नागरीकरणाच्या प्रक्रियेत माणूस कधीतरी टोळी करून राहू लागला. त्याची अवस्था जरी रानटी असली तरी शेतीच्या शोधाने काही प्रमाणात का होईना त्याच्या जगण्याला स्थिरता लाभली. संवादाच्या गरजेतून भाषा निपजली. व्यक्तिंच्या एकत्रीकरणातून समाज निर्माण झाला. पुढे कधीतरी ‘राष्ट्र’, ‘देश’ ह्या संज्ञा रूढ झाल्या. अनाकलनीय घटकांच्या भीतीतून वा नैतिक शिकवणुकीसाठी धर्म समोर आला. धर्म मानवाला तथाकथित नीती शिकवू लागला. ह्या धर्माला प्रचलित रूप देण्यात व समाजावर हा धर्म थोपवण्यात एका विशिष्ट समूहाचे वर्चस्व दिसून येते. भाषा, समाज, धर्म या घटकांच्या माध्यमातून नागरीकरणाची प्रक्रिया मानवाला ‘मानवत्व’ बहाल करत होती.
कधी स्वार्थाच्या तर कधी श्रेष्ठत्वाच्या धारणेतून एकमेकांवर प्रभुत्व मिळवले. त्यासाठी देवत्व, वर्ण, भाषा, धर्म, प्रांत, वंश इत्यादींचा आधार घेतला गेला. जगाच्या पाठीवरचा कोणताही मानवी समाज लक्ष्य म्हणून समोर ठेवला तरी कमी–अधिक याच रीतीने झालेली स्थित्यंतरे समोर येतात. जागोजागीच्या राजसत्ता आणि त्याला मार्गदर्शन करणारी धर्मसत्ता यांच्या कचाट्यात सर्वसामान्य माणूस अडकला होता. या काळात शोषणाचे प्रमाण कमाल होते. त्याला कसलाच धरबंध नव्हता. धर्मसत्ता, शोषण यांच्या विरोधात चकार शब्द जरी कोणी काढला तरी धर्मसत्ता राजसत्तेकरवी तिचा समूळ विध्वंस करायला सज्ज होती. राज्यसत्ता व धर्मसत्ता माणसाला सुखनैव ‘वापरत’ होती. शिक्षण वा अन्याय यांची जाणीव नसलेला समाज जणू चिखलाच्या थंड गोळ्यासारखा निपचित पडून आला दिवस ढकलत होता.
जगभरामध्ये सुमेरियन, इजिअन, इराणी, ग्रीक, ख्मेर, ज्यू, रोमन, लिडीयन, सिथियन, यांसोबत भारतामध्ये आढळणाऱ्या सिंधू–हडप्पा ह्या प्राचीन संस्कृती सांगता येतात. यांमधील कांही संस्कृती ह्या बऱ्याच पुढारलेल्या होत्या. त्यांच्या अवशेषांनी आजही संशोधकांना सुट्टी दिली नाही. त्यानंतरच्या काळात जगभरामध्ये अनेक छोटी–मोठी राज्ये निर्माण होत होती; नाश पावत होती. कोणीतरी पुन्हा आपल्या कर्तृत्वाने ती स्थापन करत होती. हे २०व्या शतकापर्यंत अव्याहतपणे चालूच होते. मात्र जागतिक पातळीवर आता राजा आणि प्रजा असा सत्तासंबंध दिसत नाही तर लोकशाही व नागरिक वा त्याला जवळ जाणारा सत्ताप्रकार दृष्टीस पडतो. याला कांही अपवादही आहेत.
जगातील सर्वच माणसे आता जवळपास नागरिक झाले आहेत. याला मानवी जीवनविकासातली नागरीकरणाची प्रक्रिया कारणीभूत आहे. आज जगात अनेक ठिकाणी लोकशाहीची स्थापना झाली. मात्र त्यातही सर्वत्र सारखेपणा दिसून येत नाही. केवळ जन्म, वंश, धर्म, जात, यातून एखाद्याची अधिसत्ता मान्य न करता जो अंगभूत गुणाने वा कर्तृत्वाने सर्वांना मान्य होतो तो पुढे यायला पाहिजे. विकासाच्या समान संधी सर्वांना मिळायला हव्या. यासाठी समाजात ‘समता’ हे मूल्य रुजायला हवे. माणसाला समतेने जगता आले पाहिजे. हे साध्य केवळ लोकशाहीतूनच साध्य होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. यासाठीच अधिकात अधिक लोकांची निवड ही प्रमाण मानायला हवी. ह्यातून लोकशाही, बहुमत ह्या घटकांना महत्त्व प्राप्त झाले.
