आवाहन

स्नेह.

नवीन कृषी कायदे मागे घेताना “आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली. देशवासियांची आम्ही माफी मागतो.” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. आजवर याच कायद्यांचे गुणगान गाणारे आणि दहशतवादी, माओवादी, सोंग घेतलेले गुंड, एवढेच नव्हे, तर अराजकतावाद्यांचे गिनिपिग्ज अशा वेगवेगळ्या शब्दांत आंदोलनकर्त्यांचा उपमर्द करणारे भारतीय जनता पक्षाचे सदस्य पंतप्रधानांच्या या कथनानंतर वेगळ्याच भूमिकेत शिरले. उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नवीन कृषी कायदे मागे घेतले असल्याची विरोधकांची सुरू असणारी ओरड दाबण्यासाठी आता “शेतकरी याच देशाचा नागरिक आहे आणि भारताचा प्रत्येक नागरिक आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.” अशी पुस्ती ते जोडू लागले.

पक्षांतर्गत परस्परविरोधी अशा या विधानांमुळे राजकारणात नेतृत्वाचा आणि त्यांच्या निर्णयाचा पाया नेमका कोणत्या तथ्यांवर आधारित असतो याविषयी मनात संभ्रमच उमटतो. मग हे नेतृत्व कोणत्याही पक्षाचे का असेना.

मध्यम वयोगट तिशीचा आत असणाऱ्या, म्हणजे अर्थातच तरुण म्हणून गणल्या जाणाऱ्या आपल्या देशातील तरुण पिढी या सगळ्या गोंधळातून नेमके काय उचलेल हा प्रश्न म्हणूनच ऐरणीवर आला आहे.

एकीकडे स्वत:तच मग्न असणारा एक मोठा तरुण वर्ग आहे. मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या, गाड्या, बंगलोर, हैद्राबाद, पुणे यांसारख्या टीअर १ शहरांमध्ये ३ बेडरूम फ्लॅट आणि हातात आय-फोन या स्वप्नांमध्ये हा वर्ग गुंग आहे. स्विगी/झोमॅटोसारख्या सेवाकंपन्या आपल्याला वेळेत पिझ्झा पोहोचवतील की नाही, काही वेळासाठी इंटरनेट बंद झाले तर नेटफ्लिक्स, व्हॉट्सॲप, यू-ट्युब कसे चालेल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरून काही मागवता येईल की नाही म्हणून कासावीस होणारा हा वर्ग आहे. टीव्हीसमोर बसून ॲन्कर्सचा आरडाओरडा ऐकणारा आणि गडगडत्या किंवा चढत्या सेन्सेक्सच्या आकड्यांवर आपली स्वप्ने विणणारा हा वर्ग आहे. जोपर्यंत विषमतेची मुळं त्यांना स्पर्श करीत नाहीत, तोपर्यंत आपल्यापुरत्या विचारांतच हा अडकला आहे. स्पर्धेतून निर्माण झालेल्या स्वत:च्याच असंख्य समस्यांशी झगडा देता देता समाजातील समस्यांचा विचार  करण्याची त्याची इच्छाही उरलेली नाही आणि ऊर्मीही!

तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने व्यसनाधीन झालेले, खर्ऱ्याच्या टपऱ्यांसमोर दिवस-दिवस घालवणारे तरुण किंवा हतबल, हताश तरुणी आहेत. शिकण्यासाठी समान संधी उपलब्ध नसल्याने कासावीस होणारा एक वर्ग आहे. जातीय विषमतेमुळे सतत डावलल्या जाणारा, राजकीय पटलावर सोंगट्यांसारखा नाचवला जाणारा, आपले संपूर्ण भविष्यच झाकोळलेले दिसत असल्याने खचलेला असा हा एक वर्ग आहे. पत्रकारिता बाजारू झाली असल्याने आपले प्रश्न संबंधितांच्या कानापर्यंत कसे पोहोचणार या विवंचनेत हा वर्ग आहे. आर्थिक विषमतेनं त्यांची स्वप्ने पार चुरडली गेली आहेत तर जातीय भेदातून, लिंगभेदातून, पारंपरिक कुटुंबसंस्थेतून/ कुटुंबसंस्थेमुळे त्यांच्यावर येणाऱ्या ताण-तणावांमुळे त्यांचा कणा पार मोडून गेला आहे. स्वत:च्या समस्यांशी झगडा देता देता समाजातील समस्यांसाठी लढण्याची उमेदच त्यात उरलेली नाही.

एक वर्ग केवळ स्वत:साठी जगतो आहे, समाज त्याच्यासाठी दुय्यम आहे. दुसरा एक वर्ग समाजाची ताकद ओळखतो, पण त्या समाजासाठी काही करण्याची ताकद त्याच्यात नाही.

अशी दोन परस्परविरोधी चित्रे प्रत्यक्ष अनुभवत असताना ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज्’ म्हणणाऱ्या वीर दासवर टीकेचे लोट उठतात (https://www.youtube.com/watch?v=5A-F9qu6c_4) तेव्हा नेमके त्याने म्हटले त्याचा विरोध असतो की हे तो अमेरिकेत म्हणाला आणि आपल्या देशाची प्रतिमा डागाळली गेली यासाठी तो विरोध असतो हे समजणे कठीण जाते.

वीर दासला दिसलेले दोन इंडियाज् हे वास्तव आहे. इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. तरुण वर्ग अधिक मोकळ्या विचारांचा, तुलनेने अधिक समृद्ध आणि पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा अधिक आर्थिक स्थैर्य असणारा असूनही वरील संघर्ष कुठेही कमी होताना का दिसत नाही याचे उत्तर आपल्याला शोधावे लागणार आहे. वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्याविषयी बोलावे लागणार आहे. Technology is great equalizer असे म्हटल्या जाते खरे, पण तळागाळापर्यंत, अतिशय दुर्गम भागांपर्यंत पोहोचलेले तंत्रज्ञानदेखील समाजाला समान पातळीवर आणण्यात कमी का पडते आहे याचा विचार करावा लागणार आहे.

यावरचे आपले विचार, मते-मतांतरे, यावरील उपाय किंवा यासाठीचे ठोस कृती-कार्यक्रम ‘आजचा सुधारक’च्या जानेवारी २०२२च्या अंकात आपण समोर आणू शकतो.

आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्र, व्यंगचित्र, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरुपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २७डिसेंबरपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.

– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.