मासिक संग्रह: एप्रिल, २०२२

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या एप्रिल अंकात शिक्षणक्षेत्रात अपेक्षित आमूलाग्र बदलांविषयी आणि त्या प्रयत्नात येत असणाऱ्या अडचणींविषयी लिहिताना अनेकांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाधारित विचार प्रगट केले. ह्या अनुभवांचे मूल्य कसे ठरवावे? कामे करत असताना होत असणारी निरीक्षणे, त्यात येणाऱ्या अडचणी आणि निघालेले/काढलेले मार्ग, एवढेच नव्हे तर, जे साधायचे आहे ते साधता येत नसल्याची तगमग समजून घेतली तर ह्या संस्थात्मक किंवा व्यक्तिगत प्रयत्नांना बळ पुरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे याविषयी शंकाच उरणार नाही.

समाजसुधारणेमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांचा, संस्थांचा जितका सहभाग, तितकाच विविध वैचारिक प्रवाहांचादेखील आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ९

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, आता एकदा आपण सिंहावलोकन करूया.”

“तुला रे कशाला हवं सिंहावलोकन? तसाही फांदीवर उलटा लटकत करतोसच की मागच्या वाटेचं अवलोकन. वेताळावलोकन म्हण हवं तर त्याला.”

“बरं,बाबा, तसं म्हण. खूश?
तर, सर्वप्रथम फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची कारणे कोणती ह्या प्रश्नावर तू ह्या सर्व कारणांच्या मुळाशी माणसाच्या दोन स्वाभाविक इच्छा आहेत असे म्हटले होतेस. पहिली आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याची आणि दुसरी भविष्याच्या अनिश्चिततेतून येणारी असुरक्षितता घालवण्याची.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ८

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, गेल्या खेपेत तू सर्वसमावेशक सुखाची व्याख्या ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवेहवेसे, आनंददायक वाटते आणि जे त्याच्यासाठी कल्याणकारक, समाधानकारक असते ते सुख आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख’ अशी केलीस. तसेच व्यक्तिगत सुखाची व्याख्या; ‘प्रत्येक व्यक्तीने जो अग्रक्रम ‘स्वतः’ निवडून एखाद्या गोष्टीस प्राधान्य दिले असेल त्यात त्या व्यक्तीला सुख वाटत असते, अशी केली होतीस.

त्या व्याख्या करतांना सुखदुःख कसं तुलनात्मक असतं ह्याविषयी तू बोलला होतास. परन्तु अशी तुलना करण्यासाठी सुखदुःख मोजण्याचा मापदंड तू कसा तयार करशील असा प्रश्न मी तुला होमवर्क म्हणून दिला होता.”

पुढे वाचा

तांड्यावरच्या मुलांचं शिक्षण आणि प्रश्न

विदर्भातल्या अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत फासेपारधी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. फासेपारधी समुदायाच्या मुलांच्या शिक्षणावर काम करताना काही गोष्टी प्रकर्षाने मला दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे फासेपारधी समाजाचा परंपरागत शिकार व्यवसाय आणि त्यांचं स्थलांतर! १९७२च्या वन्यजीवसंरक्षण कायद्यानुसार शिकार करणं हे जरी कायदेसंमत नसलं तरी आत्ताही काही भागांत फासेपारधी समुदायाकडून लपून शिकार केली जाते. आणि हा व्यवसाय करण्यासाठी फासेपारधी समाजातील कुटुंबं स्थलांतर करतात. एका गावातून दुसऱ्या गावाच्या जंगलांमध्ये आसऱ्याने मुक्काम करून राहणे असं चालतं. 

मागच्या वीस-पंचवीस वर्षांत फासेपारधी समाजातील माणसं काही प्रमाणात तांडा वस्ती करून एका ठिकाणी राहू लागली आहेत.

