निरपेक्ष म्हणजे जे सापेक्ष नाही ते. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘धर्माला सापेक्ष नाही ते’, म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रतिक्रियावादी शब्द आहे, क्रियावादी नाही. पहिल्यांदाच हे अशासाठी सांगायचं की कोणतीही निरपेक्षता ही सापेक्ष नसण्यात असते, अन्यथा निरपेक्षतेला स्वतंत्र अस्तित्व नाही. अर्थात निरपेक्षता ही वस्तूनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ आहे. अजून थोडं स्पष्ट करायचं झालं तर एक लोकप्रिय उदाहरण घेऊ. ‘अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव’ असं जेस बोवेन म्हणतो. या विधानाचा अर्थ असा की अंधाराला स्वतंत्र अर्थ नसून प्रकाशाचा अभाव असलेल्या स्थितीला आपण अंधार म्हणतो. थोडक्यात काय तर अंधार तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रकाश नसेल.
मासिक संग्रह: ऑक्टोबर , 2020
मन केले ग्वाही
‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या विषयावर ऑक्टोबरचा विशेषांक काढायचा संपादकांचा मानस आहे. नास्तिक्य हे केवळ देवाला नाकारण्यातून आलेले नसून अफाट वाचन, अभ्यास, विज्ञानाशी त्याची सांगड, चिकित्सा असे सारेच त्यामागे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. “बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे” अशी ह्या अंकाची मध्यवर्ती कल्पना असावी असे त्यांनी ठरवले आहे. समस्त सृष्टीपेक्षा मनुष्यसमाज असे संपादकांना म्हणायचे आहे असे मानते. माणसे बुद्धिप्रामाण्यवादी वागू लागल्याने सृष्टीचे म्हणजे समग्र जीवसृष्टीचे काही वेगळे भले होईल की नाही असा विचार मी केलेला नाही. आपण मनुष्यवस्तीच्या परिप्रेक्ष्यातूनच विचार करत असतो.
धर्म आणि हिंसा
आज ‘धर्म’ ह्या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन…. हे शब्दोच्चारही मनात दहशत निर्माण करताहेत. धर्माच्या नावाखाली जगभर चाललेला उच्छाद केवळ उद्विग्न करणारा आहे.
घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला धर्मच जबाबदार ठरावा…. धर्माचं आपलं आकलन इतकं तोकडं असावं……. बिनदिक्कतपणे गलिच्छ राजकारणासाठी….. सत्ताप्राप्तीसाठी…. स्त्रीच्या उपभोगासाठी…. दलितांच्या खच्चीकरणासाठी तो वापरला जावा…. आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं! धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो का माणसाची? की धर्माची ढाल करत वेगळंच काही राजकारण जगभरात चालू आहे? ह्या सगळ्या विध्वंसामागे सत्तालालसेची प्रेरणा कार्यरत आहे का?