गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३

(क)

आता आपण विनिमयव्यस्थेच्या तात्तविक पायाची चिकित्सा करूया. यासंदर्भात तृष्णा, सुख आणि उपयोगिता या संज्ञाच्या अर्थाविषयी थोडा खुलासा करू. तृष्णा आणि सुख ह्या मानसशास्त्रातील संज्ञा आहेत; परंतु सुखवादी पंथाच्या (Hedonism school) लोकांनी त्यांचा नीतीशास्त्रात प्रयोग केला. मानवाला इच्छा-आकांक्षा, आशा, स्वप्ने असणे स्वाभाविक आहे आणि त्यांची पूर्तता झाली की मानव सुखी होतो, अशी आपली सुखाची संकल्पना असते. किंबहुना, परिपूर्तीची अवस्था गाठण्यासाठी मानवाने आधी सुखी असले पाहिजे, असेही बरेचदा ऐकण्यात येते. परंतु, सुखवाद्यांची सुखाची कल्पना काय होती?

मानवाला जीवन जगताना अपरिहार्यपणे कर्तव्ये करावीच लागतात; परंतु ही कर्तव्ये करताना त्याच्यासमोर काही प्रमुख समस्या उभ्या राहतात: 
१) मानवी जीवनाचे परमप्रातव्य कोणते? 
२) स्वतोमूल्य(स्वयंनिष्ठ मूल्य) कशास आहे? 
३) युक्त अथवा प्रशस्त (इष्ट) कर्म कोणते व त्याची युक्तता कशी ठरवायची? 
४) कर्तव्य कशास म्हणायचे आणि आपले कर्तव्य कसे निश्चित करावयाचे? 

या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सुखवादाने स्विकारलेली भूमिका थोडक्यात अशी: 
१) ‘सुख’ हेच मानवाचे परमप्रातव्य होय. मानवाने जगायचे ते सुखासाठीच. 
२) स्वयंनिष्ठ मूल्य (स्वतोमूल्य) जर कशाला असेल, तर ते सुखालाच आहे. स्वतोमूल्य म्हणजे ज्याचे प्रयोजन दुसऱ्या कशासाठी नाही असे साध्यमूल्य. सुख का हवे? तर ते सुख आहे म्हणून. त्याच्यापासून आणखी काही निष्पन्न होते अथवा व्हावे म्हणून नव्हे. याचाच अर्थ, सुखाचे मूल्य स्वयंनिष्ठ म्हणून आंतरिक असते. 
३) ज्यापासून जास्तीत जास्त सुख निर्माण होईल, तेच कर्म वा तीच कृती युक्त (वा इष्ट) होय. 
४) आपले खरे कर्तव्य सुखाची जास्तीत जास्त निर्मिती करणे आणि दु:खाचे होईल तेवढे निर्दालन करणे, हे होय. आता, सुखवादाच्या ह्या भूमिकेविषयी काही प्रश्न उपस्थित करता येतील. ज्याकरिता आपला सर्व खटाटोप सुरू आहे, अशा एका साध्याची केवळ प्राप्ती म्हणजे सुख आहे की मग सुख हे ‘स्वयमेव साध्य ‘(End in itself) आहे? याबद्दल सुखवाद्यांची भूमिका अशी: “सुख हे स्वयमेव साध्य आहे.” सुखाला स्वयमेव साध्य मानल्याने अनेक अनुलंघ्य अडचणी व व्याघात निर्माण होतात. 

