सुधारकचा अंक प्रकाशित करण्याच्या टप्प्यात असतानाच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (IGNOU) ज्योतिषावर एक स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे जाहीर केले. हे एक अ-शास्त्रीय पाऊल आहे असे आम्हांला वाटते.
२००१ साली मुरलीमनोहर जोशी यांनी वाजपेयींचे सरकार असताना UGC मार्फत असाच एक अभ्यासक्रम विज्ञानशाखेत सुरू करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला होता आणि तो अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधीच बंद करण्यात आला. काही वर्षांनी मात्र असे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू झाले – ग्वाल्हेर, दिल्ली, रामटेक, बनारस वगैरे. नुकताच जाहीर केलेला हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्यामुळे आता अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. IGNOU ने जरी तो कलाविभागात घातला असला तरी अभ्यासक्रमाच्या वर्णनाप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रहांचे ज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय हे शिकवले जाईल आणि नंतर तेच ज्ञान ते स्वत:च्या उपजीविकेकरता वापरू शकतील असे म्हटले आहे.
हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याला विश्वाबद्दलचे फारसे ज्ञान नव्हते, तेव्हा रात्री स्थिर ताऱ्यांदरम्यान दिसणाऱ्या आणि द्विमीत भासणार्या आकाशात भटकणाऱ्या ग्रहांमुळे आयुष्यावर बरेवाईट परिणाम होतात असे आपल्या पूर्वजांनी समजणे आपण एकवेळ समजूनही घेऊ शकतो. पण गेल्या काही दशकांमध्ये खगोलशास्त्रातील संशोधने आणि त्यामुळे खगोलशास्त्राने जी प्रगती केली आहे, आपल्याला विश्वाबद्दल जे काही नवीन कळले आहे, ते पाहता अजूनही पूर्वीच्या, मर्यादित माहितीच्या व आकलनाच्या आधारावर त्याच गोष्टींना खरे समजून नवीन पिढीला त्याबद्दल शिकायला उद्युक्त करून त्यांना त्याच भ्रमात ठेवायचा हा प्रयत्न अतिशय चिंताजनक आहे.
फिलि नावाचे मानवनिर्मित यान एका धुमकेतूवर उतरले. ओसायरीस रेक्सने एका लघुग्रहाचा नमुना मिळवला. चंद्र-मंगळ इत्यादींवर यान उतरवणे आता मानव लीलया करू लागला आहे. दूरवरील शनीचे, त्याच्या कड्यांचे, त्याच्या उपग्रहांचे हाय रिझोल्युशन फोटो आपण मिळवले. वॉयेजरसारखी याने दूर सौर्यमंडळाच्या सीमेवर जाऊन ठेपली आहेत. भारताच्या चांद्रयानाने, तसेच मंगळयानाने बरेच काही साध्य केले आहे. नासाबरोबर ईस्रोचे अनेक प्रकल्प अजूनही सुरू आहेत. भारताचा ऍस्ट्रोसॅट सॅटलाईट हा क्ष-किरणांमध्ये अविरत संशोधन करतो आहे. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), लेसर इंटरफेरोमॅट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑबजरवेटरी (LIGO), थर्टी मीटर टेलिस्कोप (TMT) असे मोठे खगोलशास्त्रीय प्रकल्प भारतीय शास्त्रज्ञ राबवत आहेत, त्यात सहभागी होत आहेत. असे सर्व होत असताना ज्योतिषाचा अभ्यासक्रम पुन्हा एकदा वैज्ञानिकांचा अपमान आहे, विचार करू शकणाऱ्या सर्व भारतीयांचा अपमान आहे.
भारताला जर उर्वरित जगाच्या बरोबरीने उभे राहायचे असेल, इतर देशांच्या पुढे जायचे असेल तर दैववादी अंधविश्वासू घटकांचा त्याग करावा लागेल. असे तेव्हाच शक्य होईल जेव्हा बहुतांश नागरिक एकत्रितपणे तसे असावे अशी हक्काने मागणी करतील.
