पुस्तक: एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…
लेखक: विजय पाष्टे
प्रकाशक: सिंधू शांताराम क्रिएशन्स
अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग आणि ‘एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…’ असं भलंमोठं, भडक, अंगावर येणारं नाव हा या कादंबरीचा प्रथम नजरेत भरणारा दोष! त्याकडे दुर्लक्ष करून ही कादंबरी वाचावी का? हरकत नाही, वाचू. पण त्यावर समीक्षा लिहायची? का नाही लिहायची? लेखन अशुद्ध आहे, प्रूफ रीडिंग गलथान आहे, नाव भडक आणि अंगावर येणारं आहे म्हणून काय झालं? लेखनातला आशय हा अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग, भडक आणि अंगावर येणारं नाव आहे म्हणून रद्दी समजायचा? तो नाकारायचा? वाचल्याशिवायच कादंबरी दूर सारायची? मनातल्या अशा उलटसुलट विचारांनंतर सदर कादंबरी वाचायला घेतली.
इचलकरंजीत राहणाऱ्या मनोहर ऊर्फ मन्या बोनकरची ही गोष्ट. पंधरा वर्षे वयाचा, साधा, समंजस मन्या. तो एकेकाळी पैलवानकी केलेल्या त्याच्या वडिलांना पुरुष’ वाटत नाहीये. त्यामुळे वैतागलेले ते मन्याला ‘बायल्या’ म्हणायला लागतात. या सगळ्याने मन्या उसकवत जातो. त्याचं आयुष्य त्याच्या हातात राहत नाही.. स्वतःच्या विपरीत त्याचा एक वेगळाच प्रवास सुरू होतो. अशाप्रकारे मन्यावर झालेल्या मानसिक बलात्काराची गोष्ट सांगणाऱ्या लेखकाला इथे शारीरिक, मानसिक आणि इतर कुठल्याही प्रकारच्या बलात्काराचं समर्थन करायचं नाहीये किंवा सहानुभूती द्यायची नाहीये. तर भारतात होणाऱ्या बलात्कारांमधील पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीचा हात त्याला उलगडवून दाखवायचा आहे. तो कसा? त्याचा उलगडा आपल्याला सदर कादंबरी वाचूनच होईल.
तर मनोहर ऊर्फ मन्या बोनकर नावाचा शाळकरी मुलगा हा या कादंबरीचा नायक. नायक म्हणजे हिरो नाही, तर केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा. त्याच्या घरात वडील आणि भोवताली टारगट मुलांचे टोळके हे खलनायकाच्या भूमिकेत आहेत. खरंतर मन्याचे वडील आणि ती शाळकरी मुलेही खलनायक नाहीतच, तर त्यांच्या अवतीभोवतीचं सांस्कृतिक पर्यावरण आणि परिस्थिती हेच या कादंबरीत खलनायकाची भूमिका बजावतात. सुष्ट आणि दुष्ट असा पारंपरिक संघर्ष, जसा तो जवळजवळ प्रत्येक कादंबरीत असतो, तसा तो इथेही आहे. आणि त्यापलीकडेही काही आहे. नायक हुशार आहे. पण त्याची हुशारी ॲकॅडेमिक आहे. तो व्यवहारचतुर नाही. त्यामुळेच वडिलांनी आणि मुलांच्या टोळक्याने आरंभलेल्या त्रासांपासून बचाव करण्याचा चतुरपणा त्याच्या अंगी नाही. त्याचा साधेपणा, सरळमार्गी वृत्ती याचं कौतुक होण्याऐवजी तो सगळ्यांच्या टिंगलीचा विषय बनून गेला आहे. अनेकदा स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असं म्हटलं जातं, त्याच्या अगदी उलट पुरुषांनीच पुरुषाला त्रास देण्याचा प्रकार या कादंबरीच्या पानागणिक अधिक तीव्र स्वरूप धारण करत जातो.
