आजकाल आपले आयुष्य इतके समस्याप्रधान झालेले आहे व कितीतरी प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यातलाच एक फार गंभीर प्रश्न म्हणजे ‘लैंगिक विषमता’. ह्या प्रश्नावरचा अगदी रामबाण उपाय म्हणजे सर्वांनी आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब करणे.
कोणतीही विचारसरणी अंगीकारायची झाल्यास आपल्याला त्या विचारसरणीच्या अगदी मुळापर्यंत जावे लागते. म्हणजेच ‘काय’, ‘का’ आणि ‘कसे’ ह्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. तेव्हाच आपण त्या विचारसरणीचा अवलंब करू शकतो. स्त्रीवादाच्या मुळापर्यंत जाण्यासाठीदेखील तीन प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी आपल्याला शोधावी लागतात. हे तीन प्रश्न पुढील प्रमाणे आहेत.
* स्त्रीवाद म्हणजे काय?
* स्त्रीवाद का गरजेचा आहे?
* त्याचा अवलंब का करायचा?
१. स्त्रीवाद म्हणजे काय?
स्त्रीवाद ही एक विचारप्रणाली आहे. स्त्री, पुरुष तसेच इतर लिंगधर्मीय म्हणजेच समलिंगी, तृतीयपंथी ह्या सगळ्यांमध्ये समानता प्रस्थापित करणारे ते एक विचारसूत्र आहे. त्याचबरोबर आपण एक माणूस आहोत ही गोष्ट कुठल्याही लिंगधर्माच्या पलीकडे आहे ही जाणीव सर्वांमध्ये रुजवणे हे स्त्रीवादाचे प्रमुख कार्य आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘मी एक स्त्री आहे म्हणून मी हे कार्य करू शकत नाही’, ‘मी एक पुरुष आहे म्हणून मी ही गोष्टी कशी करू, मला समाज बायकी म्हणेल.’, किंवा मग ‘माझी लैंगिक ओळख एक तृतीयपंथी/ समलिंगी आहे, मला समाज कसा स्विकारेल?’ अशा भ्रामक समजुती स्त्रीवाद पार झुगारून देतो व आपली ओळख ह्यापलीकडे आहे ही जाणीव आपल्याला करून देतो. शारीरिक, आर्थिक, बौद्धिक अशा कोणत्याही पातळीवर कुठलेही लिंग वरचढ नाही, सगळे समान आहेत ही भावना स्त्रीवाद आपल्यात रुजवतो.
स्त्रीवाद हा शब्द कानी पडताच बरीच मंडळी नाके मुरडतात. चिमामांडा नगोझी अदीची ह्या नायजेरीन स्त्रीवादी साहित्यकार tedX वरील एका भाषणात ह्या संदर्भातील एक किस्सा सांगतात. ओकुलामा ह्या त्यांच्या एका मित्राने एखादी शिवी दिल्यासारखे ‘तू स्त्रीवादी आहेस’ असे त्यांना एकदा म्हटले होते. काही वर्षांपूर्वी स्त्रीवाद आक्षेपार्ह मानणे कबूल होते. मात्र आज २१व्या शतकातही स्त्रीवाद पूर्णपणे समजून न घेता संपूर्ण चळवळीला दूषणे देत फिरण्यात अर्थ नाही. बरेच लोक सहज म्हणतात, “मी स्त्रीवादी नाही बरं का! पण मी समानता मानते/ मानतो”. मुळात स्त्रीवाद हा समानतेच्याच तत्त्वावर उभा आहे हे सर्वांत आधी आपण समजून घेतले पाहिजे. आपण जर समानता मानत असू पण स्त्रीवादी म्हणवून घेण्यास आपल्याला लाज वाटत असेल तर ती आपल्याला का वाटते ह्याचा विचार जर प्रत्येकाने केला तर ह्याच्या मुळाशी असलेली पुरुषप्रधान व्यवस्थाच उघडी पडते. मी स्त्रीवादी आहे असे जर आपण जाहीरपणे कबूल केले तर आपला समाज (पुरुषप्रधान समाज) आपल्याला काय म्हणेल, ह्या भीतीपोटी आपण ह्या विचारधारेपासून चार हात लांबच राहिलेलो आहोत.
स्त्रीवाद म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे तो का गरजेचा आहे.
२. स्त्रीवाद का गरजेचा आहे?