याआधी बरेचदा ज्योतिषांना खुली आव्हाने देण्यात आली आहेत. खूप कमी लोक असे एखादे आव्हान स्वीकारण्यास पुढे येतात आणि जेव्हा जेव्हा तसे ते आले आहेत तेव्हा तेव्हा तोंडघशी पडले आहेत. आता गरज आहे विद्यापीठांना असे आव्हान देण्याची. याबाबतची जनजागृती कशी घडवून आणता येईल याविषयी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन निरनिराळ्या व्यासपीठांवर बोलते/लिहिते व्हायला हवे आहे.
हा महत्त्वाचा विषय येथेच न संपवता सुधारकच्या पुढच्या अंकात घेऊ.
आशिष महाबळ
मला वाटत कि अभ्यासक्रम असु द्यावा कारण तो ऐच्छिक आहे ।
अभ्यासक्रम ऐच्छिक आहे त्यामुळे असु द्यावा ।
पुर्वी 2001 मधे युजीसी ने ज्योतिष हा विषय विद्यापीठ स्तरावर विज्ञान शाखेत घेण्याचा घाट घातला होता. प्रा.यशपाल खगोल भौतिकतज्ञ व माजी चेअरमन यूजीसी यांनी असे मत व्यक्त केले होते कि ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञान शाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञान शाखेत घेणे ही घोडचूकच.
आता इग्नू ने त्याला मानव्य विद्याशाखेत एक MAJY Master of Arts(JYOTISH) कोर्स चालू केला आहे. भारतीय प्राच्यविद्या च्या अंतर्गत हा विषय येतो.बनारस हिंदू युनिवर्सिटीत हा कोर्स पुर्वीपासून आहे. आजही विद्यापीठात मानव्यविद्या अंतर्गत वेदांग उपनिषद ज्योतिष या विषयांवर पीएचडी करता येते.
‘फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य’ या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यावेषी लिहितात,” ………एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा.” हे सत्यान्वेषी म्हणजे साहित्य समीक्षक प्रा. न.र.फाटक
”अभ्यासक्रमाच्या वर्णनाप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रहांचे ज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय हे शिकवले जाईल आणि नंतर तेच ज्ञान ते स्वत:च्या उपजीविकेकरता वापरू शकतील असे म्हटले आहे. ”
ग्लोबल वाॅर्मिंग, पर्यावरण ऱ्हासाचे परिणामांचा पृथ्वी या आपल्या ग्रहाच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न सामोरा ठाकलेला असताना या शास्त्रीय अभ्यासाचे विविधपैलू लक्षात घेण्याची गरज
उडत्या तबकड्या आणि परग्रहावरील जिवांच्याबाबत नव्याने हाती येणारी काही ठोस बातमी
उपजिविकेची लालूच दाखवणे हे सध्याच्या प्रचंड बेकारीच्या काळात लांगुलचालन म्हणूनच गुन्हा ठरवला जाणे गरजेचे आहे.
स्वकष्टाचे मोल हे मूल्य ऱ्हास पावत असताना ही खौठ्या, फसव्या आशा दाखवणारी बांडगुळे पोसायला या अभ्यासक्राच्या कोंदणांचा निषेध सर्वार्थाने कारायलाच हवा.
या विचारप्रवर्तक मनोगताबद्दल आभार.
स्वातिजा मनोरमा
एवढ्या मोठ्या कोरोना महामारीने जगाला वेठीस धरलं लाखो लोक मेले, कित्येकांचे रोजगार गेले, शिक्षणाची तर वाट लागली, आजही लोक मानसिक दहशतीत आहेत, जगातल्या अनेक अर्थव्यवस्था मोडकडीस आल्या मागल्या तिमाहीत भारताचा वृद्धिदर minus मध्ये गेला होता. एवढं सगळं होऊन सुद्धा एकही ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक कसलंच भाकीत वर्तवत नाही याचं कारणं हे थोथांडच आहे. संस्कृती वाचवण्याच्या नावाखाली देशातील तरुणांची डोकी अविवेकी करायची आहेत.
