विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला, आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“हे राजन्, नेहमी मी तुला गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीच्या आधाराने तुला प्रश्न विचारतो, पण नेहमी मीच का सांगायची गोष्ट तुला? आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं कर की आज तूच मला गोष्ट सांग कसा! मग मी विचारीन त्यावर माझे प्रश्न!”
“असं कसं म्हणतोस तू?” विक्रमादित्य म्हणाला. “तू गोष्ट सांगायची हे तर नियत आहे, विधिलिखित! त्यात आपल्याला बदल कसा करता येईल?”
“वा राजन्, आपलं विधिलिखित, आपलं भविष्य, सगळं जाणतोस की काय तू? आज तू गोष्ट सांगणार हेच विधिलिखित नाही कशावरून? आणि विधिलिखित जे असेल ते असो, पण free will नावाची काही चीज असते की नाही माणसाला? ते काही नाही, आज तूच गोष्ट सांगणार, आणि हो, तू गोष्ट सांगितली नाहीस आणि त्यावरील माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे! तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायांवर लोळू लागतील!”
“जा रे, तुझ्या असल्या फालतू धमक्यांना घाबरत नाही मी! गोष्ट सांगितली नाही तर खरंच माझ्या डोक्याची शकले होतील कशावरून? आणि मी मेल्यावर शंभर काय हजार शकले होऊन का लोळेनात माझ्या पायांवर, मला काय त्याचं? पण असो, भीतीपोटी नाही, पण आपल्या इतक्या वर्षांच्या प्रेमापोटी सांगतो मी गोष्ट तुला. ऐक . . .
आटपाट नगर होतं, त्या नगरात एक कुडमुड्या ज्योतिषी राहत होता. एक दिवस दुपारचं जेवण झाल्यावर सवयीप्रमाणे त्याने सुपारीचं खांड तोंडात टाकलं, आणि निवांतपणे चघळत वामकुक्षीसाठी पडणार इतक्यात त्याला लागली उचकी आणि खांड घशात जाऊन जाम अडकून बसलं, काही केल्या निघेना आणि त्याला श्वास घेता येईना. शेवटी घुसमटून त्याचं प्राणोत्क्रमण झालं; आणि थोड्याच वेळात तो चित्रगुप्ताकडे पोहोचला.
चित्रगुप्ताने त्याच्या पापपुण्याच्या हिशेबाची वही काढली, काही बेरजा वजाबाक्या केल्या आणि अचानक चित्रगुप्ताच्या कपाळावर आठयांचं जाळं पसरलं. वहीतून डोकं बाहेर काढून दिलगिरीच्या सुरात तो म्हणाला, “हिशेबात थोडी चूक झाली आहे. तुझ्या आयुष्याची आणखीन पाच वर्षे बाकी आहेत. पण ही चूक माझ्या हातून झाली असल्यामुळे मी तुला एक ‘वर’ देतो. तुझ्या आयुष्यातल्या ह्या पुढच्या पाच वर्षांत जे काही घडणार आहे त्याचे तुला पूर्ण ज्ञान असेल.”
आता आपल्याला आपले भविष्य माहीत असणार ह्या विचाराने ज्योतिषी प्रचंड खूश झाला. त्याने चित्रगुप्ताला त्याबद्दल मनापासून धन्यवाद दिले आणि चित्रगुप्ताने त्याची रवानगी परत पृथ्वीवर केली.
सुरुवातीला काही दिवस ज्योतिष्याला खूपच मजा येत होती. त्याचा व्यवसायच होता पुढे काय होणार हे सांगण्याचा, आणि त्याला, निदान त्याच्या आयुष्यात पुढे काय होणार ह्याची आता संपूर्ण अचूक माहिती होती, आणि त्याचा पडताळाही क्षणोक्षणी त्याला मिळत होता.