कोणतीही विचारधारा एकाएकी आभाळातून पडत नाही. विशिष्ट सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती त्या–त्या विचारधारेला जन्माला घालत असते. लैंगिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी स्त्रीवादाचा जन्म झालेला आहे. युगानुयुगे स्त्रियांना मिळालेले दुय्यम स्थान हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. आज मात्र जरा वेगळे लैंगिक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. स्त्री, पुरुष, तसेच इतर लिंगधर्मीय यांच्यावर व्यवस्थेने केलेल्या अन्यायातून किंवा दडपणातून हे प्रश्न उभे राहिलेले आहेत. स्त्री–पुरुष विषमता तर आपल्याला जागोजागी दिसतेच. मात्र स्त्रियांमधील आंतरिक कलहामुळे त्यांच्यातही विषमता दिसून येते व त्यांच्यात भगिनीभाव टिकत नाही.
हे आंतरिक कलह आपल्याला जात–वर्ग-सौंदर्य, अपत्यप्राप्ती, सौभाग्य अशा काही घटकांमधून दिसून येतात.
जात, वर्ग, सौंदर्य – श्रीमंत घराण्यातील स्त्रिया गरीब घराण्यातील स्त्रियांशी मैत्री करत नाहीत, त्यांच्यात मिसळत नाहीत असे आपण बऱ्याचवेळा पाहतो, ज्यामुळे त्यांच्यात भलीमोठी दरी निर्माण होते. जातीच्या बाबतीतही फारसे समाधानकारक चित्र काही आपल्याला दिसत नाही. एवढेच काय तर सगळ्यात जास्त कोण सुंदर आहे, कोण गोरीपान आहे यावरून आपण एकमेकींना तुच्छ लेखतो, एकमेकींची हेटाळणी करतो. जोवर आपण एकमेकींचा माणूस म्हणून स्वीकार करत नाही व एकमेकींसाठी उभ्या राहत नाही तोवर समानता रुजू शकत नाही. स्त्रीवाद आपल्याला जात–वर्ग ह्यापलीकडे जाऊन एकमेकींचा माणूस म्हणून स्वीकार करायला शिकवतो.
अपत्यप्राप्ती/मातृत्व – युगानुयुगे आपल्या व्यवस्थेने मातृत्वाविषयीच्या अनेक संकल्पना स्त्रियांच्या मनावर बिंबवल्या आहेत. “कुठल्याही महिलेच्या जीवनाचे सार्थक अपत्यप्राप्तीनंतरच होते” किंवा “तिला मूल होत नाही म्हणून त्यांचा संसार सुखी होऊ शकला नाही” अशी वाक्ये आपल्या कानावर हमखास येतात. मातृत्वाचा अनुभव घेतल्याशिवाय कुठलीही स्त्री स्त्रीत्वाचा अनुभव घेऊच शकत नाही असे भासवले जाते. ज्यामुळे मुलांना जन्माला घालण्याचे व त्यांच्यावर संस्कार करण्याचे एक यंत्र असल्यासारखी किंमत तिला दिली जाते. मातृत्वाचा अनुभव हा व्यक्तिनिष्ठ आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. तेव्हाच आपण कुठल्याही स्त्रीला वांझ म्हणून हिणवणार नाही. “मुला–मुलींवर होणाऱ्या संस्कारांमध्ये आईचा फार मोठा वाटा असतो” हे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल. आता हे पुरे झाले. आई–बाबा दोघांचा सहभाग महत्त्वाचा आहे. केवळ बायकोनेच कुटुंबाची देखभाल करावी हा पळपुटेपणा ठरतो.
सौभाग्य – एखाद्या महिलेला जर वैधव्य आले तर तिच्या आयुष्यातील सगळे सुख संपले आहे असे भासवले जाते. विधवा स्त्रियांवर अनेक बंधने घालण्यात येतात. फुले माळायची नाहीत, कुंकू, बांगड्या इत्यादी अलंकार परिधान करायचे नाहीत, सणा–समारंभाला जायचे नाही, धार्मिक कार्य करायचे नाही. थोडक्यात काय तर, सुखी राहायचे नाही असा नियम घालण्यात येतो. तिचा नवरा मरण पावला म्हणजे तिचे सर्वस्व संपले आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. ती स्वतःसाठी नाही का जगू शकत? खुश असूनही दुःखी असल्याचे सोंग तिने का घ्यावे? सतीसारखी अनिष्ट प्रथा आज बंद पाडण्यात आली आहे खरी, पण जिवंतपणी क्षणोक्षणी मरत जगणे म्हणजे एकप्रकारे सती जाणेच नव्हे का?
स्त्रीवाद आपल्याला स्त्रियांमधील आंतरिक विषमता दूर करून एकमेकींविरुद्ध कुभांड न रचता एकमेकींसाठी उभे राहायला शिकवतो.
