(१) येणारा काळ कठीण असेल
चक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेय
एक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंय
टाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊन
उपकाराची फेड केली जातेय,
हात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय.
दिवे लावा, दिवे मालवा म्हणत
देशाला जागं केलं जातंय
अंधाराची अफू देऊन
प्रकाशाला दूर पळवलं जातंय
कित्येक अडकलेले,
दूर कोठे घरापासून
आपली माणसं, आपलं गाव
पाहिलं नाही डोळे भरून.
अशांचा काही विचार हवा
भरीव रोकडे धोरण आखा.
येणारा काळ, काळ ठरेल
अशी आजची परिस्थिती आहे.
भविष्यात पोट भरायचं कसं,
हा रोकडा सवाल आहे.