कविता – कालची व आजची

कविता आजची असो अथवा कालची, तिच्या निर्मितीमागील प्रेरणा मानव्य असते. तिला स्थलकालाचे बंधन नसते. साहित्य निर्मितीमागील प्रेरणा ही सर्वसामान्यपणे प्रत्येक देशात व भाषेत सारखीच असते. साहित्याची निर्मिती होण्यासाठी एक फार मोठी शक्ती आवश्यक असते. ती म्हणजे “प्रतिभा”! वामनाने यालाच ‘कवित्वाचे बीज’ असे म्हटले आहे. त्यासोबतच स्फूर्ती व कल्पनाशक्तीही महत्त्वाची असते. प्लेटो व अरिस्टॉटलने कलात्मक अनुकरणाचा (Artistic Imitation) सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मतानुसार अनुकरणाच्या माध्यमातून काव्याची निर्मिती होत असते. विल्यम वर्डस्वर्थने काव्य-स्फूर्तीची व्याख्या ”उत्कट भावनांचा सहज उत्स्फूर्त उद्रेक” अशी केलेली आहे. Prescott च्या मतानुसार प्रतिभा घडविणारी शक्ती म्हणजे ”कल्पनाशक्ती”. काव्यनिर्मितीमध्ये कल्पनाशक्तीला खूप महत्त्वाचे स्थान असते, असे प्रथमतः बेकनने म्हणून ठेवले आहे. कोलरीजने कल्पनाशक्तीचे प्रथम व द्वितीय श्रेणीची कल्पनाशक्ती असे दोन प्रकार मांडलेले आहेत.

“कालची कविता, कवी व काव्यविषय” यांचा संपूर्ण धांडोळा घेणे म्हणजे फारच मोठे व अवघड काम आहे. परंतु त्याशिवाय आजच्या कवितेची स्थिती उमगणार नाही.

प्राचीन मराठी साहित्यात महानुभवीय साहित्याला खूप महत्त्व आहे. ‘लीळाचरित्र’पासून मराठी चरित्रग्रंथाला सुरुवात झाली. ‘रुक्मिणीस्वयंवर’ रचणारी महंदबा ही मराठीला पहिली कवयत्री या पंथाने दिली. नाथपंथाच्या संबंधित असलेल्या वारकरी पंथाची धुरा महाराष्ट्रातील संत मंडळींनी उभारली. अमृतालाही लाजवणारे असे साहित्य या संप्रदायाने निर्माण केले. चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, नामा शिंपी, तुकोबा, संत सखू, मुक्ताबाई, जनाबाई असे कवी व कवयित्री या पंथातून साहित्य लिखाण करू लागले. तुकाराम अनेक अर्थाने वारकरी संप्रदायाचे कळस ठरले.

सतराव्या शतकाच्या अखेरीस व अठराव्या शतकात बखरीसोबतच शाहिरी वाङ्मयाचा विकास झाला. यात पोवाडे व लावणी हे प्रकार मोडतात. पोवाडा हा प्रकार शिवकाळात तर लावणी हा प्रकार पेशवेकाळात उदयास आला. पोवाडा दीर्घ रचना असते, तसेच त्याची बांधणी चौका-चौकांनी केलेली असते. शिवकाळ ते शाहू काळ यातील तीनशे पोवाडे उपलब्ध आहेत. इसवीसन सोळाशे पूर्वीची कराडची भवानीवरील लावणी सर्वांत जुनी मानली जाते. आकाराने लहान असलेल्या या प्रकारात ताल, ठेका, संगीत, नृत्य इत्यादी प्रकार येतात.

१८८५ मध्ये आधुनिक काव्याला सुरुवात झाली. इंग्रजी राजवटीच्या परिणामामुळे आधुनिक काळात काव्याचा चेहरामोहरा बदलला तो केशवसुतांनी. केशवसुतांना अर्वाचीन काव्याचे जनक म्हणतात. याच काळात गोविंदाग्रज, बालकवी, ना.वा. टिळक, कवी विनायक यांनी मराठी काव्याला झळाळी आणली. इंग्रजी अनुकरणाने ‘लव लीरिक्स व सुनीत काव्य’ हे प्रकार काव्यात येऊ घातले. मराठी कवितेवर इंग्रजी पेहराव चढविण्याच्या उद्योगास नवशिक्षित कवींनी प्रारंभ केला. इंग्रजी साहित्य जास्त अलंकारिक नसतानाही अंतःकरणाचा सहज ठाव घेते. याच कारणाने नवकवी इंग्रजी काव्याच्या अनुकरणाकडे वळले. एपिक, नॅरेटिव्ह, सटायर, लीरिक आणि यांसारखे काव्यप्रकार रुळवण्याचा प्रयत्न केला गेला.