पण, पण . . . हळूहळू काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं त्याला वाटू लागलं. त्याला झालेला आनन्द त्याला व्यक्त मात्र करता येत नव्हता. पुढे काय घडणार हे त्याला पूर्ण ठाऊक असूनही त्याबद्दलची बढाई मात्र तो मारू शकत नव्हता. ना असं म्हणू शकत होता की, सांगितलं होतं ना मी असं घडेल? आणि बघा नेमकं तसंच घडलं! खरं तर त्याच्या इच्छेनुसार तो काहीच करू शकत नाही हे हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं. त्याने काय बोलायचं, काय करायचं, हे सगळं आधीच ठरलेलं, नियत आहे, एखाद्या नाटकातील भूमिकेसारखं. त्याला ती भूमिका फक्त वठवायची आहे, त्यात एका अक्षराचाही फेरफार तो स्वतःहून करू शकत नाही. त्यातील एकही प्रसंग तो टाळू शकत नाही, मग तो प्रसंग त्याला कितीही अडचणीचा, अपमानास्पद, अवांछनीय का वाटत असेना.
आता उद्याचंच बघा ना.. उद्या भरपूर पैसे घेऊन एका श्रीमंत शेठजीचं भविष्य सांगायचं आहे, पण हे ही माहीत आहे की महिन्याभरातच ते भविष्य खोटं ठरल्याचा पडताळा शेठजीला येणार आहे, आणि मग . . . , मग शेठजी दिलेले पैसे सव्याज वसूल करून घेणार आहे. मारपीट करणार नाही हेच नशीब. पण हे सगळं माहीत असूनही चुकीचं भविष्यच सांगावं लागणार, अगदी खरं काय घडणार हे पूर्ण माहीत असूनही!
सगळं, सगळं, सगळं माहीत आहे. ठेच लागून पडणार, हात मोडणार, जीभ चावणार, मित्र फसवणार, सकाळी शौचाला परसदारी गेल्यावर पाण्याचा लोटा लुढकणार आणि तसेच न धुता, ओंगळवाणे, ओशाळवणे होऊन घरी यावे लागणार! सगळं माहीत आहे, पण काहीच उपाय नाही!
त्याने आजपर्यंत लोकांना त्यांचे भविष्य बदलण्यासाठी सुचवलेल्या, सत्यनारायण, नागबळी, आणखीन काय काय त्या सगळ्या उपायांची जंत्रीच त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागली. पण काय करणार, त्याला स्वतःहोऊन काहीच करणं शक्यच होत नव्हतं. अगदी काही बोलायला गेलं तरी जीभ वळायचीच नाही आणि जेव्हा, जे शब्द बाहेर पडायचे ते आधी ठरलेले नियत शब्दच बाहेर पडायचे. ह्यापेक्षा तर सश्रम कारावास परवडला असं त्याला वाटू लागलं!
माणसाला भविष्य जाणून घेण्याची इतकी तीव्र इच्छा का असते? कसंही करून भविष्यात येऊ घातलेले दुःखद प्रसंग टाळण्यासाठी काही तरी उपाय करता यावे यासाठीच ना? पण जर असे प्रसंग टाळता येणं अशक्य असेल तर भविष्य जाणून घेणं व्यर्थ आहे, आणि जर टाळता येऊ लागले तर अचूक भविष्य वर्तवणे अशक्य!
काहीही असले तरीही आपला ज्योतिष्याचा व्यवसाय किती मूर्खपणाचा आहे हे ज्योतिष्याला लक्षात आले. चित्रगुप्ताने आपल्याला दिलेला भविष्य जाणण्याचा ‘वर’ नसून ‘शाप’ आहे असे आता ज्योतिष्याला वाटू लागले होते. पण आता पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत अशीच कठपुतळी बनून राहणे भाग होते.
होता होता पाच वर्षे संपत आली. आता उद्या दुपारचं जेवण झाल्यावर एकदाचं सुपारीचं खांड खाल्लं की झालं, सुटलो!
