सुधारकचा अंक प्रकाशित करण्याच्या टप्प्यात असतानाच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (IGNOU) ज्योतिषावर एक स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे जाहीर केले. हे एक अ-शास्त्रीय पाऊल आहे असे आम्हांला वाटते.
२००१ साली मुरलीमनोहर जोशी यांनी वाजपेयींचे सरकार असताना UGC मार्फत असाच एक अभ्यासक्रम विज्ञानशाखेत सुरू करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला होता आणि तो अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधीच बंद करण्यात आला. काही वर्षांनी मात्र असे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू झाले – ग्वाल्हेर, दिल्ली, रामटेक, बनारस वगैरे. नुकताच जाहीर केलेला हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्यामुळे आता अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. IGNOU ने जरी तो कलाविभागात घातला असला तरी अभ्यासक्रमाच्या वर्णनाप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रहांचे ज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय हे शिकवले जाईल आणि नंतर तेच ज्ञान ते स्वत:च्या उपजीविकेकरता वापरू शकतील असे म्हटले आहे.