गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १

‘आपल्या नातवंडांसाठीच्या आर्थिक संभाव्यता’ (The economic possibilities for our grandchildren) ह्या १९३० साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात अर्थतज्ज्ञ श्री. जे. एम. केन्स ह्यांनी जे भाकीत वर्तविले होते, ते असे : “२०३० सालापर्यंत जगातील जवळजवळ सर्वच आर्थिक समस्या सुटलेल्या असतील. महामंदीसारख्याच समस्या नव्हे, तर ज्या ज्या म्हणून मूलभूत आर्थिक समस्या आहेत, त्या सर्वच समस्यांची सोडवणूक होऊन, जग हे संघर्षमय युगातून निघून अधिकाधिक सुसंवादी, समृद्ध आणि परस्परपूरक झालेले असेल.” 

कोविड-१९ अरिष्टाची परिणिती म्हणून आजच्या आधुनिक मानवापुढे, आधुनिक संस्कृती आणि समाजापुढे जी संकटावस्था निर्माण झाली आहे, ती बघता श्री. केन्स ह्यांचे शतकभरापूर्वीचे भाकीत प्रत्यक्षात येण्यासाठी–जर ते खरोखरच शक्य असेल तर–अजून किती काळ लोटावा लागेल, हे आज निःसंशयपणे सांगणे कठीण आहे. वर्षभरातील जागतिक घडामोडींनी आपल्याला जाणीव करून दिली आहे की कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही. अनपेक्षित घटना घडत राहतील आणि त्यापासून आपण सतत चकित होत राहू, ही एकच गोष्ट निश्चित आहे. त्यामुळे, कोविड-१९ अरिष्टानंतरचे जग कसे असेल? याविषयी भाकीते न करता, मुळात आर्थिक अरिष्टेच का निर्माण होतात? यासारख्या प्रश्नांच्या कारणमीमांसेवर भर देत, प्रचलित अरिष्टाच्या आर्थिक पायाची अन्वेषणा करणे अधिक फलदायी ठरेल.

अर्थशास्त्राला जेव्हापासून ‘शुद्ध विज्ञान’ (pure science) बनविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, तेव्हापासून अर्थशास्त्राने तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांपासून फारकत घेऊन एक स्वतंत्र शास्त्र या रूपात स्वत:चा विकास करावा, अशी टूम जगभर निघाली आहे. याकरिता अर्थशास्त्राने शक्य तशी गृहीतकृत्ये (Postulates), बोजड गणिती तंत्रे वापरून, कोणत्याही परिस्थितीत ‘शास्त्र’ या पदवीपर्यंत पोहचले पाहिजे, अशी बऱ्याच अर्थतज्ज्ञांची भूमिका असते; परंतु हे करताना अर्थशास्त्राची मूलभूत अन्वेषणारीती, आर्थिक तत्त्वज्ञान आणि त्यातील समस्या यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. या सर्वांचा अटळ परिणाम म्हणून आर्थिक सिद्धान्तन हे वास्तवाला पारखे होत चालले आहे आणि निरपेक्ष वैश्विक नियम (Absolute universal laws) प्रतिपादन करणे, हेच त्याचे एकमेव प्रमाणवचन होऊन बसले आहे. त्यामुळे प्रचलित आर्थिक अरिष्टांची मीमांसा करण्यात ते अपुरे ठरले आहे. याउलट, प्रस्तुत लेखात मानवी अर्थव्यवहारांविषयी दोन भिन्न नीतिमार्गांची चिकित्सा करण्याचे योजिले आहे, ज्यायोगे कोविड-१९ अरिष्टकाळात आर्थिक समस्या अधिकच तीव्रतर का बनल्या आणि प्रचलित अरिष्टांतून नवी अर्थव्यवस्था उभारताना आर्थिक धोरणांच्या साध्य-साधन विचारांची दिशा काय असायला हवी, यांसारख्या प्रश्नांविषयी सम्यक दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होईल, असे वाटते. 

याकरिता, प्रस्तुत विषयाशी निगडीत अशा प्रसिद्ध झालेल्या साहित्याचा, इंग्रजी-मराठी लेखांचा आधार घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने तज्ज्ञांची मते चर्चिली असून, आवश्यक तेथे त्यांच्या विचारांचे मंथन करून त्यावर स्वतंत्रपणे लिहिले आहे. 