ज्योतीष शास्त्र हे वैदिक काळापासूनचे शास्त्र आहे. पण ते पोटार्थी कुडमुड्या ज्योतिषांमुळे बदनाम झाले आहे. पण उत्तम ज्ञान असलेल्या ज्योतिषा कडून आपल्या जीवनातील आगामी अनिष्ठा विषयी आगाऊ कळले तर उपाय योजना करून त्या अनिष्ठाची तीव्रता कमी करणे शक्य होते. पण या गोष्टी नास्तीक लोकांच्या बुध्दीला रुचणार नाहीत. पण मी स्वतः या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे या शास्त्राच्या अभ्यासक्रमाला विरोध करणे योग्य वाटत नाही.
ज्योतिष शास्त्र कोणत्याही शाखेत सुरु करायला काय हरकत आहे. थोतांड असते तर भारतात ते हजारो वर्ष टिकलेच नसते. शास्त्र , ज्ञान अजूनही पूर्ण नाही हा पूर्णत्वाचा प्रवास आहे , निरंतर अभ्यास करीत राहिले, तर नक्कीच त्यात विज्ञान सापडेलच त्यामुळे कोणत्याही शाखेबद्दल , शास्रबद्दल पूर्वदुषित ग्रह नसावा
कुठल्याही शास्त्राला ते ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ‘Empirical Testing’ या परीक्षेतून जावे लागते. ज्योतिष शास्त्र आत्तापर्यंत कुठेही, जगाच्या पाठीवर आणि भारतामध्ये, या टेस्टमध्ये पास झालेले नाही. या पार्श्वभूमीवर त्याला अभ्यासक्रमामध्ये आणणे हे योग्य नाही. TV वरील चर्चेमध्ये आणि इतरत्र, सगळेजण म्हणत आहेत की यावर संशोधन व्हायला पाहिजे. हे अगदी कबूल. पण ते अगोदर व्हायला पाहिजे आणि मग विद्यापीठातून ते शिकवले गेले पाहिजे. कारण समजा या संशोधनात असे सापडले की ज्योतिष हे ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होत नाही तर त्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य काय होईल ज्यांनी तो अभ्यासक्रम घेऊन पदवी घेतली आहे?
अजून एक विचार म्हणजे ज्योतिषांनी अथवा ज्योतिष विरोधक वर्गाने स्वतःच केलेले Empirical testing हे सर्वमान्य होणार नाही आणि या विषया मधील संदिग्धता कधीच संपणार नाही म्हणून विद्यापीठांनी एकत्र येऊन एक असे पॅनेल नेमावे ज्यात शास्त्रज्ञ, ज्योतिषी, संशोधक, संख्याशास्त्रज्ञ असे सर्व असतील आणि या पॅनेलने Empirical testing करून त्याचे निष्कर्ष प्रकाशित करावेत. Empirical testing विषयी पुढे अजून लिहीनच परंतु ज्यांना याविषयी अशा प्रयोगाविषयी जाणून घ्यायचे आहे त्यांनी The Skeptik, UK या मासिकात नुकताच प्रकाशित झालेला हा लेख वाचावा.
