मनोगत

‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबरच्या अंकासाठी साहित्य मागवताना आपल्या समाजातील विषमतेवर आणि चढाओढ, स्वार्थ यांसारख्या मूलभूत स्वभाववैशिष्ट्यांवर लिहावे असे आम्ही सुचवले होते.

तदनुषंगाने श्रीधर सुरोशे यांचे बर्ट्रांड रसेल यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ या ग्रंथाचे परीक्षण उल्लेखनीय वाटते. त्यांच्या परीक्षणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अनुक्रमे ग्रंथपरिचय आणि ग्रंथसमीक्षा असा असून यात बर्ट्रांड रसेलांनी आणि डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विविध संकल्पनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

या अंकात पुस्तक परीक्षणांना विशेष जागा देता आली याचा आनंद वाटतो. यानिमित्ताने वाचकांची अनेक नव्या व जुन्या उत्तम, वाचनीय अशा पुस्तकांशी ओळख होईल.

चंद्रकांत ठाकरे यांचा ‘कविता – कालची आणि आजची’ हाही एक माहितीपूर्ण लेख या अंकात आहे. कवितेच्या प्रांताशी नव्याने ओळख करून देणारा कवितेइतकाच लालित्यपूर्ण असा हा लेख वाचकांना आवडेल याची खात्री वाटते.

मुंबईतील अगदी परिचयाचीच पण तरीही प्रत्येकवेळी ह्रदयद्रावक वास्तवाचे भान देणारी झोपडपट्टीतील जीवनाविषयक ‘पटरी’ या विजय पाष्टे यांच्या कथेच्या माध्यमातून ‘आजचा सुधारक’मध्ये प्रथमच ‘कथा’ हा साहित्यप्रकार आम्हाला हाताळता आला आहे.

‘आजचा सुधारक’च्या ऑगस्टच्या ‘फलज्योतिष विशेषांका’त भरत मोहनी यांच्या ‘विक्रम आणि वेताळ’ या लेखमालिकेचा पहिला भाग प्रकाशित झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांत त्यातील पुढचे तीन भाग आम्ही प्रकाशित केले. या अंकात त्याचा पाचवा भाग समाविष्ट केला आहे. विवेकपूर्ण विचार करणाऱ्याच्या मानगुटीवर बसलेल्या प्रश्नांवर राजाची उत्तरे आणि राजाचा मौनभंग झाल्याने वेताळाचे पुन्हा झाडावर लोम्बकळणे अशी रंजक भाषा वापरून माणसाच्या मनातील कमकुवत जागा लेखकाने नेमक्या पकडल्या आहेत. या लेखमालिकेत पुढेही माणसाच्या मनात उमटणारे अनेक प्रश्न आणि त्यांचे तर्कसंगत निराकरण होत राहावे असे वाटते.

काही तात्कालिक विषयांनाही हात घालावा असे मनात असतानाच बदललेल्या ऋतुचक्राचे विषण्ण करणारे वास्तव मांडणारी अनंत भोयर यांची कविता, तसेच पर्यावरण बदलाचे चित्र दाखवणारी श्रीनिवास माटे यांची कविता लक्षवेधी आहे.

हा अंक वाचल्यानंतर येणाऱ्या तुमच्या अभिप्रायाचे आणि सूचनांचे स्वागत.

अभिप्राय 2

  • अंकातील लेखांसंबंधी वाचले. आजून ते वाचलेले नाहीत. वाचल्यावर प्रतिसाद देईनच. पण या अंकासाठी लेख मागवताना खास करून तालीबानिंच्या आफगाणिस्तान वरील कब्जामुळे भातावर होऊ शकणाय्रा परिणामां विषयी व आपल्या देशातील सद्य परिस्थितीची तालिबानशी तुलना, यावर निर्देश करण्यात आला होता, म्हणून मी त्या अनुशंगाविषयी लिहिले होते. पण माझ्या लेखाला स्थान मिळू शकले नाही. संपादक मंडाळाची मर्जी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.