एकोणीसशे वीसला काव्यक्षेत्रात निर्माण झालेले ‘रविकिरण मंडळ’ खूप महत्त्वाचे आहे. या मंडळातील माधव ज्यूलियन, गिरीश, यशवंत यांनी नवनवे प्रयोग केले. गझल, रुबाया, सुनीत, उर्दू-हिंदी मिश्रित मराठीत खंडकाव्य या काळात प्रसिद्ध झाले.

१९४५ ला मर्ढेकरांच्या काव्यरूपाने नवकाव्यास सुरुवात झाली. मर्ढेकर नवकाव्याचे जनक ठरले. औद्योगिकरण, यांत्रिकीकरण, दुर्बोधता, अश्लीलता व माणसाचे माणूसपण हरवणे इ. गोष्टी नवकाव्यात दिसू लागल्या. यातही आपली वेगळी परंपरा सांभाळली ती मनमोहन नातू, विंदा करंदीकर, पु. शि. रेगे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर व कुसुमाग्रज यांनी.

१९६० नंतर काव्यात आणखी नवीनता उतरली. काव्य ग्रामीण, दलित, स्त्रीवादी या नावाने पुढे येऊ लागले. प्रमुख कवी ठरले- नारायण सुर्वे, चित्रे, कोल्हटकर, सुरेश भट, केशव मेश्राम, ग्रेस, आरती प्रभू. या सर्व महान कवींनी मोठे योगदान दिले. पुढील काळात नामदेव ढसाळ, राजन गवस, विठ्ठल वाघ यांनी आपला ठसा उमटवला. ग्रामीण कवितेने मोलाचे योगदान दिले. आनंद यादव, बहिणाबाई चौधरी, सरोजिनी बाबर, राजन गवस, मोहन पाटील, ना.धों. महानोर, विठ्ठल वाघ यांनी ग्रामीण कवितेला उच्च दर्जा मिळवून दिला.

ग्रामीण साहित्याचा प्रारंभबिंदू १९२५ हे वर्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले मानतातच तर डॉक्टर आनंद यादवांनी त्या अगोदर म्हणजे एकोणाविसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा प्रारंभबिंदू मानलेला आहे. संतकवींमधील एकनाथांनी ग्रामीण वास्तवाचा व जीवनसंदर्भांचा आपल्या संतकवितेत सर्वाधिक वापर केलेला आहे. ‘सुगी’ हा ग्रामीण कवितांचा पहिला प्रातिनिधिक संग्रह १९३३ साली प्रसिद्ध झाला. तीस ते पस्तीस कवींच्या कविता यात आहेत. शहरातील कवींना खेड्याविषयी आकर्षण असते. त्यातून आकार घेणाऱ्या रम्य कल्पनांचा आविष्कार म्हणजे ‘सुगी’ असे आनंद यादव म्हणतात. ते योग्यच आहे. ग. श. पाटील यांनी ‘सुगी’ नंतर १९३४ साली ‘रानजाई’ हा स्वतःचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला. त्यात ग्रामीणतेची ओढ दिसते. वर्डस्वर्थची कविता ‘सॉलिटरी रिपर’ व थॉमस हार्डीचे ग्रामीण चित्रण यापासून प्रेरणा घेतल्याचे सुरुवातीला स्पष्ट दिसते. हे आरंभीचे परावलंबित्व नंतर संपलेले दिसते. बहिणाबाई चौधरी, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ व इंद्रजीत भालेराव यांनी पुढे ग्रामीण कविता अधिकच परिपक्व बनवली.

तेराव्या शतकात होऊन गेलेला महार जातीतील विठ्ठल भक्त संत चोखामेळा व त्याचा मुलगा कर्ममेळा यांच्या अभंगातून मनात ठसठसत असलेली वेदना व्यक्त झालेली आहे. खरी दलित कविता दलित चळवळीतून जन्मास आली. तिचे प्रेरणास्थान होते आंबेडकर. मुक्तिलढा तीव्र व्हावा म्हणून, अस्पृश्यांना जागे करावे म्हणून कवींनी कवित्वाची शक्ती वापरली. वामनदादा कर्डक, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, वामन निंबाळकर, दया पवार, केशव मेश्राम, अर्जुन डांगळे, यशवंत मनोहर इत्यादींच्या रूपातून दलित कवितांचे नवे रूप पाहावयास मिळते. सर्वोच्च स्तरावर बंडखोरीची व विद्रोहाची जाणीव स्पष्ट दिसते. दया पवार, अशोक बागवे व इतर मोठ्या दलित कवींनी विद्रोहाला वैचारिक रूप दिले. वसाहतवादी मनोवृत्ती, हिंदू जातीयवादी मनोवृत्ती यांचा उपहास कवितेतून केलेला दिसतो. जरी विद्रोह दिसत असला तरी दलित काव्यामध्ये मानवी मूल्य ठसठशीतपणे दिसून येते.

