प्रसंग पहिला
एक व्यक्ती एका कार्यालयात कामाला लागली. कधी? १ एप्रिल २०१९, सकाळी नऊ वाजता. नऊ वाजल्यापासून कार्यालय सुरू झाले. व्यक्तीच्या टेबलसमोरची जी खिडकी आहे, त्या खिडकीतून साधारण एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक आहे आणि तिथून साधारण दिवसातून दोन वेळा ट्रेन पास होताना दिसते. त्या ट्रॅकपलीकडे अडीच ते तीन किलोमीटरवर एक मोठा डोंगर दिसतो. अर्थात डोंगराच्या पार्श्वभूमीवर ट्रेन पास होताना कार्यालयातून दिसते.
दोन वर्षांनी या व्यक्तीला प्रमोशन मिळाल्याचे पत्र मिळाले. हे पत्र मिळाले तेव्हा समोरून ट्रेन पास होत होती. त्यावेळेस तिथे कार्यालयात श्री संस्कारे नावाची व्यक्ती कामासाठी आलेली होती. त्यांनी प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीला कधी रूजू झाले ते विचारले. १ एप्रिल २०१९ ला नऊ वाजता रूजू झालो असे ऐकून काही आकडेमोड करून श्री. संस्कारे यांनी सांगितले की, आज चार वाजता त्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर ट्रेन पास झाली म्हणून प्रमोशन मिळाले. तिथे बसलेल्या अनेकांना श्री संस्कारे यांचं म्हणणं पटत असल्याचं दिसलं.
तरीही तिथे बसलेली विवेक नावाची व्यक्ती मात्र याबाबत सहमत नाही असं दिसलं. त्या व्यक्तीने सरळ एक प्रश्न विचारला की अनेक किलोमीटर दूर असलेल्या डोंगराच्या या पार्श्वभूमीवर दोन किलोमीटर लांबून जाणारी एक छोटीशी ट्रेन या व्यक्तीला प्रमोशन देते हा निष्कर्ष आपण कशाच्या आधारावर काढला? या म्हणण्याला पुरावा किंवा तर्क काय? तर श्री संस्कारे म्हणाले की तसं ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे.
आपल्याला काय वाटतं? तिथून ट्रेन पास झाली म्हणून प्रमोशन मिळालं?
आता वरील प्रसंगामध्ये काही गोष्टी बदलू या..
१ एप्रिल २०१९, नऊ वाजता – ही जन्मतारीख व जन्मवेळ
दोन वर्षांनी तीच वेळ – म्हणजे घटना घडण्याची वेळ
प्रमोशन – म्हणजे घटना
श्रीयुत संस्कारे – म्हणजे ज्योतिषी
अनेक जण – म्हणजे समाजातील ज्योतिष्यांचे समर्थक
ट्रेनचे पास होणे – म्हणजे आकाशातील ग्रहांचे भ्रमण जे खगोलीय नियमाप्रमाणे होत असते. तेही कोट्यवधी किलोमीटरवरून.
दूरवरील डोंगर – म्हणजे शेकडो प्रकाशवर्षे दूर असलेले ताऱ्यांचे समूह, ज्याला ग्रीकांनी राशी आणि भारतीयांनी नक्षत्र असं संबोधलं.
प्रसंग दुसरा
प्रगती आणि प्रमेया या दोघी मैत्रिणी पास झाल्या म्हणून जेवायला गेल्या. त्यांनी जेवणात सहा पदार्थ मागवले आणि नंतर एक थंड पेय आणि दोन आईस्क्रीम मागवले. एकूण नऊ खाद्यपदार्थ व त्यांनी खाल्ले. साधारण अर्ध्या तासांनी दोघींच्याही पोटात दुखू लागले आणि म्हणून त्यांना डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी सांगितलं, “विषबाधा झाली.” प्रमेयाने विचारले की खाल्लेल्या पदार्थांपैकी कशापासून विषबाधा झाली? अर्थात कोणत्या पदार्थाची विषबाधा झाली हे डॉक्टर सांगू शकले नाहीत. तिने पुन:पुन्हा विचारले की कशापासून विषबाधा झाली हे तुम्ही का नाही सांगू शकत? डॉक्टर म्हणले की तुम्ही नऊ खाद्यपदार्थ सेवन करून मग आल्या आहात. त्या नऊ पदार्थांपैकी प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळ्याने परीक्षण केल्यानंतरच त्यातील कोणता किंवा कोणते पदार्थ खाण्यास धोकादायक होते किंवा आहेत हे सांगता येईल.. डॉक्टर म्हणाले, “प्रत्येक पदार्थ वेगवेगळा तपासून पाहिला तरच ते कळू शकेल. जे एकदम खाऊन झाल्यानंतर शक्य नाही.”
