तीन कविता

१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 

तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 
पाठवत राहा शुभेच्छा 
महिला दिनाच्या.. 
बस कुरवाळत 
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला 

तसेच, आयुष्यभर पुन्हा 
सहन करण्यासाठी… 
करत रहा अभिमान 
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा 

दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात 
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर 

‘कशी तारेवरची कसरत करते’ 
हे ऐकून 
तुझ्या मनावर कोरलेल्या 
भूमिकेला न्याय देत 
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या 
पायावर सांभाळण्यासाठी… 
टाकत राहा 
मनगटात बांगड्यांचे थर

नेसत राहा 
नवरात्रीच्या नऊ साड्या 
करत रहा 
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास 
भरत रहा 
टिकल्यांचा ठिपका 
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या  
स्वातंत्र्याच्या चंद्रावर 
ग्रहणासारखा

तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….

२. आपण तर्क तर्क खेळूयात 

तुझ्याकडचा अजोड तर्क 
माझ्याकडचा जड तर्क  
तिकडे कामगार पोटाच्या भट्टीत 
जळून मरू दे दिवस-रात्र
आणि होऊ दे होळी जंगलाची 

विकासाच्या नांगरावर
आपण अर्थांचे कीस पाडूयात 
जात ‘सामाजिक’ की  ‘नैसर्गिक’

तिकडे मंदिरात घुसलेल्या 
मांगाच्या पोरांना बडवूदे  
लाठ्या काठ्यांनी 
अंगाची चाळणी होईपर्यंत

आपण वाद-वाद खेळूयात
तो ‘चिद्वाद’ हा ‘निसर्गवाद’

तिकडे धर्माच्या नावावर 
जिहादी आगीत 
जळून खाक होऊदे  
मोहल्ले आणि वस्त्या 

आपण नास्तिक नास्तिक खेळूयात 
तू ‘ब्राह्मण’ नास्तिक  मी ‘मराठा’ नास्तिक
तिकडे गावागावात मंदिराचे कळस 
बुद्धिवादाच्या खोपडीत 
‘कमळ’ होऊन उगवू दे.. 

३. हळूहळू व्यवस्था स्विकारायची

हे मनावर बिंबवणं सुरू आहे 
सहवेदना बोथट बनवणं सुरू आहे 

झाडांच्या कत्तलीनं हळहळून जायचं नाही
माणसांच्या जंगलात लागलेल्या वणव्यात 
पेटून उठायचं नाही

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी…
अजून वाढतील ही नावं  
पण आपण ‘विचार मरत नाही’ 
या चादरीखाली मशाली विझवून 
खुशाल झोपी जायचं 

गांडू बगिच्यातील झाडांची फळं  
सवयीने पचवत जायचं 
हळूहळू हक्क, लढा, स्वातंत्र्य, समता..
हे शब्द पऱ्यांच्या कथेतील वाटायला लागतील  

वास्तव जे ‘व्यवस्था’ दाखवील
ते ‘बाय डिफॉल्ट’ सत्य होऊन जाईल 
मग कोणत्याही दाढी आणि पगडीवाल्यांना
खलिस्तानी म्हणायला सोपे होईल.. 

घरात मार्क्सचं पुस्तक सापडलं की
नक्षली म्हणून डांबून  ठेवलंय 
हे समजायला सहज होईल.. 

हळूहळू व्यवस्था स्विकारायची
हे मनावर बिंबवणं सुरू आहे..

अभिप्राय 3

  • manala dhavalun kadhale kavitene. Nice.

  • ज्वलंत…
    आपण तर्क तर्क खेळूयात… नास्तिक नास्तिक खेळूयात.. खेळच मांडलाय आपण… नुसता…
    आपण तर काय वीस वर्षांत मरून जाऊ.. नंतर नाहीच पाह्यचं हे सगळं.. असल्या षंढ विचारांनी हुरळत…
    खेळच मांडलाय नुसता..
    पण काटा येतो अंगावर एका विचाराने..
    खरोखर पुनर्जन्म असला तर..??

  • तीनही कविता वाचल्या. तुला डाँलच बनून रहायचे असेल तर या कवितेत स्रियांच्या सहनशीलतेवर कोरडे ओढले आहेत. पण स्त्रयाऔच्या या सहनशीमुळातचळेच आज हजारो वर्षे भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था टिकून राहिलेली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्रियांना शिक्षणाची दारे उघडल्यावर अनेक स्त्रियांनी त्या संधीचे सोने केलेले. पण कवितेत अपेक्षित असलेल्यमानसिकतातेच्या स्त्रियांनीच कुटुंबव्यवस्था मोडीत काढली आहे. कविला हेच अपेक्षित आहे काय? तीनही कवितांमध्ये कविची नकारात्मक विचारसरणी दिसून येते. अशा लोकांमुळे भारतीय संस्कृती जी पाश्चात्य देशांमध्येगगौरवली जाते; ती धोक्यात येत आहे. आज शहरात जातीभेद नष्ट होताना दिसत आहे. उलट पुढारलेल्या दलितांमध्येच तो टिकून आहे. आणि असे कवी त्यमानसिकतातेला खतपाणी घालत असतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.