीमोल होतील यासाठी रक्ताचे पाट वाहवणार आहेस का? सांसारिक सुख तुच्छ आहेत. राज्याची आशा सोडून दे. सिंहासनासाठी वृद्ध पितामहांवर व पूज्य द्रोणाचार्य़ांवर बाण मारणे तुला शोभेल का? फार फार तर क्षत्रिय असून रणांगणातून पळून गेला म्हणून लोक हसतील. पंरतु जे खरोखर ज्ञानी आहेत ते निंदा व प्रंशसा यांच्या पलिकडे असतात. त्यांची मने विचलित होत नसतात. हे सर्व उपद्व्याप सोडून दे व माझ्याबरोबर हिमालयाला चल. असे काही तो म्हणाला नाही. उलट तो अर्जुनाला भडकावत होता, युद्ध करण्यास भाग पाडत होता. आणि तुला वाटते की गीतेत अहिंसा व वैराग्य आहे. तुझी अक्कल कुठे गेली आहे?”
“काका, मोठमोठी शहाणी सुरती माणसं गीतेद्वारा विश्वशांती स्थापित करत आहेत. आणि तुम्हाला मात्र त्यात युद्धाचा संदेश दिसतो!”
काका थोडे हसतच म्हणाले, “तू कधी पोवाडे ऐकले आहेस का? त्यात गाणे म्हणत तुमच्यात जोश आणतात. शेवटी काय तर एका दिवशी मरूनच जायचे असते. याच बोलीवरून कित्येक जण मरण्यास तयार होतात. मला तर हे सगळे गीतेत दिसते. पंरतु कधी तरी मरायचे असते म्हणून आत्ताच मरून जा हे काही मला पटत नाही.”
“काका, भगवान श्रीकृष्णाच्या मते जीव कधी नष्ट होत नाही.”
“जीव जर नष्ट होत नसेल तर खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा का दिली जाते? अभिमन्यूच्या वधानंतर एवढे आकाशपाताळ एक करण्याची गरज काय होती? जयद्रथावर सूड का उगवला? तेव्हा त्याला आपले शब्द आठवले नाहीत का? तू अजूनही बच्चा आहेस या गोष्टी तुला कळणार नाहीत.”
“खट्टर काका, सर्व उपनिषदांचे मंथन करून भगवान श्रीकृष्णाने गीतारूपी अमृत अर्जुनाला पाजले असे म्हटले जाते.”
“हा अर्जुन म्हणजे कुक्कुल बाळंच होता! म्हणूनच श्रीकृष्णाने त्याला चुचकारत युध्दाला जुंपले. अर्जुनाला चुचकारण्यासाठीच गीता लिहिली की काय असे वाटू लागते. मुळात श्रीकृष्णाला युद्धाची इच्छा होती. अर्जुनाला छू करून सोडून दिला व महाभारताचा तमाशा बघण्यात श्रीकृष्ण दंग झाला. अर्जुनाला इतका चेव चढला होता की त्यांनी संपूर्ण वंशच निर्वंश करून टाकले.”
“काका, अर्जुन तर अनासक्त होऊन युद्ध करत होता त्याला राज्याचा लोभ नव्हता.”
काका हसतच म्हणाले, “हस्तिनापूरच्या गादीचा वारस तूच जणू आहेस की काय! अर्जुन अनासक्त असता तर सर्व चुलतभावांना मारून दिल्लीत राज्याभिषेक करून घेतला असता का? कसली ही दिल्ली! दिल्लीने इतके रक्तपात पाहिले आहेत की तेथील किल्ल्याचे नाव सुद्धा लाल किल्लाच आहे!”
“धन्य आहात काका, कुठल्या कुठे गोष्टी नेऊन ठेवता?”