पुरुषसत्ताक व्यवस्था पुरुषांसाठीही घातकच!
पुरुषप्रधान व्यवस्था जेवढी स्त्री, समलिंगी, तृतीयपंथी व इतर लिंगधर्मांसाठी घातक आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त ती पुरुषांसाठी घातक आहे. पुरुषांवर कर्तृत्ववान बनण्यासाठी अनेक वेळा दबाव आणला जातो. तो शरीरयष्टीने उत्तम असला पाहिजे, बलवान असला पाहिजे, दिसायला देखणा असला पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे, त्याच्याकडे गाडी, बंगला असला तरच तो यशस्वी अशा अनेक समजुती पुरुषांवर लादल्या जातात. ह्या सगळ्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावरही आलेले असते.
अगदी लहान वयातच विशिष्ट लिंगधर्माने काय करू नये हे आपल्याला सांगितले जाते. एखादा लहान मुलगा जर रडत असेल तर त्याला ‘मुलीसारखे काय रडतोय?’ असे हिणवले जाते. कालांतराने त्याच्या मनात अनेक संकेत तयार होतात जे त्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक असतात. आपण रडून व्यक्त झाल्याने आपण बायकी ठरू अशी त्याची धारणा होते. मुळात रडणे, त्यातही ‘मुलीसारखे रडणे’, हे खरोखर वाईट किंवा पराभवाचे लक्षण आहे का? तर, तसे अजिबात नाही.
आपण आपल्या त्वचेची किंवा स्वत:ची निगा राखली तर आपण बायकी ठरू अशा समजुतीही पुरुषांच्या मनात बिंबवल्या जातात. रुक्ष असण्यातच पुरुषार्थ आहे अशा फुटकळ कल्पना तयार करण्यात येतात. यातून नैराश्य, चिडचिडेपणा अशा अनेक मानसिक आजारांना पुरुषांना तोंड द्यावे लागते. ते व्यक्त होत नाहीत, किंबहुना आपण त्यांना व्यक्त होऊ देत नाहीत हे खरोखरीच दुर्दैव आहे.
ही भीषण परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर, हा बदल आपल्याला स्वत:पासून सुरू करायचा आहे. ह्यासाठीच आपण आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब केला पाहिजे.
स्त्रीवादाचा अवलंब कसा करता येईल?
सर्वप्रथम आपण शोषणव्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. जात, वर्ग, धर्म असे सगळे भेद नाकारूनच आपण लैंगिक विषमतेचा विरोध करू शकतो.
वस्तूकरणावर आळा घालणे – स्त्री, पुरुष, समलिंगी, तृतीयपंथी व इतर लिंगधर्मीय व्यक्तिंकडे एक वस्तू म्हणून न पाहता स्वतंत्र विचार असलेली सुजाण माणसे म्हणून पाहिले पाहिजे. आपल्या व्यवस्थेने नकळतपणे आपल्याला वस्तूकरण करायला शिकवलेले आहे. उदा: एखाद्या मुलीचे लग्न झाल्यावर आपण त्याविषयी चर्चा करताना सहज बोलून जातो. “अरे, तिला नागपुरात दिली आहे.” किंवा “रमाकांतच्या मुलीला दिलीपच्या घरी दिली आहे.” मुळात एका माणसाला दुसऱ्याच्या घरी ‘देणे‘ म्हणजे तिला एका अर्थी वस्तूसमान मानणेच आहे. आपल्या भाषेत ही विषमता आपल्या संस्कृतीतूनच आलेली आहे. आजकाल मुलींना ‘देण्यात’ येत नाही. त्या स्वेच्छेने लग्न होऊन जातात. आपल्या भाषेत जोवर आपण बदल करत नाही तोवर हा बदल आपल्या आचरणात येणार नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे पुढच्या वेळी ‘दिली आहे‘ वगैरे शब्द न वापरता आपण ‘गेली आहे‘ असे म्हणूया. तसेच कन्यादानासारखी प्रथा, जीमध्ये मुलीला वस्तूसमान मानून तिचे दान केले जाते, अश्या प्रथा आपणच बंद केल्या पाहिजेत.
स्वयंपाकघरात दोघांचाही वावर महत्त्वाचा – स्वयंपाकघर ही काही स्त्रियांची मक्तेदारी नाही. त्यामुळे रोजचा स्वयंपाक तिनेच केला पाहिजे हा अट्टाहास बाळगणे पार चुकीचे आहे. घर हे नवरा–बायको दोघांचेही असते, तर सगळी कामे दोघांनी मिळूनच केली पाहिजेत. रोजचा स्वयंपाक करणे, घराची साफसफाई करणे इत्यादी कामे दोघांनी वाटून केली पाहिजेत. जेणेकरून एकावर सगळा भार पडत नाही.