आता इथेही आपण जागा बदलूया…
सेवन केलेले ९ पदार्थ – म्हणजे नवग्रह
प्रमेया – म्हणजे पुरावा तेवढा विश्वास असं म्हणणारी जागरुक नागरिक
डॉक्टर – म्हणजे कारणमीमांसा समजावून देणारे शास्त्र
खरे तर ग्रहांचा कुठलाच परिणाम मानवी जीवनावर होत नाही हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. याउलट मानवी जीवनावर ग्रहांचा परिणाम होतो हे अजून तरी ज्योतिषशास्त्राने सिद्ध केलेले नाही. परंतु समजा, तसे गृहीत धरले तरी, जसे नऊ पदार्थांपैकी कोणत्या अन्नपदार्थ पदार्थामुळे विषबाधा होऊ शकते हे सांगणे शक्य नाही, तसेच नवग्रहांपैकी कोणता ग्रह हा जहाल आहे किंवा मवाळ आहे, कडक आहे की मऊ आहे हे ठरवले कसे? आणि ते कोणते गणित किंवा ज्ञान होते ज्यांच्या साहाय्याने ग्रहांचा आजच्या विज्ञानालाही जाणवला नाही असा प्रभाव ज्योतिष्यांना जाणवला? व्यक्तिगत ग्रहांचा प्रभाव त्यांना कसा ठरवता आला?
प्रसंग तिसरा
शांत समुद्रकिनारी जमलेल्या समुदायासमोर एक बाबा सगळ्यांना सांगत होता की समुद्राची ओहोटी ही चंद्रामुळे येते. समुद्राच्या पाण्यावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडतो, तर मग तुमच्या आणि माझ्या शरीरातही जवळजवळ सत्तर टक्के पाणी आहे. त्याच्यावरही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडत नसेल का? अगदी शास्त्रीय भाषेत बाबांचा युक्तिवाद जवळजवळ सगळ्यांनाच पटला. माझ्या मनात मात्र दोन-तीन प्रश्न निर्माण झाले.
- बरोबर आहे. चंद्रामुळे समुद्राचा पाण्याची पातळी भरती आणि ओहोटी स्वरूपात बदलते. परंतु त्यात समुद्राचे पाणी समुद्रकिनारी असलेल्या खड्ड्यांमध्येही भरतं आणि त्या खड्ड्यातल्या पाण्याला भरती-ओहोटी अजिबात येत नाही. इतकंच काय, मी मासे पकडून आणल्यानंतर ज्या भांड्यात समुद्राच्या पाण्यासह मासे ठेवलेले असतात किंवा एखाद्या भांड्यात किनार्यावर त्याच समुद्राचे पाणी काढून ठेवले तर त्याला भरती-ओहोटी का बरं येत नाही?
- चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव संपूर्ण जगातल्या सगळ्या समुद्रांवर सारख्याच प्रमाणात पडतो पण प्रत्येक माणसावर मात्र तो प्रभाव वेगवेगळा पडतो यामागे काय तर्क आहे बरं?
- पृथ्वीला एकच चंद्र. त्याचा प्रभाव पडतो असं हे म्हणतात. पण मग गुरूला ७६ चंद्र आहे आणि शनीला ८२ चंद्र आहेत. मंगळाचे आणखीन दोन चंद्र धरले तर ह्या चंद्राची संख्या होते १६०. एका चंद्राचा प्रभाव पडतो, पण ह्या १६० चंद्रांपैकी एकही चंद्र यांच्या कुंडलीमध्ये कुठेही आढळत नाही? की प्रभाव फक्त पृथ्वीच्या चंद्राचा पडतो. बाकीच्यांचे चंद्र प्रभावहीन आहेत असं हे मान्य करतात का?
- बरं, चंद्रामुळे पृथ्वीच्या जमिनीला पण भरती-ओहोटी येते. मग शरीरातल्या पाण्याबरोबर मांसल अवयवांना पण भरती-ओहोटी येते असं हे कधीच बोलताना दिसत नाहीत. म्हणजे चंद्राचा प्रभाव फक्त पाण्यावर होतो, मांसल भागांवर किंवा अवयवांवर होत नाही असं तर म्हणायचं नाही ना?
