सूर्याने उजाडलंच पाहिजे…!

विधवा असणं….
खडक फोडून पाणी काढल्यासारखं
पाण्याचा मागमूस नाही
उभं पीक डोळ्यांदेखत जळावं
नुसतं जळत जावं
सदाहरित वृक्ष दुष्काळात करपणं
करपल्यालं खोडंही ओरबाडून टाकणं

विधवा असणं….
म्हणजे आतल्या आत सोलत जाणं
कुठेच थांबा नाही
शेवटचं ठिकाणही नाही
मनसोक्त आनंद लुटावा असा कॅनव्हासही नाही
कोरड्या बारवमध्ये पोहत सुटायचं
पाण्याचा गंधही नाही…

विधवा म्हणजे….
असतो एकटीचा प्रवास
माघार नाहीच नाही
पुढेही अंधार पाचविला पुजलेला
भयाण स्वप्नांचं घर असते विधवा…
तिला दार नाही
खिडक्या तर मुळीच नाहीत
गावातील शेवटचं घर हाच कायमचा पत्ता
ओंजळीत मावेल एवढं हसू नाही
रुजावं कुठे तर सुपीक माती नाही
चालतात आतल्या आत कित्येक महायुद्ध
ज्याला अंत नाही…

विधवा असणं नेमकं काय?
ओसाड जमिनीचा अखेरचा तुड़ा?

चाकोऱ्या तोडून माळरानं फुलवायला हवी
परीघ सोडून पाखरांनी उडायला हवे
आता…
दाही दिशांचं आभाळ मोकळं करून
सूर्याने उजाडलंच पाहिजे…!



हेमंत दिनकर सावळे
जि. वाशिम
7875173828

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.