राजस दाणे
भरडलेच जातील का?
काही जात्यात
काही सुपात
काही ओंजळीत
तोंडात टाकण्यासाठी
अलगद
काही जमिनीत
मातीआड
कणीस फळवायला
भरडलेच जातील का
राजस दाणे?
सुपातल्या दाण्यानं हसू नये
जात्यातल्या दाण्याला
ओंजळीतल्यांनी
भिऊ नये दातांना
मातृत्वाचे पोवाडे गात
जमिनीत गाडून घ्यायलाही
नसावं आसुसलेलं दाण्यांनी
ओंजळीत पडून
कुण्या लाचाराची
भरू नये झोळी
दाण्यांना फुटावेत डोळे
स्वतःचे टपोरेपण
पाहण्यासाठी
दाण्याना फुटावेत पंख
वाऱ्यासवे उडण्यासाठी
घालू नये जन्माला कणीस
दाण्यांनी
भागवू नये कुणाची भूक
दाण्यांनी थांबवावं
फिरतं जातं
कणखर होऊन…