प्रसंग ४
विवेक साहेबांचं प्रमोशन व्हायचं होतं. त्यांच्या मुलांच्या दहावी-बारावीच्या परीक्षाही होत्या. घरामध्ये आनंदाबरोबरच थोडं तणावपूर्ण वातावरण होतं. त्यातच खर्चाचाआणि उत्पन्नाचा ताळमेळ बसवताना थोडी जास्तच कसरत व्हायला लागली. साहेबांच्या पत्नीला इतके दिवस सुरळीत चाललेला संसार अचानकपणे विस्कटला आहेसा वाटायला लागलं. त्यांच्या मैत्रिणीने ज्योतिष्याकडे जायचा सल्ला दिला. यापूर्वी सर्व व्यवस्थित असल्याने कधी तशी वेळ आली नव्हती. पण आता मात्र विवेक साहेबांना काही ग्रहांची बाधा असली तर ‘कशाला विषाची परीक्षा घ्या’ म्हणून ज्योतिष्याचा सल्ला घ्यावा असे वाटू लागले. त्यातच ते पाहत असलेल्या सर्व चॅनेलवर वारंवार ज्योतिष्यांचे सल्ले दिले जात होते. आता इतके लोक ज्योतिषाबाबत बोलताहेत आणि पेपरमध्ये, चॅनेल्सवर सर्वत्र त्याबाबत सांगितलं जातंय म्हणजे काहीतरी तथ्य असणारंच ना? विवेक साहेबांनी मित्राला विचारून एका चांगल्या ज्योतिष्याची माहिती काढली आणि काहीतरी उपाय मिळतो का या अपेक्षेने ज्योतिष्याकडे जायचे ठरविले. त्या ज्योतिष्याने साहेबांची कुंडली पाहून काही खूप समजतील अशा आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या. परंतु थोड्या वेळाने त्याच्या चेहर्यावर आठ्या दिसू लागल्या. त्या आठ्यांची कारणे विचारताच ज्योतिषीबुवांनी सांगितले की शनीची ग्रहदशा थोडी वाईट आहे. अर्थात ग्रहदशा वाईट आणि त्यातही शनीची म्हटल्यावर विवेक साहेबांना खूप काळजी वाटू लागली. अर्थात ज्योतिषीबुवांकडे काहीतरी उपाय असेलच म्हणून त्यांनी उपाय विचारला असता शनीची शांती करण्यासाठी सोळा शनिवार उपवास करायला सांगितले. तसेच शनीमहात्म्यासाठी एक विधी करायला सांगितला. त्या विधीचा खर्च विचारताच त्यांनी रुपये पंचवीस हजार सांगितले. विवेक साहेब तेथून उठून बाहेर आले. एकदम २५०००/- द्यावेत का? हा विचार करत होते. दोन-तीन दिवस गेले. त्यांच्या मित्राकडे दुसरा ज्योतिषी तयार होता. त्याच्याकडे जायचे ठरले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्याच शनीची ग्रहदशा सुधारवण्यासाठी जो विधी होता त्या विधीचे पंधरा हजार रुपये सांगितले. विवेक साहेबांच्या पत्नीला तेही पैसे थोडे जास्त वाटत होते. तिने आपल्या मैत्रिणीला विचारले असता आणखी एका ज्योतिष्याचा पत्ता मिळाला. विवेक साहेब सपत्नीक त्या ज्योतिष्याकडे गेले. त्यांनीही शनीची ग्रहदशा सुधारण्यासाठी जो विधी सांगितला तो विधी पाच हजार रुपयात करतो म्हणून सांगितले. यादरम्यान, साहेबांचा जुना पुरोगामी विचारांचा मित्र भेटला. त्याच्याशी चर्चा करता करता त्यानी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर मात्र नावात विवेक असणाऱ्या साहेबांकडे नव्हते. त्यांच्या मित्राने विचारले की एका ज्योतिष्याकडे पंचवीस हजार रुपयांत ज्या विधीमुळे ग्रहदशा बदलता येऊ शकते, त्या विधीला दुसऱ्याकडे पंधराहजार रुपयांत तर तिसऱ्याकडे मात्र तेच काम पाच हजार रुपयांत कसे होऊ शकते?
आता मात्र विवेक साहेबांचा विवेकी विचार जागृत व्हायला लागला होता. त्यांच्या मनात प्रश्न येऊ लागले.
- वेगवेगळे ज्योतिषी वेगवेगळ्या किमतीत ग्रहदोष दूर करताहेत म्हणजेच समोरच्याची आर्थिक परिस्थिती पाहून तर ते ठरवत नाहीत ना?
- ज्याअर्थी वेगवेगळ्या किमतीत हे ज्योतिषी ग्रहदोष दूर करतात, त्याअर्थी कमी किंमत घेणारा ग्रहदोष पूर्ण दूर करेल याची काय हमी?
- आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकाच ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी वेगवेगळे ज्योतिषी वेगवेगळी किंमत कसे काय वापरू शकतात? यात काय गौडबंगाल आहे?