सुखवादावर घेण्यात येणारे सर्वसामान्य आक्षेप असे सांगता येतील: 
१) मितीविषयक समस्या : सुख हेच स्वयमेवसाध्य (स्वार्थसाध्य) मानले, तर त्याचे संख्यात्मक मापन कसे करणार? सुख मोजण्यासाठी आपल्याजवळ सुखाचे कलनशास्त्र (pleasure calculus) आहे काय? सुखवाद प्रमाण मानून व्यवहारात त्याचे आचरण करावयाचे झाल्यास निरनिराळ्या सुखांची बेरीज करून तिच्यातून दु:खाची बेरीज वजा करावी लागेल. हे करणे जवळजवळ अशक्य आहे, कारण एक सुख दुसऱ्यापेक्षा किती कमी किंवा किती अधिक आहे, हे सांगता येणार नाही. तसेच सुख हा व्यक्तीचा खाजगी अनुभव असल्याने एकाच बाह्य पदार्थापासून निरनिराळ्या व्यक्तीस कमी-जास्त सुखाचा लाभ होईल आणि त्यामुळे त्याचे मापन कोणालाच करता येणार नाही. 
२) न्याय्य वितरण समस्या : सुखाची वाटणी कशी करावयाची हाही प्रश्न आहे. अशी परिस्थिती असेल की, सुख सर्वांना सारखे वाटायचे म्हटल्यास सुखाची एकंदर बेरीज कमी होईल; पण विषम वाटणी केल्यास त्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही काय?व्यक्तीस न्याय द्यावयाचा, असे नैतिक बंधन स्विकारल्यास सुखवाद सोडून द्यावा लागतो. 
३) गुणात्मक श्रेणीची समस्या : “सुखाची मात्रा सारखीच असेल तर काव्यानंदातील आणि पोरखेळातील आनंद ह्यांत फरक करू नये.” अशी जेरेमी बेंथम ह्यांची भूमिका होती; परंतु सुखवादावरील उपर्युक्त आक्षेपांमुळे दोन सुखांमध्ये गुणात्मक भेद नसतो, ही बेंथम ह्यांची भूमिका जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी नाकारली. असा गुणात्मक भेद असतो आणि गुणवत्तेच्या दृष्टीने उच्च प्रतीचे असलेले लहान सुख कनिष्ठ गुणवत्तेच्या मोठ्या सुखापेक्षा अधिक इष्ट असते, असे प्रतिपादन मिल ह्यांनी केले; परंतु सुखाचे असे उच्चनीच प्रकारभेद केल्याने सुखवादच सोडावा लागतो. एखादे सुख उच्च आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ त्याचे मूल्य सापेक्षतः अधिक असले पाहिजे. अर्थातच, सुखाचे मूल्य त्याच्या सुखत्वावर अवलंबून नसून, अन्य कशाने तरी ते ठरते, असे मानावे लागेल. तात्पर्य, सुख = मूल्य हे सुखवादाचे प्रमेय लटके पडते. “अधिकतम लोकांचे अधिकतम सुख” (Greatest happiness of the greatest numbers) ह्याला परमप्रातव्य म्हणण्यातही दोष आहे. सुख एकमेकांत मिसळता येत नाही. सर्वांच्या सुखांची गोळाबेरीज करता येणे कदाचित शक्य झालेच, तरीही ती बेरीज म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीचे सुख म्हणता येणार नाही. 

सुखावादातील हे दोष मुख्यत: सुख ही एक अमूर्त गोष्ट मानून झालेल्या चर्चेमुळे उद्भवले आहेत. दैनंदिन जीवनात आपण जेव्हा सुखाविषयी बोलतो, तेव्हा अगदी भिन्न अर्थांनी आपण ‘सुख’ ही संज्ञा वापरत असतो. विशेषत: आपण सुख निर्माण करणाऱ्या किंवा ‘सुखनिर्मात्या वस्तूंविषयी’ बोलत असतो. म्हणजे ज्याविषयी आपली तृष्णा असते, ती गोष्ट म्हणजेच त्या सुखकारक ‘वस्तू’ होत, त्यामुळे ती वस्तू आणि त्या वस्तूंपासून प्राप्त होणारे सुख या फरक करता येण्याजोग्या (Distinguishable) गोष्टी असल्या, तरी त्या अलग करता येण्याजोग्या (Separable) गोष्टी नाहीत. एखादी वस्तू आणि तिची लक्षणे या अलग करण्याजोग्या गोष्टी नसतात, त्यात फक्त फरक करता येतो. त्यामुळे वस्तू वा साध्याचा कोणताही संदर्भ न देता, केवळ लक्षणांविषयीच बोलणे, विवेकीपणाचे नाही. त्यामुळे सुखाची अमूर्त कल्पना निरर्थक ठरते. अशा कारणांमुळे, श्री.जी.ई. मूरसारख्या तत्त्ववेत्यानेही अमूर्त सुखाची कल्पना अस्विकारार्ह म्हणूनच त्याज्य ठरविली. 