मन्याची सभ्य व्यक्तिरेखा आणि त्याचा शारीरिक, मानसिक छळ करणारे त्याचे वडील आणि मुलांचे टोळके हे या कादंबरीत एक हिंस्त्र संघर्ष उभा करतात. या संघर्षमय वातावरणातून स्थानिक-सामाजिक व्यवस्थेचे चित्रच आपल्यापुढे साकारते. मुलांचे हे टोळके आपल्याकडील सामाजिक विषमतेचे, त्यातून निर्माण झालेल्या दैन्यावस्थेचे, मूल्यहीन शैक्षणिक पर्यावरणाचे बळी आहे. ही टारगट मुले पौगंडावस्थेत असल्याने त्यांच्या बोलण्या-वागण्यात लैगिंकतेचे त्यांना वाटणारे आकर्षण, अर्धवट ज्ञानामुळे निर्माण झालेले लैंगिक गंड आहेत. मनात कोंडलेल्या लैंगिक वासनांचे शमन अर्वाच्च शब्दांवाटे करण्यासाठी या पोरांनी मन्याला टार्गेट केले आहे. या मुलांचे आपापसातील संवाद, त्यांनी मन्याची वेळोवेळी उडवलेली टर कागदावर उतरवताना लेखकाने विनासंकोच असभ्य आणि अश्लील शब्दांची पखरण केली आहे. या कादंबरीचा तो एक आवश्यक आणि अविभाज्य भाग म्हणावा लागेल. आजच्या मुलांची बोलीभाषाही लेखकाने अचूक पकडली आहे. कादंबरीतल्या घटना इचलकरंजीतल्या असल्या तरी त्या महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही अर्धविकसित शहरात घडू शकतील अशा प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत.
भडक विषयावरील भडक शैलीतील कादंबरी असं या कादंबरीचं वरकरणी रूप असलं तरी, या कादंबरीला अशी विशेषणं वापरणं काहीसं अन्यायाचं ठरेल. लेखक या विषयाला प्रामाणिकपणाने भिडला आहे याची जाणीव कादंबरी वाचताना होत राहते. समाजाच्या ज्या स्तराचे, वर्गाचे चित्रण लेखक या कादंबरीत करू पाहतो, त्या स्तरातले वास्तव, त्या वास्तवात घडणाऱ्या घटना, सदर घटनेतल्या स्त्री-पुरुषांचे संघर्ष आणि संवाद पांढरपेशा समाजातल्या वाचकांना कदाचित भडक वाटतील. वीकएण्डला मसालेपट पाहणाऱ्या, रोज भारंभार मालिकांची पारायणे करून गोड, गुळमट जगणाऱ्या आजच्या समाजाला नकोसे वाटणारे हे चित्र आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषमतेतून आणि विपन्नावस्थेतून आज जो मूल्यहीन समाज निर्माण होऊ पाहतो आहे, तो काही केल्या दृष्टीआड करता येणार नाही. आजच्या पांढरपेशा वर्गाच्या संपन्नावस्थेवर ओरखडे उमटवणारे हे टाळता न येणारे समाजवास्तव आहे.
ही केवळ मन्याची आणि त्याच्या छळाची गोष्ट नाही. आपल्या समाजातील उगवत्या पिढीचे हे चित्रण आहे. ही पिढी संस्कारक्षम शिक्षण, शाळेतून मिळणारे मूल्यशिक्षण यांपासून वंचित आहे. ही उनाड, रिकामटेकडी शाळकरी मुले तरुण वयात गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षणहक्काच्या कायद्याच्या काळातही धड शिक्षण उपलब्ध नाही. धडपड करून ते मिळवावं तर, रोजगार उपलब्ध नाहीत. लैंगिक भान आलेल्या वयात मार्गदर्शन करायला सभोवती समंजस पालक किंवा सोबती नाहीत. अश्यावेळी या मुलांकडून लैंगिक गैरवर्तनाचे प्रकार घडले तर नवल नाही. कादंबरीतील व्रात्य मुले ही मूलतः व्रात्य किंवा गुन्हेगार नाहीत. ती अज्ञानाची आणि (गैर)संस्काराची बळी आहेत. त्यांचे नीतिशून्य वर्तन यातूनच जन्माला आलेले आहे. सणसोहळे, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या जल्लोषात साजऱ्या करण्यात मग्न असलेल्या आजच्या सुस्थितीतल्या समाजाचे या भीषण वास्तवाकडे लक्ष नाहीये. लेखक विजय पाष्टे यांच्या या कादंबरीतून अप्रत्यक्षपणे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
शिर्षकात फक्त ‘पुरुष’ असला तरी, कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत ‘प्रत्येक पुरुषातील स्त्रीस आणि स्त्रीतील पुरुषास’ असं लेखक म्हणतो. यातूनच लेखकाला स्त्री आणि पुरुष या भेदांपलिकडे जाऊन त्यांच्यातल्या माणसांबद्दल काहीतरी सांगायचं आहे याची जाणीव होते. परंपरेने चालत आलेल्या पुरुषार्थाच्या भ्रामक कल्पना बाळगून असलेला मन्याचा बाप शंकर, त्याच्या जाचाखाली दडपलेली, आपला मुलगा ‘बायल्या’ निपजेल या कल्पनेने वेडीपिशी झालेली मन्याची आई पार्वती, नवऱ्याच्या पळून जाण्याने पुरुषांच्या बाबतीतल्या सनातन संकल्पनाच उराशी बाळगून असलेली तथाकथित पुढारलेली लक्ष्मी, याच लक्ष्मीची मन्यावर जीव असणारी निरागस मुलगी सुगंधा, लहानपणापासून कसलेच संस्कार किंवा मूल्यशिक्षण वाट्याला न आलेले टारगट अव्या आणि किशा आणि मनात असूनही एकटे पडण्याच्या भितीमुळे अव्याच्या आणि किशाच्या टारगटपणाला विरोध करू न शकणारा अशोक ऊर्फ अशा ही सारी या कादंबरीतील पात्रं! पुरुषप्रधान संस्कृतीने आणि सामाजिक परिस्थितीने केवळ मन्यावरच नव्हे तर या सगळ्या व्यक्तिरेखांवर बलात्कार केलाय. अर्थात हे त्या व्यक्तिरेखांना कळत नाहीये हेच त्यांचं भागधेय आहे.
