एखादी हानिकारक गोष्ट उत्पन्न झाली तरी ती फार वेळ टिकून रहात नाही हे उत्क्रांतीच्या अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे. मानवी मेंदू हा सध्याच्या स्वरुपात काही लक्ष वर्षे टिकून आहे पण तो अशा अनेक गोष्टी निर्माण करतो ज्या तर्काच्या चाळणीत टिकत नाहीत. तरीही लिखित आणि मौखिक इतिहास असे सांगतो की या क्रिया, सवयी आणि परम्परा हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. जगभर आहेत. कोणताही मानवी समूह – भाषा , धर्म, भौगोलिक जागा याने इतरांपेक्षा वेगळा पडला असला तरीही – या नियमाला अपवाद नाही.
जी गोष्ट हजारो वर्ष टिकून आहे ती काहीतरी उपयोगाची असावी असाही निसर्गनियम आहे. त्यामुळे फलज्योतिष ही अशास्त्रीय गोष्ट कशी टिकून राहते याचा मानसशास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यास आपल्याला काही कोड्यांची उत्तरे सापडू शकतील.
त्यामुळे या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मानवी मनाबद्दल आपल्याला माहीत असलेल्या काही गोष्टी बघूया –
१. आपले आयुष्य हे अनेक घटनांवर अवलंबून असते पण यातल्या अनेक लहान-मोठ्या घटना या पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर असतात ही स्पष्ट जाणीव.
२. काही नैसर्गिक घटना या निरीक्षणावरून किंवा गणितावरून आधीच सांगता येतात. उदा. चंद्राच्या कला, ग्रहणे, इत्यादी.
३. काही नैसर्गिक चमत्कार सुद्धा थोडे आधी सांगता येतात. उदा. समुद्राचे पाणी एकदम आत ओढले गेले आणि मोठा समुद्रतल उघडा पडला तर त्सुनामी लाट येते. अशावेळी पळून उंचावर गेले तर जीव वाचतो. म्हणजे पूर्वसूचना मिळाली तर धोका टाळता येतो किंवा मोठा फायदाही करून घेता येतो.
४. आयुष्याच्या अस्थिरतेवर उपाय शोधण्याची सततची धडपड हा सुद्धा मानवी स्वभाव आहे.
५. एकाचवेळी किंवा जवळपास घडणाऱ्या घटनांचा परस्परसंबंध आहे हे मानण्याची प्रवृत्ती. उदा. आकाशात धूमकेतू किंवा विशिष्ट नक्षत्र दिसणे आणि काहीतरी दुर्घटना घडणे याचा परस्परसंबंध लावणे.
निसर्गात दिसणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष असणे आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी त्याचा संबंध लावणे हे अगदी नैसर्गिक आणि साहजिकच आहे.मानवी मनाच्या या सर्व गुणांची सांगड घातली की आपल्याला हे सहज लक्षात येते.
आपल्या मनाचा अजून एक गमतीदार कंगोरा आहे – power of expectation – अपेक्षा किंवा समजुतीची ताकद – एखादी गोष्ट घडणार याची खात्री बाळगून तसे वागायला सुरुवात केली की तशी घटना घडवून आणण्याची शक्यता वाढते. मन त्या दिशेने उत्साहाने काम करायला सुरुवात करते. वैद्यकीयशास्त्रात आणि संमोहनात याचा भरपूर वापर करता येतो.
“हे फार चमत्कारपूर्ण औषध आहे. हे खाल्ल्यावर/ शीरेतून दिल्यावर लगेच वेदना कमी व्हायला मदत होते” अशी मानसिक घडण करून दिल्यास, ते औषध दिल्यावर वेदना कमी झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
“आज माझे काम होणारच” अशा ठाम विश्वासाने काम सुरू करणारा माणूस जास्त उत्साहाने आणि निर्धाराने काम करतो. रस्त्यात येणारे अडथळे फार मनावर घेत नाही. प्रयत्न सोडत नाही आणि स्वतःच्या यशाची शक्यता अनेक पटींनी वाढवतो. आणि “आज माझे ग्रह/नशीब बरे नाही” या विश्वासावर काम सुरू करणारा मात्र त्याच अडथळ्यांना दैवी संकेत मानून प्रयत्न सोडून देतो आणि अपयशाची पायाभरणी करतो. एकच अनुभव, पण दोन व्यक्तींना तो पूर्णपणे विरुद्ध दिशांना घेऊन जातो; कारण त्यांची पूर्वधारणा विरुद्ध प्रकारची होती.