(अ)

दैनंदिन भाषिक व्यवहारांत आपण गरज, तृष्णा, इच्छा, अपेक्षा यांसारखे शब्द त्यांच्या रूढ अर्थांनी-समानार्थी-मानूनच वापरत असतो. त्यामुळे त्यांच्या अर्थांबाबत अनेक घोटाळे निर्माण झालेले आहेत. येथे, गरज (Need) आणि तृष्णा/अपेक्षा (Want) या संज्ञांची व्याख्या करताना त्यांपासून आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ कोणता? याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. एकाअर्थी हा ठराव आहे. 

आता, जेव्हा केव्हा आपण ‘गरज’ हा शब्द वापरू, तेव्हा त्याचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ–रूढ अर्थ नव्हे–आपण स्पष्ट केला पाहिजे. मानवी गरजा म्हणजे एक अवयवी म्हणून मानव आणि ज्यापासून मानवाच्या गरजांची पूर्ती होईल अश्याक्रयवस्तु (commodities) वा पदार्थ यांतील अनिवार्य संबंध होय. मानवी इंद्रियसंस्थेच्या जैविक क्रिया-व्यहारांच्या पूर्तीसाठी गरजांचे प्रयोजन असते. एखादी व्यक्ती (वा अवयवी) आणि क्रयवस्तू (वा पदार्थ) यांतील अनिवार्य संबंधातून गरजा आकार घेतात. ज्या कुण्या एका गोष्टीचे आपल्याला ज्ञान आहे, अशी आपली समजूत असेल–तर ही समजूत सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी–ज्याला ज्ञान होते तो विषयी अर्थात ज्ञाता (Subject) आणि ज्ञात्याच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष विषय असलेली वस्तू अर्थात ज्ञानविषय (Object) यांमध्ये जो तार्किकदृष्ट्या अनिवार्य संबंध–ज्ञानसंबंध–प्रस्थापित होणे आवश्यक असते, अशाच प्रकारचा संबंध मानव (वा अवयवी) आणि त्यांच्या गरजांची पूर्ती करणाऱ्या क्रयवस्तू (वा पदार्थ) यांमध्ये निर्माण होणे आवश्यक असते.

यासंदर्भात, ‘गरज’ ही संज्ञा आपण ‘ज्ञान होणे’ (Know) या संज्ञेप्रमाणेच वापरत असतो. उदाहरणार्थ, ‘अ’ ह्या व्यक्तीला ‘ब’ या क्रयवस्तूची गरज आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा:
(१) एक अवयवी म्हणून ‘अ’ ला ‘ब’ ची गरज आहे, आणि 
(२) ज्या वस्तूची गरज आहे, ती ‘ब’ ही वस्तू, एक संसाधन म्हणून उपलब्ध आहे. हे आपल्याला अभिप्रेत असते.

येथे, ‘अ’ आणि ‘ब’ यांतील संबंध हे ज्ञाता (वा विषयी आणि ज्ञेयवस्तू (वा विषय) यांमधील संबंधासारखेच आहेत. उदाहरणार्थ, ‘य’ या ज्ञात्याला ‘क्ष’ या वस्तूचे (येथे, विशेषतः भौतिक वस्तू) ज्ञान व्हायचे असल्यास, ‘क्ष’ म्हणून कोणतीतरी विवक्षित वस्तू अस्तित्वात आहे याची–अनुभवाने, तर्काने किंवा विवेकशक्तीने–सिद्धी देता आली पाहिजे आणि ‘क्ष’ अशी कोणतीतरी वस्तू –खरोखरच अस्तित्वात असेल तरच–अशी सिद्धी देणे संभवनीय होईल. या सिद्धीशिवाय ज्ञाता ‘य’ आणि ज्ञेयवस्तू ‘क्ष’ यांमध्ये ‘ज्ञानसंबंध’ प्रस्थापित होणार नाही. याचप्रमाणे, ज्याला गरज आहे ती ‘अ’ ही व्यक्ती आणि जिची गरज आहे, ती ‘ब’ ही क्रयवस्तू (वा पदार्थ) यांतील अनिवार्य संबंधाला आपण ‘गरजसंबंध’ (Need relations) म्हणूया.