भारतात आज लोकशाही नांदते. लोकशाहीतून नेतृत्व निवडले जाते. या नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या जगण्यातील अडचणी, संघर्ष, संकटे देशाच्या समोर मांडावी; व त्यातून मार्ग काढून जगणे सुकर करावे हा प्रधानहेतू लोकशाही निवडण्यामागे होता. मात्र आज बरेचवेळा आपण कशासाठी सत्तेत बसलो हेच ज्याला माहीत नाही, अशी व्यक्ती सत्तास्थानी बसलेली पाहायला मिळते. भारतीय राजकारणात आजही कुटील डाव–प्रतिडाव खेळत असणारे बरेच मोठे ‘खेळाडू’ दिसतात. कालपर्यंत राजकारण हे देशाच्या उन्नतीसाठी केले जात होते, मात्र आज अनेकांनी त्याचा ‘धंदा’ केला आहे. त्यातून मिळवलेली माया ही कल्पनातीत आहे. त्यांच्या ‘पहाटेच्या’ लीला अगाध आहेत.
ह्या लोकप्रतिनिधींची वर्तणूक, त्यांचे स्वरुप यांसोबतच सर्वसामान्य मध्यमवर्गीय जाणीवासुद्धा अत्यंत बोथट झालेल्या दिसून येतात. प्रत्येकजण शुद्र स्वार्थ साध्य करण्याच्या धडपडीत दिसून येतो. आज कोणतेही सरकार सत्तेत असो, आणि ते कसल्याही विचारांनी प्रेरित असले तरी मागचे दिवस चांगले होते; असे म्हणण्याची वेळ का यावी? आणि ही सगळी स्खलनशीलता कशामुळे आली? याचा विचार करणे गरजेचे आहे. आज एकापेक्षा एक मोठे घोटाळे उघडे पडत आहेत. यातून समाजाने वेळीच सावरायला हवे, अन्यथा आज वंचित असलेला माणूस उद्या नको त्या मार्गी लागला तर त्याचे ते वर्तन थोपवणे अवघड होऊन बसेल. समाजात अराजकता निर्माण होईल. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला, उभा केलेला देश विस्कटून जाईल. याचा जाणकारांनी विचार करायलाच पाहिजे.
समाजात आज एका बाजूला ‘आहे रे’ आणि दुसऱ्या बाजूला ‘नाही रे’ असे दोन भाग स्पष्ट दिसतात. ही विषमता आजची नाही. तरीही समाजात असलेली विषमता तशीच टिकून राहावी यासाठी अनेक धूर्त मेंदू प्रयत्नरत असतात. कारण या विद्यमान विषमतेचा त्या धूर्त मेंदूंना बराच मोठा लाभ असतो. त्याचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गणित त्यांनी मांडूनच ह्या विषमतेचे परिपोष झाला पाहिजे याची व्यवस्था ते करीत असतात. यात अनेक स्तरातील मातब्बर मंडळी ह्या पापात बरबटलेल्या असतात. ह्या विषमतेचे अनेक पदर आहेत. जात, धर्म, संस्कृती, भाषा, आर्थिक स्तर, राजकीय पार्श्वभूमी, संधी, सामाजिक स्थान असे अनेक पैलू यात विद्यमान असलेले दिसतात. जन्माने मिळालेल्या मोठेपणावर अनेकजण अभिमान बाळगताना दिसतात. या मोठेपणात त्यांची कसलीही मिळकत नाही; त्यांना ते जन्माने मिळालेले असते, कोणी कोठे जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसते. तरीही त्यांना कशाचा अभिमान वाटतो, त्याचे उत्तर तेच देऊ जाणे.