श्री. लिओनेल रॉबिन्ससारखे अभियांत्रिकी अर्थतज्ज्ञ असे ठामपणे प्रतिपादन करतात की नीतीशास्त्र आणि अर्थशास्त्र यांत कसलाच संबंध नाही. त्यांचा असा दावा आहे की, अर्थशास्त्र केवळ मानवी वर्तनाच्या वास्तविकतेचा अभ्यास करते; त्यामुळे नीतीशास्त्राशी संबंध जोडल्याने अर्थशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप नष्ट होईल. ही एक निरर्थक भीती आहे, असे मला वाटते. खराखुरा मानव “मी जीवन कसे जगावे? माझे कर्तव्य कोणते?” असे नीतिशास्त्रीय प्रश्न विचारणार नाही, असे घडूच शकत नाही. मानवी जीवनाला नीतीकडे वळविणारे मुख्य प्रेरक म्हणून श्री. बर्नाड विल्यम्ससारख्या नीतीज्ञांनाही हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे, आज अर्थशास्त्राचा नीतीशी असलेला संबंध विशद करणे, हे आमचे कर्तव्य बनले आहे. सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यास आढळेल, की सुखवाद (वा उपयोगितावाद) हा अभियांत्रिकी अर्थशास्त्राचा आणि काही प्रमाणात कल्याणकारी अर्थशास्त्राचाही तात्त्विक पाया आहे, हे सोदाहरण दाखवून देता येईल. सुखवादाच्या मर्यादा अनेकांनी दाखवून दिल्यानंतरही अर्थतज्ज्ञमंडळी अर्थशास्त्राच्या तात्त्विक पायाचा साधा पुनर्विचार करायलादेखील तयार नाही. ही मंडळी तर सुखाचे कलनशास्त्र तयार करण्यात व्यग्र आहे. सुख, समाधान या संज्ञांविषयीच्या तात्त्विक अडचणी दुर्लक्षित करून, सुखाचे मोजमाप करण्याचे एककही (Unit) त्यांनी कल्पिले आहे. या अर्थशास्त्रात सुखाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व शक्य आहे. सुखात किती वाढ झाली, यासाठी ‘सीमान्त तत्त्वाची (Marginality principle) संकल्पना कुर्नो, वॉलरस, जेव्हान्स ह्यांसारख्या सीमान्तवादी अर्थशास्त्रांनी उपयोजिली. ही चर्चा आणखी एका संज्ञेसह केली गेली, ती म्हणजे ‘उपयोगिता’ (Utility). आता उपयोगिता, सुख आणि समाधान या संज्ञांचा विचार करूया. येथे असा प्रश्न विचारता येईल: उपयोगिता म्हणजे काय? प्रा. स्टॅन्ले जेव्हॉन्स यांच्या मतानुसार, “वस्तूंमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय.” अर्थात, उपयोगिता ही मानवाच्या गरजा आणि तृष्णांची परिपूर्ती करू शकेल अशी, वस्तूचीच क्षमता असते.

आपल्या ‘ऋजुता ह्या स्वरूपातील न्याय’ (Justice as fairness) या निबंधात जॉन रॉल्सकृत न्यायसंकल्पनेचे विवेचन देताना, प्रा. मे. पुं. रेगे ह्यांनी उपयोगितावादाचे सार सांगितले आहे, ते असे: “उपयुक्ततावादाप्रमाणे ज्या सामाजिक संस्थांच्या आणि वैयक्तिक आचरणपद्धतीच्या योगे समाजात जास्तीत जास्त सुख निर्माण होते, त्या योग्य अश्या संस्था आणि आचरणपद्धती होत. आता हे सुख व्यक्तीमध्ये कसे वाटावे हा न्यायाचा प्रश्न आहे. सुख वाटणे म्हणजे सुख निर्माण करणारी साधने -थोडक्यात संपत्ती -वाटणे असे समजू. मग उतरत्या सीमान्त सुखाच्या (Diminishing marginal Utility) सिद्धान्ताप्रमाणे सुखसामग्रीचे वाटप केल्याने जास्तीत जास्त सुख निर्माण होईल.” 

येथे, प्रा. रेगे यांनी ‘Utilitarianism’ आणि ‘Utility’ या संज्ञाकरिता अनुक्रमे ‘उपयुक्ततावाद’ आणि ‘सुख’ या संज्ञा उपयोजिल्या आहेत. यावरून, उपयोगिता, उपयुक्तता व सुख या फरक करता न येण्याजोग्या (Non-distinguishable) आणि म्हणून समानार्थी संज्ञा आहेत, अशी प्रा. रेगे यांची भूमिका दिसते; परंतु उपयोगिता, उपयुक्तता आणि सुख ह्यांत भेद आहेत. 

यासंदर्भात, प्रा. दि.य.देशपांडे लिहितात, “‘Utilitarianism’ या शब्दाला मराठीत वापरण्यात येणारा ‘उपयुक्ततावाद’ ह्या पर्यायाऐवजी आपण ‘उपयोगितावाद’ असा पर्याय वापरावा असे मी सुचवतो. त्याचे कारण असे की ‘Utility’ हा शब्द या वादात एक पारिभाषिक शब्द म्हणून वापरला जातो. ‘Utility म्हणजे usefulness’ म्हणून त्याचे भाषांतर ‘उपयुक्तता’ असे करणे स्वाभाविक आहे. पण ‘उपयुक्त’ या शब्दाच्या अर्थच्छटा अनेक असल्यामुळे ‘Utility’ या पारिभाषिक शब्दाला एखादा पारिभाषिक शब्दच वापरणे योग्य होईल. त्याकरिता, ‘उपयोगिता’ हा शब्द वापरावा असे मी सुचवितो. हा शब्द अर्थशास्त्रात ‘Utility’ चा पर्याय म्हणून रूढ आहेच.” 