येथे आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी, की ज्याप्रमाणे ‘क्ष’ अशी एखादी भौतिक वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याशिवाय-कमीत कमी ज्यावरून तिच्या अस्तित्वाचे अनुमान करता येईल, अशी वेदनदत्ते (Sense-datum) लाभल्याशिवाय ‘य’ या ज्ञात्याला ‘क्ष’ चे साक्षात ज्ञान होणे अवघड होऊन जाईल. परंतु गरजांविषयी असे म्हणता येणार नाही. ज्या ‘ब’ या क्रयवस्तूची गरज ‘अ’ ला आहे, ती क्रयवस्तू ‘अ’ समोर प्रत्यक्ष त्याचवेळी हजर असणे आवश्यक नाही. खोलीत ठेवलेला टेबल, ज्ञाता खोलीबाहेर गेल्यास अदृश्य होईल, अशी शंका काही तत्तववेत्यांना वाटत असली, तरी विक्रिसाठी आणलेला टेबल, त्याला मागणी असल्याशिवाय खोलीतून अदृश्य होणार नाही, याविषयी अर्थतज्ज्ञ निश्चिंत राहू शकतात. त्यामुळे, गरजसंबंध हा ज्ञानसंबंधाप्रमाणेच असला तरीही, येथे काही बाबतीत त्यांचे वेगळेपण लक्षात घेणे हितावह ठरते. 

आता, आपल्याला अभिप्रेत असलेल्या ‘गरज’ (need) ह्या संज्ञेच्या अर्थाची ‘तृष्णा/अपेक्षा’ (want) या संज्ञेशी तुलना करून बघूया. त्याकरिता, ‘तृष्णा’ या संज्ञेद्वारे आपल्याला काय म्हणायचे आहे, ते समजावून घेऊया. ज्याप्रमाणे आपण ‘गरज’ ही संज्ञा ‘ज्ञान होणे/जाणणे’ (know) या संज्ञेप्रमाणे वापरू शकतो, त्याचप्रमाणे ‘तृष्णा’ ही संज्ञा ‘कल्पिणे, वाटणे वा समजणे’ (imagine, feel or believe) याप्रमाणे उपयोजू शकतो. यासंदर्भात एक उदाहरण लक्षात घेऊया: जर ‘य’ या व्यक्तीची केवळ अशी कल्पना असेल किंवा तिला असे वाटत असेल की, तेथे ‘क्ष’ अशी भौतिक वा अतीत अशी कोणतीतरी वस्तू अस्तित्वात आहे (आणि भलेही मग तिने ‘क्ष’ ची अनुभव, तर्क किंवा विवेकशक्ती यापैकी कोणत्याही मार्गाने सिद्धी केली नसली तरीही), तर केवळ त्या कल्पनेच्या आधारे ‘क्ष’ अशी एखादी विवक्षित वस्तू, त्या किंवा इतर क्षणी, अस्तित्वात आहे, याची निःसंशयपणे सिद्धी देता येत नाही आणि म्हणूनच ‘य’ ची कल्पना खात्रीशीर आहे, असे मानता येत नाही. 

मानवी तृष्णांचे स्वरूपही कल्पनांप्रमाणेच असते. जर मला ‘क्ष’ या वस्तूविषयी तृष्णा असेल, तर फक्त याच कारणामुळे, ‘क्ष’ अशी एखादी विवक्षित वस्तू खरोखरच अस्तित्वात असलीच पाहिजे, असे आपल्याला म्हणता येणार नाही. जर माझी तृष्णा ही ‘अमृत’ नावाच्या एखाद्या गोष्टीविषयी असेल, तर फक्त याच आधारावर ‘अमृत’ म्हणून एखादी गोष्ट खरोखरच अस्तित्वात असलीच पाहिजे, असे कुणालाही खात्रीने म्हणता यावयाचे नाही. कारण, आपली ‘क्ष’ वस्तूविषयीची तृष्णा, आपल्याला ‘क्ष’ वस्तूविषयी जे सांगते, त्यापेक्षा अधिक आपल्या स्वत:विषयी सांगते. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती अशी : तृष्णा ही विषयीनिष्ठ (Subjective) असते. जर ‘अ’ ह्या व्यक्तीला संकल्पस्वातंत्र्य असेल आणि ‘ब’ सारख्या कुठल्याही गोष्टीविषयी तृष्णा ठेवण्यास ती मुक्त असेल, तर या संकल्पस्वातंत्र्याच्या आधारे ‘अ’ ही व्यक्ती कोणत्याही वस्तूविषयी – अस्तित्वात असलेल्या वा नसलेल्या – तृष्णा बाळगू शकेल. मानवाचे हेच स्वातंत्र्य, ‘मानवी तृष्णा अनंत असतात.’ या विधानाची सिद्धी देते. 

