त्या कृष्णसागरावरती
विश्वाच्या लाटा येती
गंगांचे फेस उधळती
बुडबुडे ग्रहांचे उठती |
त्यातील नील गोलाला
म्हणतात आपली धरती
धरणीच्या पायघड्यांतून
या पर्वतमाला घडती |
अन् सप्तसमुद्रांवरती
जलदांच्या राशी झुलती
वाऱ्यावर लहरत जाता
अचलांवर करती वृष्टी |
की हरित जटा शंभूच्या
वृक्षावली दाट उगवती
फेसाळत उंच कड्यांतून
ओघांच्या सरिता बनती |
वेळूवनातून जाता
वाऱ्याची गीते होती
पकडून सूर्यकिरणाांना
जलबिंदू रंग पसरती |
जलचर वनचर पक्षी
अन् मानव रांगत येती
ते उभे राहती आता
भाषेची कळते युक्ती |
जे दिसे जाणवे ते ते
जाणिवेपार जे लपले
कल्पना विहंगम होता
ते ऋचा अर्पुनी गेले |
वनकुहरे सोडून केली
सरितातीरावर वस्ती
जोडिली, उराशी जपली
ती स्थावर, जंगम, नाती |
वडवानल होते उर्जा
बेटांची कमळे फुलती
कधी त्सुनामी होऊन लाटा
भातुकली मोडून जाती |
शावके, फुले अन् बाळे
हास्याची उधळण करती
काळाचे हस्तक केव्हा
सुह्रदांना ओढून नेती |
हे चलनवलन सृष्टीचे
शाश्वती एक बदलाची
बुडबुडे, फेस अन् लाटा
कृष्णातच विरती स्फुरती |
मज हव्यात लाटा
नीलबिलोरी
वेळावत, फुस्कारत, धसमुसणाऱ्या,
अन् तरंग अस्फुट लव पाण्यावर
लवलवणारी |
मज हवा फेस तो
लाटांवर फसफसणारा
मज हवे बुडबुडे, घुमट जणू काचेचे
जे गिरकी घेता, रंगांचे नर्तन होते |
घुमटात सखे त्या
हाती गुंफू हात
या क्षणात लपला
आहे काळ अनंत |