सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या उपचारपद्धतींत ॲलोपॅथी ही कालसुसंगत आहे असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ॲलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. ज्यांना ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे नाईलाजाने आयुर्वेदिक डॉक्टर व्हावे लागते अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी ते मग आयुर्वेद हे ॲलोपॅथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देण आहे, अश्या बढाया मारू लागतात. पण खरी ‘अंदर की बात’ अशी असते की, ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ॲलोपॅथीवर खार खात असतात. मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते. त्यात त्यांना सध्या विद्यमान सरकारची साथ मिळाली आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखेच झाले.
खरेतर आयुर्वेदात काही औषधे काही रोगांवर खरेच गुणकारी आहेत. पण त्या औषधांच्या शास्त्रीय कसोट्यांवर चाचण्या न घेतल्यामुळे हजार-दोन हजार वर्षांपूर्वीच्याच जुन्यापुराण्या ठोकताळ्यावर ती औषधे दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचा ‘आपल्या पूर्वजांचे प्राचीन ज्ञान’ यापलीकडे कुठलाही ठोस परिणाम जनतेसमोर दिसत नाही. अशा वेळेस जे स्वतःला आयुर्वेदाचार्य म्हणवतात त्यांनी अशा सगळ्या औषधांना सर्व शास्त्रीय चाचण्यांमधून तावूनसुलाखून प्रमाणित करणे आवश्यक नाही काय? जोपर्यंत आयुर्वेदातील औषधे ही शास्त्रीय चाचण्यांना सामोरे जात नाहीत तोपर्यंत तरी आयुर्वेद हे जडीबुटीचे शास्त्र असे समजले जाईल, हे आयुर्वेदाच्या खंद्या समर्थकांच्या कसे लक्षात येत नाही? यामुळे नुकसान तर आयुर्वेदाचेच होते ना?
म्हणूनच मला एक कळत नाही की, या आयुर्वेदशास्त्रात आजपर्यंत आयुर्वेदाचार्य म्हणवणारे अनेक ढुढ्ढाचार्य निर्माण झाले. त्यातील क्वचित कुणी शेकडो वर्षांपूर्वीच्या या चिकित्सापद्धतीत संशोधन करून काही नवीन भर घातली आहे असे झाले नाही. उलट पुरातनकालीन ऋषी-मुनींनी त्यांच्या निरीक्षणाने जी काही चिकित्सापद्धती तयार केली तीच त्यांनी ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ म्हणून पुढे चालू ठेवली. यातील एकानेही का बरे प्रयोगसिद्ध वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून योग्य त्या नोंदी ठेवत, चाचण्या घेत आयुर्वेदिक चिकित्सापद्धतीची विश्वासार्हता वाढवली नाही? बुद्धिप्रामाण्यापेक्षा शब्दप्रामाण्यावर का भर दिला?
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे आपल्याकडे विज्ञान म्हटल्यावर, दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात असलेली विमाने आणि ज्योतिषशास्त्राने मिळवलेली ग्रहांदरम्यानची अचूक अंतरे, असे सध्या वातावरण आहे. आयुर्वेद कसा थोर आहे, हे सांगताना अनेक थकत नाहीत. गेल्या ५० वर्षांत भारतीयांचे आयुर्मान जवळपास दुप्पट झाले. पण त्याला कारण आधुनिक विज्ञान आहे, आयुर्वेद नाही. आपण केलेल्या प्रयोगांचे दस्तावेजीकरण न केल्यामुळे आयुर्वेदातील अनेक शोध त्या त्या माणसांबरोबर संपले आहेत. अशाप्रकारे आयुर्वेद मागास ठेवण्यात या तथाकथित आयुर्वेदाचार्यांचाच हातभार लागला आहे. आपले संशोधन जर जागतिक स्तरावर पुढे यायचे असेल तर त्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून दस्तावेजीकरणाचे महत्त्व असतेच. म्हणून जोपर्यंत आपण वैज्ञानिक पद्धतींचा नीट उपयोग करत नाही तोपर्यंत आपण केलेल्या लहानसहान नवीन संशोधनांचा फायदा दुसरा कोणीतरी घेत रहाणारच. अशा लहान गोष्टींना मोठ्या करून जगामध्ये आपणच हा शोध लावला असे दाखवले जाणार. हे टाळण्यासाठी तरी आपल्या संशोधक डॉक्टरांनी वैज्ञानिक दस्तावेजीकरणाची सवय लावणे आवश्यक आहे असे वाटते.