प्रा. दि.य.देशपांडे यांची ही सूचना मौलिक आहे. त्यामुळे, उपयोगिता, उपयुक्तता व सुख यांतील भेदांची चर्चा करूया. उपयोगितावादाच्या तत्वप्रणालीनुसार: 
अ) उपयोगिता म्हणजे उपयुक्तता नव्हे: उपयोगिता म्हणजे मानवी गरजा आणि तृष्णापूर्तीची वस्तूची क्षमता होय, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूपासून उपभोक्त्याचे होणारे हित होय. उपयोगिता व्यक्तीच्या समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूचे उपयोगमूल्य दर्शविते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती उपयुक्त असेलच असे नाही. उदा.: धूम्रपान करणाऱ्याला सिगारेटची उपयोगिता असते. परंतु सिगारेट आरोग्याला अपायकारक असल्यामुळे त्यात उपयुक्तता नसते. 
ब) उपयोगिता म्हणजे सुख नव्हे: उपयोगितेला सुखही म्हणता येणार नाही, कारण उपयोगिता आणि सुख ह्यात भेद आहे. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी तिचा उपभोग सुख देणारा असतोच असे नाही. उदा.: आजारी मनुष्याला इंजेक्शनची उपयोगिता असते; परंतु इंजेक्शन टोचल्याने तो सुखी होत नाही. 
क) उपयोगिता आणि समाधान वेगवेगळे: उपयोगिता ही वस्तूमधील एक विवक्षित क्षमता असते, तर समाधान ही व्यक्तीला होणारी सौख्याची जाणीव होय. अर्थात, उपयोगिता वस्तूशी संबंधित असते, तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते. उपयोगिता हे अपेक्षित समाधान असते, तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते. थोडक्यात, उपयोगिता ही उपभोगाची सुरुवात असते, तर समाधान उपभोगाचा अंतिम परिणाम असतो. 

उपर्युक्त विवेचनाच्या संदर्भात प्रा. रेगे यांनी केलेल्या संज्ञांच्या उपयोजनाची तपासणी केली असता, ते दिशाभूल करणारे आहे, असेच म्हणावे लागते. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे अर्थभेदांकडे असे दुर्लक्ष होऊ शकते. उपयोगितावादानुसार, उपयोगितेचे मापन करता येते. श्री. आल्फ्रेड मार्शल ह्यांनी उपयोगिता मोजण्यासाठी ‘युटिल्स’ (Utils) हे एकक सुचविले होते; त्याचबरोबर उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय व सापेक्ष संकल्पना असल्याने ती व्यक्तिपरत्वे बदलते अशीही भूमिका ते घेतात. या भूमिकेतील आत्मव्याघात (Self-Contradiction) उघड आहे. अशाप्रकारे, आधुनिक अर्थशास्त्राचा तात्त्विक पाया कच्चा आहे, असे आपल्याला म्हणता येईल आणि त्यामागचे कारण उपयोगितावादाच्या मूलभूत मर्यादा, हे आहे. उपयोगितावादानुसार, मनुष्यस्वभावाला अनुसरून जर कित्येकांना अधिक दिले, तर ते अधिक उत्पादन करतील, हे ध्यानात घेऊन विषम वाटणीसुद्धा सुखवृद्धीसाठी आवश्यक ठरते. कारण, व्यक्ती ह्या केवळ सुखाच्या धारक असतात. सामाजिक-आर्थिक विषमतेमुळे सुखवृद्धी होत असेल तर ती विषमताही उपयोगितावादानुसार न्याय्य ठरते. त्यामुळे, अभियांत्रिकी अर्थतज्ज्ञ विनिमयव्यस्थेत होणारे मानवाचे शोषणही, ते सुखवृद्धी करते म्हणून, न्याय्य ठरवीत असतात. अशाप्रकारे, उपयोगितावाद हा विषमता व अन्यायाला नैतिक अधिष्ठान पुरवू शकतो. “Everyone to count for one and none for more than one.” ह्या तत्त्वापासून सुरू झालेल्या उपयोगितावादाची परिणती, ‘एक हा इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचा बनत जातो.’ यात होणे शक्य आहे. “सर्व मानव समान आहेत” हे मान्य केले तरी, “काही मानव इतरांपेक्षा अधिक समान बनत जातात.” (All men are equal but some men are more equal than others.) एकूणच, हे तत्त्वज्ञान शेवटी शोषण आणि विषमता ह्यांतच परिणत होते. नीतीशास्त्रात हे तत्त्व अहंवाद (Egoism) बनते, तर राज्यशास्त्रात व अर्थशास्त्रात ते हुकूमशाही, भांडवलशाही व साम्राज्यवाद यांना तात्त्विक अधिष्ठान पुरवते. उपयोगितावादाची मूलभूत मर्यादा स्पष्ट करताना प्रा.दि.य.देशपांडे लिहितात, “एक तत्तवप्रणाली म्हणून उपयोगितावाद अपूर्ण आहे. त्याला न्यायाची जोड देणे अनिवार्य आहे.” 

