प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गूढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून-उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना, समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलितगात्र, भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तात्कालिक हितसंबंधांच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामहूनच आणलेलं असतं? तसं असेल तर असे हितसंबंध जोपासण्यात काय हशील आहे? कारण ह्या हितसंबंधातून वैयक्तिक आयुष्य जरी भरभराटीला येत असले तरी त्यामुळे संपूर्ण समाजाचं किती नुकसान होत असतं! परिणामी मानवाच्या प्रगतीलाच खीळ बसत असते, हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला हवं.
फलज्योतिषासंबंधी विचार करताना हा मुद्दा प्रकर्षाने जाणवत राहतो. भविष्याबद्दलचे कुतूहल समजू शकते. पण त्यासाठी निसर्गातील ग्रहगोलांना वेठीस धरणे समजू शकत नाही. भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा म्हणून प्रयत्न केलेले समजू शकतात. पण त्या प्रयत्नांच्या जोडीला नशीब, देव-देव यांचा आधार घ्यावा लागणं; हे समजू शकत नाही. विचारांची पायवाट काढायची असली तरी ती अखेर फलदायी ठरणारी असते, हे आपल्याला कळतं. पण त्याच वेळेस कष्टांना घाबरून भावनाशीलतेच्या आहारी जात ज्योतिष्यांच्या हातातलं बाहुलं बनणं समजू शकत नाही. या विसंगतीपूर्ण वागण्यामागची कारणं निव्वळ भविष्याविषयीची अनाकलनीयता असते की आत्मविश्वासाचा अभाव? आपण एकाच वेळेस ‘आपला हात जगन्नाथ’ म्हणत ‘प्रयत्नांती रगडिता वाळूचे कण त्यातून तेलही गळे’ असा प्रयत्नवादाचा जयघोष करत असतो, तर त्याचवेळेस दुसरं मन मात्र आपला हात ज्योतिषमार्तंडांच्या हातात देऊन भाग्य उजळण्याची पळवाट शोधत असतं. ह्याचं एक कारण असंही असू शकेल की, माणसाचं मन विचारांपेक्षा भावनेच्या आहारी सहज आधीन होतं. कारण भावनाशीलता माणसाला आभासी का होईना पण तात्काळ चिंतामुक्त करते. मनाला हवी तशी उत्तरं शोधते. तर बुद्धिनिष्ठता मनाला सतत बोचणी लावत असते. सतत विचार करायला प्रवृत्त करते. स्वाभाविकच मानवी मन हे सोयीच्या भावनांना बळी पडतं. आणि हे बळी पडणंच माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देतं. मन कमकुवत करतं. हळूहळू अशी वेळ येते की, माणूस विचार करणंच टाळायला लागतो. विचार करणं म्हणजे डोक्याला नसती कटकट वाटायला लागते. परिणामी एवढ्यातेवढ्या गोष्टींना मानवी मन घाबरू लागतं. मग प्रयत्नाची वाट चोखाळण्याऐवजी माणूस सुखाचा शॉर्टकट शोधायला धावतो आणि अंधश्रद्धेचा बळी ठरतो, बुवा-बाबांना, कर्मकांडांना, देवदेवतांना आणि ज्योतिष्यांना… हे चक्र त्याच्यामागे शुक्लकाष्ठासारखे चालूच राहाते. या चक्रात आपण पिळून निघतोय असं मात्र त्याला कधीही वाटत नाही, हे विशेष. कारण तोपर्यंत त्याच्या मनानं प्राक्तन, नशीब, दैव, भोग ह्या सर्वांचा हात असा घट्ट पकडलेला असतो की, हेच शब्द त्याला ‘पूर्वजन्मीचे कर्म’ असं वाटायला लावून सगळं सहन करायला शिकवत असतात. हीच खरी माणसाच्या आयुष्याची शोकांतिका असते. गगनाला गवसणी घालण्याची विजिगीषु वृत्ती बाळगणारा माणूस दुसऱ्या बाजूनं मात्र असा गर्भगळित झालेला, नियतीच्या हातातलं बाहुलं बनलेला दिसतो. ह्या दैवदुर्विलासाला काय म्हणावं!