काका आपल्याच तंद्रीत, “बघ, श्रीकृष्णाला युद्ध हवे होते व अर्जुनाकडे स्वत:ची अशी बुद्धी नव्हती. त्यामुळे मनाला येईल तसे श्रीकृष्ण बडबडत गेला – शरीर नाशवंत आहे कर युद्ध, आत्मा अमर आहे कर युद्ध, तू क्षत्रिय आहेस कर युद्ध, युद्ध नाही केलेस तर छी थू होईल, कर युद्ध! गंमत म्हणजे क्षत्रियांनी युद्धभूमी सोडून पळून जाण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे म्हणणारा श्रीकृष्णच रणछोडदास होता! यालाच परोपदेशे पांडित्य म्हणता येईल! फक्त अर्जुन ऐकत सुटला! सर्व काही ऐकूनसुद्धा पदरी काही पडले नाही म्हणून श्रीकृष्णानी आपले अक्राळविक्राळ रूप दाखवून अर्जुनाला भीती दाखविली. तसे सांगूनही तुला कळत नाही तर हे बघून तरी कळेल! लहान मुलांना भीती दाखवतात तसे हे झाले!”
“काका, गीतेत ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग इत्यादी आहेत की……”
“सर्व योगाचा मूळ उद्दिष्ट ‘तस्मात् युद्धस्य भारत!’ म्हणजे कौरवांना मारून टाक. कसे तरी करून अर्जुनाला लढण्यास प्रवृत्त करायचे होते म्हणून निष्काम कर्म आणि अनासक्ती योगाचा महाजाल त्याने उभा केला. अर्जुनाने अगोदरच बुद्धी गहाण टाकली होती व तो श्रीकृष्णाच्या तालावर नाचू लागला. परंतु ज्याला समजण्याची शक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णच चालाख निघाला.”
“काका भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भरीस पाडले? मला तसे वाटत नाही!”
काका म्हणाले, “तुझी काय बिशाद, मोठमोठ्या पंडितांनासुद्धा तसे वाटत नाही. पंरतु मला स्पष्ट दिसते. ‘सगळ्या इच्छांचा त्याग करणारेच यथार्थ ज्ञानी असतात’ असे सांगणारेच राज्याचे व स्वर्गाचे प्रलोभन का दाखवतात? अर्जुना, लढता लढता तू मेल्यास स्वर्ग मिळेल व जिंकल्यास राज्य मिळेल. दोन्ही हातात लाडूच लाडू. त्यामुळे अर्जुना, उठ आणि युद्धास सज्ज हो!
मुळात अर्जुनाला तर्क माहीत नसावे. त्यामुळे तो उभयसंकटात पडला. मी त्याच्या जागी असतो तर सांगितले असते की, हे भगवान, यासाठी तिसरा मार्गही आहे – अर्जुनाला बंदी करून ठेवणे. परंतु अर्जुनाला फक्त धनुष्यबाण चालवण्याचेच ज्ञान होते. त्याला वितंडवाद करणारे कुणी भेटले नसतील. मी श्रीकृष्णालाच विचारले असते की भगवान, सर्व मनोरथ व्यर्थ असल्यास हा रथ तू का चालवत आहेस?”
“काका, आपण सर्व ठिकाणी हे तर्कशास्त्राचे घोडे पुढे का दामटता?”
“का म्हणून दामटू नये? हेच तर आपल्या देशाची महान परंपरा आहे. खंडन-मंडनमधील ही सूक्ष्मदृष्टी अजून कुठल्याही संस्कृतीची असू शकत नाही. गंमत म्हणजे हाच श्रीकृष्ण एके ठिकाणी निंदा व प्रशंसा यांना समान समजले पाहिजे असे म्हणतो. तर दुसऱ्या ठिकाणी युद्ध केले नाहीस तर निंदा-नालस्ती होईल. त्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे म्हणतो. या अनासक्त कर्माबद्दल प्रबोधन करत असताना यशापयशांना सारखे समजून युद्ध करण्यास सांगतो. आणि नंतर मात्र जिंकण्यासाठी प्रलोभन दाखवत शत्रूला जिंकून राज्य कर असेही म्हणतो. जर सुख-दुःख, यश-अपयश, सगळे सारखेच असतील तर युद्ध जिंकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण एवढा का आग्रही असतो?”