परंतु आमची अर्थतज्ज्ञमंडळी अजूनही अवास्तव गृहितकांच्या कोसल्यातून बाहेर पडायला तयार नाही. अर्थशास्त्र हे ‘शुद्ध विज्ञान’ आहे आणि म्हणूनच त्याचा तत्त्वज्ञानाशी काहीही संबंध नाही, हे सिद्ध करण्यातच त्यांना धन्यता वाटते. त्यांच्या अर्थशास्त्रात उपयोगितावादी व्यक्तिवादाला आणि उपभोगाच्या उपयोगितावादी विवेचनाला प्राथमिक स्थान असते. आणि शेवटी, या सिद्धान्तनाची परिणती राज्यकर्त्यांच्या अविवेकी धोरणांचे समर्थन करण्यात आणि भांडवलशाही व हुकूमशाहीचे सिद्धांत प्रतिपादन करण्यात होते. 

आपल्या ‘Impossibility theorem’ (अशक्यता प्रमेय) ह्याचे विवेचन देताना श्री. केनेथ ॲरो लिहितात, “लोकशाहीत बहुमत घेताना परस्परविरोधी निर्णय मिळत असतात. अशी कल्पना करू, अ, ब आणि क ह्या तीनच व्यक्तींचा मिळून बनलेला एखादा समाज असेल आणि क्ष, य आणि र या तीन निर्णयांपैकी एकमताने निर्णय घ्यायचा असेल तर, तिघांच्या तीन वैयक्तिक निवडीअसतील. त्या निवडींचा क्रम असा असू शकेल: (क्ष, य, र) किंवा (य, क्ष, र) किंवा (र, य, क्ष), परंतु या स्थितीत सामाजिक निर्णयांना समान मतदान (Equal voting) न होता, सामाजिक निवड ( Social choice) अशक्य ठरते.”

तात्पर्य हेच, की लोकशाहीत लोकांच्या वैयक्तिक निवडीत कधीच एकमत होणे शक्य नाही. अशाप्रकारे, श्री. ॲरो ह्यांच्या आर्थिक विचारांची परिणती ‘लोकशाहीपेक्षा हुकूमशाही श्रेष्ठ आहे’, असा निष्कर्ष असलेल्या सिद्धान्तात होते. 

राजकीय पक्षांना वाहून घेतलेले काही लोकप्रिय विचारवंत असतात. त्यांची निष्ठा प्रामाणिक असेल तर मला काहीच म्हणायचे नाही. परंतु, एकीकडे अर्थशास्त्राला ‘शुद्ध शास्त्र’ म्हणून तटस्थ मानणे आणि दुसरीकडे राजकारण्यांच्या अविवेकी कार्यवाह्यांना शास्त्रीय मुलामा चढविणे, यासारखी दुटप्पी प्रवृत्ती अर्थतज्ज्ञांनी सोडली पाहिजे. आज जर आर्थिक सिद्धान्तनाला एकसूरीपणा आला असेल आणि म्हणून कित्येकांना ते निरस, कंटाळवाणे आणि अंधकारमय शास्त्र (Dismal science) वाटत असेल, तर त्याचा दोष आपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा बळी घेण्यासाठी राजकारण्यांना मोकळीक देणाऱ्या या व्यावसायिक अर्थतज्ज्ञांशिवाय दुसऱ्या कुणालाही देता येणार नाही. याचा अटळ परिणाम म्हणून आर्थिक सिद्धान्तनाचा स्तर आज खाली घसरला आहे. 

या संपूर्ण आर्थिक सिद्धान्तनाचा पाया ‘मानवी तृष्णा’ हा आहे. तथागत बुद्धांनी, “मानवी जीवन दु:खमय आहे आणि दु:खाचे मूळ मानवी तृष्णांमध्ये आहे.” असे म्हटले आहे. तथागत बुद्धांनी उपयोजिलेल्या ‘दु:ख’ या शब्दाचा अर्थ ‘पिळवणूक’ असा घेतला, तर तृष्णांच्या पायावर उभारलेली कोणतीही व्यवस्था पिळवणूकीला, अन्यायाला व विषमतेलाच जन्म देते, हे समजून येईल. त्यामुळे, तृष्णांचे अर्थशास्त्र म्हणजे मानवाला मानवाचेच शोषण करण्याचा परवाना देणारे अर्थशास्त्र होय. म्हणूनच न्याय्य समाज (Just society) निर्मितीसाठी तृष्णांच्या अर्थशास्त्राचा त्याग केला पाहिजे. 

