गावापासून दूर जंगलातल्या
वावराच्या धुऱ्यावर
वावरातला बारीक सारीक गोटा
वावर सप्फा करावा म्हणून
वावरातून वजा होत
जमा होत होत जातो
वावराच्याच बांधावर
गोट्यावर गोटा
एक्कावर एक करून
साल दरसाल
मिर्गाच्या तोंडी
ठेवत गेलं की
त्याचाच कंबरीएवढा बनतो बांध
कळत नकळत
गोट्यावर गोटा
रचलेल्या बांधाच्या भरोशावर
आम्ही काहीसे अस्तो बिनधास्त
कारण
थोडी का होईना
त्यामुळं रोखली जाते
जंगली जनावरांची अतिक्रमणं
दरसाल पाण्यासंग
वाहून जाणारी
वावरातील माती
राहते वावरात बांधामुळे टिकून
बांधाच्या या बांधणीमुळे
मोकाट जनावरं करत असलेलं
पिकांचं नुकसान
किमान नावापुरतं तरी
कमी होत असतेच.
खडे निवडून निवडून
गहू सप्फा करावं
तसं वावर सप्फा होत जातं
साल दरसाल
गोटे वेचून वेचून
वावर सप्फा झालं तरी
बांध बनायचा रुकत नाही.
मग जंगलातले,
नाल्यातले,
इकडचे तिकडचे
जिथचे भेटले तिथचे
गोटे येऊन पडतात बांधावर
बांध कंबरीएवढा झाला की
वावर एखाद्या गडासारखं
अन् बांध त्याच्या बुरुजासारखा
भासत राहतो
वावराभोवताली तार कंपाऊंड
जल्मात पाहू न शकणाऱ्या डोळ्यांना.
जंगली जनावरांच्या
उभी तूर अन् कापसाच्या गच्च भरल्या बोंड्या
भुकेखातर खाऊन जाण्याला
अतिक्रमण तरी कोणत्या तोंडाने म्हणावं
कळतही नाही वळतही नाही.
अतिक्रमण कुणी केलं याचा पत्ता लावला
तर साला आपणच पकडलं जाऊ शकतो
याचा अदमास घेऊन भीतीने
अतिक्रमण शब्दच जिभेवर
चॉकलेट गोळीसारखा
चोखून चोखून
जिरवून टाकावा लागतो.
पोटाचा प्रश्न छाताडावर
आपले पंचरंगी दातं बाहेर काढून
खदाखदा हासत हासत नाचतो
तेव्हा
नैतिकता कुठे कशी शेन खाले जाते
समजत नाही.
कनकीच्या उंड्यात
बारुदीचे गोळे भरून,
शेजारच्या गावातले
बंदूकवाले शिकारी बोलवून
रानडुकरं, रोही मारताना
जराही टपकत नाही
डोळ्यातून पानी
त्यांचं पिकांचं ओरबाडून खाणं
व्यापाऱ्यांचं,
दलालांचं,
कृषी मालाच्या दुकानांचं
दिवसाधवड्या लुटणं
क्रॉप लोनच्या भानगडीत
बँक ऑफिसरच्या निर्लज्ज हलगर्जीपणाने
बँकेत सतराशे छप्पन चकरा मारणं
पोटाचं पानी पानी करून टाकतं
मग
डोळ्यात तरी कसं येणार पानी ?
हमीभाव
*******
यावर्षीही
हमीभाव जाहीर केला
केंद्र सरकारने
दरवर्षीप्रमाणे
बाप, मोठा बाप अन् मोठा भौ
टक लावून आईकत होते
डोये फोडून पाहत होते
हमीभाव जाहीर करणारा
कृषीमंत्र्याचा
प्रधानमंत्र्याचा
फसवा आश्वासक चेहरा,
त्यांच्या ओठाची लबाड हालचाल
साडे सातच्या बातम्यात.
तुरी अन् कापसाशिवाय
कोण्या पिकाले किती हमीभाव
याचा त्यांना पत्ता नसतोच बहुधा.
गेल्यावर्षी तुरी ऐवजी
तुराट्याच घरी आल्या आंतरपीक म्हणून
कापूस बम पिकुनही
हमीभाव कागदावरच राहिला
कापूस घरी येताच गंजी पाहून सावकारही
दैतासारखा झोंबला
अन् होता नव्हता कापूस मनमानी भावानं
विकत घेऊन गेला
म्हणे
पेरणीची, खता-मुताची उधारी पिकांवर घेतली ते बरं.
सातबाऱ्यात साऱ्या दुनियेची नावं
कोणती केस करता येत नाहीत
अन् क्रॉप लोनही घेता येत नाही.
मग
याचे त्याचे दाढे झिजवल्याशिवाय कसं जमेल.
राजराहुल
मु. पो. तारासावंगा, ता. आष्टी जि. वर्धा
संपर्क : ७०३८२९२४५३