एकीकडे आपला विज्ञानावर विश्वास असतो. पण त्याचबरोबर वैज्ञानिक कसोट्या न लावता काही गोष्टी आंधळेपणानं सत्य म्हणून स्वीकारण्याकडेही आपला कल असतो. ज्योतिषशास्त्राला आपले सांस्कृतिक संचित समजून आणि भृगुसंहितेला प्रमाण मानून आपण जन्मकुंडली, हस्तरेषा, ललाटरेषा यांचे वाचन करून आपला भूतकाळ व भविष्यकाळ शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा आधार खरोखरच भरभक्कम आहे का? तो शास्त्रीय कसोट्यांवर टिकणारा आहे का? की आपल्या कमकुवत मनाला तात्पुरते समाधान देणारा आहे? हा विचार आपण कधी केलाय का? ह्या आधाराची जरा चिकित्सा केली तर त्यातून काय निष्पन्न होते? म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे शास्त्र असेल तर ते शास्त्रीय कसोट्यांवर का टिकत नाही?
शास्त्रीय आधार म्हणून जन्मकुंडली मांडताना ज्योतिषी अचूक जन्मवेळेचा आग्रह धरतात. आता जन्मवेळ नेमकी कोणती मानावी? मुलाचं डोकं दिसायला लागतं ती वेळ? की मूल पूर्णपणे जगात प्रवेश करतंं ती वेळ? की ते पहिला श्वास घेऊन ट्याहॅ करतं ती वेळ? की सर्वात प्रथम स्त्री-बीजाचं आणि पुं-बीजाचं मिलन होतं ती वेळ? की या मिलनानंतर ज्या क्षणी त्या पेशीमध्ये जीव निर्माण होतो ती वेळ? (या दोन्ही वेळा कुणालाही सांगता येणे कठीण!) ह्या प्रश्नांच्या उत्तराची एकवाक्यता अजून भल्या-भल्या ज्योतिषमार्तंडांमध्येही आढळत नाही. मग अशा प्रकारे तयार झालेली जन्मकुंडली ही शास्त्रीय मानायची काय?
बरे ते असो. कुंडलीतील ग्रहमानानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी होणे जर अटळ असेल तर अमुक एक प्रकाराने ग्रहशांती, उपासतापास इत्यादी कर्मकांड केल्यावर त्या टळू शकतात यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? याचा अर्थ अशा अटळ घडामोडींवर ताबा मिळवण्याइतपत माणसाचा आत्मविश्वास जर आहे तर तो ह्या कर्मकांडाशिवाय का वापरू शकत नाही? माणूस जर लाखो किलोमीटर अंतरावरील ग्रहांवर आपल्या मंत्रशक्तीने आणि अनुष्ठानांनी हुकूमत चालवून त्यांना वठणीवर आणू शकतो, तर एवढा प्रबळ माणूस आज दुःखात का? गरीबीत का? असे प्रश्न पडण्याऐवजी आत्मविश्वास गमावलेला तो, ‘प्राक्तनाचा भोग’, ‘पूर्वजन्मीचे पाप’ म्हणत आपल्याच नशिबाला दोष देत असतो.
जरा डोळसपणे विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की, ह्यात ग्रह-ताऱ्यांचा काहीही दोष नाही. प्राक्तनाचा आणि पूर्वजन्माचा तर नाहीच नाही. ह्यासगळ्या दुःखाचं मूळ आहे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती! त्याचाच तो परिपाक आहे. सत्ताधाऱ्यांना आणि भट-भिक्षुकांना जनसामान्यांवरील आपली पकड ढिली करायची नसते. हे जनसामान्य जर असेच दुःखात पिचत राहिले, आत्मविश्वासहीन जगले, अंधश्रद्धेच्या गर्तेतच फिरले, कुठल्यातरी भयगंडांनी पछाडलेले असले, रोजी-रोटीच्या चिंतेने ग्रस्त असले, तरच त्यांची सत्तास्थाने टिकून रहातील. त्यासाठी त्यांना देवाचा, ज्योतिषाचा बागुलबुवा उभा करणे भागच असते. जर सर्वसामान्य जनता विचार करू लागली, जागृत झाली, प्रश्नांची चिकित्सा करू लागली तर ह्यांचे चालायचे कसे? उत्पन्नाचं – तेही सहजगत्या मिळवून देणाऱ्या साधनाला एवढ्या सहजासहजी सोडायचं कसं? म्हणूनच ज्योतिष हे शास्त्र आहे असं आपल्या मनावर वर्षानुवर्षं ह्या तथाकथित विद्वानांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी ठसवलं आहे. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असो द्यावे समाधान||’ असे पढवून या हितसंबंधियांनी उपासतापास, भविष्य सुखासमाधानात जावे म्हणून कर्मकांडाचे फसवे समाधान देण्याचे कार्य, नियमितपणे इमानेइतबारे चालवले आहे, हे आता तरी आपण लक्षात घेणार आहोत काय?