आता आपल्यासमोर गरजांच्या अर्थशास्त्राचा पर्याय आहे. हे सत्य आहे की मानवी तृष्णांप्रमाणे गरजांमध्येही वाढ होण्याची प्रवृत्ती असते; परंतु गरजांच्या वाढीवर स्वाभाविकच मर्यादा असतात. कारण, साधनसंपत्तीच्या संदर्भात गरजांची वाढ ठरत असते. या गरजापूर्तीचे प्रयोजन हे ‘मानवी जीवनमानाचा दर्जा व गुणवत्ता उंचावणे’ (Increasing standard and quality of human life) हे असते. कार्ल मार्क्स ह्यांच्यासारखे विचारवंत हे जेव्हा मानवी गुलामगिरीच्या श्रृंखला तोडण्याचे विचार मांडतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा आशय सर्वसामान्य मानवाच्या जीवनमानाच्या दर्जात आणि गुणवत्तेत कशी सुधारणा करता येईल, हाच असतो. हे साध्य प्राप्त करण्याची जी साधने ते सांगतात, त्यावरून मतभेद निर्माण होऊ शकतील. मात्र ‘मानवाचे कल्याण’ (Human welfare) ह्या साध्याविषयी त्यांमध्ये एकमत दिसून येते, याविषयी शंका नाही. 

गरजांच्या अर्थशास्त्रात अनंत गरजांना कोणतेही स्थान नाही. आमच्या अर्थशास्त्राच्या बऱ्याच पाठ्यपुस्तकांची सुरुवात, “मानवी गरजा अमर्याद असतात.” किंवा “मानवी गरजा अनंत असतात.” यासारख्या – जणूकाही स्वयंसिद्ध (Self Evident) – विधानांपासून होते, जी मुळातच चुकीची आहेत. मानवाच्या गरजा अनंत नसतात आणि जरी गरजांमध्ये वाढ झाली, तरीही ती विशिष्ट मर्यादेपर्यंतच होऊ शकेल. एकेकाळी गुहेत राहणारा मानव हा आज इमारती बांधून राहतो, शिकारी मानव कच्चे अन्न खायचा आणि आजचा मानव ते शिजवून खातो. मानवी गरजापूर्तीच्या स्वरूपात बदल होईल, मात्र गरजा नेहमीच उपलब्ध संसाधनांवर अवलंबून असतील. तात्पर्य, मानवी गरजांत आमूलाग्र बदल होत नाही. गरजांचे अर्थशास्त्र नैसर्गिक साधनसंपत्तीला, पर्यावरणाला व एकूणच शाश्वतता, मानवी जीवनमानाचा दर्जा व गुणवत्ताविकास ह्यांना प्राध्यान्य देते. निसर्गव्यवस्था आणि मानव ह्यांत सुसंवाद (Harmony) प्रस्थापित करण्याचा मार्ग गरजांचे अर्थशास्त्र खुला करू शकेल. गरजांचे अर्थशास्त्र नैसर्गिक संसाधनावर आणि पुरवठाक्षमतेच्या विवेकावर आधारित आहे. निसर्गाची मानवाला देण्याची क्षमता किती, हे जाणून संसाधनाच्या उपयोगाची नीती ह्यात आहे. तृष्णांच्या अर्थशास्त्राप्रमाणे त्याचा आधार उपभोग हा नाही. तृष्णांचे अर्थशास्त्र मानवाला किती हवे, ह्याचाच विचार करते, त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर करणेही ते युक्त ठरवते. उपभोक्तावाद (Consumerism) हे तृष्णांच्या अर्थशास्त्राचेच अपत्य आहे. तृष्णांचे अर्थशास्त्र हे दोन प्रकारच्या शोषणाचे समर्थन करते.
१) मानवाने निसर्गाचे शोषण (Exploitation of nature) करणे. 
२) मानवाने मानवाचे शोषण (Exploitation of man) करणे. 

मात्र गरजांचे अर्थशास्त्र मानवी कल्याणाला व्यापक पाया प्रदान करू शकेल. कारण त्यानुसार शोषणाला तात्त्विक अधिष्ठानच उरत नाही. श्री. ईव्हान इलिच ह्यांनी ‘गरजग्रस्त माणूस’ ही संकल्पना मांडली आहे. खरे तर श्री. इलिच ह्यांनी त्याऐवजी ‘तृष्णाग्रस्त मानव’ अशी संज्ञा वापरायला हवी होती. कारण, माणूस गरजग्रस्त नसतो. गरजग्रस्त असण्यासाठी गरजांच्या अनंततेचा सिद्धांत मान्य करावा लागेल, जो की मुळातच चुकीचा आणि म्हणूनच अशक्य आहे. 