समाजातील अनेकांच्या जगण्यातील भेद आज स्पष्टपणे जाणवतात. कांही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलन झाले. त्यांनी विद्यमान सरकारविरोधात भूमिका मांडली. ज्यांनी आपले नेतृत्व निवडले, त्यांनाच महिनोनमहिने ‘तुम्ही करत असलेले कायदे आम्हाला नको’ हे म्हणण्यासाठी लढा द्यावा लागला. त्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा त्यांना समर्थन देणाऱ्या जनतेविषयी कोण वावड्या उठवल्या गेल्या! आपला अहंकार सोडण्यातील ताठरता किती पराकोटीची होती, याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यानंतर घ्यावी लागलेली माघार व कायदा परत घेतानाची भूमिका त्यांचे ढोंग उघडे करणारी होती. त्यानंतर कालपरवाचीच गोष्ट आहे, कांही (अति) बुद्धिमान लोकांनी भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले, म्हणून आपल्या अकलेचे तारे तोडले. यातून त्यांनी आपल्या मानसिकतेची ओळख करून दिली. स्वातंत्र्यलढ्यात ज्या महापुरुषांनी आपले प्राण वेचले, आणि म्हणूनच १५ ऑगस्ट १९४७ साली इंग्रजांच्या जोखडातून संपूर्ण देशाने सुटकेचा श्वास घेतला, त्याला मग नेमके काय म्हणायचे? याचे उत्तर म्हणजे पराकोटीच्या भक्तीचे लक्षण.
आपल्या देशाला वैचारिक राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्यासोबतच अनेक विचारवंतानी आपल्या विचारातून, श्रमातून देश घडवला आहे. अनेकांनी आपल्या स्वार्थापेक्षा, जीवनापेक्षा देश मोठा हा विचार पेरण्यासाठी आपले आयुष्य वेचले. अशा आपल्या देशाची आजची वैचारिक वाटचाल आणि भीतीदायक वातावरण पाहून अंगावर शहारे येतात. जे लोक स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होते, ज्यांनी शत्रूला सढळ हाताने सहाय्य केले, ते आज सर्वसामान्य लोकांना देशभक्ती, राष्ट्रप्रेम, भारताचे पावित्र्य शिकवायला सरसावली आहेत. त्यांच्या राजकीय हितासाठी आपणाला सध्या द्वयामध्ये पहायला शिकवले जाते आहे. एक तर माझ्या बाजूला अन्यथा माझ्या विरोधात. तुम्हाला एखादा विचार पटत असेल, हरकत नाही; पण दुसऱ्याचे मत समजून घ्यायचेच नाही ही कांही समजण्यासारखी बाब नाही. सांप्रतकाळची राजकीय व्यवस्था अत्यंत किडक्या स्तरावर गेलेली पाहायला मिळते. नासक्या मेंदूतील बाहेर पडलेले विचार आपसातला बंधुभाव धोक्यात आणत आहेत. एकमेकांची वेगवेगळ्या पातळ्यांवर झुंज लावू पाहत आहेत. ज्यातून केवळ विध्वंस साकार होईल.
‘इंडिया’मध्ये राहणाऱ्या नागरिकाला ‘भारता’त राहणाऱ्या माणसाविषयी थोडीही कणव नाही. शहरात बागेतल्या आरामखुर्चीवर बसून कांदा–पोहे खात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वृत्तपत्रात वाचताना अनेकांच्या चेहऱ्यावरचा थोडाही भाव बदलत नाही. ही मानसिकता, हे निर्ढावलेपण कशाने आले? हा शोधाचा विषय आहे. संवेदनशील नजरेने निरीक्षण (पाहणे नव्हे) केले; तर समाजात असलेल्या प्रचंड विषमतेची दरी स्पष्ट दिसते. ही दरी केवळ आर्थिक, सामाजिक नसून मानसिकतेत असलेले महदंतर दर्शवते. भारतीय समाजातील विविधता हे भारताचे सौंदर्य मानले जाई. मात्र आज दोन जातीच्या, दोन धर्माच्या, दोन भाषेच्या नागरिकांमधे एकमेकांप्रती घृणा पाहायला मिळते, हे का झाले? या परिस्थितीला नेमके कोण जबाबदार आहे? हे आपण जाणकारांना सांगणे न लागो. प्रत्येक माणसाचे वेगळेपण मान्य का करत नाही आपण? माणूस म्हणजे बुटाच्या कारखान्यातले उत्पादन आहे का? म्हणजे एकजात सगळे सारखेच असायला हवे हा अट्टाहास धरायला? प्रत्येक माणसाचा जन्म भिन्न, त्याची वाढ भिन्न, त्यांची पार्श्वभूमी भिन्न. मग सगळ्यांचे विचार सारखेच कसे असतील?