याउलट, मानवी गरजा अनंत व अमर्याद असणे अशक्य आहे. मानवी गरजांत वाढ होऊ शकेल, पण एका निश्चित मर्यादेपलीकडे ही वाढ होत नाही. गरज ही वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर समान असणे शक्य आहे, कारण इंद्रियसंस्था(अवयवी) व आवश्यक वस्तू यांतील अनिवार्य संबंधालाच जर आपण ‘गरजसंबंध’ म्हटले आहे, तर एक मानव म्हणून आपल्या व इतरांच्या गरजा सारख्याच असणे शक्य असते; पण म्हणून आपल्या आणि इतरांच्या तृष्णाही सारख्याच असल्या पाहिजेत, असे मानण्यासाठी काही ठोस आधार आपल्याजवळ नसतो. ज्याप्रमाणे मला ‘क्ष’ ची गरज आहे, त्याचप्रमाणे इतरांनाही ‘क्ष’ ची गरज असेल, असे मी म्हणू शकतो; परंतु, मला ‘क्ष’ विषयी तृष्णा आहे म्हणून इतरांनाही ‘क्ष’ विषयी तृष्णा असलीच पाहिजे, असे मला म्हणता येणार नाही. परंतु याचा अर्थ असासुद्धा नाही की माझी आणि इतर कुणाची एखादी तृष्णा सारखीच असण्याची शक्यता मी नाकारत आहे. आता, तृष्णा आणि समाधान यांचा विचार करूया. तृष्णा आणि समाधान या विषयीनिष्ठ (Subjective) संज्ञा आहेत, त्यामुळे त्यांचा प्रयोग हा केवळ ‘मी’ या प्रथमपुरूषी एकवचनी कर्त्याबरोबरच करता येईल. (परंतु व्यवहारात आपण अगदी सैलपणे शब्दप्रयोग करत असतो.) मानवी गरजांचे समाधान (वा पूर्ती) करणे शक्य आहे. कारण मानवी गरजा मर्यादित संसाधनांच्या प्रमाणात पूर्ण होऊ शकतात; परंतु मानवी तृष्णांचे अनंत स्वरूप पाहता त्यांची पूर्णपणे तृप्ती होणे अशक्य आहे. मानवी तृष्णा ह्या कल्पित व भावविश्वातील अतीत गोष्टीविषयक असू शकतात किंवा मग वर्तमानस्थितीत उपलब्ध नसलेल्या; परंतु भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही विवक्षित गोष्टीविषयी असू शकतात. हे भविष्य आपल्यापासून किती दूर असू शकते, याचा अंदाज स्वर्गाच्या (Heaven) कल्पनेवरून सहज लावता येईल. त्यामुळे, स्वर्गाची भाबडी कल्पनासुद्धा अशाच मानवी तृष्णांतून आकारास आली असणे शक्य आहे. याबरोबरच, तृष्णा या मानवाला तात्काळ उपलब्ध होतील, अशा पदार्थांविषयी किंवा क्रयवस्तूंविषयी सुद्धा असू शकतात. 

आता, एक विवक्षित प्रकारची वस्तू जर मला हवी असेल आणि ती माझ्याजवळ उपलब्ध नसेल, तसेच त्या वस्तूविषयीची माझी तृष्णा अधिक तीव्रतर असेल, तर अशा परिस्थितीत ती गोष्ट (वा क्रयवस्तू) ज्याच्यापाशी आहे, अशा व्यक्तीकडून मिळवून मला स्वत:च्या तृष्णांची परिपूर्ती करावी लागेल. सामान्यत: मानवी तृष्णापूर्तीची जी साधने आहेत, त्यापैकी प्रमुख चार साधने अशी:
१) मी त्या व्यक्तीला विनंती (request) करू शकेन. 
२) मी त्या व्यक्तीजवळील वस्तूची चोरी (steal) करू शकेन. 
३) मी त्या व्यक्तीवर वस्तू देण्यासाठी दबाव/बलप्रयोग (force) करू शकेन. 
४) मी त्या व्यक्तीकडून ती वस्तू खरेदी (buy) करू शकेन. 
मानवी जीवनात या पर्यायांमधून निवड करण्याचे भिन्न प्रसंग अनेकदा येतात. यासंदर्भात श्री. सुरेंद्र बारलिंगे ह्यांनी लिहिले आहे, “विशिष्ट परिस्थितीत या चारही पर्यायांचा – विनंती, चोरी, बलप्रयोग, खरेदी यांचा – शोषणासाठी वापर केला जाऊ शकतो. खरंतर, मानवी गरजापूर्तीकरितासुद्धा या मार्गांचा अवलंब केला जाऊ शकतो; परंतु मानवी तृष्णांच्या संदर्भात ते अधिक लागू व तीव्रतर असतात.”