पुढे वाचा

आदिवासी तरुणांमध्ये जाणीवजागृती

इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी भारतातील वनांचे व्यवस्थापन त्या त्या भागातल्या गावसमाजाकडून होत असे. भारतातील घनदाट वनराईचे इंग्रजांना फार अप्रूप वाटू लागले. कारण जहाजबांधणी, रेल्वेस्लीपरनिर्मिती व इतर उपयोगासाठी त्यांना हवे असणारे इमारती लाकूड भारतात मुबलक होते. इंग्रजांनी भारतात त्यांचा अंमल प्रस्थापित केल्यावर १८६५ व १८७८मध्ये कायदे करून भारतातील वनसंपत्ती ही सरकारी मालमत्ता असल्याचे घोषित केले. त्यामुळे वनांवर अवलंबून असणारे, वनक्षेत्रात जमीन कसणारे आणि पिढ्यानपिढ्या वनांचे संवर्धन करणारे आदिवासी हे वनावर अतिक्रमण करणारे चोर ठरले. भारत स्वतंत्र झाल्यावरही या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.

पुढे वाचा

दर्जात्मक शिक्षणाची चळवळ – जमिनीवरील आव्हाने

दर्जात्मक शिक्षणासाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. अनेक ठिकाणी यावर काम होत आहे, पैसे खर्च होत आहेत, पण अपेक्षित दिशेने प्रगती मात्र झालेली दिसत नाही. दर्जात्मक शिक्षण कसे असावे हे अनेकांनी आपापल्या परीनं समजून घेण्याचा प्रयत्नदेखील झालेला दिसतो. परंतु तरी, शिक्षणाला सर्वसमावेशक बनवण्याचे किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे काम प्रत्यक्षात उतरवणे आपल्याला इतके आव्हानात्मक का वाटते आहे? शिकण्याच्या वेगवेगळ्या जागा निर्माण करून मुलांना शैक्षणिक संधी देऊ इच्छिणाऱ्या एका सेवाभावी संस्थेतील आपले चार मित्र त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुढे वाचा

एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…

पुस्तक: एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…
लेखक: विजय पाष्टे

प्रकाशक: सिंधू शांताराम क्रिएशन्स

अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग आणि ‘एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…’ असं भलंमोठं, भडक, अंगावर येणारं नाव हा या कादंबरीचा प्रथम नजरेत भरणारा दोष! त्याकडे दुर्लक्ष करून ही कादंबरी वाचावी का? हरकत नाही, वाचू. पण त्यावर समीक्षा लिहायची? का नाही लिहायची? लेखन अशुद्ध आहे, प्रूफ रीडिंग गलथान आहे, नाव भडक आणि अंगावर येणारं आहे म्हणून काय झालं? लेखनातला आशय हा अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग, भडक आणि अंगावर येणारं नाव आहे म्हणून रद्दी समजायचा?

पुढे वाचा

पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नीक-एकपतिक पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बरेचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.

यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक?

पुढे वाचा

खट्टरकाकांची भगवद्गीता

प्रो. हरीमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील भगवद्गीता या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर देत आहे. या पुस्तकातील लेख १९५०च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.

‘खट्टर काका’ हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापिठाचे हे मैथिली भाषेचे तज्ज्ञ होते.

पुढे वाचा

व्होल्गा ते गंगा – मातृवंशीय ते पितृसत्ताक भारतीय समाजाचा प्रवास

व्होल्गा ते गंगा
लेखक: राहुल सांकृत्यायन
मराठी आवृत्ती: लोकवाङ्मय गृह

‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे राहुल सांकृत्यायन आपल्याला टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात. इसवी सन पूर्व सहा हजारमध्ये निशा या मातृवंशीय समाजातल्या स्त्रीपासून ही कथा सुरू होते. कथेच्या सुरुवातीला निशाचा परिवार हा १६ जणांचा आहे. मात्र मातृवंशीय समाजाचे चित्र सांकृत्यायन आपल्यापुढे उभे करतात. ४५ वर्षांची निशा परिवाराची प्रमुख आहे. त्या काळात स्त्री-पुरुषात मुक्त संबंध असल्याकारणाने मुलांचा पिता कोण हे कळायचे नाही आणि मातेवरूनच मुलांची ओळख असायची.

पुढे वाचा