कापूस उलंगून गेल्यावर
********************
कापूस उलंगून गेल्यावर
काहीच नाही राहत शिल्लक
आशा,
निराशा
अन्
वाळलेल्या पऱ्हाट्याशिवाय
कापूस उलंगून गेल्यावर
शिकारीसाठी दडून बसलेल्या शिकाऱ्यासारखे
दडून बसलेले सावकार अलगद पडतात बाहेर
जे बहुतांश स्वतःच असतात व्यापारीही.
मिरगात सरकी, खात-मूतासाठी कधीतरी घेतलेले
उसने पैसे वसूल करण्यासाठी लावतात तगादा
अन्
नेमका डाव साधून
घेतात कापूस बेभाव विकत
कापूस उलंगून गेल्यावर
अनेक स्वप्नांच पीक ओरबाडून नेलं जातं
चोराने अर्ध्या रात्री कापूस चोरून नेल्यासारखं
मुलांचे कपडे,
मुलीची सायकल,
बायकोची साडी
अन्
भोकं पडलेली बनियन सुद्धा
विकत घेणं कठीण होऊन जातं
कापूस उलंगून गेल्यावर.
शेवटी
काही राहीलंच तर राहतं
भणंग वावर,
वावराच्या धुऱ्यावर ठेवलेल्या पऱ्हाट्या
तुरीची फणं
नैराश्य
अन्
नैराश्यातून नव्या मिर्गासाठी
उगवणारी
नवी उमेद
अवकाळी पावसाच्या येण्याने
***********************
अवकाळी पावसाच्या येण्याने
जिथं स्वप्न फुलतात
अन्
करपूनही जातात…
तिथं
या बहुरूपी अंतर्मनातले
अनेक माणसं पडतात बाहेर
त्यापैकी
एखाद्या कवी-लेखकाला
सुचू लागते एखादी कथा, कविता
अन्
बरंच काही
अवकाळी पावसाच्या येण्याने.
मनाच्या कोण्यातरी कोपऱ्यात
आदिम काळापासून
वसती करून राहणारा आदिवासी
करू पाहतो पावसाने चिंब भिजून थिजलेल्या मोराची शिकार
घरी वाट पाहत बसलेल्या बायको
अन्
लेकरासाठी
अवकाळी पावसाच्या येण्याने.
अवकाळी पावसाच्या येण्याने
कोलमडून पडतो कास्तकार
कापणीला आलेला गहू
वेचनीला आलेला कापूस
अन्
संत्र्यानी भरगच्च भरलेला बगीचा
जेव्हा पाऊस झोडपून काढतो.
अवकाळी पावसाच्या येण्याने
फिरू पाहतो एखादा प्रियकर
आपल्या प्रेयसीसह धुक्याने भरलेल्या
ढगाळ वातावरणात
अन्
पुढे होऊ घातलेल्या
सर्दीची कोणतीही भीड न ठेवता
भिजू पाहतो तिच्या हातात हात घालून
अवकाळी पावसाच्या संतत धारामध्ये
कोणत्याही छत्री-रेनकोट शिवाय.
तसं म्हटलं तर
बरंच काही
घडून-बिघडून जातं
अवकाळी पावसाच्या येण्याने.
मात्र तरीही
मनामनातले अनेक माणसं
कित्येक आशा मनात जाग्या ठेवून
तगवतात स्वतःला
अवकाळी पावसाच्या आगमनानंतर
गुलाबी थंडीच्या गोष्टी
*****************
….हिवाळ्याचं हीव
सुरू होताच
नसलेली ती सांगू पाहते
गुलाबी थंडीच्या गोष्टी
ती गोष्टी सांगत राहते
मी ऐकत राहतो
ऐकता ऐकता
कल्पनेच्या कॅनव्हासवर
रेखाटून अनुभवू लागतो तिच्या गोष्टी
तेव्हा सारी भलतीच चित्रं दिसू लागतात….
कापसाचा दुसरातिसरा वेचा तरी
जरा बरा निघावा म्हणून
लेटनाइट पाणी ओतणारा बाप
मध्यरात्रीच्या सुमारास दवानं करपून गेलेली
नुकतीच फुलावर आलेली तूर
हिवानं-दवानं बिमार पडून मेलेली
बाह्यडी बकरी
रात्रीच्या प्रहरी जागली करताना
तापात पडून जळलेला गुलाब बुढा
अन्
त्याची म्हतारपणी निराधार झालेली जानकी बुढी
व त्याचा अपरिपक्व दारुडा पोरगा.
ट्रॅक्टर अलटीपलटी होऊनही मरता मरता वाचलेलं
असह्य मुक्या माराला चुपचाप सहन करणारं
गावातल्या गल्लीतलं सोळा सतरा वर्षाचं पोट्टं
इत्यादीइत्यादी
वगैरेवगैरे
तिच्या गुलाबी थंडीच्या गोष्टी
ऐकता ऐकता
अशा कितीतरी थंडीच्या गोष्टी आठवू लागतात
ती सांगत राहते नॉनस्टॉप
सतत बडबड करणारा
मी ऐकत राहतो
ऐकता ऐकता
आता तिचं बोलणं
कितीही बरं वाटत असलं
कितीही गुलगुलू वाटत असलं
तरी
तिच्या गुलाबी थंडीच्या गोष्टीपेक्षा
या अशा कितीतरी जुन्यापुराण्या थंडीच्या गोष्टी
भरवतात, भरवत राहतात
कायमच छाताडात धडकी…