अशी सवय नसणे हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहेच. कारण विज्ञान हे कधीच साचलेले डबके नसते किंवा त्यात अंतिम सत्य असे काही नसते; तर तो एक सतत वाहणारा ज्ञानाचा प्रवाह असतो. या अर्थाने विज्ञान हे निरंतर असते. कालचे सत्य आज असत्य ठरून – म्हणजेच त्यातील त्रुटी लक्षात येऊन नवीन सत्य जन्माला येते. अशाप्रकारे दर क्षणाला त्यात नवीन नवीन शोध लागत असतात आणि माणसाची प्रगती होत असते.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. कारण ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून प्रश्न विचारणे थांबले. अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तूंची व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले. आयुर्वेदही शेकडो वर्षांपूर्वी जसा होता तसाच राहिला आहे. मग अशा साचलेल्या डबक्यात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती, हा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य वाटू नये.
मोबाईल: ०९९२०१९७६८०
आयुर्वेदाचापण धर्म होऊन बसला आहे. जे लिहिले आहे, ते अनुसरा. प्रश्न विचारू नका, त्रुटी दाखवू नका, मर्यादा मान्य करू नका, पुरावे मागू नका, दुसऱ्यामधील जे चांगले, ते स्वीकारू नका, नवीन काही बघू नका. थोडक्यात, बदलूपण नका आणि वाढूपण नका.
(१) भारतात सध्या प्रामुख्याने अॅलोपॅथी (अथवा वैज्ञानिक वैद्यक’), आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या चार वैद्यकप्रणालींचा वापर वैद्यकीय व्यावसायिक करतात.
(२) आयुर्वेदातील चिकित्सा पद्धतीत ज्या उणीवा आहेत त्याबद्दल दुमत होऊ शकते पण जशी अॅलोपॅथी किंवा वैज्ञानिक वैद्यक’ शाखेला संशोधनाची (असे संशोधन जे मानवाच्या हिताचे आहे)) आवश्यकता आहे तशीच ती आयुर्वेदाला पण नक्कीच आहे हे कोणीही मान्य करेल.
(३) येथे एक महत्त्वाचा मुद्दा विसरता कामा नये. अॅलोपॅथीच्या आजवरच्या प्रगतीत खाजगी क्षेत्रातील औषध-कंपन्यांच्या संशोधनाचा फार मोठा वाटा आहे. सर्व औषधकंपन्यांचे एकमेव उद्दिष्ट असते ते अधिकाधिक नफा मिळवण्याचे. त्यामुळेच वैज्ञानिक वैद्यकाचा विकास झाला तरी त्याचा भारतासारख्या कोट्यवधी गरीब लोकांच्या देशाला अगदी अल्पप्रमाणात फायदा होतो आणि आधुनिक औषधे इतकी महाग असतात की सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाहीत. समाजहिताच्या दृष्टिकोणातून महागड्या वैद्यकीय तंत्रज्ञानाकडे बघणे आवश्यक आहे. केवळ ते वैज्ञानिक आहे म्हणून त्याचा स्वीकार करणे शहाणपणाचे नाही व आपल्या हिताचेपण नाही.
(४) आपल्या ग्रामीण व शहरी भागांत, पाणी, हवा व ध्वनी ह्यांच्या प्रदूषणामळे व अनेक अनाकलनीय बाबींमुळे जुने आजार नवीन रूप घेऊन आले आहेत व आपल्या आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांपुढे हे मोठेच आह्वान उभे आहे. कोरोना महामारीमुळे नव्या आरोग्यसमस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच माझे मत आहे की आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी केवळ वैज्ञानिक वैद्यक वा आयुर्वेद वा होमिओपॅथी ही एक वैद्यकप्रणाली समर्थ आहे असा दावा कोणी करू नये व तो केल्यास तो अज्ञानमूलक, समाजस्वास्थ्यविरोधी व समाजहितविरोधी होईल असे मी ठामपणे सुचवू इच्छितो.