फार वर्षांपूर्वी माणसाला आपली पृथ्वी कशी आहे? सूर्य काय आहे? चंद्र काय आहे? आकाशातील तारे म्हणजे काय? पाऊस कसा पडतो? असे अनेक प्रश्न पडत होते. त्या त्या वेळच्या त्याच्या उत्क्रांत अवस्थेप्रमाणे तो त्यांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करीत होता. ह्या उत्तरांमध्ये काळानुरूप बदलही होत गेले. पण हे बदल सहजासहजी झालेले नाहीत. धर्माच्या, कर्मकांडाच्या नावाखाली ह्या बदलांना विरोध होत राहिलाच. पण परिस्थितीच्या आणि नवज्ञानाच्या प्रचंड रेट्यामुळे हा बदलही होतच राहिला. त्याला धर्ममार्तंडही रोखू शकले नाहीत.
म्हणूनच सुरुवातीच्या काळात ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे, त्यांचे ऋण म्हणून, त्याच्यापोटी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पूजाअर्चांचा जन्म झाला. पण ह्या कृतज्ञतेचे रूपांतर कालांतराने कर्मकांडात आणि माणसाला भविष्याच्या भयगंडात टाकण्यात झाले. आज सूर्य, चंद्र, तारे आदि काय आहेत हे आपल्याला कळले आहे. पाऊस कसा पडतो तेही उमगले आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची पूजाअर्चा वा इतर कोणतेही कर्मकांड केले नाही तरी ते नियमितपणे त्यांच्या शास्त्रीय नियमानुसार त्यांची कर्मे करीतच राहाणार आहेत. मग कुंडलीत सूर्य, चंद्र, आदींना स्थान देण्यात काय बरं अर्थ आहे? त्यांच्या पोटी कृतज्ञता असणं वेगळं आणि त्यांचा आधार घेऊन ज्योतिष्यांनी सामान्य माणसाला घाबरवून सोडणं वेगळं.
मुळात जन्मकुंडलीत सूर्य, चंद्र, राहू व केतू ह्यांना स्थान देऊन आणि त्यांना ग्रह मानून आपण आपले अज्ञानच प्रकट करीत असतो. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे आता शालेय विद्यार्थी सहज सांगू शकतात. पण फलज्योतिषात मात्र ‘पृथ्वीभोवती सूर्य फिरतो’ असे आजही समजतात. म्हणजे शिक्षितांना बरोबर विरुद्ध अर्थ सांगून आपण लोकांना मागास ठेवत आहोत याचेही भान ज्योतिष्यांना नाही. सूर्य हा तारा आहे. चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. राहू व केतु हे चंद्राची भ्रमणपातळी आणि पृथ्वीची भ्रमणपातळी यांच्यामध्ये सुमारे साडेपाच अंशाचा कोन असल्याने ते दोन भ्रमणमार्ग जिथे छेदतात ते छेदनबिंदू आहेत. त्यांना आपण शास्त्रीय परिभाषेत शरदसंपात आणि वसंतसंपात बिंदू म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहातो, तिला ह्या कुंडलीत स्थानच नाही. लाखो किलोमीटर अंतरावरील हे ग्रह-तारे जर मानवावर, त्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात तर तो माणूस ज्या पृथ्वीवर जन्मला त्याच्या भोवतालची परिस्थिती काहीच परिणाम करू शकत नाही का? ह्याला कुंडलीतील फोलपणा म्हणावा नाही तर काय? उलट एका अर्थाने ह्या पृथ्वीवरील ज्या प्रदेशात तो जन्मला तो प्रदेश, त्याचा परिसर, तेथील राजकीय परिस्थिती, तेथील समाजकारण हे सर्व खऱ्या अर्थाने त्याच्या भविष्यावर परिणाम करणारे घटक असतात. म्हणजे एका अर्थाने कुंडलीतील लहानशा चौकटीत कोंडून बिचाऱ्या ह्या ग्रह-ताऱ्यांवर आपण उगीचच अन्याय करीत असतो.
आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा व त्यांच्या परिभ्रमणाचा पृथ्वीच्या परिसंस्थेतील काही घटकांवर बरावाईट परिणाम होतो, पण किती? अगदीच नगण्य. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रांना भरती-ओहोटी येते, म्हणून माणसावरही ग्रहांचा परिणाम होतो, असा दावा ज्योतिषी करतात. वरवर पाहता ते जरी खरे दिसत असले तरी, बारकाव्याने विचार केल्यावर तो युक्तिवाद फसवा आहे हे लक्षात येते. कारण गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वस्तुमानाशी निगडीत असते आणि ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. एक साधा प्रश्न विचारा की, बशीतल्या पाण्याला भरती-ओहोटी आलेली दिसते का? याचा अर्थ ती डोळ्यांनी दिसत नसली तरी नगण्य असते. त्याचप्रमाणे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे वस्तुमान ग्रह-ताऱ्यांपुढे बशीतल्या पाण्यासारखे नगण्यच असणार. मग एवढ्या दूर अंतरावरचे ग्रह कणाएवढ्या लहान माणसावर परिणाम करतात हे मानणे हास्यास्पद नाही काय? तसेच तो परिणाम एकाच वेळी जन्मलेल्या, एकाच अक्षांशावर जन्मलेल्या अथवा एकाच दवाखान्यात एकाच क्षणी जन्मलेल्या बालकांवर सारखाच व्हायला हवा. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचे भविष्य वेगवेगळे घडलेले दिसते. जसे सूर्य-चंद्राचा पृथ्वीवरील होणाऱ्या भरती-ओहोटीवर एकसारखाच परिणाम सर्वत्र दिसतो तसेच मानवाच्या आणि प्राण्यांच्या बाबतीतही सर्वत्र एकसारखेच घडायला हवे. पण तसे घडताना दिसत नाही. पृथ्वीवरील परिसंस्थेतील काही घटकांवर ग्रहगोलांचा परिणाम होतो… नगण्य असला तरी, यावरुन जर ज्योतिषी म्हणत असतील की, तसाच मानवी जीवनावर ग्रहगोलांचा परिणाम होतो. तर अशा म्हणण्याला ‘सुतावरून स्वर्ग गाठणे’ किंवा ‘राईचा पर्वत करणे’ असेच म्हणायला हवे. दुसरे म्हणजे ग्रह-ताऱ्यांचा परिणाम होत असेल तर तो सगळ्याच ग्रह-ताऱ्यांचा व्हायला हवा. कुंडलीतील मर्यादित चौकटीत मनःपूतपणे कोंबून बसवलेल्या मूठभर ग्रहांचाच का होतो? ह्या अट्टाहासाला काय म्हणावे बरे?
जन्मकुंडलीत किंवा राशीचक्र मांडण्याविषयी जी ज्योतिषविषयक पायाभूत गृहीतके आहेत त्यात प्रचंड अज्ञान सामावलेले दिसते. ग्रहांची स्थिती जशी विशिष्ट वेळी दिसते तशी ती नसते. कारण ग्रहांचे मानवी दृष्टीला होणारे ज्ञान हे त्या ग्रहाच्या अंतरानुरूप बदलत असते. सूर्य दिसायला सुमारे सव्वाआठ मिनिटांचा कालावधी लागतो, तर शनी दिसायला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे आपण पहातो ते एकप्रकारे शिळे आकाश असते. त्यामुळे ग्रहस्थिती हाच मुळात भ्रम आहे. कारण तेवढ्या काळात गुरू, शनी आदी ग्रहांची जागाही बदललेली असते.
दुसरे असे की, काही ग्रह हे विशिष्ट स्थानी उच्चीचे आणि नीचीचे मानले जातात. उदा. रवी सिंहाचा स्वामी आहे पण तो मेषेत उच्चीचा तर तुळेतील दहाव्या अंशात नीचीचा मानला जातो. ह्या उच्च-नीच राशी आणि त्यांचे स्वभाव ठरविले कोणी? आणि कोणत्या नियमांनी? ग्रहांच्या पार्श्वभागी असणारी रास त्याचे सबलत्व काढून त्याला जर दुर्बल बनवू शकते तर ग्रहांपेक्षा राशीच परिणामकारक ठरू शकत नाहीत काय? मग कुंडलीतील ग्रहस्थानांना कोणता अर्थ उरला?
पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सहा महिने दिवस व सहा महिने रात्र अशा दिनमानात दिवस काढावे लागतात. आणि वर्षातून काही काळ तर तेथे आकाशस्थ ग्रहज्योती दिसतच नाहीत. उत्तरध्रुवावर दक्षिण गोलार्धातील वा विषयवृत्तावरील ग्रह-तारे दिसूच शकत नाहीत. मग त्यांचा कोणता परिणाम ह्या माणसांवर होतो? कारण त्या माणसांच्या कुंडल्या ह्या ज्योतिषातील नवग्रहांशिवाय तयार होऊच शकणार नाहीत. की तेथील माणसांना जन्मकुंडल्यांची गरजच नाही? याचा अर्थ त्यांना भविष्यच नाही की काय?
निसर्गनियमानुसार तीच ती ग्रहस्थिती विशिष्ट कालावधीत नियमितपणे पुनःपुन्हा येत असते. तर मग महान व्यक्तींच्या बाबतीत जन्मतिथीची आणि जन्मवेळेची वारंवारता का आढळत नाही? महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध, कबीर यांसारख्या महात्म्यांच्या जन्मवेळी असणारी ग्रहस्थिती जेव्हा कधी येईल तो क्षण पकडून नेमके त्याचवेळी शस्त्रक्रिया करून शेकडो बालकांना जन्म देण्याइतपत विज्ञान पुढे गेलेले असताना, ज्योतिषमार्तंड अशा वेळा काढून जगाला कल्याणकारी ठरणाऱ्या विभूतींची पैदास करण्यासाठी का बरे सहाय्यभूत ठरत नाहीत? ह्या सत्कर्माबद्दल त्यांना सारे जग दुवा देणार नाही काय? त्यांच्या आयुष्यभराची कायमची ददात मिटेल.
पण आपले ज्योतिषी बसले आहेत मंगळ आणि शनीच्या राशीवर! बिच्चारे!! मंगळ आणि शनीविषयीची शास्त्रीय माहिती यांच्या गावीही नसते. तांबूस रंगाचा दिसणारा मंगळ हा किती विलोभनीय दिसतो! शनीची कडी कधीतरी तुम्ही दुर्बिणीतून पाहिली आहेत काय? ह्या त्या बिचाऱ्या शनीच्या मागे ज्योतिष्यांनीच साडेसाती लावली आहे. मंगळ आणि शनी तर निमूटपणे सूर्याभोवती परिभ्रमण करताहेत. पण आपण मात्र त्यांना अस्पृश्य आणि दलित करून टाकलं आहे… आपल्या कुंडलीत! ह्या वेडगळपणाला काय म्हणावं? या ना त्या ग्रहाचा खडा अंगठीच्या कोंदणात बसवून आपण या अफाट मोठ्या ग्रहांना लगाम घालू शकतो अशी समजूत फक्त बुद्धी गहाण टाकलेली माणसेच करून घेऊ शकतात. ह्या खड्यातून धन होते ते फक्त सोनारांचे आणि ज्योतिषमार्तंडांचे!