आपल्या या मनाच्या अभ्यासात आणखी एक जालीम गुण आपल्याला अभ्यासायला हवा. तो म्हणजे – भूतकाळाची पुनर्रचना. हा गुण इतका सर्वव्यापी आणि फसवा आहे की भल्याभल्यांची यात दांडी गुल होते आणि त्यांना कळतही नाही.
आज घडणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींची कारणमीमांसा करणे हा आपल्या मनाचा, आपल्या नैसर्गिक चौकसपणाचा भाग आहे. घटना घडल्यानंतर – नेहमी नंतरच- आधी कधीच नाही – हा शोध सुरू होतो. मग आपापल्या मानसिकतेनुसार त्याचे अर्थ लावणे सुरू होते. उदा. एखाद्या स्त्रीची उतारवयात पाठ दुखायला लागते. आपली आहारशैली, बसण्याची आणि उभे राहण्याची चुकीची पद्धत या खऱ्या कारणांपेक्षा २५व्या वर्षी झालेले अवघड बाळंतपण, पाठीतून दिलेले भुलीचे इंजेक्शन या गोष्टी ढोबळपणे सहज आठवतात आणि कारण म्हणून पटायला मनाला सोप्या वाटतात.
शेअर मार्केट बघणाऱ्या मंडळींना हा नेहमीचा अनुभव आहे. एखाद्या दिवशी मार्केट वर किंवा खाली का झाले याचा उहापोह संध्याकाळच्या चर्चेत करणारे ‘तज्ज्ञ’भरपूर असतात. याच सर्व तज्ज्ञांना मार्केट सुरू व्हायच्या आधी विचारले तर मात्र गुळमुळीत उत्तरे मिळतात. घटना घडून गेल्यावर मात्र यांच्या जिभेवर सरस्वती नाचायला लागते.
याच न्यायाने – एखादा तारा किंवा नक्षत्र पूर्वी कोठे होते हे गणितानुसार ठरवता येते. त्या गणिती ताकदीचा वापर करून एखादी मोठी घटना ही त्या नक्षत्रस्थितीमुळे कशी झाली असे दाखविले जाते. सध्या तशीच नक्षत्रपरिस्थिती असेल तर भाकितेसुद्धा मांडली जातात.
आता २५०च्या जवळपास देश असलेल्या या आठ अब्ज माणसांच्या जगात दंगली, दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती, सत्तांतर वगैरे गोष्टी कोठेतरी तर रोज होतातच. पण सोयीस्कर अर्थ लावायच्या हुकुमी तंत्रामुळे असले संबंध जोडले जातात आणि त्यावर विश्वाससुद्धा ठेवला जातो. योगायोगाने होणाऱ्या गोष्टींना अशा प्रकारे वेगळे कपडे चढवून कारणमीमांसेचे छद्म रूप दिले की भूतकाळाचे पुनर्लेखन सोपे होते.
आपल्या मनाच्या या सगळ्या गरजा आणि अंध-बिंदू लक्षात घेतले तर हे सर्व साहजिक वाटते. भूतकाळाचा अर्थ लावणे आणि भविष्याचा अंदाज घेणे ही आपली मूलभूत गरज आहे. अतर्क्य पद्धतीने चालणाऱ्या या जगाच्या व्यवहारावर आपले किंवा कोठल्यातरी शक्तीचे नियंत्रण आहे. त्या शक्तीचा रोष होऊ नये किंवा कृपा व्हावी म्हणून काहीतरी करणे हे आपल्याला शक्य आहे हा विश्वास माणसाला फारच महत्त्वाचा आहे.
त्यामुळे आकाशातल्या चंद्र, सूर्य, ग्रह या जवळच्या आणि नक्षत्रे या दूरच्या नैसर्गिक गोष्टींना मानवी भावना, रूप, गुण देणे. त्यांच्या आपसातल्या आभासी नात्यांना अर्थ देणे, त्याला खगोलीय गणिताची जोड देऊन हे सर्व कसे शास्त्रीयदृष्ट्या खरेच आहे असा बुद्धिभ्रम करून घेणे आणि देणे हे अगदीच सहज वाटते आणि पटतेसुद्धा.