https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-powers-of-indian-astrology-simply-dont-hold-up/
प्राचीन काळी लोक वातावरणाचा किंवा हवामानाचा अंदाज घेण्यासाठी खगोलशास्त्राचा वापर करीत. म्हणजे चार हजार वर्षापूर्वी बॅबिलोनियन संस्कृती मध्ये असं वर्तवलं जाईल की विशिष्ट राशींच्या चांदण्यांचा समूह आकाशामध्ये दिसला की काही दिवसांनी पाऊस येणार असं भविष्य वर्तवले जात होतं. आणि त्यानुसार लोक शेतीच्या कामाला सुरुवात करत होते. हे झालं खगोलशास्त्र. पण ज्योतिषाला खगोलशास्त्राचा मुलामा देऊन व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पाडता येतो असे म्हणणे केवळ चुकीचं आहे. कारण राशी आणि ग्रह यांमध्ये महदंतर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषविद्येतील कुंडलीमध्ये नक्षत्र आणि राशी या एका काल्पनिक द्विमितीय प्रतलावरती नमूद केल्या गेल्या आहेत. जी पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. कारण आकाशात दिसणाऱ्या चांदण्यामध्ये कोट्यावधी किलोमीटरचे अंतर आहे हे विज्ञानाने स्पष्ट पणे सिद्ध करून दाखवले आहे. आता आणखी एक गोष्ट अशी की ज्योतिषी सर्वमान्य आहे प्राचीन काळापासून पाहिलं जातं आणि सर्व ठिकाणी पाहिलं जातं असा चुकीचा युक्तिवाद केला जातो. कारण समजा सर्वत्र ठिकाणी लोक दारू पीत असतील किंवा तंबाखू खात असतील तर दारू आणि तंबाखू आरोग्यास चांगली आहे असं म्हणता येणार नाही. दुसरा एक भाग असा ग्रहांचा प्रभाव आपल्या वर पडतो यामध्ये कोणतच तथ्य नाही. सुमारे दीडशे कोटी किलोमीटर वर असलेला शनि जो आपल्याला नीट डोळ्याने दिसत सुद्धा नाही तो कसा आपल्या वर प्रभाव पाडेल. शनीचा जाऊ द्या चंद्र तरी कसा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पाडू शकतो. कारण वैज्ञानिक नियम असा सांगतो की दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल हे त्या दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानाच्या वर्गाच्या समप्रमाणात आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर वस्तू जितकी लांब आणि जितकी लहान तेवढा त्या वस्तू वरील प्रभाव कमी. चंद्राचा प्रभाव तो सूर्याचा प्रभाव पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यावर पडतो कारण त्यांचे वस्तू मन खूप मोठे आहे परंतु तो प्रभाव एखाद्या वेळी न दिवस एखाद्या तलावावर किंवा एखाद्या बॅरेल मधील पाण्यावर कधी पडलेला दिसतो का? समुद्राच्या तुलनेने नदी तलाव किंवा बॅरेलमधील पाणी अगदीच नगण्य वस्तुमानाचे आहेत. त्यामुळे ग्रहांचाच प्रभाव आपल्यावर पडत नाही. तिथे लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या राशींचा किंवा नक्षत्रांचा कसा पडणार? दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेवरून त्याची कुंडली ठरवली जाते. ती जन्मवेळ आपण कोणत्या निकषांच्या आधारे ठरवतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुहूर्त पाहून लढाई करणारी पेशवाई चा अंत झाला. परंतु कोणतेही मुहूर्त न पाहता आपले कार्य करणारे इंग्रज यांनी जवळपास दीडशे वर्ष भारतीयांवर राज्य केलं. आपल्या आयुष्यात वाईट का घडतं किंवा चांगलं का घडतं याचे श्रेय एका विशिष्ट अज्ञातावर देण्यापेक्षा चिकित्सक पद्धतीने मुळाशी भिडले पाहिजे हा दृष्टिकोन समाजामध्ये रुजायला हवा. त्यामुळे थोतांडावर आधारित असलेले फलज्योतिष कुरवाळायचे की वैज्ञानिक दृष्टिकोनाभिमुख समाज घडवायचा याचा जाणकारांनी विचार करायला हवा.
जुलै २०२१ च्या अंकातील मनोगत तसेच या संबंधातील श्री. राजोपाध्ये आणि श्री. गलगले यांचे विचार वाचले. त्यांनी जरी काही वैज्ञानिक मतं मांडली असली तरी त्यांच्याशी मी सहमत नाही. ज्योतीष शास्र्त हे पुरातन शास्र्त असून त्यालाही शास्र्तीय बैठक आहे. सर्वसाधारणतः ज्योतीष सांगण्यासाठी जन्म कुंडली पाहिली जात असली तरी हातावरील रेषा आणि कपाळाकडे पाहून भविष्य वर्तवणारे अभ्यासू, ज्ञानी ज्योतिषीही आहेत आणि त्यांचे भविष्य कथन बरोबरही असते. पण किही पोटार्थी कुडमुड्या लोकांमुळे हे शास्र्त बदनाम झाले आहे. पण जाणकार, आधिकारी व्यक्तिंनी सांगितलेल्या भविष्य काळातील घटनांचा प्रत्यय अनेकांना येत असल्यामुळेच लोकांचा या शास्र्तावर विश्वास आहे. त्याला थोतांड म्हणणे योग्य नाही. जाणकार व्यक्तीकडून आपल्या जीवनात भविष्यात घडणाय्रा एखाद्या घटनेची आगाऊ कल्पना मिळाली तर ती घटना टाळण्याचा किंवा तिची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणे शक्य होते.