आजतर मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जाते. सामान्यतः कवितालेखनाची सुरुवात प्रेमकवितेतून होते. आजच्या कवींना समाजमाध्यमातून व्यक्त होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ज्येष्ठ व मनाने श्रेष्ठ कवींच्या मार्गदर्शनातून नवकवीदेखील हळूहळू उभारी घेतांना दिसत आहेत. काळाच्या ओघात चांगले कवी टिकून राहतील यात काही शंकाच नाही.

वाचण्यासाठी ज्येष्ठ कवींच्या कविता समाजमाध्यमांमुळे सहज उपलब्ध होत असतात. त्यातून कवी घडत जातो. अगदी लहान वयातदेखील अद्भुत अशी काव्यप्रतिभेची अनुभूती देत असतो.

समाजमाध्यमे अशा प्रतिभावंत कवींना उचलून धरतात. यू-ट्यूब सारख्या माध्यमातून लाखो व्ह्यूज् मिळतात. समाजमाध्यमांमुळे काव्यप्रकारात कुणा एकाची मक्तेदारी राहिलेली दिसत नाही. विविध साहित्यसंमेलनांच्या माध्यमातून सर्व स्तरावरील कवी आपली काव्यप्रतिभा अत्यंत दमदारपणे सादर करतांना दिसतात. असे अनेक साहित्यसंमेलनांचे चित्रीकरण करून यू-ट्यूबच्या माध्यमातून काव्य रसिकांपर्यंत पोचवले जाते.

सुरेश भटांनी गझल एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खलील मोमीन, प्रदीप निफाडकर, कमलाकर देसले, नितीन देशमुख, प्रमोद खराडे, सुप्रिया जाधव, ममता सपकाळ, संतोष कांबळे व सतीश दराडे यांसारखे अनेक नवोदित कवी, गझलकार आपल्या प्रतिभेने ज्येष्ठांचे डोळे दिपवल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचा एकूणच प्रत्येक सामाजिक विषयाबद्दलचा संवेदनशील दृष्टिकोण सर्वसामान्यांच्या मनापर्यंत नक्कीच भिडतो. किशोर कदम, गुरु ठाकूर व वैभव जोशी तर कधीच घरा-घरात पोचलेत. दासू वैद्य, संदीप चौधरी, शशी डांभरे, आश्लेषा महाजन, प्रभा सोनवणे, स्वाती सामक सारख्या वृत्तबद्धातून व मुक्तछंदातून अद्भुत प्रतिभेने काव्याविष्कार करून आपल्या असामान्य प्रतिभेची चुणूक दाखविणाऱ्या कवींचीही कमतरता नाही. नलेश पाटील यांची कवितेतून निसर्गाची प्रतिकृती डोळ्यासमोर उभी करण्याची हातोटी तर अक्षरशः अनुकरणीय आहे. इंद्रजीत भालेराव आणि शेतकरी हे जसे एक समीकरण आहे तसेच प्रशांत मोरे आणि आई हे समीकरणसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. ‘कवितेचे पान’सारख्या यू-ट्यूब चॅनेल्सवर अशा प्रतिभावंत कवींची कविता अनुभवता येते. तसेच ‘कालच्या’ कवितांनाही ऐकण्याची व रसग्रहण करण्याची संधी मिळते. गावोगावी असलेल्या साहित्य संघांद्वारे व WhatsApp च्या माध्यमातून ‘रंगत संगत’ सारख्या काव्यक्षेत्रास वाहिलेल्या समूहांद्वारे आजचे प्रतिभावंत तरुण व ज्येष्ठ कवी व्यक्त होत असतात व काव्यातील विविध प्रकार सहजपणे हाताळतांना दिसतात. अशाप्रकारे ‘कालच्या’ कवितेच्या रूपाने जो देदीप्यमान वारसा लाभलेला आहे तो वारसा चालवण्यास सक्षम पिढी उभी ठाकलेली दिसते. आजचे प्रश्न व समस्या वेगळ्या आहेत. त्या प्रश्नांना अनुरूप तंत्राचा वापर करून तंत्रज्ञानातून आलेल्या नवीन शब्दकळांचा चपखल वापर करून अत्यंत दमदारपणे कवितांचे सादरीकरण करणाऱ्या तरुणांसोबतच ज्येष्ठ, श्रेष्ठ कवी मेहनत घेतांना दिसतात. अगदी तरुण कवींसकट ज्येष्ठ कवीदेखील चालीसह कविता सुचते असा अनुभव व्यक्त करतात. आपल्या वयाच्या मानाने अत्यंत परिपक्व विचार काव्यातून प्रकट करणारे तरुण कवी स्तब्ध करीत असतात, कधी कधी खळखळून हसवत असतात तर कधी राजकीय व सामाजिक विचार अत्यंत तळमळीने मांडून समाजास अंतर्मुख करत असतात. तरुण, ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींची प्रतिभा व दमदार सादरीकरण बघून मराठी काव्यविश्वाचे भवितव्य किती उज्ज्वल आहे याची प्रचीती येते.

मालेगांव
9403454584

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.