ठरल्याप्रमाणे ज्योतिष्याचं प्राणोत्क्रमण झालं आणि तो चित्रगुप्तासमोर हजर झाला. चित्रगुप्ताने त्याच्या पापपुण्याच्या हिशेबाची वही काढली, काही बेरजा वजाबाक्या केल्या, आणि अचानक चित्रगुप्ताच्या कपाळावर आठयांचं जाळं पसरलं. वहीतून डोकं बाहेर काढून दिलगिरीच्या सुरात तो म्हणाला, “अरे बापरे, हिशेबात परत थोडी चूक झाली आहे. तुझ्या आयुष्याची आणखीन पाच वर्षे बाकी आहेत. पण ही चूक माझ्या हातून झाली असल्यामुळे मी तुला एक ‘वर’ देतो . . .”
ज्योतिष्याने चित्रगुप्ताचे पायच धरले आणि भविष्य जाणण्याचा ‘वर’ देऊ नये म्हणून गयावया करू लागला . . . !”
“गोष्ट तर छान सांगितलीस राजन् . . ., पण मग पुढे होणाऱ्या सगळ्याच गोष्टी/घटना, नियत किंवा विधिलिखित आहेत असं समजून आपण सोडून द्यायचं का? भविष्याच्या उदरात काय दडलेलं आहे ह्याविषयीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही? स्वयंप्रेरणेने free will ने आपल्या कर्तृत्वाने काही घडवण्याचा प्रयत्न करायचा की नाही? माझ्या ह्या प्रश्नांची तू समाधानकारक उत्तरे दिली नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे, तुझ्या डोक्याची . . .”
“बस, बस, बस, मी तुझ्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर माझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती माझ्याच पायावर लोळू लागतील, हे जे भाकीत तू वारंवार घोकतोस ना ते खरं ठरतं की खोटं ते पडताळून पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. तसंही मी वर्षानुवर्षं तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन कंटाळलोच आहे. त्यामुळे आज काही मी तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. बघूचया काय होतं ते. आज सोक्षमोक्ष लावूनच टाकू.
काहीही झालं तरी शेवटी तू एक प्रेत आहेस आणि मी एक जिवंत माणूस. ही बघ काढली मी माझी तलवार म्यानातून बाहेर. बघूया आता खांडोळी कोणाच्या डोक्याची होते? तुझ्या की माझ्या!”
“अरे, अरे राजन् शांत हो, शांत हो! आणि शाब्बास!मिळालं मला समाधानकारक उत्तर माझ्या प्रश्नांचं. म्यानातून आपली तलवार त्वेषाने उपसून तू सिद्ध केलंस की कर्तृत्वासमोर विधिलिखिताचं काही चालत नाही आणि प्रत्यक्षप्रमाणासमोर शब्दप्रामाण्य निष्प्रभ आहे!
तुला आता उकळ्या फुटत असतील नं आनंदाच्या, कसा तू माझ्यावर डाव उलटवला म्हणून? पण लक्षात घे, तुझ्या नकळत, डाव मात्र मी आधीच साधला आहे!आणि तोही तुझ्याच free will चा उपयोग करून!
कसा म्हणतोस?
अरे बाबा, तुझ्याच करवी तुझ्याच मौनव्रताचा भंग करवून!
हा ., हा . ., हा . . . !”
असे म्हणून वेताळ निघाला आणि पुन्हा झाडावर जाऊन लोम्बकळू लागला!
मस्त गोष्ट. बोधकथा.
अरे वा, भरत मोहनी! एकदम मस्त.
व्वा… सुंदर…
कथा भन्नाट रंगली आहे!