जेव्हा आपण मानवाचा विचार करतो, तेव्हा तो समग्र विश्वाचा सदस्य असलेल्या वैश्विक मानवाविषयी असला पाहिजे. तेव्हाच, “हे विश्वचि माझे घर” असे म्हणण्याचा नैतिक अधिकार आपल्याकडे येईल. मानवी जीवनाचा विचार करता, मानवी जीवनाला दोन आयाम असलेले दिसतात: एक वैयक्तिक (Individual) आणि दुसरा सामाजिक (Social). मानवाच्या वैयक्तिक बाजूची घडण त्याच्या हक्कांच्या परिपूर्तीतून होते, तर मानवाची सामाजिक बाजू त्याच्या कर्तव्यपूर्तीतून आकार घेत असते. एक व्यक्ती म्हणून आपली भूमिका आणि समाजाचा एक सदस्य म्हणन आपली भूमिका यांत जेव्हा द्वैत निर्माण होत असतील, तेव्हा सामाजिक रचनेत बिघाड उत्पन्न होईल. अशावेळी समाजसुधारणेची आवश्यकता असते. परंतु ही समाजसुधारणा कोणत्या मार्गांनी होते, याला महत्त्व आहे. कारण, मानवी हक्कांचा बळी देऊन कर्तव्यपूर्ती करणे, या मार्गाने समाज बंदिस्त होण्याची शक्यता असते. हे गुलामगिरी, संरजामशाही, हुकूमशाही व साम्यवादी व्यवस्थांत झाले आहे. याउलट, कर्तव्याचा बळी देऊन हक्कांचा उपभोग घेतल्याने समाजाचे विघटन होते, हे आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेत घडते. या हक्कांच्या आणि कर्तव्यांच्या पेचातून सुटका मिळवण्यासाठी काय करता येईल? हा आपल्यासमोरील प्रमुख प्रश्न आहे. या आव्हानाची सोडवणूक न्याय्य समाजाची (Just society) निर्मिती करण्यासारख्या प्राथमिक पण मूलगामी प्रयत्नापासून होऊ शकेल. हा प्रयत्न करण्याचे एक साधन म्हणून गरजांच्या अर्थशास्त्राकडे पाहता येईल. 

आत्तापर्यंतच्या संपूर्ण विवेचनाच्या आधारावर प्रचलित कोविड-१९ अरिष्टाकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन आपल्याला मिळाला? आपण केलेले विवेचन हे अरिष्टपूर्व जगातील सामान्य परिस्थितीमध्ये विनिमयव्यवस्थेचे व तिच्या मानवाशी असलेल्या संबंधांचे आर्थिक व नैतिक स्वरूप विशद करणारे आहे. या अरिष्टाने विनिमयव्यवस्थेच्या मुळावरच आघात केला आहे. त्यामुळे विनिमयव्यवस्थेतील अंगभूत दोष अरिष्टकाळात अधिक वाढत जाऊन शेवटी आज त्याचे सामाजिक-आर्थिक व्याधीत रूपांतर झाले आहे. विपणनव्यवस्था स्वत:च्या व्याधीस स्वत:हून बरी करते, हा मुक्त बाजारपेठी अर्थतज्ज्ञांचा प्रमुख दावा सपशेल चुकीचा ठरला आहे. तृष्णांच्या अर्थशास्त्राने नियमित झालेली संपूर्ण जागतिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. कारण, माणसा-माणसांतील सामाजिक संबंधात सौहार्द निर्माण करण्याला ही व्यवस्था प्राधान्य देत नाही. खरेतर, या व्यवस्थेला मानवी पायाच नाही आणि म्हणूनच मानवासाठी ती अनुकूल नाही. तिचे विध्वंसक रूप प्रचलित अरिष्टाने बरोबर दाखवून दिले आहे. कोविड-१९ अरिष्टाने घेतलेल्या परिक्षेत आजचा तृष्णाग्रस्त मानव, त्याने निर्मिलेल्या सामाजिक संस्था, विपणनव्यवस्था व राज्यसंस्था जवळजवळ नापास झाले आहेत.