मी काही बोलत नाही हे बघून काका म्हणाले, “अरे, मला एक गोष्ट कळत नाही. परमेश्वराची माया अगाध आहे. त्या मायाजालात आम्हा सर्वांना तो कठपुतळीसारखे नाचवत असतो. हेच जर खरे असेल तर गीता सांगण्याचे सोंग कशाला हवे? हवेत हात फिरवले की अर्जुनाची युद्धाला नाही म्हणण्याची काय बिशाद? मुकाट्याने त्याने युद्ध केले असते. परमेश्वराच्या इच्छेनुसार हे जग चालत असल्यास त्याने तसे करून दाखवावे. तू सर्व काही त्याज्य करून मला शरण ये. तुला सर्व पापातून मी मुक्त करतो. असे त्याला का म्हणावेसे वाटते? हे तर अगदी पाद्री वा बिशप बोलल्यासारखे वाटते. परमेश्वराला हे शोभते का? शेवटी शेवटी तर अर्जुना, मी तुला आज्ञा देतो, तू युद्ध कर अशी आज्ञा देतो.”
“काका, माझ्या मते संपूर्ण गीतेचा निष्कर्ष निष्काम कर्म आहे.”
“हेच मला समजत नाही. इच्छा बाळगून केलेले कुठलेही कर्म निष्काम कसे काय असू शकते? जे पण कार्य केले जात असताना त्यामागे काहीना काही कामना असणारच. सर्व कामनांचा त्याग कर हीसुद्धा एक कामनाच आहे. निष्काम कर्म हा माझ्या मते शुद्ध विरोधाभास आहे.”
“काका, तुमच्या तर्कविचारांपुढे मी काही टिकणार नाही. परंतु जीवनमुक्त असणाऱ्याला कुठलीही कामना नसते, हे तरी तुम्हाला मान्य आहे की नाही?”
“मला अजूनपर्यंत जीवनमुक्त असा कोणीही सापडला नाही. तसा कुणी भेटल्यास काठीने बदडल्यास त्याची स्थितप्रज्ञता किती काळ टिकते ते मला बघायचे आहे. या गोष्टी फक्त ऐकण्यात बोलण्यात बरे वाटतात. प्रत्यक्ष व्यवहारात नाही.”
मी थोडा गंभीर होऊन, “काका, तुमच्या मते ही भगवद्गीता केवळ अर्जुनाला युद्ध करण्यास भाग पाडण्यासाठी लिहिलेली आहे की काय?” म्हणालो.
काका हसत हसत म्हणाले, “अरे, तू आहेस कुठे? ही सर्व कविकल्पना आहे. कवीला काही वास्तव प्रसंगांचा आधार घ्यावा लागतो. आपल्या काव्यातील चमत्कारसदृश प्रसंगांचे वर्णन करण्यासाठी एखादा कवी रामचंद्राच्या आयुष्यातील प्रसंगावरून रामगीता लिहितो. आणखी एखादा शंकराच्या आयुष्यावरून शिवगीता लिहितो. आणखी एखादा कवी यमुनेच्या तीरावर प्रच्छन्नपणे बागडणाऱ्या गोपिकांवरून गोपीगीता लिहितो. त्याचप्रमाणे आपल्या कवित्वाचे प्रदर्शन करण्यासाठी कुरुक्षेत्रातील युद्धप्रसंगाचा खुबीने वापरून भगवद्गीता लिहिली असेल. गंमत म्हणजे एवढ्या मोठ्या अठरा दिवसांच्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत गीतेतील अठरा अध्याय ऐकून घेण्यास कुणाला तरी फुरसत असेल का? अठरा अक्षौहिणी सैन्याच्या धमासान युद्धाच्या वेळी कुंभक प्राणायाम करूनच हे ऐकावे लागेल. संजयच्या डोळ्यात टीव्ही कॅमेरा बसवलेले असतील का? हा कवी जरा वेगळ्या प्रकारचा होता. त्याला सांख्ययोग व वेदांतातील पांडित्याचे प्रदर्शन करायचे होते. म्हणून त्याचे प्रदर्शन या गीतेत सापडते.”
“काका, तुमच्या दृष्टीने गीतेपासून काहीच फायदा झाला नाही?”