“१०० जन्मपत्रिकांपैकी ५० जन्मपत्रिका ह्या बुद्धीने खूपच अधू असणाऱ्या बालकांच्या आहेत. त्या ओळखून दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवा” ही शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांची पैज जिंकणारा ज्योतिषी कित्येक दशकात निघालेला नाही. हे सत्य बहुतेकांना माहीत नसते. आणि माहीत असेल तरी त्यावर विश्वास ठेवावा इतकी विज्ञाननिष्ठा प्रत्येकांत नसते. ही मानव समूहाची सत्यपरिस्थीती आहे.
आपल्या समजापलीकडे, ताकदीपलीकडे चालणारे हे जग आणि त्यात येणारे चांगले आणि दुःखदायक अनुभव सहन करून जगत राहाणे हे फार अवघड काम आहे. जिथे थोडी आशा मिळेल, धीर मिळेल तिथे जाऊन उभे राहायचे ही मनाची गरज आहे. थंडीत शेकोटी पेटवली की जनावरेच कशाला, सरपटणारे प्राणीसुद्धा उबेला येतात हा आपला अनुभव आहेच की! मग अपघाताने बुद्धी वाढलेला, प्रगत झालेला; पण अंतर्मनात कावराबावरा असलेला माणूस हा फलज्योतिषसारख्या आभासामध्ये आधार शोधतो, यात मनाचा अभ्यासक म्हणून मला आश्चर्य वाटत नाही.
आपल्या देशात या सर्व प्रकारांना समाजमान्यता आणि राजमान्यता सुद्धा आहे. ज्योतिष विषयावर पदवी अभ्यासक्रम सुरू करायच्या प्रकरणानिमित्ताने झालेला गदारोळ आपल्याला आठवत असेलच.
जेव्हा समाजाच्या दृष्टीने मोठ्या आणि यशस्वी व्यक्ती जाहीरपणे असे प्रकार करतात आणि त्याला पाठिंबा देतात तेव्हा विवेकवादी आणि फसवणूकविरोधी आवाजांची ताकद कमी होते.
जर पटकन घाबरून जायच्या प्रवृत्तीला आळा घालता आला, मनाला ज्या धीराची गरज आहे तो धीर जास्त सकारात्मक पद्धतीने देता आला तर अशा “शास्त्र” नावाने चालणाऱ्या उद्योगांना कमी वाव मिळेल.
फसवणूक कमी करता येईल का ? याचे सरळ साधे उत्तर “हो” असे आहे.
आता सविस्तर उत्तर बघूया –
१. टाळता येणारे आजार, नैसर्गिक संकटात वेळेवर मदत मिळण्याची खात्री ही आयुष्यातील अनिश्चितता कमी करते.
२. चुकीने किंवा दुर्दैवाने आर्थिक परिस्थिती बिघडली तर सारे घरदार उघड्यावर पडणे, मुलांचे शिक्षण थांबणे हे योग्य सरकारी सहभागाने थांबू शकते.
३. आजार वगैरेची योग्य शास्त्रीय माहिती मिळाल्यास भीती कमी होते आणि जास्त सकारात्मक विचार येतात.
४. संकटकाळात पालक कसे वागतात हा मुलांच्या वैचारिक आणि भावनिक शिक्षणाचा सर्वात मोठा भाग असतो. सारासार विवेकबुद्धी वापरणारे पालक जेव्हा मुलांना प्रत्यक्ष दिसतात तेव्हा एका पिढीच्या भीतीत घट होते आणि सकारात्मक विचार, कृती यांचे उपयोग दिसतात. भोळेपणा आणि अंधश्रद्धा यावर हे सर्वात मूलगामी आणि दूरगामी उपाय आहेत.
लहानपणापासूनच भावनिक जागरूकपणा देणारे शिक्षण मिळाले तर सर्वांत जास्त उपयोग होतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. हा भाग आपल्या शालेय आणि घरगुती शिक्षणात दिसला तर मोठी क्रांती घडू शकते.