येथे आणखी एक खुलासा करावा लागेल, तो असा: जरी तृष्णा ही विषयीनिष्ठ (खाजगी) गोष्ट असली; तरी अशाच प्रकारच्या तृष्णा इतर लोकांच्याही असणे संभवनीय आहे आणि ज्या वस्तूविषयी ती तृष्णा आहे, तिच्यावर मालकी नसल्याने असंतुष्ट व असमाधानी असलेले लोक – आपल्या तृष्णापूर्तीसाठी – संघटन उभारू शकतात. असे संघटन करणे, जेव्हा अशक्य असते, तेव्हा वैयक्तिक पातळीवर तृष्णापूर्तीसाठी उपर्निर्दिष्ट साधनांपैकी एकातरी साधनाची निवड व्यक्तीला करावीच लागते. 

आता, या चार साधनांपैकी ‘विनंती करणे’ किंवा ‘चोरी करणे’ हे मार्ग आपण निवडू शकू; परंतु तृष्णापूर्तीसंदर्भात पहिला मार्ग गैरलागू तर दुसरा मार्ग अनैतिक म्हणूनच अप्रशंसनीय, असा आहे. त्यामुळे, उर्वरित दोन पर्यायांचा विचार करूया, ते म्हणजे– ‘बलप्रयोग’ आणि ‘खरेदी’. 

सामान्यतः, एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीची वस्तू बळकावून घेणे स्तुत्य मानले जात नसले तरी इतिहासाचा दाखला असा आहे की, एका देशाने दुसऱ्या देशावर बलप्रयोग करून वा दबाव आणून त्यांचा भूप्रदेश हस्तगत करणे, तेथील जनतेला गुलाम करणे, तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा यथेच्छ वापर करणे यांसारख्या गोष्टींना राष्ट्रवादी तर्कशास्त्राने प्रसंशनीय, स्तुत्य ठरविले होते. आत्यंतिक राष्ट्रवाद जेव्हा आपले परमोच्च टोक गाठतो, तेव्हा ‘युद्ध’सुदधा अशाप्रकारे समर्थनीयच ठरविले जाते. अर्थात, मानवी संहारसुद्धा तृष्णापूर्तीसाठी समर्थनीय ठरू शकतो. एकूणच, बलप्रयोगाचा मार्गसुद्धा इष्ट नाही, असेच म्हणावे लागेल. 

आता, शेवटी उरला तो खरेदीचा अर्थातच विनिमयाचा (exchange) मार्ग! श्री. सुरेंद्र बारलिंगे लिहितात, “साधारणतः खरेदीमध्येसुद्धा शोषण असते, या गोष्टीवर आपला विश्वास बसणे कठीण आहे. परंतु, वस्तुविनिमयाची जागा जेव्हा मुद्राअर्थशास्त्राने घेतली, तेव्हा अशाप्रकारची शक्यता अधिकच तीव्रतर झाली आहे. याचा अर्थ असा नाही की, मुद्रापूर्व अवस्थेत आणि वस्तुविनिमयातही शोषण नव्हतेच. वस्तुत: वैयक्तिक पातळीवर अत्यंत गरजू माणसाची, ज्या वस्तूची त्याला गरज आहे, अशा वस्तूवर मालकी असणाऱ्या किंवा त्यांचे उत्पादन, विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून अधिक पिळवणूक होणे शक्य आहे. समान पातळीवर सामर्थ्यशाली असलेल्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती दुसरीचे शोषण करू शकेल, असेही शक्य आहे. यासंदर्भात श्रृंखलाबद्ध श्रमाचे (Bonded labour) उदाहरण सर्वविदित आहे. परंतु, मुद्राअर्थव्यवस्थेत विनिमयप्रक्रियेद्वारे शोषणाची नवनवी सभ्यरूपे आकारास येऊ लागली आहेत.” 

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे. (तृतीयवर्ष (कला) -अर्थशास्त्र) 

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.