कोणताही पुरुष हा काही स्वतःच्या मर्जीने ‘पुरुष’ म्हणून जन्माला येत नाही. निसर्गतः तो माणसाचं शरीर धारण केलेला प्राणी म्हणून या जगात येतो. तिथून पुढे त्याच्याही खूप आधीपासून अस्तित्वात असलेली इथली पुरुषसत्ताक समाजव्यवस्था लिंगभेदावर आधारित स्त्री किंवा मग पुरुष अशी लेबलं त्याच्यावर लावते. पुरुषलिंग असेल तर त्याला वंशाचा दिवा बनवते. पुढे याच लेबलांचा भाग आणि वंशाचा दिवा म्हणून त्या मातीच्या गोळ्याला विशेष पुरुषी वागणूक दिली जाते. अर्थात ही वागणूक, शिकवण देण्यात स्त्रियांचा विशेष वाटा असतो. आणि पुढे याच स्त्रिया सदर पुरुषाच्या, स्वत:च शिकवलेल्या पुरुषीपणाच्या शिकार ठरत असतात. हे असं दुष्टचक्र इथे वर्षानुवर्षे सुरू आहे. याच वातावरणात नव्या पिढ्या जन्म घेत आहेत, प्रौढ आणि पुरुष होत आहेत. मन्या बोनकर या पौगंडावस्थेतल्या मुलाला केंद्रस्थानी ठेवून स्त्री-पुरुषांकडे आणि त्यांच्यातील लैंगिक नात्याकडे पाहण्याचा समाजाचा मानसिक दृष्टीकोन मांडताना वर्तमानाचा एक समाजपट उलगडून वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण समाजाच्या या नैतिक विध्वंसाकडे, त्यातून अस्तित्वात आलेल्या भीषण वास्तवाकडे ही कादंबरी लक्ष वेधते.
लेखक मनोगतात म्हणतो त्याप्रमाणे त्याने मुळात नाटकासाठी लिहिलेला हा बोल्ड विषय सगळ्यांनाच आवडला. लिखाण एक्सायटिंग आणि हटके वाटलं. मात्र हे सेन्सॉर होणार नाही असा थेट शेरा बसून सगळं तसंच पडून राहिलं.
“माणूस आला…. कचरा येतो…. म्हणजे माणूस येतो आणि कचरा करतो…. पुन्हा कसं? तर माणूस आणि कचरा म्हणजे अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू! आज याच माणसाच्या, विशेषतः आपल्या देशातील माणसांच्या आजूबाजूला जे घडतं आहे, ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आपल्याशी आहे; अशा कचऱ्याच्या गोष्टींना सेन्सॉर नावाच्या परफ्यूमने आपण किती दिवस झाकून ठेवणार? ह्या झाकाझाकीत चुकून अख्ख्या देशाचं, देशात जगणाऱ्या समाजाचंच डंपिंग ग्राऊंड झालं तर?” लेखकाच्या या मनोगती प्रश्नाला उत्तर म्हणून आपण जगताना निर्माण केलेल्या (किंवा झालेल्या) भौतिकच नव्हे तर आर्थिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक कचऱ्याने आपल्या समाजाचं डंपिंग ग्राऊंड होऊ नये याची काळजी म्हणून तरी ही कादंबरी वाचायलाच हवी.
अशा प्रकारची पुस्तके वास्तव समाज स्तिथी दर्शवतात… खूपच सुंदर समीक्षा