इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!
अन् हिमतीसाठी.. गळ्यालाही हवी होती…थोडी दारू!

वर्दळीत उरलेत फक्त..
बांगड्यांचे तुकडे,
काही खरे..काही खोटे अश्रू,
इंडियन वाहिन्यांवरून
चमचमीत चेहर्‍यांनी दिलेल्या काही बातम्या,
पोकळ पंचनामावाल्यांच्या निर्विकार गाड्या!

दारू पिऊन आत्महत्या
केलेल्या इंडियाच्या यादीत
समाविष्ट झाले होते
अजून एका भारतीयाचे नाव!

अभिप्राय 1

  • खरे आहे. आपल्या देशातील ऋतुचक्र बदलले आहे. आता बारा महिने पाऊस पडतो, युरोपियन देशांप्रमाणे. उन्हाळा असह्य होतो. माझ्या लहानपणी दिवाळीच्या पहाटेच्या अंगणात केल्याजाणाय्रा अंघोळीच्या वेळी दात कडकड वाजायचे. पण आता सगळंच बदलून गेले आहे. पण याला कारण आमच्या देशावर राज्य करणारे ब्रिटिश सरकार आणि नंतर आलेले काँग्रेसचे सरकारच आहे, असे म्हणणे गैर असू नये. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. आमच्याच नाही, तर सर्वच गांवांत चांगले जंगल होते. पट्टेरी ढाण्या वाघ रात्री आमच्या अंगणात यायचा. पण मी माझ्या डोळ्यांनी जंगले तुटताना आणि कोळशाच्या भट्ट्या लागलेल्या पाहिल्या आहेत. नंतर व्रुक्षारोपणांची नाटकंही पाहिली आहेत. भ्रष्टाचार माजलेलाही पाहिला आहे. गांधीजिंच्या ग्रामोध्दार आणि ग्रामोद्योग योजना बासनात बांधून शहरीकरण होताना पहिले आहे. कंपोस्ट खतांऐवजी रासायनिक खतांच्या कारखान्याचे खूळ राबवून भ्रष्टाचारी नोकरशाही मुळे एन्फ्ल्यूएन्टटँक न बसवता रसायनयुक्त पाणी नद्यांच्या पात्रात सोडून नद्या, नाले प्रदुषित होताना पाहिले आहेत. गांवठी झाडं न लावता निलगिरी व्रुक्षांची लागवड पाहिली आहे. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती मुळे कार्बनडाय आँक्साईडची निर्मिती. या पर्यावरण ह्रासाला हे सरकारच जबाबदार आहे. पाऊसपाणी तसे ठीक असूनही पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने गांवात शेतीलाचकाय, पण पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. हा कवी तेव्हा जन्माला ही नसेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.