स्वतःच्या अपयशाबद्दल स्वतःखेरीज दुसऱ्या कुणालातरी जबाबदार धरणे हे सर्वांनाच सोयीचे असते. म्हणूनच ग्रहांना वेठीला धरणे पोटार्थी ज्योतिष्यांना भावते. गूढचिन्हे, आकडेमोड व अगम्य खाणाखुणा करून विद्वत्तेचा आव आणत हे सगळे ज्योतिषी एकजात संदिग्ध आणि मोघम भाषा वापरत असतात. आता हेच पाहा ना, पृथ्वीवर दररोज अनेक उत्पात घडत असतात. त्यामुळे त्यांचे भविष्यकथन कुठे ना कुठे तरी लागू पडणारच असतं. त्यासाठी धूमकेतूची आणि ग्रहणाची काय आवश्यकता आहे? थोडासा लोकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास झाला की झालं. यावरून पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी आपल्या ‘आत्मपुराण’ या आत्मचरित्रात लिहिलेला एक किस्सा आठवला. पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा ज्योतिषाचे दुकान उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूला काही शंका विचारल्या. त्यावेळेस त्या गुरूने जोशींबुवांना गुरुमंत्र दिला की, ‘तुम्ही ग्रंथाद्वारे सांगायला गेलात की मेलात. इथे कामी येतं ते शब्दजंजाळच! समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आणि भविष्य सांगायचं. तेही बरंच सांगायचं आणि त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचं. अहो, हा धंदा आहे! यात वाक्चातुर्य जितकं प्रभावी तितकं तुमचं भविष्य बरोबर!’ यावरून काय ते समजा. एकंदरीत काय तर, ज्योतिषशास्त्र हे अनुमान लावण्याचं शास्त्र आहे. दहा प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तरे द्यायची झाल्यास एकाही प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण जसे सगळी उत्तरे होय किंवा नाही अशा प्रकारे लिहितो, मग त्यातील कधी सात बरोबर येतील, तर कधी पाच, तर कधी तीनच, असं आहे ज्योतिषशास्त्राचं.
आज स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्षे झाली तरी, शालाबाह्य मुलांची संख्या पाहता भारतीयांच्या हातावर शिक्षणाची रेषा मोठ्या प्रमाणात उमटलेलीच नाही. जपानमध्ये ६ ऑगस्ट १९४६ साली हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून एका क्षणात लाखो लोक जळून खाक झाले. ह्या सर्वांच्या कुंडल्यांतील ग्रहयोग काय एकच होते? दुसऱ्या महायुद्धानंतर रशियामध्ये आणि चीनमध्ये शिक्षणाचा आणि सुबत्तेचा प्रसार झाला याचे कारण काय तेथील प्रत्येकाच्या हातावर शिक्षणरेषा आणि धनरेषा होत्या म्हणून? की आपल्याच देशातील सगळ्यांची ग्रहदशा विपरीत आहे म्हणून आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे? हे कोणत्या तर्काच्या आधारावर पटावं?
आजपर्यंत ज्योतिषाला वैज्ञानिक निकष लावण्याचे प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केलेत. ज्योतिष्यांनी केलेले दावे खरे ठरतात का ते पाहण्याचे परिश्रमही वैज्ञानिकांनी घेतले आहेत. पण वैज्ञानिक विषयाला लागणारा पाया, या विषयाला, म्हणजे ज्योतिषाला लाभलेला नाही हेच चिकित्सेअंती सिद्ध झाले आहे. १९७४ साली १९२ शास्त्रज्ञांच्या सह्यांसकट, ज्यात काही नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञही होते, एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात फलज्योतिषावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून टीका केली होती. शेवटी असे म्हटले होते की, ज्योतिष हे शास्त्र नाही.
या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, भविष्य हे माणसांच्या प्रयत्नांच्या कसोटीवर घडवता येते, ज्योतिष्यांच्या ग्रहशांतीमुळे नव्हे. त्यासाठी गरज असते ती आत्मनिग्रहाची, चिकित्सेची आणि जिद्दीची. फलज्योतिष मात्र कमकुवत मनाला आणखी दुर्बल करते, भ्याड बनवते, तात्पुरते समाधान दिलेच तरी ते फसवे असते. म्हणून शहाण्या माणसांनी ज्योतिष्यांच्या नादी लागून स्वतःला भविष्याच्या गर्तेत लोटून देऊ नये, हेच खरे. प्रयत्नांची आणि कष्टांची कास धरली तरच आजची परिस्थिती बदलू शकेल यावर विश्वास असणे जास्त महत्त्वाचे आहे. तेच आपल्या भविष्याला खरा आकार देणारे असते.
+91 9920197680
जन्मवेळेबद्दलचे मुद्दे पूर्ण पटले. जनतेचा आत्मविश्वास कमी ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि ज्योतिषांची युती झालेली असते हे मात्र पटत नाही. राजसत्ता कमकुवत असताना व प्रबळ असतानाही जनतेचा ज्योतिषावर विश्वास फारसा वाढल्याचं किंवा कमी झाल्याचं दिसत नाही.
“ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असो द्यावे समाधान” हे विधान ज्योतिषशास्त्रात आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या कुणीही केलेलं नाही. ब्राह्मणद्वेष्ट्यांना प्रिय असलेल्या जगद्गुरू तुकोबारायांची ही ओवी आहे. त्या मतालाही फारसं गांभीर्याने खरं तर कुणी घेत दैवावर अवलंबून राहत नाहीत. समाज खरंच दैववादी असता तर तुकोबांच्याच शतकात हिंदवी स्वराज्य स्थापना होताना दिसली नसती.
कुंडलीत सूर्य, चंद्र आदींना स्थान देण्यामागे सूर्य चंद्राच्या गतीचं व खगोलीय प्रभावाचं अज्ञान हे कारण नाही. फलज्योतिषात ‘पृथ्वीभोवती सूर्य फिरतो’ असे आजही समजतात हा मुद्दा तद्दन खोटारडा आहे. पृथ्वी आणि सूर्य यापैकी कोण स्थिर आणि कोण भ्रमण करतं हा मुद्दा ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीतला असून ख.गोलशास्त्राच्या अखत्यारीतला आहे. ज्योतिषशास्त्र काही विशिष्ट खगोलीय वस्तूंच्या भासमान कोणात्मक स्थितीवर आधारित आहे.
पृथ्वीवरील जन्मस्थान, परिसर, राजकीय परिस्थिती, समाजकारण हे सर्व घटकदेखील भविष्यावर परिणाम करतात ही गोष्ट ज्योतिष शास्त्राला अमान्य नाही.
भरती ओहोटी व चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा गुरुत्व बलाच्या सूत्राने मोजता येतो. F = G (M1 x M2) / r^2. पण ज्योतिषशास्त्रात फक्त कोणात्मक स्थितीला (θ) विचारात घेतलं जातं, अंतराला (r) नाही.
ग्रहस्थिती भ्रामक असते हा मुद्दा बरोबर आहे. पण त्या भ्रामक भासमान स्थितीला विचारात घेऊनच भाकितं मांडली जातात आणि निरीक्षणं नोंदवली जातात.
ज्योतिषशास्त्रात ग्रहांसोबतच राशी व शुभ नक्षत्रंदेखील विचारात घेतली जातात.
पृथ्वीवरील जन्मस्थानाचे फक्त अक्षांश-रेखांश विचारात घेतले जातात. त्या स्थानावरून कोणता ग्रह कधी दिसतो/ दिसत नाही याचा ज्योतिषीय भाकितांवर फरक पडत नाही.
[टीप : ध्रुवीय प्रदेशाचं सोडा, जन्म विषुववृत्तीय प्रदेशात जरी दिवसा झाला असेल तरीही जन्मावेळी सूर्याशिवाय इतर कुठलाच खगोल दिसणार नाही. पण कुंडली मांडताना त्या न दिसणाऱ्या खगोलांची स्थितीसुद्धा लक्षात घेतली जाते.]
ज्योतिषांनी मंगळ आणि शनीला अस्पृश्य केले आहे हीदेखील तद्दन खोटी माहिती आहे. मंगळ आणि शनीच्या गतीला विचारात घेतले जाते. त्या ग्रहांच्या अंगठ्या घालून त्यांचे प्रभाव टाळता येतात असं म्हणणं हा मात्र मूर्खपणाचा कळस आहे आणि शहाण्या माणसांनी ज्योतिष्यांच्या नादी लागून स्वतःला भविष्याच्या गर्तेत लोटून देऊ नये याच्याशी मी 200% सहमत आहे
खूपच छान आणि comprehensive लेख आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे सर्व मुद्दे त्यात व्यवस्थित मांडले आहेत.
Fantastic write-up.
खूप सुंदर विवेचन आहे. काल्पनिक त्रयस्थ शकीच्या भरवश्यावर राहण्यापेक्षा प्रयत्न वर विश्वास ठेवला पाहिजे.शतकानू शतके यावरून शोषण होत आलं आहे. यांची दुकानदारी बंद होणार म्हणून मनुवादी तकलादू युक्तिवाद करतीलच. तुमच्या लेखामुळे माझ्या विचारात स्पष्टता आली आहे. मी कधीही ज्योतिष कडे जाणार नाही हे वचन देतो.
खालील दुव्यावर जाऊन सुधारकची सदस्यता घ्या.
https://www.sudharak.in/subscribe/