एकदा का खुर्चीवर बसले की ज्यांनी आपणाला निवडून दिले. त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य आहे, हे ते विसरूनच जातात. सत्तेचा मलिदा खाताना आपण कोठून आलो, आपल्या लोकांच्या समस्या कोणत्या, आपण दिलेले शब्द/वचन कोणते, याचा त्यांना पार विसर पडलेला असतो. आपण ज्या समाजातून, प्रदेशातून, लोकांतून येतो ते जाणीवपूर्वक विसरले जाते. सत्तेच्या लालसेने लोकांच्या भावनेला हवा दिली जाते, त्यांच्यात संघर्ष घडतील यांची व्यवस्था केली जाते. कधी धार्मिक तर कधी महापुरुषांच्या नावाने, तर कधी भाषेच्या संवेदनशील बाबीवर बोलून लोकांच्या भावना बेकायदेशीररित्या चेतविल्या जातात. जाती–जातीत तेढ निर्माण करायची, मते मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने धार्मिक मुद्दे उकरून काढायचे हे सर्व आता रोजचेच होऊन बसले आहे. यात सर्वसामान्य माणसालाही काही नवे वाटत नाही. राजकीय विचारपीठावरून केली जाणारी भाषा आपणां सर्वांना अपरिचित नाही.
माणसातला राग, द्वेष, अस्मिता याचा फायदा घेऊन हे राजकीय ‘धेंड’ सत्तेचा ताबा घेतात आणि त्यानंतर आपल्याच उरावर बसून आपणालाच अ, ब, क शिकवतात. एखाद्या विचारी माणसाने त्यांना त्यांच्याच शब्दाची, वचनांची आठवण करून दिली तर ‘मला तसे म्हणायचे नव्हते’, किंवा ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे’ म्हणून वेळ मारून नेतात. यातून यांचा सत्तेसाठी खेळला जाणारा ‘नंगा नाच’ अनेकांना खटकतो, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधा? म्हणून जो तो काहीच कळत नसल्याचे नाटक बेमालूमपणे पार पडत असतो. ‘सत्तेपुढे शहाणपण व्यर्थ‘ ही म्हण आज कित्येकदा तरी प्रत्ययाला येते.
सर्व कांही कळत असूनही गप्प राहणे हे उद्याच्या नाशाचे कारण ठरू शकते. आपण आपल्या मकदुराप्रमाणे शक्य तिथे विवेकाची कास धरून हे रोखणे आवशक आहे. अन्यथा सत्तेच्या नशेत चूर झालेली ही पिलावळ आपल्या भावनेचे भांडवल करून आपणाला एकमेकांत झुंजवून सत्तेचे फळ चाखायला सोकावतच राहील. आज आपण गाईच्या शेणासाठी झुंजतो, उद्या आपला अस्मिताविषय आणखी काही असू शकतो. ही कोंबड्यासारखी अविचारी झुंज आजच्या विचारी मानवाला शोभनीय नाही. गेलाबाजार अशा गोष्टी घडल्या, पण हेच निंदनीय काम किती दिवस होणार? याला काही धरबंद लावला जाईल की नाही? की आपला प्रवास सुखनैवपणे मध्ययुगाकडे चालू ठेवायचा? याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आज सर्वत्र भयाण अंधार दाटला आहे, पण माणूस आशावादी प्राणी आहे. उद्या यापेक्षा चांगला असेल ही आशा ठेवू आणि आणि प्रत्येक निर्णय विचारांती घेऊ, नाहीतर हे आपल्याच रक्तावर पोसलेले ‘बांडगूळ’ आपल्या डोळ्यात आपलेच बोट घालत राहतील…
मराठी विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
गणेशखिंड, पुणे
संपर्क: shivakoli2014@gamil.com