- ज्योतिषाच्या किंवा ग्रहांच्या परिणामापेक्षा हे ज्योतिष्यांची परिस्थिती सुधारण्याचे अर्थकारण तर नाही ना?
विज्ञान कायम सांगते, “प्रश्न विचारा.. उत्तरे शोधा…” विवेक साहेबांनी स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करताच, स्वतःच्या नावातला विवेक वापरण्याची तसदी याआधी का नाही घेतली याबाबत त्यांना पश्चाताप होऊ लागला.
प्रसंग ५
अनामिका आपल्या मैत्रिणीबरोबर बोलत होती. त्यांचा विषय होता, ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम! अनामिका हे समजावण्याचा प्रयत्न करत होती कीविज्ञानाने हे सिद्ध केले आहे की ग्रहांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही. त्यावर तिची मैत्रीण देवयानी “ग्रहदर्शनामुळेच आपल्या जीवनात स्थित्यंतरेघडतात” असे सांगत होती. अनामिकाने सहज तिला विचारले, “कसं काय गं ग्रहदशेमुळे? म्हणजे ग्रहांचा माणसावर कोणत्या प्रकारे परिणाम होतो?” “ग्रहांकडूनतुमच्यापर्यंत काही लहरी येतात आणि त्या लहरींचा आपल्यावर परिणाम होतो” असे मैत्रिणीने सांगितले. अनामिका म्हणाली, “मला नाही पटत.” मैत्रिणाने समजावले, “अनेक ग्रहांवरून लहरी येतात. त्या लहरी मानवी जीवनावर परिणाम करू शकतात. सूर्य गरम झाल्यावर जसं आपल्याला गरम वाटतं, तसंच इतर ग्रहांच्या शक्तीचा परिणाम आपल्यावर होतच असणार ना?” त्यावर अनामिकाने एक प्रश्न विचारला. ती म्हणाली, “पृथ्वीपासून जवळजवळ पंचवीस कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रहांच्या ज्या लहरी आपल्यापर्यंत येतात असे तू म्हणतेस, त्या लहरी ग्रहांवरून निघाल्या. तिथं त्या संपूर्ण सूर्यमालेत पृथ्वी शोधत निघाल्या. त्यांना पृथ्वी सापडल्यानंतर त्या पृथ्वीवरील सात खंडांपैकी आशिया खंड शोधून, त्यातील भारताला शोधायला लागल्या. आणि भारत सापडताच त्यांनी महाराष्ट्राचा शोध घेऊन, मुंबई जिल्ह्याच्या एका उपनगरातल्या दहा मजली हॉस्पिटलच्या गच्चीतून १०वा मजला, मग ९वा मजला, मग ८वा मजला, असा प्रवास करत सिमेंटच्या छतामधून प्रवास करत पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटर शोधत, थिएटरमधल्या मातेची प्रसूती व्यवस्थित व्हावी म्हणून बाळाच्या आणि बाळाच्या आईभोवती जमलेल्या नर्सला आणि डॉक्टरला बाजूला करून त्या बाळासाठी खाली आल्या. तर अश्या या लहरींचा प्रभाव त्या बाळावर आयुष्यभर राहतो हे, देवयानी, तुला हास्यास्पद नाही वाटत?”
“बरं, त्यापुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर मंगळ मुंबईच्या आकाशात रात्री दिसत असेल आणि बाळाचा जन्म दिवसा असेल तर त्याचा अर्थ जन्माच्या वेळेस म्हणजे दिवसा मंगळ पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूस आहे. म्हणजेच मंगळावरून निघालेल्या किरणांना फक्त इमारतीचे ९-१० मजलेच नव्हे तर पृथ्वीला वळसा घालून त्या बाळासाठी यावे लागणार नाही का?”
देवयानी हे प्रश्न ऐकून निरुत्तर झाली. तरीही अनामिकाने अजून एक मुद्दा मांडला. अनामिका म्हणाली, “हे ग्रह कोट्यवधी किलोमीटर लांब आहेत. तिथून प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी, वीस-पंचवीस मिनिटे सहज लागू शकतात. अश्या परिस्थितीत मंगळाला वीस-पंचवीस मिनिटे आधीच हे कळते का की, पृथ्वीवर अमुक-तमुक ठिकाणी एक बाळ जन्माला येणार आहे. अर्थात हे अमुक-तमुक ठिकाण भारतातच असणार आहे आणि मला आता आपली जागा सोडली पाहिजे, तरच वीस मिनिटानंतर जन्माला येणार्या बाळापर्यंत वेळेत पोहोचेन.
वरील सारी उदाहरणे ज्योतिष किती आणि कसे थोतांड आहे हे समजण्यासाठी पुरेशी ठरावी.