माणसाला भावनिक आधाराची सतत गरज असते. “सगळे ठीक होईल, संकटे जातील, चांगले दिवस येतील, धीर सोडू नको” हा खात्रीचा आणि विश्वासाचा आवाज जेव्हा विज्ञान आणि समाजरचना देऊ शकते, तेव्हा फलज्योतिषासारख्या भ्रामक आणि छद्मी गोष्टी कमी होतात हासुद्धा जगात इतरत्र राहणाऱ्यांचा अनुभव आहे. आपल्या भारतातसुद्धा हे म्हणूनच शक्य होईल अशी माझी खात्री आहे.
बाल मानसोपचार तज्ज्ञ, पुणे.
Kup chan , muddesud lihalay.
“१०० जन्मपत्रिकांपैकी ५० जन्मपत्रिका ह्या बुद्धीने खूपच अधू असणाऱ्या बालकांच्या आहेत. त्या ओळखून दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवा” ही शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांची पैज जिंकणारा ज्योतिषी कित्येक दशकात निघालेला नाही. हे सत्य बहुतेकांना माहीत नसते. >>>>> याचा नेमका संदर्भ मिळेल का? आपल्याला 2008 साली झालेल्या मतिमंद व हुषार मुलांच्या पत्रिकेच्या चाचणी बद्दल म्हणायचे असेल तर या प्रकल्पाचा मी समन्वयक होतो. या बद्दल सविस्तर माहीती माझ्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ या ब्लॉग वर सविस्तर उपलब्ध आहे. माझ्या माहितीप्रमाणे नारळीकरांनी अशी कुठलीही 1 लाखाची पैज लावली नव्हती. त्यांचा तो स्वभावही नाही. मी स्वत: अंनिस त अनेक वर्षे डॉ दाभोलकरांसोबत काम सुरवातीपासून केले आहे. अंनिसचे फलज्योतिष विषयक मात्र अशा प्रकारचे आव्हान सुरवातीपासून आहे.कदाचित आपल्याला त्या आव्हानाविषयी म्हणायचे असावे. बाकी आपला लेख उत्तम आहे आवडला. मानसशास्त्रीय उत्तम चिकित्सा केली आहे.
प्रकाश घाटपांडे 9923170625
prakash.ghatpande@gmail.com
http://faljyotishachikitsa.blogspot.com/
प्रयोगा ची अधिकृत व विश्वासार्ह माहीती
A statistical test of astrology
Jayant V. Narlikar, Sudhakar Kunte, Narendra Dabholkar and Prakash Ghatpande
This paper describes a recent test conducted in Maharashtra to test the predictive power of natal astrology.It involved collecting 200 birth details of 100 bright school students (group A) and 100 mentally retarded school students (group B). These details were used to cast horoscopes or birth charts for these children.After recording these details the charts were mixed and randomized and astrologers were invited to participate in a test of their predictive ability. Fifty-one astrologers participated in the test. Each participant was
sent a random set of 40 birth charts and asked to identify to which group each chart corresponded. Among the initial 51 participants, 27 sent back their assessment. Statistical analysis of the results showed a success rate marginally less than what would be achieved by tossing a coin. The full sample of 200 birth charts was given to the representatives of an astrology institute for identification. They also did not fare any better. The limited but unambiguous procedure of this test leaves no doubt that astrology does not have any predictive power as far as academic ability is concerned. Ways of extending the scope of this test are discussed for future experiments.
करंट सायन्स मधील मूळ पेपर आपल्याल इथे वाचायला मिळेल. CURRENT SCIENCE, VOL. 96, NO. 5, 10 MARCH 2009
https://drive.google.com/file/d/1zi5S3lWOfGrRsJUHppsanUwXiMr3fYT1/view?usp=sharing
“एखादी हानिकारक गोष्ट उत्पन्न झाली तरी ती फार वेळ टिकून रहात नाही हे उत्क्रांतीच्या अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे.”
किंवा
“जी गोष्ट हजारो वर्ष टिकून आहे ती काहीतरी उपयोगाची असावी असाही निसर्गनियम आहे.”
हे दावे पटले नाहीत.
खून/बलात्कार/चोरी इ. गुन्हे असोत (ते करण्याची मनोवृत्ती) की मलेरिया असो, मानव समाजासाठी हानिकारक असलेल्या अनेक गोष्टी टिकून आहेत. अपेंडिसायटिसचा धोका बनू शकणारे अपेंडिक्ससुद्धा विनाउपयोग टिकून आहे.