(५) वर उल्लेखलेल्या चारही वैद्यकप्रणालींच्या समर्थकांनी एकत्र येऊन उमद्या मनाने, निःसंकोचपणे व पूर्वग्रह बाजूला ठेवून, आपल्या प्रणालीच्या जमेच्या बाजू व उणिवा यांचा विचार करावा व आपल्या देशाच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी एकत्रित असा सुसंघटित कार्यक्रम देशापुढे ठेवावा.
(६) आयुर्वेद म्हणजे निव्वळ औषधोपचार नव्हे. आयुर्वेद आपल्या जीवनाचा संपूर्ण विचार करतो व एक विशिष्ट जीवनशैली सुचवतो असा आयुर्वेद समर्थकांचा दावा असतो. तर आयुर्वेद कालबाह्य झाला आहे असे या लेखकाला वाटते. ज्या काळात आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या संहिता लिहिल्या गेल्या तो काळ व आजचा काळ यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे हे मान्य करूनही ज्या वैज्ञानिक वैद्यकाचा प्रस्तुत लेखकासारखे हिरिरीने पुरस्कार करतात त्या वैद्यकालापण आयुर्वेदाकडे मोकळ्या, विवेकशील मनोवृत्तीने बघण्याची जरुरी आहे.
(७) सर्व पूर्वग्रह बाजूला सारून, आयुर्वेद एक ज्ञानशाखा आहे असे समजून संशोधन करण्याची आवश्यकता आहे हे पुन्हा आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.
आयुवेद हा विशिष्ट जातबांधवानी उदातीकरण केलेली आरोग्य उपचार पध्दती आहे, अन्य शेकडो जातीचे लोक आयुवेदाला पाठिंबा देत नाहीत वा याचा उदोउदो करीत नाहीत, उटी भस्म काढा अर्क या झाड पाला औषधी आहेत आणि बहुतांशी लोक हली या वापरतही नाहीत.
लेखक जगदीश काबरे यांनी मांडलेली मते काही नवीन नाहीत,पण ती बरोबरच आहेत त्याच्या मताशी मी सहमत आहेच,पण आयुर्वेद जर खरोखरच उपयोगी असेल तर आणि तरच तो उपचार अल्प खर्चात व योग्य तो परिणाम देणारा असेल तर तो वापरला पाहिजे प्रत्यक्षात आयुर्वेदीय उपचार करतो म्हणणारे वैद्य सुद्धा नाहक जास्त फी आकारतात. तसेच अव्वाच्या सव्वा किंमत करून रुग्ण लोकांची पिळवणूक करताना इतर पथ्यी चे डॉक्टर पेक्षा काही कमी नाही इतकी पिळवणूक करतात. त्याचे जास्त दुखः वाटते.
म्हणजे अल्प खर्चात खरोखर परिणाम देणारे उपचार होणार असतील तर आयुर्वेद नक्कीच लोक स्वीकारतील.
अन्यथा नाही.
वैञानिक दृटिकोन वापरा, एवढेच येथे थोडयात सांगतो
ॲलोपॕथीला आधुनिक विज्ञानाचा पाया आहे. आयुर्वेदात माञ नवे नवे नवे प्रयोग व संशोधनाची गरज आहे.आयुर्वेदात तर नवीन संशोधनाला खूप वाव आहे. जडी-बुटीचा अनंत मोठा खजिना नवीन संशोधकां अभावी दुर्लक्षित आहे.जे आहे त्यातही धार्मिक अंधभक्तीचा दंभ ओसंडून वाहत असल्याने त्यांचेकडून काही भरीव अपेक्षा ठेवणे म्हणजे केवळ स्वप्नरंजनच ठरणार आहे!
नरेंद्र महादेव आपटे यांच्या अभीप्रायाशी मी सहमत आहे