भरत मोहिनीजी आपण गोष्ट छान रचलीत, पण ज्योतीष शास्त्र खोटे ठरविण्यासाठी काय काय आटापिटा चालवलेला आहे हे पाहून हसावे की रडावे हेच समजत नाही. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगाच्या कानाकोपय्रात घडणाय्रा घटना आपण लहरिंच्या सहाय्याने दूरदर्शन सेटवर पाहू शकतो, तर ग्रहगोलांच्या त्याहूनही प्रखर लहरिंचा प्रभाव मानवावर का पडू शकणार नाही? आपल्या भारतातच नाही तर जगात अनेक देशात लोकांचा ज्योतीष शास्त्रावर विश्वास आहे तो त्यांना काहीतरी प्रचिती आली असेल म्हणूनच ना? ४६५ वर्षांपूर्वी १५५५साली फ्रें ज्योतिषी अँमस्टरडँम यांनी वर्तवलेली हजारो भाकितं आज सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहेत या वरून तरी ज्योतीष शास्त्रावर विश्वास बसायला नको काय? काही ज्योतीषी राशी वरून व्यक्तीच्या स्वभावाचे यथायोग्य वर्णन करतात यावरून तरी प्रचिती येऊ नये काय? याच अंकातील या अगोदरच्या लेखाच्या प्रतीक्रीयेत माझ्या स्वतःच्या जीवनातले अनुभव मी व्यक्त केले आहेत, त्यात लिहिल्या प्रमाणे एका आधिकारी ज्योतीषाने केलेल्या भाकिता मुळे माझ्या वडीलबंधुंवरचे गंडांतर टळून पुढे ते ८४ वर्ष जगले, हे ज्योतीष शास्त्रामुळेच ना? अलिकडे स्वतःस विद्वान समजणारे काही लोक देव मानत नाहीत, सनातन धर्माची टर उडवत असतात. त्यात त्यांना काय आनंद मिळत असतो ते त्यांनाच माहीत. नरेंद्र दाभोळकर हिंदूंच्या अंधश्रध्देवर टिका करत असत, पण त्यांनी इतर धर्मियांच्या अंधश्रध्देवर कधी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात आले नाही. मान्य आहे काही पोटार्थी स्वतःस धर्ममार्तंड अवडंबर माजवतात. पण त्यासाठी सनातन धर्मावर टीका कशा साठी. कोर्टानेच मान्य केल्याप्रमाणे सनातन हिंदू धर्म ही आचार/ जीवन पध्दती आहे, व ती आरोग्य शास्त्रावर आधारित आहे. पण हे तथाकथित बुध्दीजीवी लोक आपल्याच धर्मावर टीका करतात हे योग्य आहे काय? होय थोडे विषयांतर झालेल्या असले तरी ज्योतीष शास्त्राला विरोध करण्याच्या मनोव्रुतीला धरूनच आहे हे मान्य व्हावे.
व्वा… छान
वा भरत मस्त जमले रसायन
रमेश जी तुमचे उत्तर वाचले,तुम्ही काही बिंदु बरोबर ठेवले आहेत.तुम्ही वेव थ्योरी चा उलेख न करता त्याचा आधार घेउन ज्योतिष शास्त्र खरे आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.ग्रह आणि त्यांचे परिणाम कशे होतात हे साइंस पण सांगते. ज्योतिष शास्त्र/ ज्योतिषी लग्न सफल होइल की नाही,डॉक्टर होणार की इंजिनियर होणार,पत्रिका मुलीशी जुलते की नाही हे जे सांगतात ते काही बरोबर ठरत नाही.जे ज्योतिष शास्त्र कुंडली वरून हे सांगू शकत नाही की हे कुंडली मेल ची की फीमेल ची आहे ते ज्योतिष लग्न करन्यारेचे जीवन सफल राहिल की नाही हे कसे सांगू शकेल.जुड़वे जे जन्मतात त्याचे भ्याग्य, कुंडली ९९.९ टक्के एक असून वेगले असते.ज्योतिष कुंडली पाहून हे सांगू शकत नाही की ही कुंडली ज्या ची आहे तो जीवंत आहे की मृत आहे.ज्योतिष शास्त्र जार खरे मानले आसते टार मानव जातीनी इतकी प्रगति कधीच केलि नसती.