“फायदा झाला की! या काव्यामुळे कुटुंबनियोजनाला नक्कीच चालना मिळू शकते!”
“ते कसे काय?” मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
“केवळ कर्म करत रहा, फलापेक्षा धरू नका. आणि हे फळ संतानसुद्धा असू शकेल. आणखी किती स्पष्ट करू? तुला नंतर समजेल.”
“काय काका, प्रत्येक गोष्ट तुम्ही विनोदी अंगानेच घेता. गीतेचा उपदेश आहे की अनासक्त होऊन कर्म करावे.”
“बरोबर! मीसुद्धा तेच म्हणतो. या उपदेशाप्रमाणे सर्व जण वागू लागल्यास या देशात कधीच क्रांती होणार नाही. विषमता जाणार नाही. कामगार पगारवाढीसाठी संप-हरताळ करणार नाहीत. दंगे होणार नाहीत. म्हणूनच मला एक नवीन गीता हवी. चंगळवादाची लाट थोपवणारी, कर्म व फळ दोन्ही हातात हात घालून जाणारी हवी. या गीतेला कुरुक्षेत्र नको, कृषिक्षेत्र हवे. या गीतेत कृतीचा मंत्र असेल. त्यातूनच आपल्या राष्ट्रगीतेतील सुजलाम सुफलाम खरे होतील.”
चुपचाप गीता झाकून ठेवत तेथून मी निसटलो.
पूर्व प्रसिद्धीः ऐसी अक्षरे
१९ जानेवारी २०१८
महाभारत हे महाकाव्य (epic) आहे आणि भगवद्गीता हे महाभारतातले कर्तव्यशास्त्र (deontological ethics) आहे. या शास्त्राला महाभारतातल्या इतर पर्वाचा आणि घटनांचा संदर्भ आहे.. हा संदर्भ गीतेतील कर्तव्याला न्यायाची (jurisprudence) जोड देतो (उदा. शांती पर्व आणि इतर काही पर्वांतील कथा आणि चर्चा). खुद्द गीतेतील कर्मयोगाला समत्वाचा आणि परस्परत्वाचा (reciprocity, golden rule) आधार आहे. हाच आधार कांटिअन कर्तव्य शास्त्राला ही आहे. हे सर्व विसरून गीतेची किंवा त्यातील संकल्पनांची खिल्ली उडवता येते .. जशी पु. लं.नी त्यांच्या अप्रतिम “तुझे आहे तुजपाशी” मधे स्थितप्रज्ञाची किंवा हरीमोहन झांनी त्यांच्या मजेदार खट्टरकाकांत गीतेची उडवली आहे. पण यामुळे गीतेचे तत्वज्ञानातील किंवा कर्तव्य शास्त्रातील ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. मला वाटत लेखकाचा तो उद्देशही नसावा.
जाता जाता: अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Idea of Justice मधे कर्तव्य-शास्त्र (deontology) आणि न्याय-शास्त्र (jurisprudence, consequential theory of justice वगैरे) याची भगवद्गीतेच्या संदर्भात चर्चा केली ती वाचण्याजोगी आहे. गीतेतील कर्तव्य आणि नीती च्या मर्यादा त्यात सांगितल्या आहेत; ज्या खरे तर एकूणच नीती शास्त्राच्या मर्यादा आहेत.. पण गीतेचे ऐतिहासिक महत्त्व त्यात निर्विवाद मान्य केले आहे, जे अजूनही टिकून आहे.
“श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ नरकात नेला” या नावाचे एक पुस्तक पंढरपूरच्या एका आमदाराने लिहिलेले आहे. तेही अत्यंत वाचनीय आहे. तसेच गीतेवरील “नारायणीयं” हे ना. ग. गोरे यांनी लिहिलेले पुस्तक वाचनीय आहे. राजीव साने यांनी लिहिलेले “नवपार्थाचे हृद्गत” हेही पुस्तक विचारप्रवण करणारे आहे. पण गीतेचे वाचन श्रद्धेने आणि भक्ती भावाने करणाऱ्या लोकांसाठी ही पुस्तके नाहीत.