डबल बर्डन (दुहेरी ओझे) – आजची स्त्री करीअर ओरीएंटेड आहे. स्वतःच्या करीअरला ती प्राधान्य देते. मात्र तरीही लग्न झाल्यावर तिने संसार सांभाळून नोकरी करावी, दोघांमध्ये समतोल राखावा तरच ती एक आदर्श स्त्री ठरते असे मानणे आणि असा रुढीवादी विचार करणे अतिशय चुकीचे आहे. त्यातही जर घरी मदत करण्यासाठी दुसरी व्यक्ती नसेल तर तिची फरफट होते. ज्यामुळे तिच्यावर दुहेरी ओझे पडते. दोन्हींपैकी एकच गोष्ट ती आनंदाने करते तर दुसरी गोष्ट कर्तव्य म्हणून करते. यावर एकमेव मार्ग म्हणजे नवरा–बायको दोघांनी घरकाम वाटून घ्यावे. तेव्हाच एकट्यावर ओझं पडणार नाही.
शिव्या – आपल्याला जर खरोखरीच एखाद्या स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर आपण आया–बहिणींचा ‘उद्धार’ करणाऱ्या शिव्या देणे सर्वात आधी बंद केले पाहिजे.
आपले निर्णय स्वतः घेऊया – शिक्षणाने आपण शिक्षित बनतो. मात्र सक्षम बनण्यासाठी शिक्षणाबरोबरच अनुभवही गरजेचे आहेत. हे अनुभव आपल्याला अन्वेषणातून मिळू शकतात. अनुभवांमुळे आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो. छोटे मोठे कोणतेही असेना, स्वत:विषयी, स्वत:च्या शरीराविषयी, स्वत:च्या नात्यांविषयीचे निर्णय आपण विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. स्त्रीवाद आपल्याला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवतो.
लग्नानंतर बदलू नये – लग्नानंतर बऱ्याच मुली इतक्या बदलतात की आपले जुने नातेसंबंध, आवडी-निवडी, राहणीमान ह्या सगळ्या गोष्टीत बदल करतात. इतकेच काय तर, काही मुली ‘नोकरी करावी का नाही’ हा निर्णयही नवऱ्याला आणि घरच्यांना विचारून घेतात. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास गोष्ट असली तरीही आपल्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडावा इतके महत्त्व तिला देणेही चुकीचेच आहे. माणसाने स्वत:त बदल करावा, मात्र ह्या बदलात आपण स्वतःला गमावत तर नाही आहोत हा विचार नक्कीच करावा.
अप्रत्यक्ष हुंडापद्धत – आज हुंडा घेणे आणि देणे ह्यावर बंदी आहे. मात्र आजही मुलीने लग्नात दागिने किंवा वस्तू आणल्या पाहिजेत असा अट्टाहास मुलाकडची मंडळी धरत असतात. ह्यात बऱ्याच वेळा मुलगा मौन बाळगणे पसंत करतो. त्यामुळे मुलीच्या घरच्यांवर व स्वतः मुलीवर बरेच दडपण येते. सोने विकत घेणे ही तशी एक चांगली गुंतवणूक मानली जात असे. मात्र दगिन्यांमध्ये गुंतवणूक करणे आजच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. लग्नात दागिने घालण्याचा अट्टाहास असू द्या किंवा सणा–समारंभाला मुलीकडून येणाऱ्या वस्तू असू द्या, दोन्ही गोष्टी हुंडापद्धतीच्या पाऊलखुणा रेखाटत आहेत. ह्या अप्रत्यक्ष हुंडापद्धतीवर आळा घालणे गरजेचे आहे. ह्याच्या विरोधात मुला–मुलींनीच बोलले पाहिजे.
प्रशंसा प्रगतीचा अडथळा बनता कामा नये! – स्वतःची तारीफ केलेली कुणालाही आवडेलच. हा मानवी स्वभाव आहे. मात्र एका पिसाने मोर होऊन चालत नाही. याने आपण आपल्याच प्रशंसेच्या रम्य विश्वात अडकून पडतो आणि आपल्या सुधारणेकडे आपण लक्ष देत नाही. या संदर्भात कवी किरण येले एका कवितेत म्हणतात,
“जिद्दीने उठलीस, माजघरातनं बाहेर आलीस.
त्यांनीही साथ दिली तुला.
मंचावरल्या प्रकाशझोतात सादर केले तुला.
त्यांना हवे तसे.
बये, सांभाळ.