या संदर्भात माझ्या कुटुंबात घडलेला प्रसंग मी कथन करत आहे. ही घटना १९४६ सालची आहे. माझ्या वडिलांचे अकाली निधन झाले होते आणि आईचे सांतवन करायला तिची मैत्रीण आणि मैत्रिणीचे यजमान आले होते. मैत्रिणीचे पती उत्तम जोतिष जाणणारे होते. आईशी सांतवनपर बोलून झाल्यावर त्यांनी माझ्या आईला आमच्या कुटुंबात दोन एक वर्षात घडणाय्रा आघाताची कल्पना दिली होती. दोन एक वर्षात माझ्या मोठ्या भावाला गंडांतर असून त्याची तीव्रता कमी करण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करण्याचा सल्ला दिला होता. मोठा भाऊ त्या वेळी दहा वर्षांचा होता. त्याच्या हातून दर सोमवारी शिवलिंगावर पाणी ओतून शिवलीलांम्रुताचा अकरावा अध्याय वाचून घेण्यास सुचवले. आई त्या दिवसा पासून शिव उपासना करू लागली व तिने मोठ्या भावाकडूनही ते सर्व करवून घेतले. दोन वर्षा नंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळची शाळा आटपून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भाऊ घरी आला होता. त्या काळात आमच्या गांवात पाणी टंचाई असे. त्यामुळे आई कपडे धुण्यासाठी नदीवर निघाली असताना हट्ट करून भाऊ तिच्या बरोबर नदीवर गेला होता. उन्हाळ्यामुळे नदीत तसे जास्त पाणी नव्हते. पण भावाला पोहता येत नसूनही आईच्या नकळत तो नदीत उतरला व बुडू लागला. त्यावेळी नदीवर आई आणि भावाशिवाय कोणी नव्हते. भावाचा आवाज ऐकून आई घाबरली व त्याला वाचवण्यासाठी तीही नदीत उतरली व तीही बुडू लागली होती. इतक्यात दोन तरूण तेथे आले व भावाला व आईला पाण्या बाहेर काढले.
श्रीशंकराच्या क्रुपेने आलेले गंडांतर टळले होते. पण आईच्या मैत्रिणीच्या पती कडून आगाऊ सुचना मिळाल्यामुळे आणि आईने श्रीशंकराची उपासना केल्यामुळे आलेले संकट टळले होते. हा ज्योतीष शास्त्राचाच परिणाम नाही काय? मी माझे वडील निवरँतले तेंव्हा पांच साडेपांच वर्षांचा होतो व तो प्रसंग घडला त्यावेळी सात, साडेसात वर्षांचा असल्यामुळे ते सर्व आजूनही मला चांगले आठवत आहे.
या वरून ज्योतीष शास्त्र हे शास्र्त असून जाणकार ज्योतीषा कडून भविष्यात घडणाय्रा एखाद्या प्रसंगाची आगाऊ सुचना मिळाली तर ते अनिष्ठ टाळण्यासाठी काही उपाय करणे शक्य होते हे मान्य व्हावे. टीप: नास्तिक लोकांचा या वर कदाचित विश्वास बसणार नाही; पण ही घटना माझ्या समोर घडलेली आहे.
ज्योतिष समजा काही प्रमाणात “खरे” ही असले, तरी त्यातून “सर्व काही आधीच ठरलेले आहे, आणि आपण असहाय्य्य आहोत” अशी भावना निर्माण होत नाही का? हे प्रयत्नवादाला मारक नाही का? (“आपण काही बदलू शकत नाही!” अशी भावना लोकात निर्माण होणे हे सत्ताधार्यांना हिताचेच असते हा एक वेगळाच मुद्दा!).