विनिमयव्यवस्थेत जेव्हा केव्हा व्यापक बदल घडून येतात, तेव्हा त्याचे सर्वांत अधिक दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागतात. प्रचलित अरिष्टही याला अपवाद नाही. प्रचलित कोविड-१९ अरिष्टाची आर्थिक परिणती (Economic consequences of covid-19 crisis) म्हणून ज्या घटना घडून आल्या, त्या अशा: 
प्रचलित अरिष्टाचा खूप मोठा फटका अर्थव्यवस्थेच्या कृषी, उद्योग, सेवा, व्यापार ह्या प्रमुख क्षेत्रांना बसला आहे. आर्थिक घसरणीच्या काळात कामगारांचे शहरातून त्यांच्या गावी स्थलांतर सुरू झाले. या प्रक्रियेत त्यांची झालेली पायपीट, गैरसोय,बरेच जणांचा रेल्वेखाली चिरडून झालेला मृत्यू, त्यांच्या मुलाबाळांची हेळसांड, त्यांचे विलगीकरण यांसारख्या समस्यांपासून ते कामगार गावी परतल्यावर त्यांच्या बेकारीचा निर्माण झालेला प्रश्न, स्थलांतरित कामगारांचा शेतीक्षेत्रावर अतिरिक्त भार पडून निर्माण झालेली प्रच्छन्न (छुपी) बेकारी, अन्नधान्याच्या उत्पादनातील घट, ओला दुष्काळ, वस्तू-सेवांच्या पुरवठासाखळीत पडलेला खंड, अन्नधान्याच्या टंचाईतून झालेली भाववाढ, पेट्रोल दरातील वाढ येथपर्यंत, तसेच नागरी भागातील शिक्षित बेकारी, चक्रीय आणि संरचनात्मक बेकारी यांत झालेली वाढ, देशात ८५ ते ९० टक्के लोक ज्या असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांच्या, म्हणजेच ऑटो-रिक्षावाले, हातगाडीवाले, टॅक्सीवाले, दुधवाले, फळभाज्या विक्रेते, फेरीवाले, रस्त्यावरचे खेळणी विक्रेते, वडापाववाले, चहावाले, मॉलमधील तरुण-तरुणी, रद्दीवाले, कागद-काच-भंगार जमा करणारे, बांधकाम क्षेत्रातील मजूर, अर्धकुशल कामगार यांसारख्या हातावर पोट असलेल्या लोकांच्या भवितव्याचा आणि रोजगाराचा प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेत (NPA) होणारी वाढ, वित्तीय तुटीत (Fiscal deficit) वाढ, मध्येच बंद पडलेली विकासकामे, रेंगाळलेले बांधकामव्यवसाय, निर्यात घट, व्यापारतोल व व्यवहारतोल समस्या आणि याबरोबरच शिक्षणक्षेत्रातील कधीच भरून न निघणारे नुकसान. युनेस्कोच्या एका अहवालानुसार, “मागील वर्षी १८८ देशांत १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले होते. भारत देशात १५ लाख शाळा बंद आहेत. २६ कोटी विद्यार्थी व ८९ लाख शिक्षक घरी बसले आहेत. ५० हजार उच्च शैक्षणिक संस्था बंद आहेत आणि ३.७० कोटी विद्यार्थी व १५ लाख महाविद्यालयीन शिक्षक घरी बसले आहेत.” 

ऑनलाईन शिक्षणातील तांत्रिक व व्यावहारिक अडचणी, त्यातील मूल्यमापन तंत्रांची समस्या, विद्यार्थ्यांची एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत होणारी ढकलपट्टी, ग्रामीण विद्यार्थ्यांना शेतात करावे लागणारे काम व त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान इ. शैक्षणिक समस्यांमुळे ज्ञानाची दरी रुंदावली आहे. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

प्रस्तुत चर्चेच्या प्रारंभीच आपण जे दोन प्रश्न उपस्थित केले होते, ते असे: 
(१) प्रचलित अरिष्टकाळात आर्थिक समस्या इतक्या तीव्रतर का बनल्या? 
(२) अरिष्टानंतरची अर्थव्यस्था उभारताना साध्य-साधन विचार काय असायला हवा? 
यांपैकी, पहिल्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध आपणास ‘तृष्णांच्या अर्थशास्त्रा’त घेता येईल, तर दुसऱ्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर ‘गरजांच्या अर्थशास्त्रा’त मिळू शकेल असे वाटते आणि गरजांच्या अर्थशास्त्रापेक्षाही उत्तम मार्ग जर कुणी दाखवून दिला, तर त्याचाही स्वीकार आपणास करता येईल. 

आज २१व्या शतकातील मानव त्याला प्रचलित कोविड-१९ अरिष्टाने बहाल केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहे आणि हे करत असतानाच तो स्वत:चाही शोध घेत आहे. या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळतील की नाही? तो मानवी व्यवस्था उभारण्यात यशस्वी ठरेल की नाही? तो प्रचलित अरिष्टापासून काही शिकेल की नाही? नंतरची पिढी जागतिक महायुद्धांप्रमाणे प्रचलित अरिष्टालाही केवळ इतिहासातील ‘एक पान’ एवढेच महत्त्व देईल का? आज ह्याविषयी बरीच भाकिते करणे शक्य असले तरीही ती करणाऱ्यांकडून एकच अपेक्षा आहे की त्यांच्या भाकितांचे मूल्य श्री. केन्स ह्यांच्या भाकिताएवढे ठरू नये. 

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे. (तृतीयवर्ष (कला) -अर्थशास्त्र) 

अभिप्राय 3

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.