पुन्हा स्वतःवर लुब्ध होऊ नकोस.
तुला पुन्हा आतल्या खोलीत नेण्याचा त्यांचा हा नवा मार्ग असू शकतो.”
ह्या ओळी प्रत्येकीने लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
स्त्रीवाद समजून घ्यावा – वाचनातून आपण स्त्रीवाद समजून घ्यावा. स्त्रीवादी पुस्तके वाचावीत. किरण येले यांचा ‘बाईच्या कविता’, ‘मोराची बायको’, कमला भसीन यांचे अनुवादित पुस्तक ‘लिंगभाव समजून घेताना’, कविता महाजन यांचा ‘धुळीचा आवाज‘ हा काव्यसंग्रह, अरुण कोल्हटकर, अमृता प्रीतम अशा काही साहित्यकारांची पुस्तके वाचावीत जेणेकरून स्त्रीवाद आपल्याला नेमकेपणाने समजू शकतो. आपण जर स्त्रीवादी बनलो तर वाढते बलात्कार, लग्नानंतर होणारे बलात्कार, लैंगिक शोषण, लैंगिक गळचेपी अश्या समस्यांवर आळा बसेल. महत्त्वाचे म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगता येईल.
थोडक्यात, ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ‘ ह्या उक्तीप्रमाणे एकमेकांशी सुसंवाद साधून, एकमेकांना समजून घेऊनच आपण विषमतेवर मात करू शकतो.
साहाय्यक प्राध्यापक
सी. ई. एस् महाविद्यालय
कुंकळ्ळी गोवा
साध्या सोप्या शब्दात आपण विवेचन केल्याबद्दल खूप आभार. या आपण दिलेल्या समर्पक उत्ताराने खूप काही साधले जावे.
एकच वाटते शतकानुशतके ही विषमता अबाधित चालू राहाण्या मागच्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.
समानता ही प्रथम शारिरीक पातळीवर मानायला हवी एक मनुष्यप्राणी ही एक प्रजाती या निसर्गाचा भाग आहे आणि पुनरुत्पादन ही ती प्रजाती टिकवण्यासाठी असलेली अनिवार्यता.
स्वातिजा मनोरमा
धन्यवाद
रोजच्या जीवनातील स्त्री स्त्री पुरुष भेद इतका अंगवळणी पडला आहे की आपल्याला त्याची जाणीव होत नाही .साधी कार चालवताना देखील त्याचा बेल्ट पुरुषांना सोयीचा असतो स्त्रियांच्या मानेला काचतो असतो. बऱ्याच वापराच्या गोष्टी या पुरुषांसाठी सोयीच्या अशाच बनवल्या जातात हे भेद पण जाणीव करून दिले पाहिजे. असे अनेक छोटे छोटे भेद जाणीव करून दिले पाहिजे
चांगला लेख
धन्यवाद
शुभालक्ष्मीजी, आपण स्त्रीवाद अत्यंत सोप्या भाषेत कथन केला आहे. पण आपल्याला मान्य करावे लागेल, की स्त्रियांची ही प्रगती एकोणिसाव्या शतकात ना. जगन्नाथ तथा नाना शंकरशेट, म. ज्योतीबा फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे या पुरुषांच्या प्रयत्नांमुळेच झाली आहे. एक गोष्ट मान्य की,स्त्रियांनानी मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेतला . आज स्त्रिया सर्वच क्षेत्रांत आग्रेसर आहेत. पुरुषांसाठी राखीव समजल्या जाणाऱ्यक्षेत्रातीलही स्त्रियांनी प्रगती केली आहे. नोकरी व्यवसाय सांभाळून घरसुध्दा सक्षमपणे सांभाळत आहेत. पण काँर्पोरेट क्षेत्रात मोठे पद सांभाळणाय्रा स्त्रिया घरात मात्र दुय्यम स्थान स्वीकारताना दिसतात. एक गोष्ट खरी की आज अनेक कुटुंबात नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे नवरे घरकामात पत्नीला मदत करतात. पण दुसरी बाजू अत्यंत वाईट दिसते. काही स्त्रिया त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्यास्वैराचारचारासाठी उपयोग करतात. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी पंजाबी ड्रेस, घालणे ठीक. पण शरिराला घट्ट बसणारी जीन किंवा मांड्या उघड्या ठेवणारे स्कर्ट घालणे ठीक वाटत नाही. चित्रपट स्रुस्टित पुरुष अभिनेते अंगभर कपडे वापरतात, अभिनेत्रिंमध्ये जास्तीत जास्त अंग उघडे ठेवण्याची स्पर्धा दिसत असते; हे ठीक वाटत नाही.